ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde
Showing posts with label maharashtra. Show all posts
Showing posts with label maharashtra. Show all posts

Wednesday, April 22, 2020

Cooperation is the key!

There is certainly no sense of love among the middle class and the general public about corporate and industry. But we have all come to the conclusion that there's no other choice if we wish to become a global superpower or don't want to miss the bus to prosperity.

There's an alternative to corporate industry, for sure. The co-operative movement. Cooperation has been the foundation of prosperity in Western Maharashtra. Co-operative societies can be set up and run in huge profits in all sectors like sugar industry, cotton mills, agricultural products and processes, education, banking, and so on. This isn't just a dream; it's our collective experience!

Industrialization promotes structure of one master and many servants / workers, which is a model complementary to capitalism. In co-operative societies, ownership of resources, profit, loss, liability, and risk is shared among the members.

It is not good for the industry if profit or resources are distributed among a lot of people (members). Because on the one hand, all the profits are less likely to return to the industry. Secondly, the more people are allowed to participate in decision making, the more time it takes, the more confusion it grows.

But the benefits of cooperation are far greater than the losses. As one compares the advantages and disadvantages of a dictatorship versus a democracy, one quickly comments as, "Our people need a dictator to set things right (pun intended)!" Nevertheless, listening to examples of dictatorships in history does not leave us unfrightened.

That's why cooperation seems to be the only cohesive, convincing, and profitable product/service model for us. A case study of the successful and unsuccessful organizations of the past can certainly be helpful in improving on this model according to today's technology and market demand. But if we leave the alchemy of co-op and choose to go for the white elephant of the corporate, would there be anything more unfortunate for us?

Remember, we cannot achieve prosperity without cooperation among the community!

- Mandar Shinde
9822401246


Share/Bookmark

Tuesday, April 21, 2020

Cooperation is the key! (Marathi)

कॉर्पोरेट कारखानदारीबद्दल मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य लोकांमधे प्रेमाची भावना नक्कीच नाही. पण जागतिक महासत्ता बनण्यासाठी किंवा प्रगतीच्या स्पर्धेत मागं पडू नये यासाठी आपल्याकडं दुसरा कुठला पर्यायच नाही, अशी आपण सगळ्यांनी समजूत करून घेतलेली आहे.

कॉर्पोरेट कारखानदारीला पर्याय आहे - सहकार चळवळ. पश्चिम महाराष्ट्राच्या सुबत्तेचा पाया सहकारच आहे. साखर उद्योग, सूत गिरणी, कृषी उत्पादने व प्रक्रिया, शिक्षण, बँकींग, अशा सगळ्या क्षेत्रांमधे सहकारी संस्था उभ्या करता येतात आणि प्रचंड फायद्यात चालवता येतात, हे स्वप्न नसून अनुभव आहे!

औद्यिगिकीकरणामधे एक मालक आणि अनेक नोकर/कामगार ही भांडवलशाहीला पूरक रचना असते. सहकारी संस्थांमधे संसाधनांची मालकी, नफा, तोटा, जबाबदारी, जोखीम या सगळ्याची सभासदांमधे वाटणी होते.

खूप लोकांमधे (सभासदांमधे) प्रॉफीट किंवा रिसोर्सेस वाटले जाणं इंडस्ट्रीसाठी चांगलं नसतं. कारण एक तर, सगळं प्रॉफीट पुन्हा इंडस्ट्रीत यायची शक्यता कमी होते. दुसरं म्हणजे, निर्णय घ्यायला जितकी डोकी जास्त लावली जातील, तितके जास्त फाटे फुटत जातात, वेळ लागतो, गोंधळ वाढतो.

पण तोट्यांच्या तुलनेत सहकाराचे फायदे नक्कीच कितीतरी जास्त आहेत. जसं लोकशाही विरुद्ध एकाधिकारशाही यांच्या फायदे आणि तोट्यांची तुलना करताना कुणीही पटकन म्हणून जातो, "आपल्या लोकांना वठणीवर आणायला हुकूम-शहाच पाहिजे (पन इन्टेन्डेड)!" असं असलं तरी, इतिहासातली हुकुमशाहीची उदाहरणं ऐकूनच आपल्या अंगावर काटे आल्याशिवाय रहात नाहीत.

त्यामुळं आपल्याला मानवणारी, पटणारी, आणि फायदेशीर उत्पादन/सेवा पद्धत सहकाराचीच आहे. भूतकाळातल्या यशस्वी-अयशस्वी संस्थांचा केस स्टडी करुन आजच्या तंत्रज्ञानानुसार आणि मार्केट डिमांडनुसार या मॉडेलमधे सुधारणा नक्कीच करता येतील. पण सहकाराचा परीस सोडून कॉर्पोरेटचा पांढरा हत्ती दारात बांधायला गेलो तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरु!

"विना सहकार नही उद्धार"

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६


Share/Bookmark

Monday, March 16, 2020

SMC Workshop at Satara


School Management Committee Workshop at Padegaon Tal. Lonand Dist. Satara

Parents, teachers and NGO representatives attended the workshop. Structure, roles and responsibilities of the committee were discussed.

SMC members, both parents and teachers emphasized on need of guidance and support for smooth and effective functioning of the committee.


Share/Bookmark

Monday, March 9, 2020

SMC GR Simplified

संवादाची सोपी भाषा…

मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या पालकांचा सहभाग घेण्यासाठी 'शाळा व्यवस्थापन समिती' हा प्रकार अस्तित्वात आला. समितीचे सदस्य होणाऱ्या पालकांना शाळेसंदर्भात काही अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. पण गंमत म्हणजे, पालकांनाच या प्रकाराची माहिती नीटशी कळालेली नसते, मग ते अधिकार वापरणार कसे आणि जबाबदारी पार पाडणार कशी?

पालकांना या समितीची रचना, कार्ये, महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळा पातळीवर त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. शासनाकडून, शाळेकडून, काही संस्थांकडून हे काम गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरु आहे. पण महाराष्ट्र राज्याचा आणि त्यातल्या शाळांचा आवाका लक्षात घेतला तर हे काम किती अवघड आहे याची कल्पना येईल.

गडचिरोली जिल्ह्यातल्या घाटी, रांगी, मार्कंडादेव, अशा काही आश्रमशाळांमध्ये गेलो होतो. आश्रमशाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातली मुलं-मुली शिकण्यासाठी राहतात, त्यांच्या पालकांशी 'शाळा व्यवस्थापन समिती'बद्दल चर्चा करायची होती. ही चर्चा आधारलेली होती महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागानं १४ डिसेंबर २०१८ तारखेला काढलेल्या शासन निर्णयावर.

शासन निर्णय नावाच्या डॉक्युमेंटला मराठीत जी.आर. असं म्हणतात. तर या जी.आर.च्या प्रथम पृष्ठावरील प्रथम परिच्छेदातील (म्हणजे पहिल्या पानावरच्या पहिल्या पॅराग्राफमधली) काही शब्द/वाक्यरचना उदाहरणादाखल अशी आहे - 

व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक, वरिष्ठ 
पातळीवरून मंजुरी, विलंबित निर्णयांचा विपरित परिणाम, सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्याचे प्रस्तावित, वगैरे वगैरे...

तर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी, म्हणजे पालकांशी चर्चा करण्याआधी एक महत्त्वाचं काम करायला लागणार होतं, ते म्हणजे हा जी.आर. मराठीत ट्रान्सलेट करणं. सोप्या, सुटसुटीत, आणि लक्षात राहील अशा पद्धतीनं अधिकृत माहिती कशी सांगता येईल असा विचार करत होतो. शेकडो वर्षांपूर्वी समाज साक्षर नसताना, संपर्काची माध्यमं उपलब्ध नसताना, सगळ्या लोकांपर्यंत महत्त्वाचे विचार कसे पोहोचवले जात होते, हे आठवलं आणि तीच पद्धत पुन्हा वापरायचा मोह झाला.

शासकीय आश्रमशाळा
'शाळा व्यवस्थापन समिती' रचना

समिती करावी स्थापन। शाळेचे करण्या व्यवस्थापन।
पालक शिक्षक मिळून। चालवावी शाळा॥

शासनाचा असावा सहभाग। निधी पुरवावा आवश्यक।
मार्गदर्शक नि प्रशिक्षक। रहावी भूमिका॥

पालकांची समिती प्रथम। शिकवून करावी सक्षम।
मुलांसाठी सर्वोत्तम। निर्णय घ्यावा॥

मुलांच्या हिताची खातरी। पालक समितीची जबाबदारी।
त्यासाठी नसावी जरुरी। शासन मंजुरी॥

निर्णयांच्या ठेवी नोंदी। जमाखर्च हिशेब मांडी।
मुख्याध्यापकांची मोठी। जबाबदारी॥

निधी जमा होई। समितीच्या बँक खाती।
खर्च झाला पुन्हा येई। निरंतर॥

मूल ज्याचे शाळेत। तोच होई अध्यक्ष।
आमदार नि खासदार। मागे राही॥

मुख्याध्यापक अधीक्षक। सचिव आणि सहसचिव।
बैठक चर्चा निर्णयांची। व्यवस्था करिती।

विद्यार्थी आणि विद्यार्थिनी। मुलांचे हे प्रतिनिधी।
समस्या नि सूचना मांडती। ठामपणे॥

एक सदस्य स्थानिक। शोधावा तो जाणकार।
यंत्रणा योजना प्रक्रियांवर। भाष्य करी॥

एकूण सदस्य अठरा-वीस। पैकी बारा पालक।
सहा तरी किमान। महिला असाव्या॥

समितीची करावी रचना। दोन वर्षांनी पुन्हा पुन्हा।
नवनवीन पालकांना। संधी मिळावी॥

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। दोघांचेही शिक्षण।
लेखन आणि वाचन। आवश्यक॥

समितीचे जे जे सदस्य। ओळख त्यांची विशेष।
सर्वांना मिळावे अवश्य। ओळखपत्र॥

गडचिरोली जिल्ह्यातल्या रामगड, येंगलखेडा, सोनसरी, कोरची, कारवाफा, येरमागड, सोडे, भाकरोंडी, कुरंडीमाल, पोटेगाव, अशा दुर्गम गावांमधून आलेल्या पालकांशी या पद्धतीनं संवाद साधता आला. यातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष किती उपयोग केला जातोय, हे स्थानिक संस्था अपेक्षा सोसायटी आणि संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापकच सांगू शकतील. पण जी.आर.मधून शासनाला नक्की काय सांगायचंय हे आम्हाला समजलं, असं पालकांना तरी वाटत होतं.

तुम्हाला काय वाटतंय?

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(संदर्भः महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. १४ डिसेंबर २०१८)


Share/Bookmark

Sunday, February 23, 2020

Smaller States Crisis

“…मोठ्या राज्याचे विभाजन घडवून आणण्याने त्या भूभागाच्या अर्थकारणाचा पॅटर्नच मुळापासून बदलून जातो. त्याचा परिणाम नव्याने अस्तित्वात येणाऱ्या राज्यांच्या आर्थिक आणि वित्तीय प्रकृतीवर अपरिहार्यपणे होतो. या सगळ्या गोष्टींचा आणि बदलांचा थेट संबंध नवनिर्मित राज्यांच्या विकास प्रक्रियेशी असतो. राज्य लहान असेल तर विकेंद्रित आणि सहभागात्मक विकासाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवता येते, राज्यातील नागरिकांच्या आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या विकासविषयक धोरणांमध्ये अधिक यथार्थपणे डोकावणे शक्य बनते, राज्यापाशी उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीवर स्थानिकांचेच नियंत्रण राहते, हे राज्य आकारमानाने आटोपशीर असेल तर तुलनेने अधिक सहजसुलभ बनते… अशा प्रकारची आर्थिक आणि विकाससंबद्ध समर्थने छोट्या राज्यांच्या निर्मितीचा पाठपुरावा करताना दिली जातात. ही सगळी स्पष्टीकरणे चुकीची अजिबात नाहीत; परंतु तरीही एक मूलभूत प्रश्न उरतोच. मोठ्या राज्याच्या विभाजनाद्वारे नव्याने अस्तित्वात आलेल्या, आकारमानाने लहान असणाऱ्या राज्यांचा आर्थिक पायाही जर आपातत्रः मर्यादितच असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम राज्याच्या विकासविषयक क्षमतांवर जाणवावा, हे ओघानेच येते. मग, अशा मर्यादित आर्थिक ताकद असलेल्या राज्यांना वित्तीय साहाय्यासाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहणे भाग पडते. म्हणजेच, राजकीय स्वायत्तता प्राप्त झाली तरी आर्थिक आणि वित्तीय स्वायत्तता धोक्यात येते. मग, या राजकीय स्वायत्ततेला व्यवहारात कितपत अर्थ उरतो? मुळात विभाजनामुळे आर्थिक क्षमताही जर मर्यादितच बनत असतील तर मग आर्थिक विकासासाठी त्या नवनिर्मित राज्याने पैसा आणायचा कोठून? निधीअभावी पुन्हा विकास रखडणारच असेल तर, ‘आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान आणि संतुलित बनण्यासाठी मोठ्या राज्यांचे विभाजन करुन आकाराने लहान लहान असणारी राज्ये  निर्माण केली जावीत,’ या प्रतिपादनालाही मर्यादा पडतात. दुसरे म्हणजे, लवचिक आणि मुबलक महसूल देणारी साधने केंद्रसरकारच्या हातात एकवटलेली आणि त्याच केंद्राच्या अर्थसाह्यावर विसंबलेली आकाराने लहान असणाऱ्या राज्यांची पिलावळ आशाळभूतपणे केंद्रसरकारच्या तोंडाकडे बघते आहे, ही रचना निकोप संघराज्यपद्धतीचे गमक मानता येईल का, हा तात्विक प्रश्न उभ राहतो तो वेगळाच!”

- अभय टिळक
(महाराष्ट्र टाइम्स, २० नोव्हेंबर २०११)



Share/Bookmark

Saturday, November 23, 2019

अनपेक्षित की बेसावध?

अनपेक्षित की बेसावध - एक थरारक सत्यकथा

लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६
वाचन वेळः ७ मिनिटे

कॉलेज संपवून नोकरी लागण्याचा काळ. एक-दोन वर्षांचा प्रत्येकाचा अनुभव. वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या शिक्ट. पण एका-एका फ्लॅटवर पाच-सात जण एकत्र रहायचो. कुणाची सुट्टी गुरुवारी, तर कुणाची रविवारी. त्यामुळं १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर हे राष्ट्रीय सुट्टीचे दिवस सोडून क्वचितच सगळे एकत्र भेटायचो. एखाद्याच्या वाढदिवसाचं आणि ३१ डिसेंबरला न्यू इयरचं निमित्त मात्र अगदीच न चुकवण्यासारखं. सगळेच गाव सोडून आलेले. आपापल्या फॅमिलीपासून लांब राहणारे आणि 'आपली' नवीन फॅमिली वसवण्याच्या प्रयत्नातले…

काही नशीबवान मुलांनी नोकरी मिळाल्यावर वर्षभरातच छोकरी गटवलेली, तर काही जणांनी गावाकडंच शाळा-कॉलेजातली जुनी सेटींग टिकवलेली. काही अगदीच आत्मविश्वास-शून्य मुलांनी मामाची मुलगी वगैरे हेरून ठेवलेली. ग्रुपमध्ये एकमेकांना एकमेकांची ही सगळी सेटींग माहिती असायची. एटीएम कार्डच्या मागं पिन लिहून 'माझेपण पैसे काढून आण' आणि ई-मेल अकाउंटचा पासवर्ड लिहून देऊन 'माझापण बायोडेटा फॉरवर्ड कर' असं विश्वासानं एकमेकांना सांगण्याचा जमाना होता तो. इंटरव्ह्यूला जायचंय म्हणून दहा किलोमीटर जायला आपली बाईक न देणारे मित्र, शंभर किलोमीटरवरुन 'मुलीला' घेऊन यायचंच म्हटल्यावर स्वतः पेट्रोल टाकून गाडीची किल्ली ताब्यात द्यायचे. वरुन काळजीनं विचारायचे सुद्धा - 'एकटाच जाशील का येऊ सोबत?' राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हायची संधी सहसा सोडायचे नाहीत असे सच्चे मित्र... मग किल्ली बाईकची असो किंवा फ्लॅटची... असो!!

तर अशाच एका मित्राची एक सेटींग 'जवळ-जवळ' फिक्स झाली होती. आता जवळ-जवळ म्हणजे किती? तर त्याच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के वगैरे फिक्सच... म्हणजे आता कोणत्याही क्षणी शपथविधी, सॉरी सप्तपदी उरकावी लागेल अशी परिस्थिती त्यानं वर्णन केलेली. पण मुलीच्या बाजूनं तशी काही चिन्हं दिसत नव्हती. म्हणजे 'होय' पण म्हणत नव्हती आणि 'नाही' पण म्हणत नव्हती. नुसतीच चर्चा आणि सल्ला-मसलत सुरु होती. वाढदिवसाला केक घेऊन भेटायला यायची, व्हॅलेंटाईन डे साठी ग्रीटींग देऊन जायची. (व्हॉट्सऐप आणि फेसबुक अजून जन्माला यायचे होते.) अशी जवळ-जवळ तयारच होती, पण ऑफिशियली युती जाहीर करायची काही लक्षणं दिसत नव्हती.

ग्रुपमधल्या अनुभवी मित्रांनी या मजनूला साईडला घेऊन समजावला. अनुभवी म्हणजे कसे, तर स्वत: कधीच सरकार स्थापन केलं नसलं तरी, इच्छुक उमेदवारांना स्वखर्चानं आळंदीला नेऊन त्यांचा शपथविधी पार पाडणं, आणि वेळप्रसंगी अशा अल्पमतातल्या सरकारमधला अविश्वास ठराव हाताळून सरकार पडण्यापासून वाचवणं, अशा बाबतीतला दांडगा अनुभव या मित्रमंडळींना होता. तर हे अनुभवी मित्र म्हणाले, गड्या हे काय खरं न्हाई.. तू काम-धंदा, अभ्यास-पाणी सगळं विसरून, आईबापाचा पैसा उडवून आणि कमावत्या मित्रांच्या कमाईचं पेट्रोल जाळून खंगत चाललायस. तुझी स्व-बळावर संसार करायची ताकद न्हाई आन पोरगी लई दिवस हे बघत बसंल असं वाटत न्हाई. तू म्हणतुस तसं जे काय जवळ-जवळ ऐंशी टक्के ठरलंय, त्याच्या फुडचं वीस टक्के तिच्याशी डायरेक बोलून कन्फर्म करुन घे गड्या…

अनुभवी मित्रांचा सल्ला आमच्या कुमार गौरव ऊर्फ तुषार कपूर ऊर्फ स्वप्निल जोशीला पटला. (आमच्या मित्रासाठी हीच तीन नावं 'नमुन्या'दाखल वापरण्याचं विशेष कारण आहे. समजलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या.) आमच्या हिरोनं हिरोईनकडं डायरेक्ट विषय काढला. समोरून उत्तर आलं, अजून माझं काय ठरलंच नाही. तू आधी शिक्षण पूर्ण कर, मग नोकरी कर, स्व-बळावर उभा रहा, मग मी आमच्या घरच्या आघाडीवर विषय चर्चेला घेते. बहुमताचा कौल बघून ठरवू काय करायचं ते…

मुलगी 'नाही' म्हटली नाही, या आनंदात हिरोनं आम्हाला पार्टी दिली. मुलीनं 'होय' तरी कुठं म्हटलंय, अशी शंका ग्रुपमधल्या राज्यपालांनी बटर पनीरमध्ये बटर रोटी बुडवून खाताना बोलून दाखवली. 'आमचा एकमेकांवर विश्वास आहे' असं म्हणून हिरोनं वेळ मारुन नेली. पनीर आणि रोटी पचायच्या आतच नको ती बातमी आली आणि जवळ-जवळ ऐंशी टक्के फिक्स असलेली आमच्या हिरोची शीट प्रचंड बहुमतानं आपटली.

बातमी अशी होती की, हिरोईनच्या हिरोबरोबर सुरु असलेल्या वाटाघाटी तिच्या घरच्या घटक पक्षांना समजल्या आणि सत्ता हातातून जायच्या आधीच तातडीनं 'राष्ट्रपती राजवट' लागू करत हिरोईनला तिच्या मामाच्या गावी हलवण्यात आलं. इकडं हिरोईनला परत मिळवण्याच्या लढाईची मोर्चेबांधणी करण्यासाठी हिरोनं मित्रपक्षांशी मिटींगा आयोजित केल्या. चहा, मसाला दूध, लिंबू सरबत, देशी-विदेशी थंड-गरम ग्लासांच्या साक्षीनं आणाभाका घेतल्या गेल्या. गनिमी कावा करु, जिंकू किंवा मरू, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, वगैरे प्रेरणादायी घोषणा आणि सुभाषितांची देवाण-घेवाण झाली. पण…

हे सगळं होईपर्यंत शत्रूपक्ष वाट बघत बसणार होता काय? आर्मीनं 'सर्जिकल स्ट्राईक' केल्यागत घाईगडबडीनं मुलीचं लग्नच लावून टाकल्याची बातमी आली. म्हणजे मुलगा शोधला कधी? मुलगी दाखवली कधी? बोलणी केली कधी? देण्या-घेण्याच्या याद्या लिहिल्या कधी? बस्ता आणि टॉवेल-टोपी आणि साड्या-बांगड्या आणि मेंदी-हळदी हे सगळं उरकलं कधी?? का डायरेक्ट शपथविधीच उरकून घेतला राज-भवनावर जाऊन…?

इकडं आमच्या दोस्ताची दाढी झपाट्यानं वाढू लागली. विश्वासघात झाला, दगाफटका झाला, असं तो भेटेल त्याला सांगू लागला. हे लग्न टिकूच शकत नाही, तिला फसवून तिकडं नेलंय, जबरदस्ती लग्न लावलंय, असं ओरडू लागला. आईबापानं केलेली अर्थसंकल्पीय तरतूद सिगारेटवर आणि मित्रांकडून मिळालेला आपत्कालीन रिलीफ फंड पेट्रोलवर जाळू लागला. जे झालं ते अनपेक्षित नव्हतंच, फक्त तू बेसावध राहिलास असं अनुभव मित्रांनी समजावलं... पण 'ती' परत येईल यावर त्याचा पूर्ण विश्वास होता.

आणि झालंही तसंच... पाच दिवस नांदून माहेरी परत आल्यावर तिनं रिक्षा पकडली आणि थेट भेटायलाच आली. अंगावर हिरवी साडी, हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र. मेंदीचा आणि हळदीचा रंग अजून उतरलासुद्धा नव्हता. नशिबात हेच लिहिलं होतं म्हणाली. सगळं आपल्या मनासारखं होत नसतंय म्हणाली. तुझं भविष्य उज्वल आहे (म्हणजे वर्तमानकाळ अंधकारमय आहे), तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल (म्हणजे माझा नाद आता सोड), पुढच्या वेळी असा बेसावध राहू नकोस (म्हणजे आधी शपथविधी उरकून घे, नंतर बहुमत सिद्ध करता येतं), असा आयुष्यभर उपयोगी पडणारा धडा शिकवून निघून गेली.

आमचा मित्र ह्यातनं काय शिकला किंवा नाहीच शिकला, हे महत्त्वाचं नाही. आपल्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून आपण सावध रहावं यासाठी ही गोष्ट जशी आठवली तशी सांगितली. गोष्ट उलगडून सांगताना राजकीय संदर्भ आणि राजकीय शब्द वापरले असले तरी ही गोष्ट अजिबात राजकीय नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती…

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२३/११/२०१९


Share/Bookmark

Friday, October 25, 2019

राजकारणाचे धडे

राजकारणाचे धडे

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(वाचन वेळः ८ मिनिटे)

    २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी प्रचाराचं रान पेटवलं आणि भाजपच्या 'सत्ता एक्सप्रेस'ला करकचून ब्रेक लागला. पवारांनी व्यक्तिशः घेतलेल्या कष्टाचं आमदाररुपी फळ त्यांना बऱ्यापैकी मिळालं असलं तरी, काँग्रेसची वाढलेली ताकद किंवा थांबलेली घसरण ही जास्त चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय ठरली हे खरं. कुठलाही स्टार प्रचारक नाही, पवारांसारखा खंबीर नेता नाही, दमदार उमेदवार नाहीत, स्थानिक किंवा राज्याच्या पातळीवर आग लावणारे मुद्दे नाहीत, फंडिंग आणि कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासून वानवाच आहे, अशा परिस्थितीत काँग्रेसला लोकांनी दिलेला प्रतिसाद (मतं) अनपेक्षितच. पण या अनपेक्षित निकालाचं विश्लेषण करणंदेखील महत्त्वाचं आणि तितकंच इंटरेस्टिंग ठरेल.

    मुळात, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्या अस्तित्वाच्या कसोटीतच बेसिक फरक असतो. एखाद-दुसऱ्या टर्ममध्ये सत्ता गेली किंवा मिळाली म्हणून राष्ट्रीय पक्ष संपत नसतो किंवा फार मोठाही होत नसतो. प्रादेशिक पक्षासाठी मात्र प्रत्येक टर्म ही निर्णयात्मक ठरू शकते. एखाद्या टर्मला मागं पडलेला प्रादेशिक पक्ष पुन्हा उभा करणं फार कठीण जातं. काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्रात पाच-दहा वर्षे वरखाली झाल्यानं मूळ संघटनेला फार मोठा धक्का बसत नाही. पण शिवसेना, मनसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष आहेत. एक-दोन टर्म सत्तेपासून लांब राहिले तर, फंडिंगपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्याचं शॉर्टेज निर्माण होतं. हा बॅकलॉग रिकव्हर करणं पुढं-पुढं अजून कठीण होत जातं. यासाठी सत्तेत टिकून राहणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी प्रचंड तडजोडी करत हा सत्तेत टिकून राहण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तो त्यांच्या प्रगतीसाठी नाही, तर अस्तित्वासाठी गरजेचा आहे. राज ठाकरे, राजू शेट्टी, अशा इतर प्रादेशिक नेत्यांचा व्यक्तिगत करिष्मा फार काळ टिकणं शक्य नाही. त्यांनी एक बेसिक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून, किरकोळ तडजोडी करायला हरकत नसावी. अस्तित्व टिकलं तरच ताकद वाढवता येईल. डायरेक्ट ताकद वाढवायला गेला, तर बेडकाचा बैल होण्याऐवजी फुटून मृत्यू होईल, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

    २०१४ मध्ये मोदी लाट प्रचंड वेगानं येऊन आदळली ती थेट काँग्रेसवरच. मुळात केजरीवालनं तयार केलेल्या पीचवर मोदींनी बॅटिंग करून मॅच जिंकली. तेव्हा केंद्रात आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसचं अस्तित्व संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पण पुढच्या पाच वर्षांत 'मोदी फीवर' टिकून राहिला, किंबहुना वाढतच गेला, तरीसुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश, आणि पंजाब, यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपचा पाडाव करून काँग्रेसनं सत्ता हिसकावून घेतली. कर्नाटक, गोवा, यांसारख्या राज्यांमध्ये सत्तेत राहण्यासाठी भाजपला आपला नैतिकतेचा बुरखा फाडून हरप्रकारच्या लांड्या-लबाड्या कराव्या लागल्या. आणि आता काही महिन्यांपूर्वीच लोकसभेला एकतर्फी बहुमत मिळवणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रात मात्र हात दाखवून अवलक्षण करून घेतलंय.

    काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांना कंटाळून जनतेनं मोदींच्या उमेदवारांना निवडून दिलं होतं, त्यांच्या जागी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच इम्पोर्ट केलेले उमेदवार फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या माथी मारायचा प्रयत्न केला. पूर्वी राष्ट्रवादीला 'पक्ष' न म्हणता, 'निवडून येणाऱ्या लोकांची टोळी' म्हणायचे. तोच फॉर्म्युला वापरायचा अयशस्वी प्रयत्न फडणवीसांनी केला. पण म्हणून फक्त बाहेरून आलेल्यांवर आपल्या अपयशाचं खापर त्यांना फोडता येणार नाही. पंकजा मुंडे, राम शिंदे, शिवतारेंसारखे मंत्री, आणि योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, अशा मूळच्या 'अातल्याच' भाजपवासी नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय. पण आपल्या नियोजित प्रयत्नांना मिळालेलं अपयश पचवण्यासाठी आणि त्यातून भविष्यात उपयोगी पडणारा धडा शिकण्यासाठी लागणारी राजकीय मॅच्युरिटी फडणवीसांसाठी 'आऊट ऑफ सिलॅबस' आहे. त्यामुळं 'स्ट्राईक रेट'ची गणितं मांडून शब्दच्छल करण्याचा पोरखेळ त्यांनी चालवलाय. पुढच्या वेळी २८८ पैकी एकच जागा लढवून ती जिंकली, म्हणजे स्ट्राईक रेट १००% होऊ शकेल असंही पुढच्या पाच वर्षात ते 'अभ्यासोनी' प्रकटतील. फक्त ती एक जागा त्यांची स्वतःची किंवा प्रदेशाध्यक्षांची नसावी, अन्यथा स्ट्राईक रेट शून्यदेखील होऊ शकतो, एवढं लक्षात आलं तरी खूप आहे.

    राष्ट्रवादीसाठी ही पुढची पाच वर्षं खूप क्रिटिकल असणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपच्या दावणीला गेलेले बैल सूर्यास्तानंतर माघारी फिरण्याची दाट शक्यता आहे. कारण घरच्यांना डावलून यांना उमेदवारी देऊनसुद्धा निवडून न आलेल्या या अपशकुनी नेत्यांना 'सासरचे लोक' अजून पाच वर्षं नांदवतील, असं वाटत नाही. या परत फिरणाऱ्या चिमण्यांचं नेतृत्व पुन्हा एकदा श्रीमंत छत्रपती राजेंनी केलं तर आश्चर्य वाटायला नको. 'विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते' असं राष्ट्रवादीचे सध्याचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि नेते मानून घेतील का? त्यांच्यावर राग धरुन आपलेच कष्ट वाढवायचे, की या पूर्वाश्रमीच्या झुंबरांना आता पायरीचे दगड बनवून पक्ष अजून मजबूत करायचा, यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला भावना बाजूला ठेवून निर्णय घ्यायला लागणार आहे. यावेळी साहेबांनी तारुन नेलं, पण पुढच्या वेळेसाठी साहेबांना गृहीत धरता येणार नाही. त्या अनुषंगानं मोर्चेबांधणी आत्तापासूनच करावी लागणार आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरुवातीच्या काळात त्यांना शरद पवारांची 'बी टीम' म्हटलं जायचं, पाच वर्षांपूर्वी अरविंद केजरीवालच्या आम आदमी पार्टीला कधी काँग्रेसची तर कधी भाजपची 'बी टीम' म्हणायचे. सध्या वंचित बहुजन आघाडीला हा आरोप सहन करायला लागतोय. या वेळी विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार जितक्या ठिकाणी दोन-तीन हजारांनी पडला, त्या प्रत्येक ठिकाणी 'वंचित'च्या उमेदवारांनी पाच-सात हजार मतं मिळवली आहेत. 'वंचित' नसते तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असता, असं बोललं जातंय. पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी! 'वंचित'चा उमेदवार नसता तर ती मतं 'नोटा'ला सुद्धा जाऊ शकली असती ना? 'वंचित'नं ज्या उमेदवारांना किंवा लोकसमूहांना संधी आणि प्रतिनिधित्व दिलंय, त्यांना आघाडी आणि युतीकडून अशी संधी कधीच मिळाली नाही, भविष्यातही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळं 'वंचित'नं कुणाचीही 'बी टीम' असल्याच्या आरोपाकडं दुर्लक्ष करत, वर सांगितल्याप्रमाणं एक बेसिक अजेंडा समोर ठेऊन राजकारणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवावं. आज ना उद्या बहुजन समाजाला त्यांची गरज आणि महत्व पटेल आणि ते 'वंचित'च्या मागं ठामपणे उभे राहतील, अशी आशा धरायला वाव आहे.

    घराणेशाहीतून पुढं आलेल्या उमेदवारांना विरोधकांनी फारसा मजबूत पर्याय न देण्याचा एक अलिखित करार सगळेच पक्ष पाळतात. पण विरोधकांनी चांगला पर्याय दिला नाही तरी आपल्याला हा प्रस्थापित घराण्याचा उमेदवार नकोय, हे सांगण्यासाठी मतदारांकडं आता 'नोटा'चा पर्याय उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे 'नोटा'ला पडणारी मतं एकूण मतांच्या ०.५ ते १.५ टक्के एवढ्या प्रमाणात दिसून येतात. या वेळच्या निवडणुकीत, लातूर ग्रामीणला धीरज देशमुख, पलूस-कडेगावला विश्वजीत कदम, वरळीला आदित्य ठाकरे, यांच्याविरुध्द विरोधकांनी नाममात्र उमेदवार दिले. पण मतदारांनी 'नोटा'ला ५ ते १५ टक्के एवढं जास्त मतदान करून आपली नापसंती आवर्जून नोंदवलेली दिसली. या प्रतिकूल मतांचा संबंधित उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी जरूर विचार करावा.

    राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसनं राज्यातलं आपलं अस्तित्व आणि महत्त्व दोन्ही टिकवून ठेवलेलं असलं तरी, प्रादेशिक नेतृत्व मजबूत करण्याची त्यांनाही गरज आहेच. विधानसभा आणि इतर स्थानिक निवडणुका प्रादेशिक प्रश्नांवर लढल्या जातात. त्यासाठी हे प्रश्न समजू शकणारं प्रादेशिक नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. प्रादेशिक स्तरावर आपला करिष्मा दाखवणारे कॅप्टन अमरिंदर, अशोक गेहलोत, डॉ. शशी थरूर, भूपेन्द्र सिंह हुड्डा, अशा नेत्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विशिष्ट कालावधीसाठी संधी देण्यात यावी. जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा आणि मेथडॉलॉजीचा फायदा पक्षाला देशभरात करून येता येईल. सोनिया गांधी काँग्रेसमध्ये येण्याआधीच्या काळात राष्ट्रीय नेतृत्व बदलतं राहील याची काळजी घेतली जायची. साधारण १९९८-९९ च्या दरम्यान शरद पवार, ममता बॅनर्जी, आणि इतर अनेक मजबूत प्रादेशिक नेते पक्ष सोडून गेले आणि काँग्रेसच्या प्रदेश कमिट्यांना चक्क एटीएम सेंटरचं स्वरूप आलं. एटीएम केंद्रात जसे प्रत्यक्ष निर्णय घेतले जात नाहीत, वॉचमनशिवाय इतर कुणी विशेष कौशल्य किंवा अधिकार असलेला प्रतिनिधी उपलब्ध नसतो, मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी मुख्य ब्रांचवर सगळे एटीएम अवलंबून असतात, अशा प्रकारची पक्ष रचना चुकीची आणि नुकसानकारकच आहे. ती बदलण्यासाठी आणि पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करायची गरज आहे.

    निवडणूक प्रचाराची माध्यमं बदलतायत, साधनं बदलतायत, मतदानाच्या एक महिना आधी प्रचार करून भागत नाही, प्रचार पाच वर्षं सुरूच ठेवायला लागतोय, हे २०१४ च्या निवडणुकीनं आणि त्यानंतरच्या पाच वर्षांच्या काळानं शिकवलं. "सत्ता येते, जाते… पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात" हे २०१९ च्या निवडणुकीनं शिकवलं. आता हे धडे व्यवहारात कोण कसं वापरतंय, यावर त्या-त्या 'विद्यार्थ्या'ची भविष्यातली राजकीय वाटचाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा अवलंबून राहील हे नक्की !

- मंदार शिंदे
9822401246
२५/१०/२০१९


Share/Bookmark

Sunday, October 6, 2019

कोथरुडचा घाट

कोथरुडचा घाट

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवारांचा प्रभाव कमी करण्यासाठी, भाजपमधून स्थानिक नेत्यांना राज्य सरकारात महत्वाचं स्थान देणं गरजेचं होतं. महानगरपालिकेवर भाजपनं आपला झेंडा फडकवला असला तरी, सुरेश कलमाडींच्या नंतर 'पुण्याचा नेता कोण' हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. गिरीश बापट यांना लोकसभेत पाठवल्यानंतर राहिलेल्या सात आमदारांपैकी एकाचीही राज्याच्या राजकारणावर छाप पाडण्याची क्षमता नव्हती. भविष्यात पुन्हा सत्तेची सूत्रं एखाद्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याकडं जाऊ द्यायची नसतील, तर पुण्यातून निवडून गेलेल्या आमदाराला महत्वाचं पद मिळणं आवश्यक होतं. चंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपानं भाजपला असा उधार पण सक्षम आमदार सापडला आहे. उपमुख्यमंत्री लेव्हलचं महसूल खातं आणि भाजप प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या चंद्रकांत दादांमुळं पुण्याला नवीन नेता लाभणार असं दिसतंय.

आता दादांच्या एंट्रीसाठी कोथरूडच का? माधुरीताई मिसाळ (पर्वती), जगदीश मुळीक (वडगाव शेरी), भीमराव तापकीर (खडकवासला), योगेश टिळेकर (हडपसर), या सध्याच्या आमदारांपैकी कुणीच आपला मतदारसंघ चंद्रकांत दादांसाठी सोडायला तयार झाले नसते. तसंही या लोकांचं राजकीय पुनर्वसन करणं पक्षासाठी कठीणच काम ठरलं असतं. त्यापेक्षा निवडून आले तर ठीक, नाहीतर आपल्याच कर्मानं पडतील, हा सुज्ञ विचार इथं दिसतोय. गिरीश बापट यावेळी लोकसभेवर निवडून गेले असले तरी, दिल्लीच्या राजकारणात ते रमतील (किंवा टिकतील) असं दिसत नाही. त्यामुळं त्यांच्या जागी प्रॉक्सी आमदार तेच निवडतील आणि निवडून आणतील. पुणे कॅन्टोनमेंट राखीव मतदारसंघ असल्यामुळं तो पर्याय नव्हताच.

मग राहिले शिवाजीनगर आणि कोथरूड मतदारसंघ. यापैकी शिवाजीनगरला मागच्या वेळी भाजपचे विजय काळे निवडून आले असले तरी ती भाजपसाठी भरवशाची सीट नव्हे. उलट कोथरूडमध्ये प्रा. मेधा कुलकर्णी यांनी नगरसेवक ते आमदार या प्रवासात भाजपला चांगला बेस तयार करून दिला आहे. कोथरूडचा मतदार सुशिक्षित आणि सुजाण समजला जातो. राज्यात महत्वाचं स्थान असणाऱ्या नेत्याला कोथरूडचे मतदार दूरदृष्टीनं स्वीकारतील, असं वाटतंय. शिवाय राजकारण हा मेधाताईंचा पूर्णवेळ 'व्यवसाय' नसल्यामुळं त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं फारसं अवघड जाणार नाही. प्रसंगी जनतेच्या प्रश्नांवर पक्षविरोधी भूमिका घ्यायला खंबीर असलेल्या मेधाताईंना पक्षामध्ये चांगलं आणि महत्त्वाचं स्थान मिळेल, असं वाटतंय. मागं-पुढं राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यासाठी त्या उत्तम पर्याय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार वंदनाताई चव्हाण यांना मिळालेलं स्थान भाजपमध्ये प्रा. मेधाताई मिळवू शकतील, असं दिसतंय.

भाजपचा प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आपल्याच पूर्वीच्या बालेकिल्ल्यात शंभर टक्के रिस्क घेऊन उतरला असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मात्र हाराकिरी करत चंद्रकांत दादांना आयताच 'पास' देऊन टाकला आहे. मनसेचे किशोर शिंदे चंद्रकांत दादांना फाईट देऊ शकतील, असं अजिबातच वाटत नाही. अगदी चंद्रकांत पाटलांना हरवून किशोरभाऊ आमदार झालेच तर, पूर्वी ११ लाखांची दहीहंडी करायचे ती २१ लाखांची करतील. यापेक्षा फार मोठ्या आणि वेगळ्या अपेक्षा त्यांच्याकडून करता येणार नाहीत, हे कोथरूडकर चांगले जाणतात. त्यामुळं कोथरूडची सीट जिंकणं, चंद्रकांत दादांना अग्निपरीक्षा द्यायला लावणं, पुण्यातल्या स्थानिक भाजप-सेना नेत्यांना शह देणं, भविष्यात दीर्घकाळासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला डोकेदुखी निर्माण करणं, असे जवळ-जवळ अर्धा डझन पक्षी एका तिकिटात मारले जातील, असं सध्यातरी वाटतंय. आता चंद्रकांत दादांना हा घाट पार करता येतोय, का आतले-बाहेरचे मिळून त्यांचा बाजीप्रभू देशपांडे करतायत, हे लवकरच बघायला मिळेल!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६




Share/Bookmark

Thursday, August 22, 2019

देणाऱ्याचे हात हजारो...

सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी 'मैत्री'कडून केल्या गेलेल्या कामाचा आढावा घेणं आणि तिथं समजलेल्या-शिकलेल्या गोष्टी सर्वांसमोर मांडणं, या हेतूनं २१/०८/२०१९ रोजी पुण्यात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे नोंदवून ठेवणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटलं, म्हणून हा रिपोर्ताज. - मंदार शिंदे 9822401246

देणाऱ्याचे हात हजारो…

सांगली-कोल्हापूर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज येताच 'मैत्री'ची पहिली तुकडी सांगलीत दाखल झाली. मदतीसाठी कुठलाही फिक्स अजेंडा ठरवला नव्हता. परिस्थितीचं नेमकं आकलन करुन मग मदतीचं स्वरुप ठरवायचं होतं.

तन्मय आणि संतोष म्हणाले की, पहिल्या तुकडीनं ०९/०८/२०१९ रोजी थेट सांगली जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. आम्ही मदतकार्यात सहभागी होऊ इच्छितो, अशी त्यांच्याकडं नोंदणी केली.

संतोषनं सांगितलेल्या अनुभवानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी स्वतःच गडबडून गेलेले होते. कुठल्या गावात कामाची गरज आहे, याची नेमकी माहिती त्यांच्याकडं नव्हती. प्रशासन पोहोचू शकलं नाही अशा गावात जाऊन काम करा, असं त्यांनी सांगितलं. नक्की कशा प्रकारच्या मदतकार्याची गरज आहे, तेही सांगितलं नाही. बाहेरुन आलेल्या वस्तूंची नोंद त्यांनी करुन घेणं अपेक्षित होतं. 'मैत्री'नं आणलेल्या वस्तूंची नोंद केली, इतर सामानाची नोंद केलेली दिसली नाही.

'राहत टीम' (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) च्या वैभव पंडीत यांनी, २०१८ च्या केरळ राज्यातल्या पुरावेळी मदतकार्यात सहभाग घेतला होता. तो अनुभव शेअर करताना वैभवनं सांगितलं की, केरळच्या महापुरात टाटा इन्स्टीट्यूटमधून काम केलं. मदतीसाठी बाहेरुन वस्तू आणि स्वयंसेवक यायच्या आधीच केरळ प्रशासनाची चांगली तयारी झालेली होती. नेमक्या गरजा ओळखलेल्या होत्या. केरळ प्रशासनाकडं मदतकार्यात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या संस्थांची यादी होती. आलेलं सामान नक्की कुठं पाठवायचं, याबद्दल संस्था आणि स्वयंसेवकांना प्रशासनाकडून सूचना दिल्या जात होत्या. त्यानुसार, वैभवच्या टीमनं मदतीसाठी आलेल्या वस्तूंच्या वाटपामध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं. महाराष्ट्रात मात्र प्रशासकीय यंत्रणेमध्ये तयारी आणि समन्वयाचा अभाव प्रकर्षानं जाणवला.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिलवडीजवळच्या माळवाडी गावात कुठलीच मदत पोहोचली नव्हती. त्यामुळं 'मैत्री'ची टीम, असेल त्या रस्त्यानं आणि मिळेल त्या वाहनानं माळवाडीला जाऊन पोहोचली. तन्मयनं नमूद केलं की, माळवाडी गावामध्ये त्याच दिवशी चोपडेवाडी, सुखवाडी, या शेजारच्या गावांमधून पूरग्रस्त आले होते. त्यांच्यासाठी माळवाडी ग्रामस्थांनी खाण्या-पिण्याची व्यवस्थित सोय केली होती. पण अचानक घर-गाव सोडून आल्यामुळं त्यांच्याकडं इतर कुठल्याही वस्तू नव्हत्या.

अंजली मेहंदळे म्हणाल्या की, सगळे पूरग्रस्त छावणीमध्ये आश्रयाला उतरले नव्हते. बऱ्याच लोकांनी आपापल्या नातेवाईकांकडं आसरा घेतला होता. स्थानिकांनी वाटेतल्या सगळ्या पतसंस्था, शाळा, वगैरे उघडून पूरग्रस्त लोकांची सोय केलेली दिसली. त्याचवेळी, छावणीच्या ठिकाणी समाजातील विविध गटांनुसार पूरग्रस्तांचे गट रहात असलेले दिसले. बायकांचे गटदेखील वेगळे रहात होते, असं अंजलीनं नमूद केलं.

त्या तुलनेत, सांगली शहरात मदतीची फारशी गरज दिसली नाही, असं निरीक्षण तन्मयनं नोंदवलं. एक तर, सांगली शहराच्या मिरज वगैरे बाजूला अजिबात पूर नव्हता. शहरातले एका बाजूचे रस्ते सुरु होते. बाहेरुन मदत येण्यासाठी इस्लामपूर मार्ग बंद असला, तरी कराड-तासगाव मार्ग सुरु होता. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मदत पोहोचत होती. त्या मानानं ग्रामीण भागात मदतीचे ट्रक कमी पोहोचत होते. चौथ्या दिवसापर्यंत सांगलीमध्ये खूप जास्त मदत पोहोचली होती. पूरग्रस्तांची नेमकी गरज काय आहे, हे न ओळखता बाहेरुन सामान पाठवलं जात होतं.

अशा परिस्थितीत, सांगलीचे अमित शिंदे आणि त्यांच्या टीमनं सांगलीमध्ये आसरा छावण्यांचं काम ताबडतोब सुरु केलं होतं. अमितनं सांगितलं की, कशा प्रकारची मदत अपेक्षित आहे याबद्दल पहिल्या दिवशी व्हॉट्सऐपवर एक मेसेज बनवून पाठवला होता, तो आजही फॉरवर्ड होतोय आणि रोज शेकडो फोन येतायत. शासनाचा इमर्जन्सी नंबर मात्र उपलब्ध नसल्याचं त्यानं नमूद केलं. प्रशासनाकडून धोक्याच्या नेमक्या सूचना मिळत नव्हत्या. त्यामुळं लोक २००५ सालच्या पुराशी तुलना करुन निर्धास्त राहिले. त्यावेळी एवढं पाणी आलं नव्हतं, म्हणून आताही येणार नाही, अशा गैरसमजात लोक राहिल्यानं जास्त नुकसान झाल्याचं आणि रेस्क्यु टीमवरदेखील जास्त ताण आल्याचं अमितचं मत होतं.

तन्मयच्या मते, धोक्याच्या सूचना अधिकृत यंत्रणेकडून नियमित वेळाने मिळत राहणं आवश्यक होतं. त्यामध्ये नक्की किती पाऊस पडणार, पाण्याची पातळी किती वाढणार, याचे तपशील अपेक्षित होते. त्याऐवजी सोशल मिडीयावर, पूरग्रस्त गावातल्या लोकांनी स्वतःच पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ पुन्हा-पुन्हा फॉरवर्ड होत राहिले, ज्यामुळं बाहेरच्या लोकांना परिस्थितीची नक्की कल्पना करणं अवघड गेलं. माळवाडीतल्या एका तरुणानं पूर परिस्थितीचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला होता. तो बघून कुणीतरी कुठून तरी एक टेम्पो भरुन सामान गावात पाठवलं होतं. असे अनियोजित अनियंत्रित प्रकार घडताना दिसत होते.

वैभवच्या अनुभवानुसार, पूर आला की नदीच्या प्रवाह मार्गातली कोणती गावं पाण्याखाली जाणार, हे आधीच ओळखता येतं. केरळच्या भौगोलिक रचनेचा अनुभव नसूनही, गुगल मॅपचा अभ्यास करुन त्यांच्या टीमला मागच्या वर्षी संभाव्य पूरग्रस्त गावं ओळखता आली होती. सांगली-कोल्हापूरच्या पुरात मात्र अशा यंत्रणेचा अभाव ठळकपणे जाणवला. 'राहत टीम'चे (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) राजू केंद्रे, ऋषी आंधळकर यांनी सांगलीत जाऊन, नक्की काय मदत लागणार याचा अंदाज घेतला. गावातल्या लोकांशी बोलून मदतीची गरज ठरवली. त्यानुसार नवीन कपडे, भांडी, शालेय साहित्य गोळा करायला सुरुवात केली.

जागृती ग्रुपची मनीषा म्हणाली की, सोशल मिडीयावरुन केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. फर्ग्युसन कॉलेज रोडवर मदतीचं सामान गोळा करण्यात आलं. त्यांनी स्वयंसेवकांच्या चार टीम बनवल्या - त्यापैकी एक मेडीकल टीम होती, तर बाकीच्या तीन टीम आलेल्या सामानाचं वर्गीकरण करुन कीट बनवायचं काम करत होत्या. साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी या कामासाठी पुण्यातलं 'साखर संकुल' वापरायची परवानगी दिली. आतापर्यंत सुमारे २५,००० किट तयार केले आणि जवळपास २२ ट्रक मदत पाठवली, असं मनीषानं सांगितलं.

आपत्तीनंतर पहिल्या २४ तासात लोकांना अगदी बेसिक गोष्टींची गरज असते. त्यानंतर सुटका (रेस्क्यू), दिलासा (रिलीफ), आणि तत्कालिक व दीर्घकालीन पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) या टप्प्यांमध्ये, लागणाऱ्या मदतीचं स्वरुप बदलत जातं. बदलत्या गरजेनुसार मदत पाठवली नाही, तर अतिरिक्त आणि अनावश्यक मदतीचं रुपांतर कचऱ्यात होतं, असं मत विनीता ताटके यांनी नोंदवलं. याबाबतीत स्थानिक प्रशासनाकडून समन्वय साधला गेला, तर जास्त परिणामकारक आणि उपयुक्त मदतकार्य करता येतं, असा केरळच्या पुरावेळचा अनुभवही त्यांनी सांगितला. आपत्ती ओढवल्यापासून कितव्या दिवशी मदत पोहोचणार, यानुसार 'मैत्री'नं लोकांकडून मागवलेल्या वस्तू वेगवेगळ्या होत्या. उदाहरणार्थ, सुरुवातीला धान्य आणि जीवनावश्यक वस्तू, चटया, ब्लँकेट, वगैरे, त्यानंतर कपडे, शैक्षणिक साहित्य, असे बदल करण्यात आले. परंतु, अगदी सुरुवातीला चटया आणि ब्लँकेट मागवल्या असल्या तरी, खूप लोकांकडून जुने कपडेच जास्त संख्येनं आले, असंही त्यांना दिसून आलं.

प्रत्यक्ष पूरग्रस्त गावात जाऊन पहिल्या टीमनं पाहणी केली होती. त्यांच्या फीडबॅकनुसार, कुठल्या वस्तू मागवायच्या हे ठरवल्याचं लीनता वैद्य यांनी सांगितलं. चटया, पांघरुणं, लहान मुलांचे कपडे, मास्क, अशा वस्तूंची मागणी केली. लोकांकडून या वस्तू घेतानाच बघून घेतल्या आणि वस्तूंची विभागणी सुरुवातीलाच केली. याआधीच्या मदतकार्यांच्या अनुभवांवरुन ही सुधारणा केल्याचं लीनता म्हणाल्या. देणगी स्वरुपात मिळालेल्या गोण्यांमध्ये-पोत्यांमध्ये, सुरुवातीलाच वर्गीकरण करुन सामान भरुन ठेवलं होतं. एवढी तयारी असल्यामुळं, पूरग्रस्त भागातून मागणी आल्या-आल्या लगेच मदत पाठवता आली. ट्रकमध्ये लोडींग करताना सुरुवातीला हलकं सामान भरलं, नंतर जड सामान भरलं. यामुळं सामान व्यवस्थित पोहोचलं आणि उतरवताना सोयीचं गेलं. मागच्या अनुभवांनुसार लोकांना मदतकार्याबद्दल व्यवस्थित निरोप गेले होते, त्यामुळं यावेळी बऱ्याच लोकांनी आधी फोन करुन, 'काय सामान पाहिजे' असं विचारुन घेतलं आणि त्यानुसार वस्तू पाठवल्या, काही वस्तू विकतदेखील आणून दिल्या, असं लीनता वैद्य यांनी आवर्जून सांगितलं.

संतोषनं सांगितलं की, सुरुवातीला माळवाडीसाठीच मदतीचं सामान घेऊन ट्रक मागवले होते, पण नेमकी आदल्या दिवशी गावात आलेल्या सामानाची चोरी झाली. शिवाय स्थानिक ग्रामसेविकांवर गावातल्या लोकांचाच विश्वास नव्हता. सामान ठेवायला दुसरी जागा मिळाली, पण त्याच्या कुलुपाच्या किल्ल्या चक्क सहा लोकांकडं असल्याचं समजलं. पुण्यातून लोकांनी विश्वासानं पाठवलेल्या सामानाची चोरी किंवा गैरवापर होऊ नये, असं टीमला वाटत होतं. त्यामुळं पुण्याहून निघालेले मदतीच्या सामानाचे ट्रक वाटेत थांबवले आणि पलूसकडं वळवले.

मदतीचं सामान घेऊन ट्रकसोबत गेलेल्या प्रविण यांनी पलुसच्या डॉ. पवार यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, पलूसमध्ये जवळपास १२ टन सामान उतरवण्यात आलं. तिथून किट तयार करुन मग गावांमध्ये वाटप करायला नेले. या सगळ्या कामात डॉ. पवार यांचं मोठं योगदान होतं. महाराष्ट्रातल्या विविध भागांतून आलेल्या स्वयंसेवकांच्या जेवणाची सोयदेखील डॉ. पवार यांच्याकडंच केली होती. पुण्यातून मदतीचं सामान घेऊन जाण्यासाठी ट्रक भाड्यानं घेतले होते. ट्रकचे चालक फक्त सांगितलेल्या ठिकाणी ट्रक घेऊन गेले. स्वयंसेवकांनी साखळी करुन १२ टन सामान उतरवल्याचंही प्रविणनी सांगितलं.

तन्मयनं सांगितलं की, पूरग्रस्त भागातली परिस्थिती दर दोन तासांनी बदलत होती. सोशल मिडीयावरुन इतक्या लोकांपर्यंत आवाहन पोहोचलं होतं की, कुठून कधी कसली मदत येईल तेसुद्धा सांगता येत नव्हतं. त्यामुळं छावण्यांमधल्या आणि गावातल्या परिस्थितीचा सतत आढावा घेऊन वाटपाचं नियोजन करावं लागत होतं. जिल्हा पातळीवर समन्वय नसल्यानं काही गावांमध्ये खूप जास्त, तर काही ठिकाणी अगदीच नगण्य प्रमाणात मदत पोहोचत होती.

या संदर्भात, 'राहत टीम' (सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ) तर्फे सामानाच्या २२ ट्रकचं व्यवस्थापन केल्याचा अनुभव वैभवनं शेअर केला. जवळपास १४० स्वयंसेवक क्रीडा संकुलात साठा, वर्गीकरण आणि वाटपाचं काम करत होते.

स्थानिक लोकांच्या सहभागाचं महत्त्व सांगताना, वैभवनं इस्लामपूर जवळच्या नवेखेड गावाचं उदाहरण दिलं. पुराचं पाणी वाढू लागल्यावर स्थानिक तरुणांनी, घरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी खूप काम केलं. गावातल्या लोकांची गरज लक्षात घेऊन, त्यांनी बाहेरुन आलेल्या मदतीपैकी फक्त दोनच ट्रकमधून सामान उतरवून घेतलं, आणि बाकीचे ट्रक पुढच्या गरजू गावांकडं पाठवून दिले.

वैभवचं म्हणणं होतं की, मदतीचे बरेचसे ट्रक मुख्य रस्त्यांनीच आले आणि गेले. आतल्या गावांपर्यंत मदत गरजेपेक्षा कमी प्रमाणात पोहोचली. तसंच, मदत म्हणून धान्य मिळालं, पण गिरण्या बंद असल्यानं त्याचा उपयोग झाला नाही. पूरग्रस्त गावांमध्ये आणि छावणीच्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी सिलिंडरची गरज होती, पण सगळ्याच गावांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा होता. याबाबतीत थोडं नियोजन करायला पाहिजे होतं, असं वैभवला वाटतं.

आपत्तीनंतर तातडीनं वीज, गिरणी, वगैरे गोष्टी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं धान्यस्वरुपात मदत करण्याऐवजी, मोठ्या प्रमाणावर फूड कॅम्पमध्ये जेवण बनवून तयार अन्नाचं वाटप करायची गरज आहे, असं राजेशनाही वाटतं.

राजेश आणि त्यांची टीम नृसिंहवाडीजवळ कुरुंदवाडच्या सैनिक शाळेत शिकलगार वस्ती कॅम्पवर काम करत होती. इथं बिस्कीटांचा खूप जास्त पुरवठा झाला होता, त्या मानानं धान्य कमी पोहोचलं होतं, असं राजेशना दिसून आलं. आलेल्या मदतीचं खरोखर गरजू लोकांमध्ये समान वाटप करणं हे खूप मोठं आव्हान होतं, असं ते म्हणाले. या ठिकाणी, एका खोलीत ७-८ पूरग्रस्त कुटुंबं, अशी एकूण १४० कुटुंबं आश्रयाला राहिली होती. या कुटुंबांमधल्या जवळपास ४७० लोकांचा डेटा राजेशच्या टीमनं नोंदवून घेतला. ज्या शाळेत ही छावणी लावली होती, तिथले कागद वापरुन कुपन बनवले आणि प्रत्येक कुटुंबाला दिले. मग एका वेळी एकाच खोलीतल्या कुटुंबांना स्वतंत्रपणे बोलवून मदतीचं वाटप केलं. यामुळं गडबड-गोंधळ न होता, सगळ्यांना गरजेनुसार वस्तू देता आल्या.

मदत साहित्याच्या वाटपाचं एवढं नियोजन करुनही, या छावणीच्या ठिकाणी गोंधळ कसा उडाला, याबद्दलचा अनुभव राजेशनं सांगितला. मराठी नाट्य परिषदेकडून मदतीच्या सामानाचे तीन ट्रक कोल्हापूरला पाठवण्यात आले होते. त्यापैकी एका ट्रकमधलं सामान खिद्रापूरला लोकांनी काढून घेतल्याचं समजलं. दुसरा ट्रक कुरुंदवाडला आला होता, आणि तिसरा ट्रक नरसोबावाडीलाच थांबून राहिला होता. कुरुंदवाडाला आलेल्या ट्रकमध्ये फक्त ६७ किट्स होते, आणि मदत घ्यायला आलेल्या लोकांची संख्या खूप जास्त होती. ट्रकमधले किट घेण्यासाठी लोकांमध्ये मारामारी झाली. मग राजेश आणि टीमनं त्यांना वाटपासाठी मदत करायचं ठरवलं. कॅम्पमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना आधीच मदत मिळाली होती, त्यामुळं त्यांना वगळून बाकीच्या कुटुंबांना हे किट द्यायचं ठरलं. प्रत्येक कुटुंबातल्या फक्त बायकांनाच रांगेत थांबायला सांगितलं, ज्यामुळं गर्दी निम्म्यानं कमी झाली. तरीसुद्धा जवळपास १०० बायका रांगेत थांबल्या होत्या.

नरसोबावाडीला थांबलेल्या ट्रकमध्ये अजून किट होते, पण खिद्रापूर आणि कुरुंदवाडच्या अनुभवामुळं त्यांचं पुढं यायचं धाडस होत नव्हतं. मग राजेश आणि टीमनं कुरुंदवाडमधून एक छोटा हत्ती (टेम्पो) ठरवून, ट्रक थांबलेल्या ठिकाणी पाठवला. मोठ्या ट्रकमधून छोट्या टेम्पोमध्ये सामान हलवलं आणि कॅम्पमध्ये आणलं. त्यांचे किट तयार होतेच. शिवप्रतिष्ठान, नाट्य परिषद, मैत्री, आणि इतरांकडून आलेल्या सामानाचं अनलोडींग आणि सॉर्टींग त्यांनी केलं. पूरग्रस्तांकडून रेशनकार्ड मागवून घेतले आणि त्यावर सामान मिळेल तसं मार्किंग केलं. हे सर्व नियोजन बघितल्यावर, 'ट्रकमधून उघड्यावर सामान वाटणं चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया कॅम्प लावलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.

मदतीच्या सामानाचे किट बनवूनच पाठवले तर वाटप करणं सोयीचं जातं, असं राजेशना वाटतं. धान्याच्या कट्ट्यातून (पोत्यातून) किलो-किलो धान्य मोजून त्याचं वाटप करणं शक्य होत नाही. तसंच, किट बनवताना ज्यांनी धान्याच्या पिशव्यांना भोकं पाडली नव्हती, त्यात हवा भरुन प्रवासात पॅक फुटले होते, असंही राजेशना दिसून आलं. किट पॅकिंग करताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, पूरग्रस्त गावातल्या गिरण्या बंद असल्यानं लोकांना गहू नको होते, पिठाची गरज होती. हा निरोप मदत पाठवणाऱ्यांपर्यंत तातडीनं पोहोचवण्याची गरज होती, असंही राजेशनी सांगितलं.

सांगलीमध्ये अमित शिंदे यांच्या टीमनं १८ ठिकाणच्या कॅम्पमध्ये सुमारे ३,५०० पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली. सोशल मिडीयावरच्या आवाहनांना प्रतिसाद देत बाहेरच्या लोकांनी पाठवलेल्या मदतीचं व्यवस्थापन करणं, हेदेखील एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. सुरुवातीला खूप जास्त अन्नपदार्थ पाठवले जात होते. उरलेलं अन्न टाकून द्यायला लागलं. म्हणून अन्न पाठवू नका, असं आवाहन केलं. आता कॅम्प बंद झालेत आणि लोक पुन्हा आपल्या घरी परत जातायत. पण घरात लगेच अन्न शिजवता येईल अशी परिस्थिती नाही. आता अन्नाची खरी गरज आहे, पण आता कुणीच अन्न पाठवत नाहीये. नक्की केव्हा कुठल्या प्रकारची मदत पाठवायची, याचा समन्वय फार महत्त्वाचा आहे, असं अमितचं मत आहे. आता पुनर्वसनाच्या कामासाठी देखील मदतीची गरज आहे; पण मदतीचा ओघ कमी होताना दिसतोय, असंही निरीक्षण मांडलं.

अंजली मेहंदळे म्हणाल्या की, चोपडेवाडीमध्ये कॅम्पमधून परत घरी गेल्यावर पहिली गरज स्वच्छतेची होती. बरेच दिवस घर पाण्याखाली राहिलं होतं, सामान कुजलं होतं, जनावरं मेली होती, काही आजारी पडली होती. मदतकार्यामध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला मेडीकल टीम होत्या, पण जनावरांचे डॉक्टर्स फारसे दिसले नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.

सुनीलच्या अनुभवानुसार, पलूस भागात भारती विद्यापीठ आणि विश्वजीत कदमांच्या टीमनं उत्तम नियोजन आणि मदतकार्य केलं. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी आणि तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तातडीनं सोय केली जात होती. पण आता पुनर्वसनाचं काम प्रचंड अवघड आहे, असं सुनीलना वाटतं. प्रत्यक्ष नुकसान झालेले पूरग्रस्त तर आहेतच, पण अप्रत्यक्ष पूरग्रस्तांची संख्यादेखील खूप आहे. आणि त्यांचं नुकसान ओळखणंदेखील कठीण आहे. अल्पभूधारक शेतकरी आणि भूमीहीन शेतमजुरांसाठी तातडीनं मदत उपलब्ध करुन द्यायची गरज आहे. त्यांच्यासाठी रोजगाराचे पर्याय लवकर उभे करणंही महत्त्वाचं आहे.

पुन्हा अशी आपत्ती आल्यास उपाययोजना म्हणून गावांच्या विस्थापनाचा पर्याय सुचवला जातो, पण लोक सहजासहजी मूळ गाव सोडून जायला तयार होणार नाहीत. त्यामागची भावनिक कारणंदेखील लक्षात घ्यायची गरज आहे, असं सुनीलना वाटतं.

तन्मयनं नोंदवलेलं निरीक्षण असं होतं की, पूर परिस्थितीचा नेमका अंदाज न आल्यानं, काही गावांमधले लोक स्वतःहून पुराच्या पाण्यात थांबले-अडकले होते. सुटकेसाठी आलेली एनडीआरएफ टीम लोकांची समजूत काढून त्यांना बोटींमध्ये बसवून बाहेर काढत होती. यामध्ये एनडीआरएफ टीमचा खूप वेळ वाया जात होता आणि आधीच कमी संख्या असलेल्या बोटीदेखील एकाच गावात अडकून पडत होत्या. बोटींची उपलब्धता आणि वापर याबाबत जिल्हापातळीवर प्रशासनाचा एनडीआरएफशी समन्वय नव्हता किंवा योग्य प्रकारे त्यांना सूचना मिळत नव्हत्या.

याच संदर्भात वैभवचा अनुभव असा होता की, आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत शासकीय अधिकाऱ्यांचं सेन्सिटायजेशन झालेलं दिसत नाही. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप हा बिल्डर लोकांचा ग्रुप असून, त्यांच्याकडं मदतकार्यासाठी लागणारे गम बूट, मास्क वगैरे सामान प्रचंड प्रमाणात उपलब्ध होतं. पण विशिष्ट सोसायटी आणि वस्तीतच हे काम करायचं, असा त्यांचा हट्ट होता. इतर ठिकाणी कामाची गरज जास्त असेल तर शासनानं समन्वय साधून, मदतकार्याची साधनं स्वयंसेवकांना किंवा संस्थांना उपलब्ध करुन द्यायची गरज होती. पण याबाबतीत शासनाकडं पाठपुरावा करुनसुद्धा त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही, याचं वाईट वाटत असल्याचं वैभवनं सांगितलं.

एका शाळेत स्वयंसेवक म्हणून स्वच्छतेचं काम करत असताना, तिथल्या मुख्याध्यापिका स्वयंसेवकांनाच आदेश देऊन काम करुन घेत असल्याचा अनुभव वैभवला आला. तर दुसरीकडं, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेल्या स्वयंसेवकांचं, त्याही परिस्थितीत स्थानिक लोकांनी आदरातिथ्य केल्याचा अनुभव संतोषनी सांगितला.

शासनाकडून मिळणारी मदत सुरुवातीला संथ आणि अपुरी होती; पण ब्रह्मनाळमध्ये बोट उलटल्याच्या प्रसंगाची बातमी पसरल्यानंतर मदतीचा वेग वाढल्याचं निरीक्षण संतोषनी नोंदवलं.

कुरुंदवाडच्या मोमीन मोहल्ला, शिकलगार वस्ती या भागात काम करताना राजेश आणि टीमला मास्कचा खूपच तुटवडा जाणवला. तसंच, मातीच्या घरांच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या ताडपत्री आणि प्लास्टीक शीट यांचीसुद्धा कमतरता जाणवत होती.

पुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर, रस्त्यांवर चिखल आणि कचरा साचला होता, असं राजेशनी सांगितलं. ड्रेनेज तुंबले होते आणि दुर्गंधी पसरली होती. कचरा आणि चिखल उचलण्यासाठी जेसीबीचा वापर करत होते. पण छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये जेसीबी जाऊ शकत नव्हता. मग लोक या गल्ल्यांमधला कचरा मुख्य रस्त्यावर आणून टाकत होते आणि नगरपालिकेची गाडी तिथून तो उचलून घेऊन जात होती. काही ठिकाणी डिझेल टाकून कचरा जाळायचे प्रकार सुरु होते. त्यामुळं आणखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली. याबाबत लोकांमध्ये जागृती करायची गरज राजेशना वाटते.

आपत्ती घडून गेल्यानंतर आपत्तीच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन हे 'सेकंड डिझास्टर' असतं, असं वैभवचं म्हणणं होतं.

पुराच्या पाण्यामुळं घरातल्या फर्निचरपासून अनेक वस्तू टाकाऊ झालेल्या आहेत. असा कचरा वर्गीकरण न करता शहराबाहेर फेकून दिला जातो. हा कचऱ्याचा पूर आहे, याचं व्यवस्थापन कसं करावं, असा प्रश्न विनीतानं उपस्थित केला.

पूरग्रस्तांना मदतीच्या भावनेनं अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या वस्तू पाठवल्या आहेत. पण त्यामुळं नवीनच प्रश्न निर्माण झाल्याचं अमितनं सांगितलं. उदाहरणार्थ, काही लोकांनी मदत म्हणून आपल्या घरातले जुने कपडे पाठवले आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये आणि शहरामध्ये या कपड्यांमुळं अडगळ निर्माण झाली आहे. तसंच, मोठ्या प्रमाणावर बाहेरुन धान्य व किराणा मालाचा पुरवठा झाला आहे. पुढचे काही महिने पूरग्रस्तांना या वस्तू विकत घ्याव्या लागणार नाहीत. पण आधीच पुरामुळं नुकसानीत आलेल्या सांगलीतल्या किरकोळ धान्य आणि किराणा माल विक्रेत्यांच्या उत्पन्नावर याचा मोठा विपरित परिणाम होणार आहे, असं अमितला वाटतं.

एका गावातल्या पोल्ट्रीमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं सगळ्या कोंबड्या मेल्या, आणि दुर्गंधी पसरुन शेजारच्या गावातले लोक आजारी पडले आहेत. हे अप्रत्यक्ष पूरग्रस्त म्हणावे लागतील, असं वैभवला वाटतं. शिवाय, नुकसान भरपाईची वेळ येईल तेव्हा स्थलांतरित मजूर, पारधी वस्ती, झोपडपट्टी, वीटभट्टी, अशा ठिकाणी विशेष लक्ष द्यायची गरज आहे, असंही मत व्यक्त केलं. या लोकांना कसलीही मदत मिळाली नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं नाहीत, ते स्थानिक रहिवासी नाहीत, त्यांच्या नुकसानीचा पंचनामा नाही, की शासनाकडे त्यांचा कसलाही डेटादेखील नाही.

तात्पुरत्या आसऱ्यासाठी उभारलेल्या छावण्यांमधून लोक आता आपापल्या घरी परत जात आहेत. आता त्यांची घरं पुन्हा उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज असल्याचं अमितनं आवर्जून सांगितलं.

सोशल मिडीयावर लोकांनी स्वतःच बनवून फॉरवर्ड केलेले खूप मेसेज फिरत राहतात. पण प्रशासनाकडून अधिकृत मेसेज प्रसारित केले जावेत, अशी अपेक्षा अमितनं व्यक्त केली. उदाहरणार्थ, कोणत्या आपत्तीमध्ये कोणते रोग होऊ शकतात, याबद्दल माहिती मिळाली तर, पूरग्रस्त आणि मदतकार्य करणाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेता येईल.

पुरासारखी आपत्ती घडून गेल्यावर, बाहेरच्या उत्साही आणि उत्सुक लोकांनी 'डिझास्टर टुरिझम' टाळलं पाहिजे, असं तन्मयला वाटतं. पूरग्रस्त परिसराचे आणि लोकांचे फोटो काढून फॉरवर्ड करणं, तसंच स्वतः शहानिशा न करता, येईल तो मेसेज सोशल मिडीयावर फॉरवर्ड करत राहणं, या सगळ्यामध्ये संयम राखला पाहिजे, असं मत तन्मयनं व्यक्त केलं.

यावर उपाय म्हणून, सोशल मिडीयावर आपत्तीबद्दल किंवा मदतीसाठी आवाहन करणारा मेसेज पाठवताना त्यामध्ये तारीख टाकावी, तसंच ही मदत जास्तीत जास्त कधीपर्यंत अपेक्षित आहे हेसुद्धा लिहावं, अशी सूचना अनिकेतनं केली. जेणेकरुन अनिश्चित काळासाठी असे मेसेज फिरत राहणार नाहीत.

मदतीचा पुरवठा होत असताना, पूरग्रस्त भागाचं सातत्यपूर्ण विश्लेषण आवश्यक असल्याचं अनिकेतनं नमूद केलं. उदाहरणार्थ, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर बाहेरुन पाठवले जात असताना, प्रत्यक्ष पूरग्रस्त भागातले लोक मात्र हापशातून मिळणारं दूषित पाणी पिण्यासाठी वापरत होते. त्यांच्यापर्यंत तातडीनं पाणी शुद्ध करणारं मेडीक्लोर पोहोचवण्याची गरज होती.

याशिवाय, पूरग्रस्त भागात घरानुसार डेटा कलेक्शन करणं आणि त्याचं अनॅलिसिस करणं, हे पुनर्वसनाच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचं आहे असं अनिकेतला वाटतं. कायमस्वरुपी पुनर्वसन होईपर्यंतच्या काळात तात्पुरता निवारा उपलब्ध करणं, गरजेच्या वस्तू पोहोचवणं आवश्यक आहे. या सर्व कामात डॉक्टर स्वयंसेवकांची खूप गरज जाणवत असल्याचंही अनिकेतनं नमूद केलं.

कॅम्पमधल्या आणि कॅम्पमधून पुन्हा आपल्या घरी जात असलेल्या लोकांचं समुपदेशन करणंही महत्त्वाचं आहे, असं वैभवला वाटतं. आपल्या घरांचं, वस्तूंचं, जनावरांचं, आणि माणसांचं नुकसान सहन करायला त्यांना मानसिक आधाराची गरज पडणार आहे.

कुठल्याही आपत्तीच्या वेळी, 'मला मदत करायची आहे', या भावनेपेक्षा 'समोरच्याला काय गरज आहे', हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे असं राजेशला वाटतं. तरच योग्य वेळी योग्य मदत मिळणं शक्य होऊ शकेल.

संतोषच्या मते, आपत्ती व्यवस्थापनाचं काम करु इच्छिणाऱ्या संस्थांचं शासनानं प्रशिक्षण करावं, नियमित काळानं त्यांची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रील घ्यावं. आपत्तीच्या वेळी फक्त प्रशिक्षित संस्थाच त्या ठिकाणी काम करतील, याची शासनानं जबाबदारी घ्यावी. बाकीच्या व्यक्ती आणि संस्थांनी या प्रशिक्षित संस्थांच्या कामात सहभाग घ्यावा, जेणेकरुन जिल्हापातळीवर मदतीचं नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल. आपत्तीच्या वेळी काम करणाऱ्या संस्थांनी आपली एक टीम आपत्तीच्या जागेवर थांबवावी, तर दुसऱ्या टीमनं समन्वयाचं काम करावं, असंही संतोषनं सुचवलं.

एकूणच आपत्ती प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपली खूपच कमी तयारी असल्याचं मत विनीतानं व्यक्त केलं. अशा प्रसंगी, समन्वय कसा साधायचा, आपत्ती काळात कुणाकडं कुठली जबाबदारी असते, याबाबत कुणाशी संपर्क साधायचा, या गोष्टींचा सगळ्यांनीच विचार करायची गरज आहे, असं विनीताला वाटतं.

आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण, आणि संस्था व शासन यांच्यात समन्वयाची गरज असल्याचं मत सर्वच सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.

२१/०८/२०१९ पुणे

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Sunday, August 18, 2019

सगुण - निर्गुण

महाराष्ट्र शासनाने शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी जाहीर केलेल्या 'सगुण विकास कार्यक्रमा'तील आक्षेपार्ह मुद्देः

• पुढारलेली किंवा नेतृत्व करणारी शाळा व 'इतर' शाळा अशी भेदभावपूर्ण मांडणी

• नेतृत्व करणारी शाळा निवडण्यासाठी निकषः

४. विविध नवनवीन उपक्रम राबविणारी व ते उपक्रम इतर शाळेशी शेअर करण्याची तयारी असलेली शाळा.
९. परिसरातील शाळांना विकासासाठी मदत करण्यास सहमती दर्शविणारी शाळा.
(निकष ४ व ९ नुसार, 'इतर' शाळांचे नेतृत्व करावे की न करावे, हे संबंधित शाळेच्या मर्जीवर अवलंबून असेल की बंधनकारक असेल ?)

• असेच निकष क्रमांक ३ व ५ 'इतर' शाळा निवडीसाठी नमूद केले आहेत.

६. परिसरातील इतर शाळेच्या तुलनेने अधिक पटाची शाळा.
(अधिक पट हा नेतृत्व करण्यासाठी निकष कसा काय असू शकतो ? यामुळे नेतृत्व करणाऱ्या आणि 'इतर' अशा दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांची अधिक गैरसोय होणार नाही का ?)

• टीपः सगुण विकास कार्यक्रमांतर्गत मुख्य शाळा म्हणून जर खाजगी विनानुदानित / स्वयं अर्थ सहाय्यित शाळा सहभागी होण्यास इच्छुक असतील तर अशा शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या A ग्रेड च्या शाळांना देखील मदत करु शकतात.
(म्हणजे खाजगी शाळांची गुणवत्ता, शासनाच्या नेतृत्व करण्यास पात्र शाळांपेक्षा उच्च असते हे गृहीत धरले आहे का ?)

• भागीदारी/ सहकार्यातील उपक्रमांची क्षेत्रेः

१) भौतिक सुविधांचा सामाईक वापरः मुख्य शाळेतील क्रीडांगण, संगणक कक्ष, सभागृह व ग्रंथालय यासारख्या भौतिक सुविधा भागीदारी / सहकार्यातील इतर शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस वर्गनिहाय / निवडक वर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे. तसेच मुख्य शाळेतील डिजिटल, ई-लर्निंग साहित्याचा लाभ दुसऱ्या शाळेतील मुलांना करुन देणे.
(म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत किमान भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणे आता शासनावर बंधनकारक राहणार नाही का ? डिजिटल, ई-लर्निंग साहित्य 'इतर' शाळेतील मुलांनी एकच दिवस वापरणे अपेक्षित आहे का ?)

२) तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शनः सहभागी सर्व शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक दिवस सहभागी इतर शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अध्यापन करणे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी व कौशल्ये विकसित करण्यासाठी सहकार्य करतील.
(तज्ज्ञ शिक्षक म्हणजे कोण ? इतर शाळेत एक दिवस जाण्याने मूळ शाळेतील कामगिरीवर परिणाम होणार नाही का ? एक दिवस इतर शाळेत जाऊन अध्ययन निष्पत्ती आणि कौशल्य विकास कसा करणार ? शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थीःशिक्षक गुणोत्तरावर याचा कसा परिणाम होईल ?)

२) विद्यार्थी अदलाबदलः भागीदारी/ सहकार्यातील इतर शाळेतील 'निवडक' वर्गातील विद्यार्थ्याना मुख्य शाळेत जाऊन शिकण्याची, तेथील इतर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची व अध्ययन-अनुभव घेण्याची संधी निर्माण करुन देणे. तसेच एका शाळेतील शालेय विषय, विविध कला व क्रीडा प्रकारात पारंगत 'निवडक' विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाऊन 'इतर' विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मदत तसेच संबंधित कला व क्रीडा प्रकार यांच्या अध्ययनात व सरावात सहकार्य करतील.
(निवडक विद्यार्थी कशाच्या आधारावर निवडायचे आहेत ? जास्त गुण मिळवणारे आणि कमी गुण मिळवणारे विद्यार्थी अशी भेदभाव करणारी निवड प्रक्रिया कशासाठी ? तज्ज्ञ आणि प्रशिक्षित शिक्षक ज्यांना शिकवू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना 'पारंगत विद्यार्थी' कसले सहकार्य करणार आहेत ? शाळा पातळीवर शिक्षकांचे प्रशिक्षण, नियुक्ती यावर भर देण्याऐवजी, पारंगत व इतर अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांवर हा अनावश्यक भार आणि ताण का टाकला जात आहे ?)

१८/०८/२०१९


Share/Bookmark