ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, November 4, 2019

गाडी बुला रही है...


"गाडी बुला रही है…"
🚂🚂🇿🇦🇮🇳📚📚🚂🚂
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६

या फोटोमध्ये दिसणारी ट्रेन साधीसुधी ट्रेन नाही. एका माणसाचं आणि दोन देशांचं आयुष्य बदलून टाकणारी ट्रेन आहे ही. याच ट्रेनमधून, मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाला प्रस्थापित व्यवस्थेनं प्लॅटफॉर्मवर ढकलून दिलं आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आयुष्यातलं खूप मोठं सत्य त्याला भेटलं. 'मोहनचा महात्मा' होण्याची खरी प्रक्रिया इथूनच सुरू झाली, असं मानलं जातं.

नाही, या फोटोमधे दिसणारी ट्रेन खरीखुरी ट्रेन नाही आणि हा प्लॅटफॉर्मसुद्धा दक्षिण आफ्रिकेतला नाही. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या 'इस्पॅलियर हेरिटेज स्कूल' या शाळेच्या आवारात ही रचना केली आहे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी!

दगडाच्या मूर्तीला देवाची प्रतिकृती न मानता देवच समजून तिला मनोभावे पूजणारी आपली संस्कृती. अशा संस्कृतीमध्ये, मोहनचा महात्मा करणाऱ्या ट्रेनची ही 'प्रतिकृती' आहे, असं मला म्हणावंसं वाटत नाही. या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरलं की समोरच्या विस्तीर्ण पटांगणात महात्मा गांधींचं जगातील पहिलं भव्य धातू स्तंभ शिल्प, सचिन जोशी आणि श्याम लोंढे या मित्रांनी उभं केलेलं दिसतं.

महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, शिक्षण क्षेत्रात अनेक व्यावहारिक प्रयोग करीत, 'इस्पॅलियर' नावाची ही प्रयोगशील शाळा सचिन जोशी चालवतात. झाडा-झुडपांना स्वतःच्या कलानं वाढू देण्यासाठी फक्त आधाराला उभी केलेली भिंत किंवा रचना असा 'इस्पॅलियर' या मूळ फ्रेंच शब्दाचा अर्थ. शाळेच्या नावावरून इथल्या शिक्षणपद्धतीचा अंदाज आला असेल तुम्हाला. 'इस्पॅलियर हेरिटेज स्कूल'च्या संपूर्ण परिसरात शिक्षणाबद्दलच्या इतक्या अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणलेल्या आहेत की, या परिसरात एखाद्या मुलाला कुठल्याही सूचनांशिवाय फक्त फिरू दिलं तरी ते खूप काही शिकून जाईल. मुलंच कशाला, मोठ्या माणसांनीसुद्धा शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी या वास्तूच्या काना-कोपऱ्यात पेरून ठेवलेल्या आहेत.

शाळेच्या भिंतीवर रंगवलेली पुस्तकांची कव्हर्स, गोथिक शैलीतल्या बांधकामात बसवलेले रविंद्रनाथ टागोरांचे ग्रीक तत्वज्ञांसारखे शिल्प, लपाछपी खेळण्यासाठी आणि गोष्टी सांगण्या-ऐकण्यासाठी खास सीतागुंफेसारख्या बनवलेल्या छोट्या-छोट्या जागा, झाडाखालचा वर्ग, वरच्या मजल्यावरून खाली यायला घसरगुंडी, भिंतीमध्ये कोरलेली महत्त्वाची ऐतिहासिक सामाजिक घटना-चित्रं, अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण त्याबद्दल वाचून किंवा फोटो बघून या गोष्टी समजणार नाहीत. त्या प्रत्यक्ष जाऊन अनुभवल्याच पाहिजेत.

तशीच ही मोहनचा महात्मा बनवणारी ट्रेन आणि त्या ट्रेनच्या बोगीत रचलेली शाळेची लायब्ररी! अशी ट्रेन आणि असा प्लॅटफॉर्म प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अनुभवायला मिळतो, पण त्या प्रत्येक मोहनचा महात्मा नाही होत. मग 'त्या' मोहनचा महात्मा करणारी ही ट्रेन प्रत्येकानं किमान बघून तरी यावी, मनात साठवावी. त्या प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर एकट्यानं बसून आपल्या आयुष्यातला 'ट्रेन प्रसंग' आठवावा आणि आपल्या आत्म्याला त्या महात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करावा…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
०१/११/२०१९


Share/Bookmark

1 comment: