ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, July 12, 2013

झोपलेल्या नशीबाची गोष्ट

...सिंधुकाठी एक गरीब कोळी राहत होता. घरात चूहेसुद्धा यायचे नाहीत इतकं वाईट चाललेलं. ना बायकोला दागिना ना पोरांना कपडा. रोज रात्री मतलई वारे सुटले की जमिनीवरच उघड्यानागड्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या अंगावर आपलं नेसूचं धोतर पांघरून नुसत्या लंगोटीवर नदीकाठच्या तराफ्यावर बसायचं, बांबू खुपसत नदी नेईल तितकं आत जायचं. भोवर्‍यांमध्ये टोपली बुडवून बुडवून जे आत येईल ते - मासे, खेकडे, सुंगटे, शिंपले, कालवे मडक्यात टाकायचे, वारा पडला की पहाटे परत बांबू खुपसत खुपसत उघडं घरी. उघडीनागडी पोरं बापाला पाहताच दुडूदुडू पळत किनार्‍यावर येऊन मडक्यातले नुस्ते घेऊन परत पळत पळत जाऊन आईला ताजं ताजं तेच रांधायला लावायचे. कारण घरात दुसरं काहीच दिवसभर नसायचं. बायको मिळालेल्यातलाच थोडासा वाटा वाण्याला देऊन भात, मीठ, मसाला, तेल रोज लागेल तेवढं आणायची. इकडे चुलीवर स्वैंपाक होईपर्यंत कोळी चिलीम फुंकत ताटं मांडून रांगेनं समोर बसलेल्या पिल्लांकडे अपूर्व मायेनं पाहत बसायचा. मग तोही जेवून झोपी जायचा. असं रोज. अर्धं आयुष्य हेच चाललं. हेच कष्ट, हाच विरंगुळा, हीच करमणूक. निजसुख, आनंद. मग एकदा झोपेत स्वप्‍नात आपलं झोपलेलं नशीबच त्याला अचानक दिसलं. वा रे वा. काय डाराडूर झोपलं आहे. या अल्ला, हे इथे असं झोपलेलं असल्यानंच माझ्या घरात धनसंपदा येत नाही. कधी घरात इतरांकडे असतात तशा वस्तू येतील? निदान घर तरी इतरांसारखं कधी ह्या जागेत होईल? या अल्ला, मला मार्ग दाखव. असा खूप कल्ला केल्यावर मग अल्लानं त्याला असा सल्ला दिला की, त्याला झोपू दे, उठवू नकोस. ते एकदा उठलं, की पुन्हा झोपत नाही. तुला ते चालेल का? बघ, तुझा तू ठरव आणि कर तुला वाटेल तसं.

मग बायकोचा विचार घेऊन कोळीमहाशय स्वप्‍नात झोपलेलं नशीब जिकडे दिसलं होतं त्या अंदाजानं वाट काढत घराबाहेर पडले. सापडलं. एका मोडक्या तोडक्या खळ्यात पालापाचोळ्यावर झोपलेलं स्वप्‍नात पाहिलं होतं तसंच... संतापून त्याला लाथ घालून उठवत कोळी म्हणाला, माँके लौडे, ऊठ. मेरा ये हाल और तू सालोसाल सोया पडा अँ? ऊठ. त्यानंतर त्याचं नशीब त्याला तरातरा दूर, एका सतत गजबजलेल्या मोठ्या शहरात घेऊन गेलं. श्रीमंतीचा झगझगाट. कामधंदा काय तोटा? खाणं पिणं कपडे चंगळ. पण राहण्याची सोय कामधंद्याच्या पन्‍नास मैल दूर, वर खोप्यासारखी, कारण तिथपर्यंत ज्यांची नशीबं आधीच जागी झाली होती त्यांची घरंच घरं वर ७-७ मजली हसताहेत. रोज पहाटे अंधारात उठून कामावर जायचं, मिळेल ते खात काम करून रात्री घरी येताबरोबर जोडे काढण्याचीही सोय नसे, इतकी झोप. पुन्हा पहाटे तेच. हळूहळू तो तिथे श्रीमंत झाला. सगळ्या वस्तू खरेदी केल्या. बायको मुलं आली. पण त्यांना तो दिवसा कधीच घरी सापडायचा नाही. दिवसेंदिवस अनेक भानगडींमध्ये अडकून पडलेला तो घरी उशिरा परततांना नेहमी म्हणायचा, सालं हे नशीब पुन्हा झोपणार नाही का? ते सुखाचे दिवस पुन्हा येणारच नाहीत का?

यावर शेवटून अवलियासाहेब मोहमदराम म्हणायचे, एकदा लाथ मारलेलं नशीब पूर्ण सूड उगवूनच तुमच्याबरोबर कबरीत झोपी जाईल.

('हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' - भालचंद्र नेमाडे)

Share/Bookmark

Friday, May 24, 2013

तुला भेटल्यावर...




ओळख पटली माझी मला, तुला भेटल्यावर
मी म्हणजे 'मी' नाही, कळले तुला भेटल्यावर

पाऊस-पाणी म्हटली गाणी, भिजलो अन् सुकलो
पाणी आभाळातील नव्हते, कळले सुकल्यावर

गुण आवडले - दोषही प्यारे, प्रीती जडताना
वाटे सगळे बदलावेसे, नाते ठरल्यावर

नशा नकोशी वाटू लागते, चढू लागताना
जरा घेऊनी झिंगू, वाटे पुन्हा उतरल्यावर

पैसा आला, घेऊन झाली गाडी अन्‌ माडी
जगायचे पण राहून गेले, कळले खपल्यावर

... मंदार
२४.०५.२०१३


Share/Bookmark

Thursday, May 23, 2013

भीती घालावी लागते...?

सोसायटीच्या पार्किंगमधून गाडी काढत होतो. एक पाच-सहा वर्षांचा मुलगा पार्किंगमधे, गाड्यांच्या मधून, गेटपर्यंत पळत-पळत चालला होता. मागून त्याची आजी ओरडत होती, "शुभम, थांब पळू नको, इकडं ये." शुभम काही ऐकत नव्हता. पळता-पळता माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मागून आजी ओरडली, "शुभम, थांब नाही तर ते दाढीवाले तुला घेऊन जातील..." शुभम थोडा घाबरला, पण तिथंच थांबून माझ्याकडं बघू लागला. मग आजी मला म्हणाल्या, "तुम्ही जरा भीती दाखवा हो त्याला. अजिबात ऐकत नाही माझं." मी एकदा आजीकडं बघितलं आणि मग शुभमकडं बघून हसलो. शुभम पण हसला. आजी पुन्हा म्हणाल्या, "शुभम, ते दाढीवाले रागावतील हं तुला." पण शुभमनं आता स्वतःचं मत बनवलं होतं. तो माझ्याकडं बघून गोड हसला आणि पुन्हा गाड्यांमधून पळू लागला. मी आजीबाईंना विचारलं, "का उगाच भीती घालता हो पोराला?" त्या म्हणाल्या, "काय करणार? माझं ऐकतच नाही तो. म्हणून अशी कुणाची तरी भीती घालावी लागते..." "अहो पण अशानं माझ्याबद्दल किंवा माझ्यासारखं दिसणार्‍यांबद्दल त्याच्या मनात कायमची भीती किंवा संशय निर्माण होईल ना!" "होऊ दे की मग. त्यानं माझं ऐकलं म्हणजे झालं. तुमच्याबद्दल काय मत होईल त्याचं मला काय..." असं म्हणून त्या शुभमच्या मागे पुन्हा ओरडत निघून गेल्या.

'आपलं' ऐकलं जावं यासाठी 'इतरां'बद्दल भीती दाखवण्याचं हे एकमेव उदाहरण नाही. वडीलधारी माणसं, समाजातले विचारवंत, आणि खास करुन मीडीया, असंच काहीतरी करताना दिसतात. सरकार युसलेस, राजकारण गलिच्छ, नेतेमंडळी गुंड, भांडवलदार पिळवणूक करणारे, श्रीमंत निर्दयी, गरीब विध्वंसक, वगैरे वगैरे... या सर्व 'इतरां'वर शिक्के मारले की सर्वसामान्य माणूस घाबरतो आणि त्यांच्यापासून लांब राहतो, त्यांच्यापासून स्वतःला 'वाचवण्याचा' प्रयत्न करतो. आणि अशा वेळी, ही भीती आणि संशय निर्माण करणार्‍यांवर त्याचा विश्वास बसू लागतो.

शुभमचं संरक्षण किंवा त्याचा विकास यापेक्षा त्यानं 'आपलं' ऐकणं त्याच्या आजीला महत्त्वाचं वाटलं. त्यासाठी विनाकारण एखाद्याबद्दल शुभमच्या मनात संशय आणि भीती निर्माण करण्यात तिला काही चुकीचं वाटलं नाही. स्वतःचं महत्त्व टिकवण्या किंवा वाढवण्यासाठी कळत-नकळत तुम्हीही असं काही करताय का? माणसा-माणसातली दरी वाढत चाललीय असं आपण म्हणतो खरं, पण आपणही ती दरी वाढवण्यात हातभार लावतोय का, याचा विचार केला पाहिजे...

Share/Bookmark

Sunday, May 19, 2013

इतिहास आणि नागरिकशास्त्र

जोपर्यंत आपल्या शाळांमधून 'इतिहास' शिकवला जातोय, तोपर्यंत आपलं 'नागरिकशास्त्र' सुधारण्याची काही शक्यता नाही. स्वातंत्र्यलढा, असहकार चळवळ, राज्यक्रांती, या गोष्टींपासून बरोब्बर उलटी आणि लोकशाहीला हानीकारक प्रेरणा घेतली जातीय...


Share/Bookmark

Thursday, May 16, 2013

पावसाचे थेंब चार...

तापलेल्या या जमिनीला
आणखी काय हवं यार?
थोडा थंड वारा आणि
पावसाचे थेंब चार...

ताप विसरून क्षणभर
जमीन होते थंडगार,
मातीचा जो वास येतो
घ्यावा वाटे वारंवार...

पाऊस येतो आडवा-तिडवा
भिजवून टाकतो घरदार,
टप्-टप् टप्-टप् थेंब साठून
छपरावरून पडते धार...

रस्त्यावरून माणसं, गाड्या
झेलत जातात पावसाचे वार,
सुटका केली उन्हापासून
म्हणून 'त्या'चे मानतात आभार...

- अक्षर्मन


Share/Bookmark

Saturday, May 11, 2013

विना सहकार नहीं उद्धार

असहकार आणि स्वार्थ हे माणसाच्या मुलभूत गुणधर्मांपैकी आहेत. दुसऱ्या व्यक्तीशी, संस्थेशी, यंत्रणेशी, वातावरणाशी - स्वतःचा स्वार्थ नसेल तर - सहकाराच्या भूमिकेत जायला माणूस नैसर्गिकपणे कचरतो. परवा एक मित्र म्हणाला, "मला सामाजिक कार्यात पहिल्यापासून रस आहे. आमच्या कॉलनीतल्या लोकांना मी सांगितलं की, आपल्या भागातल्या रस्त्याचं काम होत नसेल तर आपण 'असहकार' पुकारू, 'रास्ता रोको आंदोलन' करू. पेपरवाल्यांना बोलवू. अमूक-तमूक वर्तमानपत्राचे संपादक माझ्या खास ओळखीचे आहेत, ते स्वतः येतील. फोटोसहीत मोठी बातमी येईल..." मी विचारलं, "त्यानं काय होईल?" "काय होईल म्हणजे? आख्ख्या शहराला कळेल की आमचा भाग, आमची कॉलनी कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहे." "पण आख्ख्या शहराला कळाल्यानं रस्त्याचं काम होईल?" "ते माहित नाही; पण लोकांमधे चर्चा तरी होईल ना..." "पण त्यापेक्षा तुमच्या भागातल्या नगरसेवकाला अथवा थेट नगरपालिकेला निवेदन दिलं तर काम होण्याची जास्त शक्यता नाही का?" "हं, शक्यता आहे, पण असं काम झाल्याचं कधी ऐकलं नाही. आंदोलन, मोर्चा, अन्यायाला वाचा फोडणं वगैरे असलंच छापून येतं पेपरात..."

ही असहकाराची भावना काढून टाकल्याशिवाय सर्वसमावेशक विकासाची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. अशा लोकांमधे राहून, याच लोकांना सोबत घेऊन, याच लोकांच्या प्रगतीसाठी सहकारातून कामाचे डोंगर उभे करणाऱ्या नेत्यांचं अशा वेळी कौतुक वाटतं.

Share/Bookmark

Saturday, April 20, 2013

एका पोळ्याची गोष्ट

(चेतन भगत यांच्या १९ एप्रिल २०१३च्या 'टाइम्स ऑफ इंडीया'मधील लेखाचा मी केलेला मराठी अनुवाद)

फार वर्षांपूर्वी, एका मोठ्ठ्या जुन्या झाडावर एक प्रचंड मोठं मधमाश्यांचं पोळं होतं. आजूबाजूला रंगीबेरंगी टवटवीत फुलांनी बहरलेले बाग-बगिचेही होते.

त्या पोळ्याचा कारभार चालवण्यासाठी काही ज्येष्ठ मधमाश्यांसोबत एका राणी माशीची नेमणूक करण्यात आली होती. त्या सगळ्यांना 'सरकारी माश्या' असं म्हटलं जाई. 'कष्टकरी माश्या' त्यांचं मध सुरक्षितपणे साठवून ठेवण्याचं काम या 'सरकारी माश्यां'वर सोपवून निर्धास्त होत्या. याबाबतीत कष्टकरी माश्यांचा सरकारी माश्यांवर पूर्ण विश्वास होता. शिवाय, नवीन बगिच्यांचा शोध घेणं, पुढच्या पिढीतील तरुण माश्यांसाठी मधाचे नवनविन स्रोत शोधून काढणं, अशी कामंदेखील सरकारी माश्यांकडून अपेक्षित होती.

पोळ्याचा कारभार कुठलाही गडबड-घोटाळा न होता सुरळीतपणे चालावा, यासाठी सरकारी माश्यांनी काही नियम बनवले होते आणि कायदेही संमत करून घेतले होते. कष्टकरी माश्यांना त्यांचं पालन करावंच लागे, अन्यथा त्या शिक्षेस पात्र ठरत. पोळ्यात राहणार्‍या विविध जातीच्या मधमाश्या आपापसात भांडून पोळ्यासाठी समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी अशा नियम व कायद्यांची गरज होती. उदाहरणार्थ, काळ्या माश्या आणि लाल माश्या असे दोन मुख्य प्रकार होते. त्यांचं काम एकाच प्रकारचं होतं. फक्त, त्या दिसायला थोड्या वेगळ्या होत्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या आपापल्या वेगळ्या पद्धती होत्या.

अशा या परिपूर्ण पोळ्यामधे सर्व काही आलबेल होतं. पण काळानुसार काही बदल घडत गेले. सरकारी माश्यांची स्वतःची मुलं, नातेवाईक, आणि मित्रमंडळी होती. त्यापैकी बहुतेकांना 'सरकारी माश्या' बनता आलं नाही. त्यांना इतरांसारखं 'कष्टकरी माश्या' बनूनच जगावं लागलं. पण एके दिवशी, एका ज्येष्ठ सरकारी माशीच्या मुलानं आपल्या जन्मदात्याकडं तक्रार केली की, कष्टकरी माशी म्हणून जगणं फारच कष्टाचं काम आहे. "आपल्या सरकारी मधाच्या साठ्यांमधून मी थोडंसं मध घ्यायला काय हरकत आहे?" त्यानं विचारलं. "नाही, हे अयोग्य आणि अनैतिक आहे," सरकारी माशीनं म्हटलं.

"कुणाला काऽही कळणार नाही. सरकारी गोष्ट आहे, सरकारपुरतीच राहील," सरकारी माशीच्या मुलानं उपाय काढला. बरोबरच होतं त्याचं. कष्टकरी माश्यांचा स्वतःपेक्षा जास्त सरकारी माश्यांवर विश्वास होता. थोडंसं मध गायब झालं तर कुणाच्या लक्षातही येणार नव्हतं.

आणि मग झाली की सुरुवात. हळूहळू, सगळ्या सरकारी माश्यांच्या मुलांनी, भावंडांनी, नातलगांनी, मित्रांनी, आणि हितचिंतकांनी रोज सरकारी साठ्यातलं थोडं-थोडं मध चोरायला सुरुवात केली. आता त्यांना दिवसभर बाग-बगिच्यात मजुरी करायची गरज नव्हती. अपेक्षेनुसार मधाची पातळी वाढत नाहीये, हे कष्टकरी माश्यांच्या लक्षात येऊ लागलं. काही कष्टकरी माश्यांनी हा मुद्दा उचलताच सरकारी माश्यांनी फर्मान सोडलं, "आळस झटका आणि कामाला लागा".

मधाचा साठा वाढवण्यासाठी कष्टकरी माश्या अजून कष्ट करू लागल्या. तरीसुद्धा, मधाची पातळी काही वाढेचना. उलट, दिवसेंदिवस मध कमीच होऊ लागला.

लवकरच, सरकारी माश्यांनी आणखी एक धोरण आखलं. एखाद्या नव्या बागेचा शोध लागला की सर्वप्रथम त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना, आणि मित्रांना तिचा लाभ दिला जाऊ लागला. "जे कष्टकरी माश्यांना ठाऊकच नाही, ते त्यांच्याकडून हिरावून कसं घेणार," अशी कुजबूज सरकारी वर्तुळात सुरू झाली.

पुढेपुढे, मधाची पातळी तर घटत गेलीच, शिवाय कष्टकरी माश्यांच्या मुलांसाठी नव्या बागाही सापडेनाशा झाल्या. आता ते रिकामटेकडे आणि उपाशी राहू लागले. कधीकधी, राणी माशी या कष्टकरी माश्यांपुढं थोडं मध शिंपडे, आणि मग सगळीकडं राणीची वाहवा होई. तरीसुद्धा, हे शिंपडलेलं मध पुरेसं नव्हतंच.

"कोण चोरतंय आपलं मध?" शेवटी एके दिवशी, एका प्रभावशाली कष्टकरी माशीनं प्रश्न विचारलाच. ही प्रभावशाली बंडखोर माशी काळ्या माश्यांच्या गटातली असल्याचं सरकारी माश्यांच्या लक्षात आलं. म्हणून, सरकारी माश्या म्हणाल्या, "लाल माश्या चोरताहेत तुमचं मध." त्यानंतर, सरकारी माश्यांनी लाल माश्यांना बोलावून घेतलं, आणि त्यांना सांगितलं, "काळ्या माश्या तुमच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारतायत असं आम्हाला वाटतंय."

उपासमार आणि कष्टानं वैतागलेल्या काळ्या आणि लाल माश्यांना संताप अनावर झाला. त्यांची एकमेकांशी तुफान भांडणं झाली. आपल्यावरची पीडा टळल्यानं या भांडणांची मजा लुटत सरकारी माश्यांनी मधचोरी सुरूच ठेवली. जसजशा लाल आणि काळ्या माश्या मरू लागल्या आणि जखमी होऊ लागल्या, तसतशा सरकारी माश्या अजून थोडं-थोडं मध शिंपडत राहिल्या. कष्टकरी माश्यांनी पुन्हा राणी माशीचा जयजयकार केला.

थोड्याच दिवसांत, त्या भागात दुष्काळ पडला. फुलांची संख्या कमीकमी होत गेली, आणि इतकी वर्षं साठवलेल्या मधाचा उपयोग करण्याची वेळ आली. पण, सर्वांसाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे, सरकारी साठ्यांमध्ये मधाचा थेंबही शिल्लक नव्हता. पूर्णपणे सरकारी माश्यांवर विश्वास ठेवून राहिलेल्या कष्टकरी माश्या सरकारी माश्या आणि त्यांच्या संबंधितांच्या घराकडं वळल्या. ते सर्वजण गलेलठ्ठ होऊन आपापल्या 'खाजगी' मधाच्या साठ्यांवर आरामात बसलेले दिसले. हे कमी म्हणून की काय, त्यांना शेकडो नव्या बाग-बगिच्यांचे नकाशेदेखील सापडले, ज्यांचा कष्टकरी माश्यांना थांगपत्ता लागू दिला नव्हता.

या सर्व प्रकारानं अचंबित झालेल्या कष्टकरी माश्या हा धक्का पचवत आपापल्या घरी परतल्या. लाल आणि काळ्या माश्यांची नजरानजर झाली. आपल्याला मूर्ख बनवण्यात आलं, हे दोघांच्याही लक्षात आलं. त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडून, एकमेकांना इजा पोहोचवल्याबद्दल माफी मागितली.

"आपण त्यांना चांगला धडा शिकवू," काळ्या आणि लाल माश्या एकमुखानं म्हणाल्या. कष्टकरी माश्यांना कळून चुकलं की, आपल्या नांग्या एकमेकांविरुद्ध नव्हे तर आपल्याला फसवणार्‍यांविरुद्ध वापरण्याची वेळ आलेली आहे.

दरम्यान, राणी माशीला तणावपूर्ण परिस्थितीचा अंदाज आला. तिनं आपल्या सुंदर तरुण मुलाला समोर आणलं, "हाच आता तुम्हाला वाचवेल. जसं इतकी वर्षं मी वाचवलं."

पण, लाल आणि काळ्या माश्या यावेळी सावध होत्या. त्या सगळ्या एकत्र आल्या आणि सरकारी माश्या व त्यांच्या बगलबच्च्यांवर त्यांनी आपल्या नांग्या उगारल्या. सरकारी माश्यांना आपली संपत्ती गोळा करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. सगळं जागेवर टाकून त्यांना पोळं सोडून पळून जावं लागलं. लवकरच, त्यांच्यापैकी कुणीही त्या पोळ्यात उरलं नाही.

लाल आणि काळ्या माश्यांनी आपल्यापैकी सर्वोत्तम लोकांच्या हाती सत्ता द्यायचं ठरवलं. तसंच, यापुढं कोणावरही आंधळा विश्वास टाकायचा नाही, सर्वांवर लक्ष ठेवायचं, असंही ठरवलं. हळूहळू पोळ्याची स्थिती सुधारत गेली, आणि मधाचा साठा पूर्ववत भरण्यासाठी नवी पिढी अजून कष्ट उपसू लागली. नव्या बाग-बगिच्यांनी नवी संपन्नता आणली, आणि ते पोळं जगातलं सर्वात यशस्वी पोळं समजलं जाऊ लागलं.

काही वर्षांनंतर, एका रात्री एक वृद्ध माशी आपल्या नातवाशी बोलताना म्हणाली, "तुला माहित्येय का, एके काळी आमच्यावर एका राणी माशीचं राज्य होतं?" "हो. पण आमच्यावर नाही. कारण आम्हाला माहित्येय की, एक छोऽटासा राजा आमच्यापैकी प्रत्येकाच्या आत लपलेला आहे," छोट्या माशीनं उत्तर दिलं.

- मंदार शिंदे
shindemandar@yahoo.com

(मूळ लेखः http://blogs.timesofindia.indiatimes.com/The-underage-optimist/entry/once-upon-a-beehive)

Share/Bookmark