ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label humour. Show all posts
Showing posts with label humour. Show all posts

Monday, September 28, 2020

Kaalji - Natyachhata (Dramatic Monologue)

 


    नाट्यछटा म्हणजे नाटकातला एक प्रसंग नव्हे. नाट्यछटा म्हणजे स्वगत नव्हे. नाट्यछटा म्हणजे एकपात्री प्रयोगसुद्धा नव्हे. स्वप्नरंजन नव्हे किंवा 'मी पंतप्रधान झालो तर' टाईप निबंध नव्हे.

    एकाच पात्रानं दुसऱ्या पात्राशी (किंवा पात्रांशी) साधलेला संवाद म्हणजे नाट्यछटा. पण ही दुसरी पात्रं अदृश्य असतात आणि एकाच पात्राच्या बोलण्यातून पूर्ण संवादाचा आभास निर्माण केला जातो. लिहायला अवघड पण वाचायला-बघायला भारी प्रकार असतो.


नाट्यछटा

काळजी


(पात्रः साधारण वीस ते पंचवीस वर्षे वयाची मुलगी)


कसंय ना मावशी, मला तुमची खूपच काळजी वाटते. तुमची म्हणजे तुझी, आत्याची, काकूची, मामीची, वहिनीची आणि आईची सुद्धा… कशाबद्दल? तुम्हाला सगळ्यांना माझी कित्ती काळजी वाटते, याचा विचार करून मलाच तुमची काळजी वाटायला लागलीय बघ... नाही समजलं? आता हेच बघ ना, मी लहान होते तेव्हा कधी मोठी होणार याची काळजी; आता मोठी झाले तर माझं शिक्षण कधी संपणार याची काळजी; शिक्षण संपेपर्यंत लग्नाची काळजी; लग्न होत नाही तोवर मुलं कधी होणार याची काळजी… बाप्रे! मला तर हे बोलतानासुद्धा धाप लागली बघ. आणि तुम्ही सदान्‌कदा यावरच चर्चा करताना कशा काय दमत नाही हाच प्रश्न पडतो मला... अगं हो, माहित्येय मला, तुम्ही नाही करणार तर कोण करणार माझी काळजी? पण मी काय म्हणते, तुम्हाला आधीच स्वतःच्या काळज्या कमी आहेत का? स्वतःच्या म्हणजे आपापल्या मुला-बाळांच्या... हो हो, मीसुद्धा तुला मुलीसारखीच आहे. मान्य आहे ना… पण तुझ्या स्नेहलला तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करायला चार वर्षं लागली, याची काळजी कमी होती का तुला? नाही, तशी मीनाआत्यापेक्षा कमीच म्हणायची तुझी काळजी… तुला नाही सांगितलं तिनं? अगं तिचा दिनेश… तीन वर्षं अडकून राहिला ना सेकन्ड इयरमधे… शेवटी सुटला म्हणतेस? छे गं, कसला सुटतोय तो! सिलॅबसच बदलला त्याच्या कोर्सचा, मग कॉलेजनं परत ऐडमिशन घ्यायला सांगितली. तेव्हापासून कॉलेजचं तोंड नाही बघितलं त्यानं… अय्या, तुलापण हेच सांगितलं का आत्यानं? त्याला डिग्री मिळाली म्हणून? वाटलंच मला! आता तूच सांग, तिच्यापुढं हा एवढा काळज्यांचा डोंगर उभा असताना तिनं माझी काळजी करायची काही गरज आहे का? काय केलं विचारू नकोस… आईला म्हणाली, प्रियाला डिग्रीचा अभ्यास झेपत नसेल तर पटकन लग्न उरकून टाका. लग्नानंतर मिळवेल हळू-हळू डिग्री, चार-पाच वर्षांत… बिच्चारी! मी नाही गं, मीनाआत्या. कित्ती काळजी करते माझी… बरं, तिचं जाऊ दे, ती स्वतः कधी गेली होती कॉलेजला? पण शोभाकाकूचं काय, ती तर स्वतः शिकलेली आहे ना? हो हो, तिची कोमल झाली ना इंजिनियर… नाही नाही, चारच वर्षं लागली तिला. राधामामीच्या राहुलसारखी सहा वर्षं लागली असती तर खचलीच असती… कोमल नाही गं, शोभाकाकू! तिचं प्लॅनिंग कसं पर्फेक्ट असतं ना एकदम. जरासुद्धा इकडं-तिकडं झालेलं चालत नाही तिला. आईला म्हणाली, पंचवीशीच्या आत मुलींची लग्नं झालीच पाहिजेत, म्हणजे तिशीच्या आत दोन मुलं पदरात! …मला तर ऐकूनच टेन्शन आलं बघ. नाही नाही, मी अजून पंचवीसच्या आतच आहे गं, पण तिची कोमल सरकली ना तिशीकडं… आधी म्हणाली, जॉब करायचाय, मग म्हणाली, अजून शिकायचंय… कलेक्टरच व्हायचंय म्हणे तिला आता. होऊ दे बिचारी! पण तिशीच्या आत दोन मुलं नाही झाली, तर शोभाकाकूच्या प्लॅनिंगचं काय? बघ, आहेत की नाही प्रत्येकाला स्वतःच्या काळज्या? तरी माझी अजून काळजी करायची असते तुम्हाला… अगं, तू कुठं निघालीस गडबडीनं? तुमच्या सगळ्यांचे सल्ले ऐकून-ऐकून आई मला काय म्हणाली ते सांगायचं राहिलंय अजून… नको, पुढच्या वेळी कशाला? आत्ताच ऐकून जा ना… पुढच्या वेळी दीपावहिनीची काळजी का वाटते त्याबद्दल सांगेन सविस्तर… नाहीच का थांबता येणार? ठीकाय मग… ए आई, मावशी निघालीय बघ गडबडीनं… नाही नाही, गेलीसुद्धा बाहेर. पोहोचली असेल आता निम्म्या वाटेत… मी कशाला घालवतीये तिला? गेली बिचारी स्वतःच उठून. काळजीच वाटते मला  तुमची सगळ्यांची…



© मंदार शिंदे

२३/०७/२०२०

Mobile: 9822401246

E-mail: shindemandar@yahoo.com

Blog: http://aisiakshare.blogspot.com

Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann



Share/Bookmark

Monday, August 10, 2020

Funny Things Overheard in Recent Times

 सध्या कानावर पडणाऱ्या काही गप्पा-गोष्टी

(इंडिया डेव्हलपमेंट रिव्ह्यू वेबसाईट, ३ ऑगस्ट २०२०)


१. स्थळ - भाजीचं दुकान; वेळ - संध्याकाळी ५:३०

हो ना, वेबिनार सुरुच आहे अजून. पण मी बोलणार आहे त्याला आणखी अर्धा तास वेळ आहे, म्हणून मग मी बाहेर आले भाजी घ्यायला… रात्रीच्या जेवणाची सोय नको का करायला? मी कशावर बोलणार आहे? तेच गं, मागच्या आठवड्यातल्या वेबिनारमध्ये दिलं होतं तेच भाषण आहे. ‘कामाच्या ठिकाणी आणि घरामध्ये स्त्री-पुरुषांच्या कामातील समानता आणि असमानता.’ हो ना, हे वेबिनार लवकर संपलं तर बरं होईल. त्यानंतर मलाच जेवण बनवायचंय… राजीवचं माहित्येय ना तुला, त्याला तर साधा चहासुद्धा नाही बनवता येत.”


२. स्थळ - सोसायटीतलं गार्डन; वेळ - संध्याकाळी ६

अरे काय सांगू भावा, जॉब गेला ना माझा. काढूनच टाकलं मला डायरेक्ट… काय झालं म्हणून काय विचारतोस? माझं स्क्रीन शेअरिंग सुरुच राहिलं, माझ्या लक्षातच नाही आलं ते… माझ्या ब्राऊजरमध्ये उघडलेले सगळे टॅब दिसले ना त्यांना… बरं ते जाऊ दे आता, ‘रेफरन्स चेक’ न करता कुणी जॉब देणार असेल तुझ्या माहितीत, तर नक्की सांग बरं का मला.”


३. स्थळ - किराणा दुकान; वेळ - दुपारी १

मी काय म्हणतो… तुझ्या माहितीत असं कुठलं वायफाय कनेक्शन आहे का, ज्याचा स्पीड अगदी म्हणजे अगदी कमी असेल आणि जे काम करताना सारखं-सारखं मधे-मधे बंद पडत असेल?”


४. स्थळ - ऑनलाईन योगा क्लास; वेळ - सकाळी ७:३०

“…आणि त्या दिवशी काय झालं माहित्येय? माझ्या ऑफिसमधल्या एकीनं नवऱ्याला सांगितलं, ‘जरा बाळाला म्यूटवर टाकता का, माझी मिटींग सुरु आहे…’ बाई गं, लोक आता ‘झूम’च्याच भाषेत बोलायला लागलेत…”


५. स्थळ - ऑनलाईन गप्पांचा अड्डा; वेळ - संध्याकाळी ६:३०

खरं सांगू का, प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा मला हे व्हिडीओ कॉलच आवडायला लागलेत सध्या… कशामुळं? लोकांची नावंच लक्षात राहत नाहीत ना माझ्या, आणि समोर भेटलं की मग एकदम अवघडल्यासारखं होतं. व्हिडीओ कॉलमध्ये ती भानगडच नाही ना!”


६. स्थळ - सार्वजनिक उद्यान; वेळ - संध्याकाळी ७

मलाही कळतंय, विनाकारण घराबाहेर पडणं बरोबर नाही ते… पण काय करणार, माझ्या मांजरीला सवयच नाही ना मला पूर्ण वेळ घरात बघायची. वैतागून गेलीय बिचारी. मग मीच बाहेर पडले… म्हटलं जरा पाय मोकळे करून येऊ.”


७. स्थळ - चौपाटी; वेळ - सकाळी ६

फारच दानशूर उद्योगपती आहेत ते… मला परवा काळजीच्या स्वरात म्हणत होते, ‘ह्या कोविड-19 आजारामुळं सगळे भेदभाव गळून पडलेत, कोण गरीब कोण श्रीमंत, सगळ्यांना एकसारखं नुकसान सोसायला लागतंय…’ तुझ्या माहितीसाठी सांगतो, या शहरातली दोन मोठी हॉस्पिटल्स त्यांच्या मालकीची आहेत बरं का!”



Original piece in English at https://idronline.org/overheard-in-the-social-sector




Share/Bookmark

Tuesday, July 21, 2020

Inspired by Corona

कोरोनाची प्रेरणा


    कुणाला कुठल्या गोष्टीतून कशाची प्रेरणा मिळेल हे काही आपण आधीच ओळखू शकत नाही. वरवर नुकसानकारक दिसणाऱ्या गोष्टीतून काहीतरी उपयोगी आणि उपकारक घडू शकते, 'जसे समुद्रमंथनातून विष बाहेर आले' असे आमचे क्षीरसागर सर सांगून गेले. आता उपयोगी आणि उपकारक गोष्ट म्हणून सरांना 'विष'च का आठवावे हा काही आपल्या चर्चेचा विषय नव्हे. खरे तर या सरांचे नावसुद्धा आता नीटसे आठवत नाही, पण 'समुद्रमंथना'ची गोष्ट त्यांनी सांगितली होती आणि विष्णू देवाची एन्ट्री वर्णन करताना 'तो क्षीरसागरात शेषनागावर पहुडलेला असतो' असे सरांनी सांगितलेले आठवते. त्यामुळे सरांचे आडनाव क्षीरसागर किंवा शेषन असावे असे पुसटसे वाटत होते. पण 'शेषन' आडनावाच्या माणसाने गांधींना आणि पवारांना सुखाने पडू दिले नाही तिथे विष्णू देवाची काय कथा? म्हणून सरांचे आडनाव क्षीरसागरच असावे असा आपला अंदाज... असो!
    तर, कुठल्या गोष्टीतून कुणाला कशाची प्रेरणा मिळावी, हा आपला मुख्य मुद्दा होता. आता हेच बघा ना, 'क्रौंच' हे नाव भारतीय कमी आणि फ्रेंच जास्त वाटावे असे असले तरी, एका शिकाऱ्याच्या बाणाने घायाळ झालेल्या क्रौंच पक्ष्याला बघून व्यासांना म्हणे अख्खे महाभारत सुचले. तेसुध्दा फ्रेंचमध्ये नव्हे तर संस्कृतमध्ये! तर असे कुणालाही कशातून काहीही सुचू शकते.
    नुकताच कोरोना विषाणू जगभरात पसरू लागल्यापासून लोकांच्या जीवनमानासोबतच त्यांच्या विचारांवर पण चित्रविचित्र परिणाम झालेला दिसू लागला आहे. ('डोक्यावर' हा शब्द खोडून 'विचारांवर' हा शब्द लिहिलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी, अध्यक्ष महाराज!) तर, कोरोना विषाणूचा प्रसार माणसाकडून माणसाकडे वेगाने होत असल्यामुळे जगभरातल्या शासनकर्त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला आणि माणसांचा माणसांशी संपर्कच येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या. 'ज्योत से ज्योत जलाते चलो' असे गुणगुणत हा विषाणू गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश, खंड यांच्या सीमा झुगारून पेटवापेटवी करत निघाला असताना शासनाने 'जरासी सावधानी, जिंदगीभर आसानी' असे धोरण जाहीर केले. लहानपणापासून 'माणूस हा समाजशील प्राणी आहे' असे शिकलेल्या जनतेला मात्र हे सामाजिक अंतर पाळणे जड गेले यात नवल नाही.
    आपल्या प्रियजनांच्या आठवणीने 'मिलो न तुम तो हम घबराए' असे वाटत होतेच, पण कोरोना संसर्गाच्या भीतीने 'मिलो तो आँख चुराए' असाही प्रकार सुरू होता. रोज अमुक इतके नवीन रुग्ण आढळले, अमुक बरे झाले, तमुक मरण पावले, असे अधिकृत आणि अनधिकृत आकडे टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मिडीया अशा सर्व दिशांनी येऊन आदळू लागले. लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येईना, एका शहरात राहत असून भेट होईना, दूध आणि भाजीसाठी बाहेर पडायचीसुद्धा भीती वाटू लागली. अशा भयग्रस्त, चिंताजनक आणि अनिश्चित वातावरणातदेखील कुणीतरी आम्हाला 'कोरोनावर काहीतरी इनोदी लिवा' म्हणून संपर्क केला.
    आता अशा परिस्थितीत कुणाला 'विनोदी लेखन स्पर्धा' वगैरे आयोजित करण्याची प्रेरणा मिळावी, हेदेखील समुद्रमंथनातून निघालेल्या विषाइतकेच उपयोगी आणि उपकारक आहे, असे तथाकथित क्षीरसागर सर नक्कीच म्हणाले असते याबद्दल माझ्या मनात कोरोना विषाणूइतकीही शंका नाही. (स्पर्धेच्या आयोजकांवर विनोद करणे शिष्टसंमत नसल्यास सदर वाक्य कामकाजातून वगळण्यात यावे अशी मी विनंती करतो, अध्यक्ष महाराज!)
    तर, कोरोना विषाणू हा माणसाप्रमाणे कामचुकार आणि भ्रष्ट नसल्याचे लक्षात यायला बराच वेळ लागला. हा विषाणू गरीब-श्रीमंत, जात-धर्म, देश-विदेश अशा कुठल्याच गोष्टीवर भेदभाव करत नाही, आणि आपल्याला स्वतःपुरती सुटका करून घेण्यासाठी त्याचा 'भाव'देखील करता येत नाही, हा त्याचा स्वभाव उशीराच लोकांच्या लक्षात आला. इतर वेळी अभावानेच आढळणाऱ्या बंधुभावाचे दर्शन घडवीत लोकांनी मग सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेसाठी स्वतःला आपापल्या घरांमध्ये कोंडून घेतले.
    पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीत गलितगात्र व्हायला आपण अर्जुन थोडीच आहोत? या वरवर नुकसानकारक दिसणाऱ्या गोष्टीने कितीतरी उपयोगी आणि उपकारक गोष्टींना प्रेरणा दिलेली बघायला मिळावी, हा मनुष्याच्या दुर्दम्य आशावादाचा दुर्मिळ आविष्कार मानता येईल काय? (हे विधान क्षीरसागर सरांच्या ज्ञानसागरातील शिंपल्यांमधील मोती गुंफून बनवले असले तरी भविष्यात आमच्या नावाने वापरण्यास हरकत नसावी, अध्यक्ष महाराज!)
    तर, या कोरोना संकटसमयी कुणा लेखकाला आपल्या लेखनाची समई पेटवून साहित्याचा उजेड पाडण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणा गवयाला राग मल्हार गाऊन सोशल मिडीयावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणा सुगरणाला (सुगरणीचे पुल्लिंग) 'पाकातल्या भजीचे थालिपीठ' बनवून आपल्यात दडलेल्या पाककलेचे अचाट प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणाला समाजसेवक बनून भुकेल्या पोटी अन्न भरवण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर कुणाला 'स्वयं'सेवक बनून भरल्या पोटी अन्नाचा संग्रह करण्याची प्रेरणा मिळाली असेल. कुणाला हॉटेलचा धंदा बंद करून महापालिकेत नोकरी करण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर कुणाला सॉफ्टवेअरमधील अनिश्चित नोकरी सोडून रोजच्या रोज रोख पैसे मिळवून देणारा भाजीचा धंदा करण्याची प्रेरणा मिळाली असेल.
    कुणाला कुठल्या गोष्टीतून कशाची प्रेरणा मिळेल हे काही आपण आधीच ओळखू शकत नाही. कोरोनामुळे समुद्रमंथन तर झालेले आहेच, आता त्यातून काय-काय बाहेर निघेल, काय उपयोगी असेल आणि किती टिकाऊ असेल, हे येणारा काळच ठरवेल. शेषनागावर निवांत पडून राहिलेल्यांची झोप कायमचीच उडाली असणार, एवढे मात्र नक्की!


- मंदार शिंदे
१९/०५/२०२०

Mobile: 9822401246



Share/Bookmark

Saturday, July 18, 2020

Written Vs Spoken Marathi

     लेखी मराठी मजकूर वाचून निवेदन करताना बोलीभाषेत 'लाईव्ह कन्व्हर्जन' करण्याची बहुतेक निवेदकांना सवय असते.
     उदाहरणार्थ, छापील वाक्य जर असे असेल - "आजच्या प्रमुख पाहुण्यांनी याच महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले व आपल्या माता-पित्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले."
     तर निवेदक बोलताना असे म्हणतील - "आजच्या प्रमुख पाहुण्यांनी याच महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि आपल्या माता-पित्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं."
     यासंदर्भात एक किस्सा (बहुतेक सुधीर गाडगीळांकडून) ऐकलेला आठवतो, तो असा -
     छापील वाक्य होते - "ललित साहित्याचा इतिहास सांगताना खांडेकर, खरे, खोटे, काळे, फडके, अशा अनेक प्रतिभावान लेखकांची नावे आवर्जून घ्यावी लागतील."
     हे वाक्य निवेदनाच्या धुंदीत असे वाचले गेले - "ललित साहित्याचा इतिहास सांगताना खांडेकर, खरं, खोटं, काळं, फडकं, अशा अनेक प्रतिभावान..."


Share/Bookmark