"खरं म्हणजे, बुद्ध हा कुण्या हिंदू देवाचा अवतार नव्हे. हजारो वर्षं, हजारो मुखांनी एखादी खोटी गोष्ट पुनःपुन्हा सांगितली, तरी ती खरी ठरू शकत नाही. देव, ईश्वर अशी कोणतीही कल्पना बुद्ध मानत नाही. तो आत्माही मानत नाही. तो कोणती अवतारकल्पनाही मानत नाही. तो स्वतःला माणूसच मानत होता. आज संपूर्ण दुनिया त्याला जगातला सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानी माणूस मानते. त्यानं ज्ञानरचनेची पायाभूत सूत्रं सांगितली. असं करून त्यानं अज्ञानरचनेच्या चिंध्या केल्या. प्रत्येक माणसानं पूर्णतः चिकित्सकच असलं पाहिजे. ‘चिकित्सेच्या वा विज्ञाननिष्ठेच्या निकषावर जे खरं ठरणार नाही, त्याचा स्वीकार करू नका,’ असं तो सांगतो. ‘विश्व सान्त आहे की अनंत?’, ‘ते शाश्वत आहे की अशाश्वत?’ अशा मालुंक्यपुत्ताच्या प्रश्नांना उत्तर देताना बुद्धानं विषारी बाण लागलेल्या माणसाची गोष्ट सांगितली. समजा, तो बाण लागलेला मनुष्य, त्याच्या उरातला बाण काढू न देता, तो बाण कोणत्या धातूचा होता, कुणी मारला, कोणत्या दिशेनं तो आला, अशा प्रश्नांच्या उत्तरांची अट घालू लागला, तर त्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत तो मरूनच जाईल. मुद्दा बाण काढण्याचा, मनुष्य वाचवण्याचा आहे. ‘ईश्वर आहे काय?’ ‘आत्मा आहे काय?’ अशा प्रश्नांची उत्तरं मिळवण्यात आयुष्य बरबाद करण्यापेक्षा तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवा. त्या प्रश्नांची उत्तरंही मिळणार नाहीत आणि तुमचे इहजीवनातील परस्परांना जगवण्याचे प्रश्नही सुटणार नाहीत. बुद्धानं बाण काढण्याचं महत्त्व विशद केलं. ज्ञानाचा विषय ईश्वर नाही. आत्मा नाही. परलोक नाही. ज्ञानाचा विषय माणूस आहे. त्याच्या आणि त्याच्या संबंधात येणाऱ्या इतर माणसांमुळं निर्माण झालेले प्रश्न हा ज्ञानाचा विषय आहे."
- यशवंत मनोहर (सकाळ सप्तरंग, १४ सप्टेंबर २०१४)
- यशवंत मनोहर (सकाळ सप्तरंग, १४ सप्टेंबर २०१४)
No comments:
Post a Comment