ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, August 1, 2012

गुंतवणूकपूर्व अभ्यास महत्त्वाचा

 
आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) ही इक्विटी मार्केटमधली सगळ्यात खळबळजनक आणि लोकप्रिय घटना असते. खास करून, एखाद्या सुप्रसिद्ध ब्रँडचा आयपीओ येणार असेल तर, गुंतवणूकदार अगदी वेडेपिसे होऊन जातात. अशीच अलिकडची घटना म्हणजे, सोशल नेटवर्किंगचा टॉप ब्रँड - फेसबुक - चा आयपीओ! लाखो इन्व्हेस्टर्स या कंपनीचा एखादा तरी शेअर मिळावा म्हणून धडपड करत होते. अंतिम ऑफर जाहीर होण्यापूर्वीच, इन्व्हेस्टमेंट बँकांनी केलेलं व्हॅल्युएशन अब्जावधीचा आकडा पार करून गेलं होतं. गुंतवणूक क्षेत्रातले रथी-महारथी आपापल्या परीनं या कंपनीच्या किंमतीचा अंदाज लावण्यात गुंतले होते. आणि प्रत्येकाचा आकडा इतरांपेक्षा जास्तच येत होता. पण त्याचवेळी, गुंतवणूक क्षेत्रातल्या एका महान व्यक्तीनं स्वतःला या सगळ्यापासून अलिप्त ठेवलं होतं. ती व्यक्ती म्हणजे... होय, वॉरेन बफे!

वॉरेन बफेंच्या मते, बहुतांश गुंतवणूकदार हे निव्वळ आकर्षक परताव्याच्या आशेनं 'फेसबुक'च्या आयपीओमधे गुंतवणूक करायला निघाले होते. ते म्हणतात, "तुम्ही शेतजमिनीचा एखादा तुकडा का विकत घेता? दुसर्‍या दिवशी जास्त किमतीला विकून नफा कमवण्यासाठी? केवढं भयानक कारण आहे हे... शेतीसंदर्भात आणि स्टॉकसंदर्भातही!" आयपीओनंतर 'फेसबुक'च्या स्टॉकचा परफॉर्मन्स बघितला तर, पुन्हा एकदा "वॉरेन बफे साब को मानना ही पडेगा" असंच म्हणावं लागेल. 'फेसबुक'च्या आयपीओ प्राइसमधे आतापर्यंत जवळपास १९ टक्क्यांची घट झालीसुद्धा!

गुंतवणूक क्षेत्रातले हे 'पितामह' स्वतः टेक्‍नॉलॉजी स्टॉक घेणं टाळतातच, कारण हे क्षेत्र आपल्या क्षमतेबाहेरचं आहे असं त्यांना वाटतं. तरीसुद्धा सर्व गुंतवणूकदारांसाठी त्यांनी एक सल्ला दिलाय. 'फेसबुक'मधे गुंतवणूक करणार्‍यांसाठी वॉरेन बफेंनी दिलेला सल्ला खरं तर अगदीच जुनापुराना आहे - "कुठल्याही कंपनीच्या बेसिक्सचा अभ्यास केल्याशिवाय तिच्यात पैसे गुंतवू नका." कंपनीची कार्यपद्धती, उत्पन्नाचे स्रोत, आणि तिची मुलभूत तत्त्वं समजल्याशिवाय, तिच्या स्टॉकची उपयुक्तता तुम्ही ठरवू शकत नाही. व्हॅल्युएशन नंतरची पुढची पायरी म्हणजे, इंट्रिन्सिक व्हॅल्युची मार्केट प्राइसशी तुलना. इंट्रिन्सिक व्हॅल्युच्या तुलनेत मार्केट प्राइस कमी असेल तरच तो स्टॉक विकत घेण्यायोग्य आहे, अन्यथा नाही.

हा सल्ला समजायला सोपा असला तरी, पाळायला तितकाच अवघड आहे... खास करून, एखाद्या आयपीओ बद्दल बाजारात खूपच हवा तयार झाली असेल तेव्हा! जशी 'फेसबुक'च्या आयपीओबद्दल झाली होती. स्वतः अभ्यास करण्यापेक्षा, चाणाक्ष इन्व्हेस्टमेंट बँकर्सच्या (मार्केटींग) बडबडीवर विश्वास ठेवणं गुंतवणुकदारांनी पसंत केलं. आणि काय मिळालं त्यातून? आपल्या मूल्यवान स्टॉकच्या किंमतीतली पडझड! त्यापेक्षा, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः अभ्यास करणं आणि वॉरेन बफेंचा सल्ला ऐकणं, हेच गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतं, असं म्हणता येईल. मग गुंतवणूक लिस्टेड स्टॉकमधे असो किंवा आयपीओमधे...दोन्हींसाठी अभ्यास सारखाच महत्त्वाचा!


http://www.fairdealsangli.com/in-the-news/guntavanukapurvaabhyasamahattvaca 

Share/Bookmark