ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, July 23, 2020

Scheme (Script)


स्कीम
(लेखकः मंदार शिंदे)

प्रवेश १
(स्टेजवर दोन घरांच्या बाल्कन्या दिसत आहेत. दोन्ही घरांत अंधार आहे. उजवीकडच्या घरात लाईट चालू होतो आणि पुष्पा बडबड करत विंगेतून आत येते.)
पुष्पाः …बाई गं… बरं झालं घरी निघून आले. कसला बोर मेनू होता आजच्या भिशीचा… इडली-चटणी म्हणे. आणि ती स्वाती… एक-एक इडली मोजून वाढत होती मेली… तरी बरं, स्वतः खाऊन-खाऊन इडलीसारखी झालीय… आणि काय तर म्हणे डाएटचा नवीन कोर्स करतीय… त्यासाठी बरे पैसे असतात ह्यांच्याकडं... मोठेपणा सांगायला मिळतो ना तेवढाच. आमच्याकडच्या भिशीला मस्त मेनू असणारे, असं स्वतःच ग्रुपवर टाकत होती. हिचा मस्त मेनू म्हणजे काय, तर इडली आणि चटणी. ती पण एक-एक मोजून… मरु दे, मस्त चहा घ्यावासा वाटतोय आता उतारा म्हणून… हो, पण आयता चहा कुठं आपल्या नशिबात… चला पुष्पा मॅडम, आपला आपण चहा करु, छान आलं टाकून… (गाणं गुणगुणत आत जाते) चहा पाज रे, हाय चहा पाज रे… एक गर्मागरम चहा पाज रे…
(डावीकडच्या घरात लाईट चालू होतो. स्वप्ना हातात मोबाईल घेऊन बाल्कनीत येते. फोनला रेन्ज मिळत नसल्यानं ती वैतागली आहे. फोन ट्राय करता करता बडबड करते आहे.)
स्वप्नाः या घरात ना अजिबातच रेन्ज मिळत नाही… कित्ती वेळा सांगितलं निशिकांतला, आपण घर बदलू, दुसरीकडं रहायला जाऊ. पण त्याला इथंच रहायचंय. (वेगळ्या टोनमधे) माझ्या ऑफीसमधले कलीग्ज इथेच राहतात, आमचा छान ग्रुप आहे, आम्ही ऑफीसला जाताना कार पूलिंग पण करु शकतो… (तुच्छतेने) सो मिडल-क्लास! आली.. आली.. रेन्ज आली. लागला फोन… (फोनवर) हां सुनिता, बोल… हो अगं, मधेच कट झाला ना फोन…. बघ ना, रेन्जच नाही मिळत इथं… हो, मी तर केव्हाचीच तयार आहे गं, पण निशिकांतला इथंच रहायचंय… हो ना, त्याला काय फरक पडतो म्हणा… तो जातो ऑफीसला निघून, दिवसभर मलाच रहावं लागतं इथे… हो ना, आणि वर्क फ्रॉम होम म्हणजे काय झोपा काढतो काय आपण? इथंसुद्धा ऑफीसइतकंच काम असतं, हे कळतच नाही त्याला… काय सांगतेस, तुझ्याकडंही तेच रामायण का? अगं या नवऱ्यांना आपण काम पण करावं आणि घर पण सांभाळावं, असंच वाटत असतं… अगं, इतका प्रॉब्लेम होतो ना घरुन काम करताना… आता हेच बघ ना, रेन्ज नसली की… हॅलो… हॅलो… सुनिता… श्शी… गेली परत रेन्ज… इथेच बसते आता काम करत, म्हणजे परत फोन आला तर रेन्ज मिळेल… (आत निघून जाते.)
(उजवीकडून पुष्पा हातात चहाचा कप घेऊन बाल्कनीत येते. गाणं गुणगुणत स्टूलवर बसते. डावीकडून स्वप्ना लॅपटॉप घेऊन येते आणि स्टूलवर बसते.)
पुष्पाः (स्वप्नाला बघून जोरात ओरडते.) अय्या! स्वप्ना तू?
स्वप्नाः (दचकून) हो, मीच आहे. एवढ्या जोरात ओरडायला काय झालं? दचकले ना मी…
पुष्पाः सॉरी सॉरी सॉरी… तू आत्ता घरी असशील असं वाटलं नव्हतं, म्हणून…
स्वप्नाः का गं? मी घरी कधी थांबायचं आणि बाहेर कधी जायचं, हे आता तू ठरवणार का?
पुष्पाः तसं नाही गं, स्वाती म्हणाली मला. स्वप्नाला कुठंतरी जायचं होतं.. म्हणून नाही आली.. भिश्शीला!
स्वप्नाः (सारवासारव करत) अच्छा अच्छा… ते होय… म्हणजे मला निरोप मिळाला होता ग्रुपवर.. पण माझं काम होतं जरा महत्त्वाचं, म्हणून मीच कळवलं तिला.. येणार नाही म्हणून.. भिश्शीला!
पुष्पाः तुझं बरंय बाई, तुला जमतं असं डायरेक्ट नाही म्हणायला… आमचं आयुष्य चाललंय लोकांची मनं राखण्यात… रांधा, वाढा, उष्टी काढा…
स्वप्नाः अय्या! म्हणजे स्वातीनं तुला स्वैपाकाला बोलवलं होतं तर…
पुष्पाः (जोरात ओरडते) एऽऽ मी काय स्वैंपाकीण वाटले का गं तुला?
स्वप्नाः (घाबरुन) अगं तसं नाही… तूच म्हणालीस ना, रांधा - वाढा आणि काहीतरी काहीतरी…
पुष्पाः अगं म्हण असते ती… बाईच्या जातीला हमखास करावी लागणारी कामं सगळी…
स्वप्नाः शी शी शी! बाईची जात काय, रांधा-वाढा काय… हाऊ ओल्ड-फॅशन्ड्‌!
पुष्पाः ओ स्वप्ना मॅडम. माहितीये तुमची फॅसण. रोज-रोज हॉटेलमधे जाण्याइतके पैसे असते, तर आम्ही तरी कशाला बसलो असतो घरी चपात्या लाटत! 
स्वप्नाः (लॅपटॉप ठेवून उभी राहते) मी काय म्हणते पुष्पा…
पुष्पाः (उठून उभी राहते) काय गं, काय?
स्वप्नाः आपण ना सोसायटीच्या चेअरमनला भेटायला जाऊ…
पुष्पाः (उत्सुकतेनं) कशाला गं कशाला?
स्वप्नाः आपला महिन्याचा मेन्टेनन्स खूपच वाढलाय नै का इतक्यात…
पुष्पाः ए हो ना, खरंच. पण आपण चेअरमनला कशासाठी भेटायचं ते सांग की.
स्वप्नाः अगं, आपल्या सोसायटीचा खर्च वाचवायची आयडीया आहे माझ्याकडं…
पुष्पाः (उत्सुकतेनं) काय आयडीया आहे? सांग की मला पण…
स्वप्नाः (हळू आवाजात गुपित सांगितल्यासारखं बोलते) आपण सोसायटीच्या चेअरमनला भेटायला जाऊ… (पुष्पा मधेमधे ‘हां हां’ करते.) आणि त्यांना सांगू… आपल्या सोसायटीच्या वॉचमनला… काढून टाका… त्याच्या पगाराचे पैसे वाचतील… आपल्याला वॉचमनची गरजच नाय… विचार का?
पुष्पाः ए का गं, का?
स्वप्नाः कारण… आपल्याकडं पुष्पा मॅडम आहेत. (नॉर्मल टोनमधे) सगळी खबर असते इकडं… कोण घरी बसलंय, कोण बाहेर गेलंय, कोण स्वैपाक बनवतंय, कोण हॉटेलात जेवतंय, कोण… (बोलत-बोलत लॅपटॉप उचलून पुन्हा बसते.)
पुष्पाः (रागानं) एऽऽ जास्त बोलू नकोस हं तू…
स्वप्नाः जास्त नै काही, खरं तेच बोलले. खरं बोललं की राग येणारच माणसाला.
पुष्पाः एहेहे हेहेहे… मी पण खरं तेच बोलले हो. निशिकांत भाऊजींनीच सांगितलं परवा चहाला आले तेव्हा… (खाली बसते) आणि मी काही दुर्बिण नाही लावून बसले तुझ्या घरात काय चाललंय बघायला. 
स्वप्नाः दुर्बिण कशाला लावायला पाहिजे? काय मस्त घरं बांधलीत आपल्या बिल्डरनं. दोन बिल्डींगच्या बाल्कन्या इतक्या जवळ… (उठून उभी राहते) इतक्या जवळ की, मधे टीपॉय ठेऊन पत्ते खेळू शकतो आपण! तरी मी निशिकांतला म्हणत होते, डोळे झाकून फ्लॅट खरेदी करु नकोस… पण त्याचं काहीतरी वेगळंच… (बडबडत राहते.)
पुष्पाः (काहीतरी आठवून उठते) ए पत्त्यावरनं आठवलं… परवाच्या मिटींगचा पत्ताच नाही घेतला मी. अशी कशी वेंधळी गं तू पुष्पा… (स्वतःशीच बडबडत खोलीत जाते. फोन शोधताना गाणं गुणगुणते. चालः दुक्की पे दुक्की हो, या सत्ते पे सत्ता…) चहाही राहू दे, राहू दे फालतू गप्पा.. चहाही राहू दे, राहू दे फालतू गप्पा.. विचारुन घेऊ दे आधी मला, परवाच्या मिटींगचा पत्ता.. फोन कुठं झाला बेपत्ता! फोन कुठं झाला बेपत्ता?
(ब्लॅक-आऊट)

प्रवेश २
(पुष्पा खोलीत बसून फोनवर बोलत आहे. स्वप्ना बाल्कनीत बसून लॅपटॉपवर काम करत आहे.)
पुष्पाः (फोनवर) हॅलो… संध्या? अगं फोन करणार होतीस ना मला?... मला फायनल लिस्ट बनवायची आहे परवाच्या मिटींगसाठी… तुला स्कीम कळालीय नीट की परत सांगू?... नाही नाही नाही, अगं काही फसवाफसवी नाही… मी बोललीये ना त्यांच्याशी… खूप सोप्पं आहे अगं… ते सगळं ट्रेनिंग देणारेत… आपण फक्त त्यांची मेम्बरशिप घ्यायची आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे… अगं काय मस्त-मस्त प्रॉडक्ट आहेत… एकदा बघाल तर प्रेमात पडाल!... नाही नाही, मी नाही बघितले अजून, पण त्यांनी फोनवर सांगितलं ना मला… मीपण भेटले नाही अजून त्यांना… पण मला तरी स्कीम आवडली बाई… घरी बसून चार पैसे कमवायची संधी मिळतीय तर सोडा कशाला?... येतीयेस ना मग?... पैसे भरावे लागतील परवा थोडे… हॅलो… संध्या?... हॅलो… (फोन कट होतो.) ह्या फोनची पण काय कटकट आहे. (उठून बाल्कनीत जाते. पुन्हा फोन लावते. रिंग होते, पण फोन उचलला जात नाही.) फोन का नाही उचलत ही संध्या?... अच्छा अच्छा, पैशाचं नाव काढल्यावर लगेच कट झाला नाही का फोन? चिंगूस मेली! 
स्वप्नाः मला काही म्हणालीस का गं?
पुष्पाः छे छे! तुला कशाला काय म्हणेल? तुझं चालू दे… (पुन्हा फोन लावत खोलीत जाते.) हॅलो… अंजूकाकी? कशी आहेस तू?... मी मजेत… नाही अगं सहजच केला फोन… प्रेरणा कशी आहे?... आणि पिल्लू?... त्याच्या बारशाचे फोटो आले का गं?... नाही नाही, काही विशेष काम नव्हतं… म्हणजे एक छोटंसं काम होतं खरं तर… अगं एक बिझनेस सुरु करतेय मी… हो, मी म्हणजे मी एकटीच… घरुनच काम करायचं आहे… खूप सोप्पं आहे अगं… ते सगळं ट्रेनिंग देणारेत… आपण फक्त त्यांची मेम्बरशिप घ्यायची आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे… हॅलो… हॅलो… काकी… (बोलत-बोलत बाल्कनीत जाऊन बसते.) आता येतंय का ऐकू?... हां, तर काय सांगत होते मी… अगं काय मस्त-मस्त प्रॉडक्ट आहेत… एकदा बघाल तर प्रेमात पडाल!... नाही नाही, मी नाही बघितले अजून, पण त्यांनी फोनवर सांगितलं ना मला… मीपण भेटले नाही अजून त्यांना… पण मला तरी स्कीम आवडली बाई… घरी बसून चार पैसे कमवायची संधी मिळतीय तर सोडा कशाला?... त्याचीच मिटींग आहे परवा. आणि मला काही मेम्बर गोळा करुन न्यायचे आहेत… येशील का मग तू?... पैसे ना? हो, भरावे लागतील परवा थोडे… हॅलो… हॅलो… (फोन कट होतो.) श्शी!! कट झालाच शेवटी. (पुन्हा नंबर डायल करायला जाते, पण थांबते) नाही पुष्पा, कट ‘झाला’ नाही.. कट ‘केला’ फोन.
स्वप्नाः मला काही म्हणालीस का गं?
पुष्पाः (स्वप्नावर राग काढते) तुझं काय गं मधे-मधे? तुझं-तुझं काम कर की. माझ्या बाल्कनीकडं कशाला कान लावून बसलीयेस?
स्वप्नाः मी माझंच काम करतीये हो. तूच माझ्या कानाजवळ येऊन आरडाओरडा करतीयेस म्हणून विचारलं…
पुष्पाः मी काही आरडाओरडा नाही केला. आता ह्या फोनला इथंच रेन्ज येते त्याला मी काय करणार? (बडबड करत पुन्हा खोलीत येते.) वैताग आहे नुसता… आपल्याच घरात आपल्यालाच बोलायची चोरी. मरु दे, मला कुठं वेळ आहे हिच्याशी भांडायला… (फोनवर नंबर डायल करते.) हॅलो… शिल्पा वहिनी? पुष्पा बोलतीये… काय? कृष्णा नाही हो, पुष्पा.. पुष्पा बोलतीये… हॅलो… ऐकू येतंय का?... थांबा एक मिनिट… (पुन्हा बाल्कनीत जाऊन बसते.) हॅलो, आता येतंय का ऐकू?... हो ना, अहो इतका प्रॉब्लेम आहे ना इथं रेन्जचा… चेन्ज नाही हो, रेन्ज रेन्ज, फोनची रेन्ज… हां, रेन्जचा प्रॉब्लेम आहे इथं… ते जाऊ दे, एका बिझनेसबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी… ह्यांच्या नाही हो, माझ्या… अहो खरंच! एवढ्यातच केलाय सुरु… गुरु? गुरु नाही हो, सुरु सुरु… तेच तर सांगायचं होतं तुम्हाला… नाही, बाहेर नाही.. घरुनच काम करायचं आहे… खूप सोप्पं आहे हो… ते सगळं ट्रेनिंग देणारेत… आपण फक्त त्यांची मेम्बरशिप घ्यायची आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे… अहो, काय मस्त-मस्त प्रॉडक्ट आहेत… एकदा बघाल तर प्रेमात पडाल!... नाही नाही, मी नाही बघितले अजून, पण त्यांनी फोनवर सांगितलं ना मला… मीपण भेटले नाही अजून त्यांना… पण मला तरी स्कीम आवडली… क्रीम नाही हो, स्कीम स्कीम… ही बिझनेस स्कीम हो… त्याचीच मिटींग आहे परवा. आणि मला काही मेम्बर गोळा करुन न्यायचे आहेत… याल का मग तुम्ही?... पैसे ना? हो, भरावे लागतील परवा थोडे… हॅलो… हॅलो… (फोन कट होतो. ती रागानं फोनकडं बघत बसते. काही सेकंदांतच तिला हुंदका अनावर होतो आणि ती रडू लागते.)
स्वप्नाः (दचकून पुष्पाकडं बघत) ओ पुष्पाताई, टीव्ही सिरीयलमधे रोल मिळाला की काय? नाही, रडायची प्रॅक्टीस सुरु केलीत म्हणून विचारलं. (पुष्पाकडून उत्तर येत नाही. स्वप्ना काळजीनं उठून उभी राहते.) ए पुष्पा… अगं काय झालं? बरी आहेस ना? (पुष्पा स्वप्नाकडं बघते आणि अजूनच जोरात रडू लागते.) अगं अशी रडतेस काय? काय झालं बोल तरी. (पुष्पा नुसतीच स्वप्नाकडं बघते आणि रडते. स्वप्ना काहीतरी विचार करुन बोलते.) थांब, मी तुझ्याकडंच येते. दार उघड.
(स्वप्ना डावीकडं आत निघून जाते. पुष्पा काही वेळ त्या दिशेनं बघत राहते. पुन्हा हुंदका देते आणि उजवीकडच्या विंगेत निघून जाते. थोड्या वेळानं दोघी पुष्पाच्या घरात येतात. पुष्पाचं हुंदके देणं सुरुच आहे.)
स्वप्नाः हां बोल आता… काय झालं रडायला? कुणी काही बोललं का? बरं वाटत नाहीये का? (पुष्पाच्या कपाळाला हात लावून) ताप आलाय का? (पुष्पाचे हात दाबत) काही दुखतंय का? डॉक्टरकडं जायचंय का? अरुण भाऊजींना फोन लावू का? (फोन शोधू लागते. पुष्पा अजूनच हुंदके देऊ लागते. स्वप्ना तिच्या जवळ येऊन बसते.) हे बघ पुष्पा, तू सांगितलंच नाहीस तर मला कळणार कसं, काय झालंय?
पुष्पाः (हळू आवाजात पुटपुटते) काही नाही झालेलं… माझंच चुकलं… कधी नव्हे ते अपेक्षा केली ना… मला अपेक्षा करायचा हक्कच कुठाय पण?... मी फक्त सगळ्यांची मनं राखायची…
स्वप्नाः (मधेच बोलते) हो, रांधायचं, वाढायचं आणि उष्टी काढायची! (पुष्पा दचकून स्वप्नाकडं बघते आणि पुन्हा हुंदके देऊ लागते. स्वप्ना गडबडून जाते.) सॉरी सॉरी सॉरी… चुकून बोलून गेले. तू नीट सांग ना काय झालंय…
पुष्पाः (हुंदके देत देत बोलते) काही नाही गं… लग्नाआधी मी पण जॉब करायचे. तुझ्यासारखा कॉर्पोरेट नसला तरी ठीकठाक होता. थोडेफार पैसे यायचे हातात… मला हव्या त्या गोष्टींवर खर्च करु शकायचे… म्हणजे मी पैशाच्या बाबतीत उधळी नव्हतेच कधी, तरी खर्च करायला आवडायचं… पण लग्न झालं आणि अरुण म्हणाले की, ‘तुला पैसे कमवायची गरजच नाही. आपलं भागेल माझ्या पगारात…’
स्वप्नाः अगं पण भागायचा काय संबंध यात? जॉब काय फक्त पैसे कमवण्यासाठी करतात का? तुझं करीयर, तुझा अनुभव, तुझं स्वातंत्र्य…
पुष्पाः (पुन्हा हुंदके देऊ लागते) जाऊ दे गं स्वप्ना… ह्या सगळ्या नशीबाच्या गोष्टी असतात. मला जॉब नाही करता येणार हे मी मान्य केलं. मग माझा सगळा वेळ मी दिला फॅमिलीसाठी - सण-बिण, लग्न-बिग्न, बारसं-बिरसं, वाढदिवस, डोहाळेजेवण, हळदीकुंकू…
स्वप्नाः (मधेच बोलते आणि जीभ चावते) भिश्शी-बिश्शी… सॉरी सॉरी सॉरी, तू बोल…
पुष्पाः बघ ना… सगळ्यांच्या घरी सगळ्या कार्यक्रमांना पुष्पा आधी हजर पाहिजे. कुणाची मुलं सांभाळायचीत, पुष्पा आहेच. कुणाला स्वैंपाकात मदत करायचीय, पुष्पा आहेच. कुणाला दवाखान्यात डबा द्यायचाय, पुष्पा आहेच… कुणाच्या…
स्वप्नाः … घरावर लक्ष ठेवायचंय, पुष्पा आहेच. (पुन्हा जीभ चावते) सॉरी सॉरी. चुकून बोलून गेले.
पुष्पाः असू दे गं, तूच एकटी आहेस जिनं माझ्याकडून कध्धीच कसलंच काम नाही करुन घेतलं… मी खूप भांडले असेल तुझ्याशी, टोमणे मारले असतील. पण खरं सांगू का स्वप्ना? तू एखाद्या दिवशी भेटली नाहीस तर करमत नाही आता मला…
स्वप्नाः (आश्चर्याने) काय सांगतेस काय, पुष्पा… अगं पण…
पुष्पाः (स्वप्नाच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत) मी कधी बोलले नाही, पण आज तुला सांगते. माझ्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करते. आणि आज कधी नव्हे ते मी अपेक्षा केली तर…
स्वप्नाः पण असली कसली अपेक्षा केलीस तू?
पुष्पाः (डोळे पुसत उत्साहानं सांगते) अगं तुला सांगायची राहिलीच की… एक मस्त बिझनेस स्कीम आहे… म्हणजे मला फारसं घराबाहेर पडायचीसुद्धा गरज नाही, आणि पैसेसुद्धा चांगले मिळणार आहेत…
स्वप्नाः (संशयानं) असली कसली स्कीम गं?
पुष्पाः अगं खूप सोप्पं काम आहे. ती कंपनी सगळं ट्रेनिंग देणारे. आपण फक्त त्यांची मेम्बरशिप घ्यायची आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे. अगं, काय मस्त-मस्त प्रॉडक्ट आहेत…
स्वप्नाः (मधेच बोलते) हो ना, ‘एकदा बघाल तर प्रेमात पडाल!’
पुष्पाः अय्या, तुला कसं गं माहीत?
स्वप्नाः का माहिती नसणार? गेल्या तीन दिवसांत तीनशे फोन लावले असतील तू. आणि प्रत्येक वेळी फोनवर हे धृवपद आहेच… (पुष्पाची नक्कल करत) “एकदा बघाल तर प्रेमात पडाल! नाही नाही, मी नाही बघितले अजून, पण त्यांनी फोनवर सांगितलं ना मला… मीपण भेटले नाही अजून त्यांना… पण मला तरी स्कीम आवडली…”
पुष्पाः (रागानं) कर कर, तू पण चेष्टा कर माझी…
स्वप्नाः (पुष्पाला समजावते) तसं नाही गं… मी आधीच बोलणार होते तुझ्याशी, पण म्हटलं जाऊ दे. तुझा उगाच गैरसमज व्हायचा. म्हणजे मला अगदी मान्य आहे, तू सगळं सांभाळून काहीतरी काम करायची धडपड करतीयेस, पण…
पुष्पाः पण काय?
स्वप्नाः अगं अशा शेकडो स्कीम्स रोज येत असतात मार्केटमधे. पण त्यातल्या खरंच आपल्या उपयोगाच्या कोणत्या ते तपासून नको का बघायला? अशी गडबड करुन, त्यांच्या मार्केटींगला भुलून आपण आपला वेळ, आपले पैसे, आणि आपले कष्ट वाया नाही घालवायचे.
पुष्पाः (विचार करत) बरोबर आहे तुझं, पण…
स्वप्नाः हो हो, कळतंय मला. तू आत्ता आणलेली स्कीम खोटीच असेल कशावरुन? असंच म्हणायचंय ना तुला?
पुष्पाः हो ना… म्हणजे आपण ट्राय तर करुन बघू शकतो की. आणि तू पण चल ना माझ्यासोबत मिटींगला. तुला पण कळेल खरी स्कीम काय आहे ते…
स्वप्नाः नको नको नको. मला नाही यायचंय अशा कुठल्या मिटींगला. मी फक्त तुला दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न करतीये… (विचार करत) आणि मी काय म्हणते पुष्पा…
पुष्पाः काय गं काय?
स्वप्नाः तुला खरंच असं काहीतरी काम करायचं असेल ना, तर मी मदत करेन शोधायला. म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट्समधे विचारुन किंवा ऑनलाईन शोधून पण काहीतरी काम मिळू शकेल.
पुष्पाः ए खरंच तू मदत करशील मला?
स्वप्नाः नक्की करेन. ऐक्चुअली निशिकांतला सुद्धा सांगेन मी तुझ्यासाठी काम शोधायला. आणि अरुण भाऊजींशी सुद्धा बोलेल तो… कदाचित त्यांनी असा कधी विचारच केला नसेल. एकदा बोलून बघायला काय हरकत आहे?
पुष्पाः थँक्यू… थँक्यू सो मच, स्वप्ना… तू माझ्याबद्दल केवढा विचार केलास. आणि मी तुझ्याशी सारखी भांडत राहिले.
स्वप्नाः असू दे गं… मला पण आवडतं असं भांडायला. मी तरी आणि कुणाशी भांडणार आहे? (दोघी हसतात.) ए, पण तसली स्कीम-बिम नको हं परत शोधू दुसरी… “एकदा बघाल तर…”
दोघीः “…प्रेमात पडाल!”

(समाप्त)

प्रयोगासाठी पूर्वपरवानगी आवश्यक
© मंदार शिंदे
१९/०१/२०१८

Mobile: 9822401246



Share/Bookmark

Tuesday, July 21, 2020

Inspired by Corona

कोरोनाची प्रेरणा


    कुणाला कुठल्या गोष्टीतून कशाची प्रेरणा मिळेल हे काही आपण आधीच ओळखू शकत नाही. वरवर नुकसानकारक दिसणाऱ्या गोष्टीतून काहीतरी उपयोगी आणि उपकारक घडू शकते, 'जसे समुद्रमंथनातून विष बाहेर आले' असे आमचे क्षीरसागर सर सांगून गेले. आता उपयोगी आणि उपकारक गोष्ट म्हणून सरांना 'विष'च का आठवावे हा काही आपल्या चर्चेचा विषय नव्हे. खरे तर या सरांचे नावसुद्धा आता नीटसे आठवत नाही, पण 'समुद्रमंथना'ची गोष्ट त्यांनी सांगितली होती आणि विष्णू देवाची एन्ट्री वर्णन करताना 'तो क्षीरसागरात शेषनागावर पहुडलेला असतो' असे सरांनी सांगितलेले आठवते. त्यामुळे सरांचे आडनाव क्षीरसागर किंवा शेषन असावे असे पुसटसे वाटत होते. पण 'शेषन' आडनावाच्या माणसाने गांधींना आणि पवारांना सुखाने पडू दिले नाही तिथे विष्णू देवाची काय कथा? म्हणून सरांचे आडनाव क्षीरसागरच असावे असा आपला अंदाज... असो!
    तर, कुठल्या गोष्टीतून कुणाला कशाची प्रेरणा मिळावी, हा आपला मुख्य मुद्दा होता. आता हेच बघा ना, 'क्रौंच' हे नाव भारतीय कमी आणि फ्रेंच जास्त वाटावे असे असले तरी, एका शिकाऱ्याच्या बाणाने घायाळ झालेल्या क्रौंच पक्ष्याला बघून व्यासांना म्हणे अख्खे महाभारत सुचले. तेसुध्दा फ्रेंचमध्ये नव्हे तर संस्कृतमध्ये! तर असे कुणालाही कशातून काहीही सुचू शकते.
    नुकताच कोरोना विषाणू जगभरात पसरू लागल्यापासून लोकांच्या जीवनमानासोबतच त्यांच्या विचारांवर पण चित्रविचित्र परिणाम झालेला दिसू लागला आहे. ('डोक्यावर' हा शब्द खोडून 'विचारांवर' हा शब्द लिहिलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी, अध्यक्ष महाराज!) तर, कोरोना विषाणूचा प्रसार माणसाकडून माणसाकडे वेगाने होत असल्यामुळे जगभरातल्या शासनकर्त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला आणि माणसांचा माणसांशी संपर्कच येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या. 'ज्योत से ज्योत जलाते चलो' असे गुणगुणत हा विषाणू गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश, खंड यांच्या सीमा झुगारून पेटवापेटवी करत निघाला असताना शासनाने 'जरासी सावधानी, जिंदगीभर आसानी' असे धोरण जाहीर केले. लहानपणापासून 'माणूस हा समाजशील प्राणी आहे' असे शिकलेल्या जनतेला मात्र हे सामाजिक अंतर पाळणे जड गेले यात नवल नाही.
    आपल्या प्रियजनांच्या आठवणीने 'मिलो न तुम तो हम घबराए' असे वाटत होतेच, पण कोरोना संसर्गाच्या भीतीने 'मिलो तो आँख चुराए' असाही प्रकार सुरू होता. रोज अमुक इतके नवीन रुग्ण आढळले, अमुक बरे झाले, तमुक मरण पावले, असे अधिकृत आणि अनधिकृत आकडे टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मिडीया अशा सर्व दिशांनी येऊन आदळू लागले. लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येईना, एका शहरात राहत असून भेट होईना, दूध आणि भाजीसाठी बाहेर पडायचीसुद्धा भीती वाटू लागली. अशा भयग्रस्त, चिंताजनक आणि अनिश्चित वातावरणातदेखील कुणीतरी आम्हाला 'कोरोनावर काहीतरी इनोदी लिवा' म्हणून संपर्क केला.
    आता अशा परिस्थितीत कुणाला 'विनोदी लेखन स्पर्धा' वगैरे आयोजित करण्याची प्रेरणा मिळावी, हेदेखील समुद्रमंथनातून निघालेल्या विषाइतकेच उपयोगी आणि उपकारक आहे, असे तथाकथित क्षीरसागर सर नक्कीच म्हणाले असते याबद्दल माझ्या मनात कोरोना विषाणूइतकीही शंका नाही. (स्पर्धेच्या आयोजकांवर विनोद करणे शिष्टसंमत नसल्यास सदर वाक्य कामकाजातून वगळण्यात यावे अशी मी विनंती करतो, अध्यक्ष महाराज!)
    तर, कोरोना विषाणू हा माणसाप्रमाणे कामचुकार आणि भ्रष्ट नसल्याचे लक्षात यायला बराच वेळ लागला. हा विषाणू गरीब-श्रीमंत, जात-धर्म, देश-विदेश अशा कुठल्याच गोष्टीवर भेदभाव करत नाही, आणि आपल्याला स्वतःपुरती सुटका करून घेण्यासाठी त्याचा 'भाव'देखील करता येत नाही, हा त्याचा स्वभाव उशीराच लोकांच्या लक्षात आला. इतर वेळी अभावानेच आढळणाऱ्या बंधुभावाचे दर्शन घडवीत लोकांनी मग सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेसाठी स्वतःला आपापल्या घरांमध्ये कोंडून घेतले.
    पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीत गलितगात्र व्हायला आपण अर्जुन थोडीच आहोत? या वरवर नुकसानकारक दिसणाऱ्या गोष्टीने कितीतरी उपयोगी आणि उपकारक गोष्टींना प्रेरणा दिलेली बघायला मिळावी, हा मनुष्याच्या दुर्दम्य आशावादाचा दुर्मिळ आविष्कार मानता येईल काय? (हे विधान क्षीरसागर सरांच्या ज्ञानसागरातील शिंपल्यांमधील मोती गुंफून बनवले असले तरी भविष्यात आमच्या नावाने वापरण्यास हरकत नसावी, अध्यक्ष महाराज!)
    तर, या कोरोना संकटसमयी कुणा लेखकाला आपल्या लेखनाची समई पेटवून साहित्याचा उजेड पाडण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणा गवयाला राग मल्हार गाऊन सोशल मिडीयावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणा सुगरणाला (सुगरणीचे पुल्लिंग) 'पाकातल्या भजीचे थालिपीठ' बनवून आपल्यात दडलेल्या पाककलेचे अचाट प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणाला समाजसेवक बनून भुकेल्या पोटी अन्न भरवण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर कुणाला 'स्वयं'सेवक बनून भरल्या पोटी अन्नाचा संग्रह करण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणाला हॉटेलचा धंदा बंद करून महापालिकेत नोकरी करण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर कुणाला सॉफ्टवेअरमधील अनिश्चित नोकरी सोडून रोजच्या रोज रोख पैसे मिळवून देणारा भाजीचा धंदा करण्याची प्रेरणा मिळाली असेल.
    कुणाला कुठल्या गोष्टीतून कशाची प्रेरणा मिळेल हे काही आपण आधीच ओळखू शकत नाही. कोरोनामुळे समुद्रमंथन तर झालेले आहेच, आता त्यातून काय-काय बाहेर निघेल, काय उपयोगी असेल आणि किती टिकाऊ असेल, हे येणारा काळच ठरवेल. शेषनागावर निवांत पडून राहिलेल्यांची झोप कायमचीच उडाली असणार, एवढे मात्र नक्की!


- मंदार शिंदे
१९/०५/२०२०

Mobile: 9822401246



Share/Bookmark

Saturday, July 18, 2020

Written Vs Spoken Marathi

     लेखी मराठी मजकूर वाचून निवेदन करताना बोलीभाषेत 'लाईव्ह कन्व्हर्जन' करण्याची बहुतेक निवेदकांना सवय असते.
     उदाहरणार्थ, छापील वाक्य जर असे असेल - "आजच्या प्रमुख पाहुण्यांनी याच महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले व आपल्या माता-पित्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले."
     तर निवेदक बोलताना असे म्हणतील - "आजच्या प्रमुख पाहुण्यांनी याच महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि आपल्या माता-पित्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं."
     यासंदर्भात एक किस्सा (बहुतेक सुधीर गाडगीळांकडून) ऐकलेला आठवतो, तो असा -
     छापील वाक्य होते - "ललित साहित्याचा इतिहास सांगताना खांडेकर, खरे, खोटे, काळे, फडके, अशा अनेक प्रतिभावान लेखकांची नावे आवर्जून घ्यावी लागतील."
     हे वाक्य निवेदनाच्या धुंदीत असे वाचले गेले - "ललित साहित्याचा इतिहास सांगताना खांडेकर, खरं, खोटं, काळं, फडकं, अशा अनेक प्रतिभावान..."


Share/Bookmark

Friday, July 17, 2020

Does Corona Really Exist?

     कोरोनाची सध्या वापरण्यात येणारी टेस्ट मेथड परफेक्ट आहे असा आपला सगळ्यांचा भ्रम आहे.
     कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट येणारी प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार किंवा बिनडोक किंवा निष्काळजी आहे असा आपला मूर्ख निष्कर्ष आहे.
     मास्क लावून आणि घरात बसून कोरोना संपणार हा सरकारनं आपल्या हातात दिलेला आणि आपण आनंदानं वाजवत बसलेला खुळखुळा आहे.
     कोरोना पॉझिटीव्हचे आकडे दररोज / दर तासाला प्रत्येक ग्रुपवर फॉरवर्ड करून आपण थोर समाजकार्य करतो आहोत असा आपला भंपक गैरसमज आहे.
     औषध नसताना लाखो कोरोनाग्रस्त बरे कसे होतात? फक्त आणि फक्त कोरोनामुळं नक्की किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकार जाहीर का करत नाही? चार महिने कोपऱ्यावरचं हॉटेल बंद पण ब्रिटानिया आणि पारलेजी प्रॉडक्शन सुरु, झोमॅटो डिलीव्हरी सुरु, ह्यामागं काय गौडबंगाल आहे? असले लॉजिकल प्रश्न विचारायचं आपलं धाडसही नाही आणि बौद्धिक कुवतही नाही.
     उद्यापासून सरकार प्रत्येकाला जोड्यानं मारणार असं म्हटल्यावर आपल्या पसंतीच्या ब्रॅण्डचे जोडे विकत घ्यायला गर्दी करणारे गुलाम मानसिकतेचे लोक आहोत आपण.
     कुणीतरी हुकूम काढायचा आणि आपल्या चालण्या- फिरण्या- बोलण्या- काम करण्यावर बंदी घालायची, हीच आपली लायकी आहे.
     अस्तित्त्वात नसलेल्या कोरोनाबद्दल भीती पसरवणाऱ्या, खोटे आकडे आणि फोटो शेअर करण्यात धन्यता मानणाऱ्या निर्बुद्ध माणसांपासून खरं डिस्टन्सिंग पाळायची गरज आहे.


Share/Bookmark