“गोड मानूनी घे रंगपूजा…”
पर्यावरणाचं रक्षण की भौतिक विकास? दोन्ही एकाच वेळी शक्य आहे का? नसेल तर दोन्हीतलं नेमकं काय निवडायचं? आणि कुणी निवडायचं? भविष्य घडवायला निघालेल्या पिढ्यांनी की पैलतीरी नजर लागलेल्या पिढ्यांनी? एकाचा विकास म्हणजे दुसऱ्यासाठी भकास, एवढं सरळसोपं गणित आहे का ते?
त्यापेक्षा हे सूत्र कसं वाटतंय - एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल ॲन्ड अपोझिट रिॲक्शन. आता आपण ॲक्शनवाले की रिॲक्शनवाले, एवढंच ठरवायचं. मग चूक बरोबर, योग्य अयोग्य, नैतिक अनैतिक, हे गोंधळ मागं पडतील कदाचित. हे जास्त सोपंय ना?
कोकणातला निसर्ग, नैसर्गिक संपत्तीचा मोह, मोहातून घडणाऱ्या ॲक्शन, आणि प्रत्येक ॲक्शनला निसर्गातून (आणि निसर्गातल्या माणसाकडून) येणारी रिॲक्शन. हे सगळं बघायला मिळेल ‘दशावतारा’च्या फॉरमॅटमध्ये. थँक्स टू सुबोध खानोलकर आणि मित्रमंडळी.
बाबुली मेस्त्रीचा मोठा पडदा व्यापून टाकणारा दशावतारी परफॉर्मन्स जबरदस्त परिणामकारक. भरत जाधव, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, विजय केंकरे, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, गुरु ठाकूर, महेश मांजरेकर, आणि दिलीप प्रभावळकर, ही नावं थिएटरमध्ये गर्दी खेचायला पुरेशी आहेतच; पण ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं पार्श्वसंगीत आणि देवेंद्र गोलटकर यांचा कॅमेरा याची जादू अनुभवायला थिएटरमध्ये जाणं भाग आहे.
डोळ्यांना सुखावणारा कोकणातला निसर्ग आणि कानाला गोड वाटणारी कोकणी भाषा. लहानपणापासून ऐकलेल्या बघितलेल्या खऱ्या-खोट्या कथा दंतकथा आणि त्यातून निर्माण झालेलं कोकणाबद्दलचं एक गूढ आकर्षण. ‘दशावतार’ सलग किंवा तुकड्या-तुकड्यात बघण्याची मजा. पौराणिक पात्र आणि प्रसंग यांच्याशी जुळलेली नाळ. आजच्या जगण्यातल्या प्रश्नांची नकळत टोचणी. वाईटावर चांगल्याचा विजय आणि जनतेच्या हातात खरी ताकद हा आशावाद. पुढं काय होणार यापेक्षा कसं होणार याची जास्त उत्सुकता.
आणि हे सगळं आपल्या मराठीत बघायला मिळतंय याचा अपार आनंद.
थँक्यू सुबोध खानोलकर. असेच सिनेमे बनवत रहा. संदर्भ कोकणाचा असल्यामुळं, ओन्ली समुद्र इज द लिमिट…
दिलीप प्रभावळकर सर! माणूस आहात की यक्ष? की एखादा शापित गंधर्व? ‘दशावतार’ संपून आता भैरवी सुरू झालीय, हे ऐकवत नाही तुमच्या तोंडून… सलाम!
नवरस मी उधळुनिया चरणी तुझ्या
मानूनी घे गोड तुझी रंगपूजा
जरी थकलो नच सुटला संग तुझा
शरण तुला नाही मनी भाव दुजा
अवघे तुझेच दान रे
ईश्वरा, खेळ रोज नवा
गोड मानूनी घे रंगपूजा
१४/०९/२०२५

No comments:
Post a Comment