ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, September 26, 2015

पाळी मिळी गुपचिळी - डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा लेख

मॅन्युफॅक्चरींग आणि आयटी इंडस्ट्रीत काम करताना या विषयावर सार्वजनिक चर्चेचे प्रसंग फारसे यायचे नाहीत. शैक्षणिक क्षेत्रातदेखील हा प्रश्न कधी जाणवला नाही. पुरुषप्रधान (की पुरुषकेंद्रीत?) समाजव्यवस्थेतल्या पुरुष मित्रांच्या गप्पांमधे "अरेरे, आता चार दिवस उपवास!" एवढाच काय तो या गोष्टीचा उल्लेख. मुली-बायका आपापसांत तरी या विषयावर बोलतात की नाही याबद्दलच शंका, मग मित्र-मैत्रिणींमधे यावर चर्चा कुठून होणार... खाद्यपदार्थांच्या उद्योगात आल्यावर मात्र अनपेक्षितपणे या प्रश्नाला तोंड द्यावं लागलं. आपलं प्रॉडक्ट भारी असलं पाहिजे, प्रॉडक्टबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे, म्हणजे झालं असं आधी वाटायचं. पण अगदी सुरुवातीलाच एका कस्टमरनं गुगली टाकलेली आठवते. "तुमच्याकडून घेतलेले पदार्थ आम्ही नैवेद्याला ठेवणार आहोत, त्यामुळं त्यादिवशी बनवणा-या बाईचा 'प्रॉब्लेम' नसावा एवढं बघा," असं एका कस्टमर बाईंनी फोनवर सांगितलं. यावर काय उत्तर द्यावं हेच सुचेना. लहानपणापासून ऐकलेल्या - वाचलेल्या महात्मा फुले, राजा राम मोहन रॉय, र. धों. कर्वे यांच्या गोष्टी आठवल्या. शिक्षण, टेक्नॉलॉजी, पैसा या गोष्टींनी पुढारलेल्या आपल्या प्रगत समाजाची दांभिकता लख्खपणे समोर आली. आपल्याला शाळेत, पुस्तकांतून दिले जाणारे पुरोगामित्वाचे धडे खोटे आहेत, प्रत्यक्षात आपण एका दुतोंडी समाजाचा भाग आहोत, याची लाज वाटली. आता या प्रसंगानंतर बराच काळ लोटलाय. हळूहळू अशी भरपूर सत्यं नागवी होत गेली. प्रत्येक वेळी त्यांना टाळणं शक्य नव्हतं, प्रत्येक वेळी भांडणंदेखील शक्य नव्हतं. आता असे प्रश्न अनपेक्षित नाही वाटत. (होय, आजही काही कस्टमर अशा गोष्टींची 'काळजी घ्यायला' सांगतात. आणि असं सांगणा-यांमधे सत्तरीतल्या आजीबाईंपासून तिशीतल्या वहिनीसाहेबही आहेत, आणि ही 'उदात्त परंपरा' जपणा-यांमधे धुणीभांडी करणा-या बायकांपासून सीएफओ-सीईओ लेव्हलच्या मॅडमदेखील आहेत. पुरुषांचं या विषयातलं ज्ञान आणि इंटरेस्ट तर अजूनच अगाध...) आता यावर न चिडता बोलणंही जमू लागलंय. पण अजूनही अशी माणसं - पुरुष आणि बायका - बघून उद्विग्नता येतेच... हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा 'पाळी मिळी गुपचिळी' हा लेख. मासिक पाळीविषयी आणि त्याभोवतीच्या प्रथा, समज-गैरसमजांविषयी सर्व स्त्री-पुरुषांनी मुळातूनच वाचावा आणि विचार करावा असा हा लेख -

"पाळी मिळी गुपचिळी"

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. पिन ४१२ ८०३ मो.क्र.९८२२०१०३४९

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ शोधत मी त्यांचे बोलणे या कानानी ऐकत होतो आणि त्या कानानी सोडून देत होतो. फार गांभीर्याने ऐकावं असं त्या पोपटपंचीत नसतंच काही. पण इतक्यात एका वाक्याने माझे लक्ष वेधले गेले. तो म्हणाला, “आता सणाचे दिवस जवळ आले डॉक्टर, आता खूप बायका पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायला येतील. तेव्हा लक्षात असू दया आमच्याच कंपनीच्या गोळ्या दया. प्लीज सर!! सणासुदीच्या दिवसांमुळे कंपनीने टार्गेट वाढवून दिले आहे; आणि तुम्ही मनावर घेतल्या शिवाय ते मला गाठता येणार नाही.” एवढं बोलून गोळ्यांचं एक नमुना पाकीट माझ्या टेबलावर ठेवत तो निघाला सुद्धा. माझा अहं कुरवाळून आपला काम सफाईदारपणे करून तो निघून गेला. मी मात्र अचंबित झालो.

एका लहानश्या गावातल्या एका लहानश्या डॉक्टरपर्यंत आवर्जून आर्जवं करणे कंपनीला सहजपणे परवडत होतं, म्हणजे हे पाळी पुढे ढकलण्याचे मार्केट किती प्रचंड लाभदायी आहे बघा! औषध कंपन्या आपला माल खपवण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे माहीत होतं, पण त्या हे ही टोक गाठतील असं माझ्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पाळी या प्रकाराबद्दल भारतीय समाजमनाची नस बरोब्बर हेरून योग्य वेळी त्यांनी आपला माल पुढे केला होता. मला कौतुकच वाटलं त्या कंपनीचं.

खरं तर ही मागणी नेहेमिचीच, पूजा, सत्यनारायण, तीर्थयात्रा, उत्सव, सण वगैरे निमित्ताने केली जाणारी. क्वचित प्रवास, परीक्षा वगैरे कारणेही असतात, पण ती अपवादानेच. किती साधी सोपी रुटीन गोष्ट होती ही. बायकांनी यायचं, पाळी पुढे जायच्या गोळ्या मागायच्या आणि चार जुजबी प्रश्न विचारून आम्ही त्या द्यायच्या. माझी चिठ्ठीही नेहेमीचीच. मुकाटपणे दिली जाणारी. पण मनातल्या मनात मी वैतागतो, चरफडतो. म्हणतो, ‘काय मूर्ख बायका आहेत या! शुद्धाशुद्धतेच्या कुठल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून आहेत.’

वेळ असला की माझ्यातला कर्ता सुधारक बोलता होतो. एरवी मागताक्षणी चिठ्ठी लिहून देणारा मी, समोरच्या स्त्रीला प्रश्न विचारतो, ‘काय शिक्षण झाले आहे तुमचे?’

‘क्ष’

क्ष ची  किंमत अशिक्षित पासून डॉक्टरेट पर्यंत काहीही असू शकते.

‘आलीच जर पाळी,  तर तुम्ही समारंभात सहभागी होऊ नये हे तुम्हाला पटतंय का?’

‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.

‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.

पाळी आलेल्या स्त्रीला अस्वच्छ अपवित्र समजणे याची पाळेमुळे पार खोलवर रुजलेली आहेत. स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या, निसर्गनेमाने घडणाऱ्या, एका अत्यंत शारीर कार्याला धर्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक धुमारे फुटले आहेत. कुठून येतात या कल्पना? अगदी लहानपणापासून मनात कोरल्या जातात त्या. आई, मोठ्या बहिणी, शेजारी पाजारी सगळीकडे असतात त्या. आपण फक्त मनानं स्पंज सारख्या त्या टिपून घ्यायच्या.

शाळेत कधी कधी जायचा प्रसंग येतो. मुला-मुलींसमोर ‘वयात येताना’ या विषयावर बोलायला. सगळ्या मुली पाळीला सर्रास ‘प्रॉब्लेम’ असा शब्द वापरतात. प्रॉब्लेम आला/ गेला/ येणार वगैरे. मी गमतीने म्हणतो, ‘अहो पाळी ठरल्यावेळी न येणं, हा खरा प्रॉब्लेम! पाळी येणं हा प्रॉब्लेम कसा?’ मुलींना मी सांगतो, प्रॉब्लेम शब्द वापरू नका. पाळी आली असं म्हणा. मराठीत बोलणे फारच गावठी वाटत असेल तर एम.सी. म्हणा, मेंन्सेस म्हणा; आणखी इंग्रजी फाडायचं असेल तर चम म्हणा; पण प्रॉब्लेम म्हणू नका. प्रॉब्लेम म्हटल्यावर एका अत्यावश्यक नैसर्गिक शरीरक्रीयेविषयी मनात नकारात्मक भावना नाही का निर्माण होतं? पण हा प्रश्न गैरलागूच म्हणायचा. प्रॉब्लेममुळे नकारात्मक भावना नसून; मुळातल्या नकारात्मक भावनेपोटी हा शब्द वापरला जातो. काहीही असो पण हा शब्द वापरू नये असं मला वाटतं. यामुळे मुळातली नकारात्मकता आणखी गडद होते. त्यावर लोकमान्यतेच्या पसंतीची मोहोर उमटते.

ह्या मुळातल्या गैरसमजाचे पडसाद इतरही सर्वमान्य शब्दांमध्ये दिसतात. काही कारणाने पाळीचा त्रास झाला तर पिशवी धुतात/साफ करतात. याचा वैद्यकीय अर्थ पिशवीच्या आतलं अस्तर खरवडून काढून टाकतात. हेतू हा की रक्तस्त्राव थांबावा, तपासणीसाठी अस्तराचा तुकडा मिळावा आणि नव्याने तयार होणारे अस्तर एकसाथ, एकसमान तयार व्हावे. पण हे सारे व्यक्त करणारा शब्दच नाहीये. क्युरेटींग हा इंग्रजी शब्द रूढ आहे पण त्यामागचा हा भाव कुणालाच कळत नाही. सर्रास पिशवी धुणे /साफ करणे वगैरे चालू असतं.

एकदा पाळी हा प्रॉब्लेम ठरला की पुढे सगळे ओघानेच येतं. पाळी म्हणजे शरीरात महीनाभर साठलेली घाण बाहेर टाकण्याची एक क्रिया, हे ही मग पटकन पटते. समाजानी पाळी आणि अपावित्र्याचा संबंध जोडला आहे, यात काही आश्चर्य नाही. मलमूत्राच्या वाटेशेजारीच पाळीची वाट आहे. मलमूत्रविसर्जन ही तर निश्चितच उत्सर्जक क्रिया आहे. चक्क शरीरातील घाण वेळोवेळी बाहेर टाकणारी क्रिया. अज्ञानापोटी समाजाने पाळीलाही तेच लेबल लावलं. खरंतर शरीरातील पेशी सातत्याने मरत असतात आणि नव्याने तयार होत असतात. आपली त्वचा झडते, पुन्हा येते, केस झडतात पुन्हा येतात, लाल पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असतं; तसंच काहीसं हे आहे. गर्भपिशवीचे अस्तर ठराविक काळ गर्भधारणेला आधार ठरू शकते. मग ते निरुपयोगी ठरतं. बाहेर टाकलं जातं, पाळी येते. पुन्हा नव्यानं अस्तर तयार होतं. (मासिक चक्रं). मुद्दा एव्हढाच की मासिक पाळी ही उत्सर्जक क्रिया नाही. पण कित्येक स्त्रियांना आणि पुरुषांना असं वाटतं की महिनाभराची सगळी घाण गर्भपिशवीत साठते आणि ती महिनाअखेरीस बाहेर टाकली जाते.

अशा बायकांसाठी वेगळी झोपडी, वेगळी जागा, वेगळं अन्न चार दिवस बाहेर बसणं, पूजाअर्चा, देवळात जाणं बंद, पाचव्या दिवशी  अंघोळ करणं, पाळीच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी न होणं या सगळ्या रूढी आणि परंपरा याचाच परीपाक आहेत. जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो याबाबतीत सर्व धर्म भलतेच समान आहेत. 

पाळीच्या या चार दिवस विश्रांतीचं समर्थन करणारीही जनता आहे. ‘तेवढंच त्या बाईला जरा सूख, जराशी विश्रांती...’ वगैरे. म्हणजे एरवी श्वास घ्यायलाही फुरसत नाही एवढा कामाचा रामरगाडा! अपावित्र्यातून निपजलेली ही विश्रांती; आदरभावातून, ऋणभावनेने मिळालेली नाही ही. घराला विटाळ होऊ नये म्हणून ही बाकी घरानी केलेली तडजोड आहे. त्या बाईप्रती आदर, तिच्या कामाप्रती कृतज्ञता, तिच्या घरातील सहभागाचा सन्मान कुठे आहे इथे? नकोच असली विश्रांती. हे बक्षीस नाही, बक्षिसी आहे ही! उपकार केल्यासारखी दिलेली ही बक्षिसी बाईनी नाकारायला हवी.

का होतं, कसं होत वगैरे काहीही जीवशास्त्र माहीत नसताना पाळी हा प्रकार भलताच गोंधळात टाकणारा होता, आदिमानवाला आणि त्याच्या टोळीतल्या स्त्रियांना. महिन्याच्या महिन्याला रक्तस्त्राव होतो, चांद्रमासाप्रमाणेच की हे, निश्चितच दैवी अतिमानवी योजना ही. जखम-बिखम काही नाही, वयात आल्यावर स्त्राव होतो, म्हातारपणी थांबतो, गरोदरपणी थांबतो...! किती प्रश्न, किती गूढ, किती कोडी. पण म्हणून आजही आपण आदिमानवाचीच री ओढायची म्हणजे जरा जास्तच होतंय!

पाळी येण्यामागचं विज्ञान समजलं, पाळीवर परिणाम करणाऱ्या गोळ्याही निघाल्या. पण आपण याचा उपयोग सजगपणे करणार नाही. आपण या गोळ्या आपल्या शरीराबद्दलच्या, पाळीच्या अपावित्र्याच्या पारंपारिक कल्पना दृढ करण्यासाठी वापरणार! वा रे आपली प्रगती! वा रे आपली वैज्ञानिक दृष्टी!

पण समाजानं जरी अपावित्र्य चिकटंवलं असलं तरी ते तसंच चालू ठेवलं पाहिजे असं थोडंच आहे? निसर्गधर्मानुसार आलेली पाळी चालत नाही आणि औषध घेऊन पुढे गेलेली चालते, हे ठरवलं कोणी? ही बंधनं विचारपूर्वक नाकारायला नकोत? ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला; सोवळा तो झाला कवण धर्म? विटाळा वाचून उत्पतीचे स्थान, कोण देह निर्माण, नाही जगी’ असं संत सोयराबाईनी विचारलं आहे.

हे असलं काही बोललं की प्रतिपक्षाची दोन उत्तरं असतात. एक, पुरुषप्रधानतेमुळे बायकांचे मेंदू पुरुषांच्याच ताब्यात असतात; आणि दुसरं समजा घेतल्या गोळ्या आणि ढकलली पाळी पुढे तर बिघडलं कुठं?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की ही समाजरचना अमान्य करण्याचे पहिलं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघा. गोष्ट साधीशीच आहे. ठामपणे सांगीतल तर पटणारी आहे. स्वतःला पटली असेल तर ठामपणे सांगता येतेच पण मुळात स्वतःचीच भूमिका गुळमुळीत असेल तर प्रश्नच मिटला.

‘घेतल्या गोळ्या तर बिघडतं काय?’ या प्रश्नाचं उत्तर असं की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो! आई करते म्हणून थोरली  करते आणि ताई करते म्हणून धाकटी! डोकं चालवायचंच नाही असं नकळत आणि आपोआप होत जातं

हे सारं कुठेतरी थांबायला हवं. स्वताःच्या आणि परस्परांच्या शरीराकडे निरामय दृष्टीने स्त्री-पुरुषांना पहाता यायला हवं. कुणीतरी कुठूनतरी सुरुवात करायला हवी.

डॉ. शंतनू अभ्यंकर

वाई, जि. सातारा. पिन ४१२ ८०३.
मो.क्र.९८२२०१०३४९

(मूळ लेख - http://shantanuabhyankar.blogspot.in/2015/09/blog-post_2.html)


Share/Bookmark

Monday, September 21, 2015

जाणीव

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाखो रुपये खर्चून त्यांना शिक्षण देणा-या पालकांनी, विशेषतः मातांनी सर्व मुलांना लहानपणापासूनच स्वयंपाकघरातल्या कामाचीही सवय लावावी. यामुळे मोठेपणी ही 'पुरुष' मंडळी स्वावलंबी तर होतीलच, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या बायकांकडून आयत्या जेवणाची अपेक्षा करताना त्यामागच्या कष्टांची त्यांना किमान जाणीव तरी राहील.


Share/Bookmark

Wednesday, September 9, 2015

इंग्रजीचा उदो उदो...

आम्हाला इंग्रजी शिकवणारे सर म्हणायचे, "इंग्रजी बोलता आली नाही तरी चालेल पण इंग्रजी पूर्ण कळाली पाहिजे." त्यांचं म्हणणं असं होतं की, इंग्रजी शिकायला सुरु करतानाच जर इंग्रजी बोलण्यावर, म्हणजे स्पोकन इंग्लिशवर भर दिला तर भाषेच्या नियमांकडं हमखास दुर्लक्ष होतं. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा समोरची व्यक्तीदेखील तुमचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. या प्रक्रियेमधे इंग्रजीचं व्याकरण, शब्दप्रयोग, वगैरे गोष्टींपेक्षा संदर्भासहीत मुद्द्यांकडं जास्त लक्ष दिलं जातं. एकदा का तुम्ही चुकीचे शब्दप्रयोग किंवा चुकीची वाक्यरचना करुनही तुमचं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकलात, की तुम्ही त्याच चुका नेहमी-नेहमी करत राहता. अशा पद्धतीनं एक भाषा म्हणून तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकत नाही, फक्त कामचलाऊ इंग्रजी बोलू व समजू शकता, जी आपल्या आजूबाजूला सर्रास आढळून येते.

आमचे सर असंही म्हणायचे, "इंग्रजी बोलण्याची तुम्हाला इतकी गडबड का? आधी ती भाषा नीट शिकून तर घ्या. इंग्रजी बोलता आलं नाही म्हणून तुमचं काम अडेल अशी परिस्थिती आपल्या देशात तरी यायची शक्यता नाही. इथं तुम्ही मातृभाषेत किंवा हिंदीत संवाद साधू शकता. अगदी परदेशातच जायचं असेल तर इंग्रजीशिवाय अडण्याची शक्यता मान्य. पण एका मराठी माणसानं दुसर्‍या मराठी माणसाशी मोडक्या-तोडक्या इंग्रजीत संवाद साधणं, यातून ना संवाद घडतो ना भाषेचं ज्ञान मिळतं."

माझा इंग्रजी शिकण्याला किंवा वापरण्याला अजिबात विरोध नाही. पण इंग्रजी भाषा म्हणून न शिकता तिला थेट मातृभाषा बनवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या स्वतःचं आणि पुढच्या पिढीचं फार मोठं नुकसान करतोय, असं मला वाटतं. अजूनही आपल्या आजूबाजूला, समाजात वावरताना अथवा कोणत्याही इंडस्ट्रीत काम करताना, इंग्रजीचं महत्त्व 'सादरीकरणाची भाषा' अर्थात 'प्रेझेंटेशन लँग्वेज' म्हणूनच असल्याचं दिसून येतं. या प्रेझेंटेशनसाठी संबंधित विषयाचं ज्ञान, अभ्यास, अनुभव, कल्पनाशक्ती, इत्यादी गोष्टी भाषेपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. मात्र या गोष्टी मांडण्यासाठी जी इंग्रजी भाषा वापरायची, तिच्या दडपणाखाली या मुलभूत गोष्टींकडंच दुर्लक्ष केलं जाताना दिसतं. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी हा अनुभव घेतला असेल - एखादा तांत्रिक मुद्दा मांडताना किंवा तुमच्या कामाबद्दल चर्चा करताना तुम्ही व्यवस्थित इंग्रजी बोलू शकता. पण हवा-पाण्याच्या गप्पा मारताना मात्र तुम्हाला ना इंग्रजी शब्द आठवतात, ना एक पूर्ण वाक्य इंग्रजीतून बोलता येतं. याच गोष्टीची भीती किंवा लाज वाटून अनेक जण इंग्रजीचं दडपण घेतात. पण असं का होतं, यामागचं कारण शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे?

कोणतीही भाषा शिकण्यातला पहिला टप्पा असतो ऐकण्याचा. लहान मुलांच्या कानावर जी आणि जशी भाषा पडते, तसेच भाषिक संस्कार त्यांच्यावर होतात. तुम्ही 'चांगली' इंग्रजी भाषा ऐकलीच नाहीत, तर तुम्हाला चांगली इंग्रजी बोलता कशी येणार? आपण इंग्रजीच्या नावाखाली जे काही आजूबाजूला ऐकतोय, त्याला भाषा तरी म्हणावं का? हा ऐकण्याचा टप्पा तर आपण सोडूनच देतो आणि मुलांना थेट ए-बी-सी-डी गिरवायला शिकवतो. मुलं या 'ए-बी-सी-डी'चा अर्थ आणि संदर्भ आपापल्या मातृभाषेत शोधण्याचा प्रयत्न करतात, जो त्यांना कधीही सापडत नाही. आणि जी भाषा त्यांना अजून आपली वाटतच नाही, त्या भाषेत त्यांनी बोलावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. इथूनच इंग्रजीचं दडपण यायला सुरुवात होते. मग काही जण चुकीचं इंग्रजी रेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी झाले की आयुष्यभर चुकीचीच भाषा रेटत राहतात. राहिलेले, कायम इंग्रजीची भीती आणि न्यूनगंड मनात घेऊन या भाषेला टाळायचा प्रयत्न करत राहतात. इंग्रजी बोलायची वेळ आली की हे रस्ता बदलून दुसरीकडंच जातात आणि समोर आलेली संधी हकनाक गमावून बसतात.

ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण इंग्रजीकडं वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकली आणि शिकवली गेली पाहिजे. पहिल्या दिवसापासून इंग्रजीतून बोलण्याची गडबड न करता, टप्प्याटप्प्यानं मुळाक्षरं, शब्दार्थ, वाक्यरचना, अलंकार शिकत गेलं पाहिजे. त्याच बरोबरीनं 'चांगली' इंग्रजी कानावर पडण्याची सोयदेखील केली पाहिजे. आणि एकदा या भाषेवर प्रभुत्व आलं की, यू कॅन टॉक इंग्लिश, यू कॅन वॉक इंग्लिश, यू कॅन लाफ इंग्लिश, यू कॅन रन इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज सच अ फन्नी लँग्वेज!


Share/Bookmark

Monday, September 7, 2015

...पण काळ सोकावता कामा नये!

पुण्यातल्या सातारा रोडवरच्या डी-मार्टमधे काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. रविवार असल्यामुळं डी-मार्टला सकाळी-सकाळीच नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याचं स्वरुप आलं होतं. मला पाहिजे असणारी वस्तू पटकन घेऊन सर्वांत छोटी रांग असलेल्या काउंटरवर आलो. बिल केलं. रक्कम होती ३०९. काउंटरवरच्या मुलीला पाचशेची नोट आणि वर दहा रुपये सुट्टे दिले. सुट्टे २०१ परत मिळणं अपेक्षित असताना, अगदी सिन्सियरली त्या मुलीनं शंभराच्या दोन नोटा आणि एक चॉकलेट दिलं.

सुट्ट्या पैशांच्या ऐवजी चॉकलेट मिळण्याची ही काही पहिलीच वेळ किंवा पहिलंच ठिकाण नव्हे. मला चॉकलेट खायला आवडत नाही, असंही नाही. पण म्हणतात ना - म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये!

डी-मार्टच्या वीसही काउंटर्सवर बिलिंगसाठी रांगा वाढत असल्यानं, काउंटरवरच्या मुलींना डिस्टर्ब करण्याऐवजी एक्झिट गेटजवळ बसलेल्या डी-मार्टच्या दुसर्‍या स्टाफ मेंबरकडं गेलो.

मीः नमस्कार, मला तुमच्या बिलिंग पद्धतीबद्दल तक्रार द्यायची आहे. कुणाशी बोलावं लागेल?
डी-मार्ट स्टाफः बोला काय तक्रार आहे?
मीः तुमच्या सगळ्या बिलिंग काउंटर्सवर एक-दोन रुपये सुट्टे देण्याऐवजी सर्रास चॉकलेट दिले जातात.
डी-मार्ट स्टाफः नाही सर, एखाद्या वेळी असं झालं असेल, पण नेहमी नाही होत...
मीः मला स्वतःला आत्ता एक रुपयाऐवजी चॉकलेट मिळालं आहे.
डी-मार्ट स्टाफः कदाचित त्या काउंटरवरची चिल्लर संपली असेल...
मीः काय सांगताय? अजून तुमचं स्टोअर उघडून दोन ताससुद्धा झाले नाहीत आणि काउंटरवरची चिल्लर संपली?
डी-मार्ट स्टाफः होऊ शकतं सर, आज रविवार आहे ना...
मीः पण ही फक्त आजची गोष्ट नाही. मी आजतागायत जितक्या वेळेला डी-मार्टमधे खरेदी केलीय, तितक्या वेळेला मला एक-दोन रुपयांऐवजी चॉकलेटच देण्यात आलेत.
डी-मार्ट स्टाफः नेहमी-नेहमी असं नाही होणार सर. आजच कदाचित झालं असेल. मार्केटमधे सुट्ट्या पैशांचं शॉर्टेजच आहे...
मीः म्हणजे डी-मार्टला मार्केटमधून सुट्टे पैसे मिळत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
डी-मार्ट स्टाफः तसं नाही, पण कधीतरी सुट्टे पैसे संपल्यावर काउंटरवरुन चॉकलेट दिले जातात.
मीः कधीतरीच द्यायचे असतील तर ते चॉकलेट कुठं ठेवले पाहिजेत? काउंटरशेजारी एखाद्या डब्यात की थेट कॅशबॉक्समधे?
डी-मार्ट स्टाफः कॅशबॉक्समधे चॉकलेट नसतात सर...
मीः चला, तुमच्या वीस काउंटरपैकी कुठल्याही काउंटरवरचा कॅशबॉक्स उघडून बघा आणि मग मला सांगा कधीतरी द्यायचे चॉकलेट कॅशबॉक्समधे का ठेवलेत?
डी-मार्ट स्टाफः तसं नाही सर... आम्ही ठेवतो थोडे चॉकलेट कॅशबॉक्समधे, पण कस्टमरला विचारतो - 'सुट्टे पैसे हवेत की चॉकलेट?' आणि मगच चॉकलेट देतो.
मीः अच्छा? चला, तुमच्या वीसपैकी कुठल्याही एका काउंटरवर मला दाखवा, एका तरी कस्टमरला हा प्रश्न विचारला जातोय का? मला स्वतःला तर कधीही हा प्रश्न विचारण्यात आलेला नाही.
डी-मार्ट स्टाफः तुम्ही कुठल्या काउंटरवर बिल केलंत सर? मी त्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हशी बोलून तुमचे सुट्टे पैसे परत करायला लावतो...
मीः प्रश्न माझ्या एकट्याच्या किंवा आजच्या सुट्ट्या पैशांचा नाही. प्रॉब्लेम तुमच्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हचा सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा आणि ट्रेनिंगचा आहे. सुट्ट्या पैशांऐवजी कस्टमरला सर्रास चॉकलेट दिलं जाणं, ही तुमची प्रोसिजर झालीय. माझं ऑब्जेक्शन ह्या प्रोसिजरवर आहे.
डी-मार्ट स्टाफः मान्य आहे सर, पण सुट्टे पैसे नसले की आम्हाला असं करावंच लागतं.
मीः ठीक आहे, मग इथं तुम्ही ऑफिशियल बोर्ड का लावत नाही - 'सुट्टे पैसे नसल्यास आम्ही चॉकलेट्स देतो आणि घेतोसुद्धा!' असा?
डी-मार्ट स्टाफः असा बोर्ड आम्हाला नाही लावता येणार सर. पण मी तुमचा प्रॉब्लेम माझ्या सिनियर्सना सांगतो...
मीः तुम्हालाच अजून माझं म्हणणं नीट कळालेलं नाही तर तुम्ही ते दुसर्‍यांना कसं सांगणार? त्यापेक्षा मीच तुमच्या सिनियर्सना समजावून सांगतो. कुठं भेटतील ते?
डी-मार्ट स्टाफः थांबा, मी त्यांनाच इकडं बोलावून घेतो...

यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलवरुन फोन लावून मॅनेजरना बोलावून घेतलं. मी पुन्हा पहिल्यापासून सगळी कहाणी सांगितली.

डी-मार्ट मॅनेजरः तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सॉरी सर. मी आत्ताच त्या काउंटरवरच्या मुलीला बोलावून तुमचे सुट्टे पैसे परत करायला सांगतो.
मीः तुम्हाला माझं म्हणणं कळतंच नाहीये का? प्रश्न माझ्या एकट्याच्या किंवा आजच्या सुट्ट्या पैशांचा नाही. प्रॉब्लेम तुमच्या काउंटरवरच्या एक्झिक्युटीव्हचा सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीमचा आणि ट्रेनिंगचा आहे. सुट्ट्या पैशांऐवजी कस्टमरला सर्रास चॉकलेट दिलं जाणं, ही तुमची प्रोसिजर झालीय. माझं ऑब्जेक्शन ह्या प्रोसिजरवर आहे. कस्टमरला पैशांऐवजी दिलेल्या चॉकलेटचं अकौंटींग करणं तुम्हाला पण अवघडच जात असेल ना?
डी-मार्ट मॅनेजरः नाही सर, त्यासाठी आम्ही प्रत्येक बिलिंग काउंटरवर मोजून चॉकलेट्स देतो आणि कॅशचा हिशोब करताना शिल्लक चॉकलेट्सचं ऑडीट करतो.
मीः छान! म्हणजे डी-मार्टला रिझर्व्ह बँकेच्या रुपयाबरोबरच चॉकलेटची करन्सीसुद्धा मान्य आहे तर...
डी-मार्ट मॅनेजरः होय, सुट्ट्या पैशांच्या शॉर्टेजमुळंच आम्ही ही पद्धत वापरतो...
मीः ठीक आहे, मग तुम्ही कस्टमरला चॉकलेटच्या करन्सीमधे पेमेंट करता तसं कस्टमरनी तुम्हाला चॉकलेटच्या करन्सीमधे पेमेंट केलेलं चालेल का?
डी-मार्ट मॅनेजरः हो हो, नक्कीच चालेल. मी तुम्हाला पैशांऐवजी चॉकलेट देत असेन तर मला तुमच्याकडून चॉकलेट स्विकारलंच पाहिजे...
मीः मग तुम्ही तसा बोर्ड इथं लावू शकता का? - 'सुट्टे पैसे नसल्यास आम्ही चॉकलेट्स देतो आणि घेतोसुद्धा!'
डी-मार्ट मॅनेजरः बोर्डबद्दल मला माझ्या सिनियर्सना विचारावं लागेल, पण तुम्ही पुढच्या वेळी काउंटरवर सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स दिली तर आम्हाला ती घ्यावीच लागतील. फक्त कुठलीही चॉकलेट्स अलाऊ करण्याऐवजी आम्ही ठराविकच चॉकलेट ह्यासाठी वापरतो.
मीः म्हणजे कुठली चॉकलेट्स?
डी-मार्ट मॅनेजरः सध्या तरी आम्ही 'फलेरो'ची चॉकलेट्स वापरतोय... आणि ती सुद्धा कस्टमरला विचारुनच देतो.
मीः ठीक आहे, मग पुढच्या वेळेपासून मी सुट्टे पैसे नसतील तर डी-मार्टच्या काउंटरवर 'फलेरो'ची चॉकलेट्स देत जाईन. आणि तुम्ही तसा अधिकृत बोर्ड इथं लावत नाही तोपर्यंत इतर कस्टमर्सच्या माहितीसाठी मी स्वतः ह्या करन्सीचा प्रचार करेन. पण तुमच्या कुठल्याही काउंटरवर 'सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स चालतील का?' असा प्रश्न विचारला जात नाही, त्याचं काय?
डी-मार्ट मॅनेजरः त्याबद्दलच्या सूचना मी ताबडतोब सगळ्या काउंटर्सवर देतो...

तर, यापुढं डी-मार्टमधे (आणि शक्य झाल्यास इतरही ठिकाणी), तुम्हाला न विचारता सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स मिळाली तर तुम्ही त्याची तक्रार संबंधित अधिकार्‍यांकडं करुन तुमचे सुट्टे पैसे परत मिळवू शकता.

एनएच-फोरवरच्या सगळ्या टोल नाक्यांवर 'सुट्ट्या पैशांऐवजी चॉकलेट्स देऊ नयेत' असे बोर्ड लावण्यात आले आहेत. डी-मार्टसारख्या स्टोअर्सना ही अल्टरनेट करन्सी वापरायची एवढीच हौस असेल तर, आपणही जागरुक ग्राहक बनून त्यांना मदत केली पाहिजे. यापुढं तुम्हाला मिळालेली चॉकलेट्स साठवून ठेवा आणि पुढच्या वेळी तीच परत देऊन पैसे वाचवा!

हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून, सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यास मदत करा...


Share/Bookmark