ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, March 26, 2010

झीरो झीरो सेव्हन



“धिस इज बाँड... जेम्स बाँड!” हा हुकमी डायलॉग, आणि मग सुरु होतो खेळ विध्वंसाचा. विध्वंस इमारतींचा, गाड्यांचा, विमानांचा, आणि हृदयांचा देखील. जेम्स बाँड म्हणतो, “विधायक कामांशी माझं फार सख्य नाही.” बरोबरच आहे ते. हत्येचा परवाना घेऊन फिरणारा सर्वाधिक लोकप्रिय नायक आहे जेम्स बाँड! त्याला 'सुपरहिरो' म्हणणं अतिशयोक्ती ठरेल. आणि कोणत्याही बाँड-चाहत्याला, जेम्स बाँड हे एका लेखकानं निर्माण केलेलं काल्पनिक पात्र आहे, यावर विश्वास ठेवायला आवडणार नाही. हेच सत्य असलं तरी.

जेम्स बाँड या स्वप्नवत नायकाच्या निर्मितीमागील अफलातून मेंदू आहे, इयान फ्लेमिंग यांचा. चला तर मग, बाँड थरारांच्या या लेखकाबद्दल अजून जाणून घेऊ. इयान फ्लेमिंग यांचा जन्म १९०८ मध्ये झाला. सुरुवातीचं शिक्षण इटॉन इथं झालं. सॅँडहर्स्ट इथं काही काळ घालवल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. परराष्ट्र कार्यालयात नोकरी न मिळू शकल्यानं, १९३१ ला ते रुचर्स न्यूज एजन्सी मध्ये रुजू झाले. दुसर्‍या महायुद्धादरम्यान, त्यांनी नौदल गुप्तहेर विभाग संचालकाचा पीए म्हणून काम केलं, जिथं त्यांचा हुद्दा लेफ्टनंट वरुन कमांडर पर्यंत वाढला. त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांतून त्यांना गुप्त कारवायांचं प्रत्यक्ष ज्ञान मिळालं.

युद्धानंतर फ्लेमिंग, केम्सली न्यूजपेपर्स मध्ये परराष्ट्र व्यवस्थापक बनले. त्यांनी जमैकामध्ये आपलं घर, 'गोल्डनएज' बांधलं. इथंच, १९५३ मध्ये, वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी जेम्स बाँड कादंबर्‍यांतील पहिली, 'कॅसिनो रोयाल' लिहिली. इयान फ्लेमिंग यांचं १९६४ मध्ये निधन झालं; पण तत्पूर्वी त्यांच्या १४ बाँड कादंबर्‍यांच्या ४० दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या, आणि अशाप्रकारे जेम्स बाँड हे पात्र जागतिक स्तरावर प्रस्थापित झालं.

'बर्ड्‌स ऑफ द कॅरीबियन' वरील एका उत्कृष्ट पुस्तकाच्या लेखकाचं नाव (जेम्स बाँड), इयान फ्लेमिंगनी आपल्या नायकासाठी वापरलं. अतिशय साधं, मवाळ, व निर्विकार असं हे नाव त्यांना आवडलं. बाँडचा अधिकृत नंबर (००७) किपलिंगच्या अमेरीकन रेल्वेसंबंधी गोष्टीतून आला, ज्यामध्ये एका नवीन इंजिनासाठी हा नंबर वापरला होता. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या मर्जीतील जॉन डी, स्पॅनिशांविरुद्ध ब्रिटीश गुप्तहेर खात्यात काम करताना ह्याच नंबरनी ओळखला जायचा.

जेम्स बाँडला नैतिकतेची चाड असून, आत्मपरीक्षणाची अशी क्षमता आहे जी त्याच्या खुनी व विषयासक्त कारवायांमधील तटस्थता झुगारुन आत्मक्लेशाकडे झुकते. इयान फ्लेमिंग स्कॉटीश वंशाचे होते, आणि त्यांच्या मनात, बाँडची स्वसुखलोलुपता, त्याची व्होडका मार्टिनी 'शेकन नॉट स्टर्ड', महागड्या मोर्लंड स्पेशल सिगारेटची तलफ, परस्त्रियांशी भावनाहीन प्रणयाराधन, वेगवान गाड्यांचं वेड, या गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना होती. लोकांचे पोषाख, त्यांच्या शरीरावरील तीळ व व्रण, एखाद्याच्या बोटाच्या लांबीतील अनियमितपणा, एखाद्याची मान किंवा कवटीचा विचित्र आकार, या गोष्टींचं बहुतेक मनोरंजक लिखाणांमध्ये न आढळणारं, विस्तृत व सबळ विवेचन त्यांच्या लिखाणात यायचं.

जेम्स बाँड च्याच बाबतीत बोलायचं झालं तर तो एक चिरंजीव नायक आहे, आणि त्याच्या थरारक कारवायांसाठी हे जग देखील पुरेसं नाही.



Share/Bookmark

Tuesday, March 9, 2010

विनोदाशी जडले नाते


"ह्या जगात येताना जसा गुपचुप आलो, तसा जाताना देखील आपल्या हातून या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे."
हे उद्गार आहेत, आपल्या निखळ विनोदानं अवघ्या महाराष्ट्राला हसवत राहणार्‍या एका असामान्य 'वल्ली'चे अर्थात्‌ आपल्या सर्वांच्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांचे!

पुलंच्या विनोदाबद्दल किती आणि काय बोलायचं? पुलंचे विनोद, आंब्याच्या डहाळीवर बसून गाणार्‍या कोकीळेच्या कुहू-कुहू सारखे मधुर आहेत; पिंजर्‍यातल्या पोपटाच्या पंखांच्या फडफडाटासारखे केविलवाणे नाहीत. पुलंचा विनोद कधीही कोंडल्यासारखा वाटत नाही; उलट कोंदटलेल्या जीवांना मोकळ्या हवेत श्वास घेऊ देणारा तो भासतो. कुणाचंही मन दुखावलं जाईल असा विनोद पुलंनी कधीच केला नाही. कुत्सितपणा टाळून केलेल्या सत्यनिवेदनाला परखडपणाची झालर चढते, फटकळपणाचं ठिगळ नाही. पुलंचा विनोद आरशासारखा स्वच्छ आहे; असा आरसा की ज्यात अक्राळविक्राळ विद्रूप सत्याला, विनोदाचा, सहनशीलतेचा मुलामा चढवून समोर उभं केलं जातं, तेही सुसह्य स्वरुपात! म्हणूनच, भाजीत झुरळ सापडल्याच्या तक्रारीला, स्वतःची मिशी अजिबात न फेंदारता, "बंडोपंत, मंथली ट्वेंटीटू रुपीजमध्ये एलिफंट का यायचा भाजीत?" हे जगप्रसिद्ध उत्तर देणारा खाणावळवाला पुलंच्या विनोदातच दर्शन देतो.

पुलंचा विनोद सहजगत्या घडून येतो, तो मुद्दाम घडवून आणावा लागत नाही. "एक तारखेला दूधवाले, घरवाले, कोळसेवाले, दारेवाले, धोबी, आणि डॉक्टर, हे 'षड्रिपू' थैमान घालतात," यासारख्या विनोदात मध्यमवर्गीयांची फार मोठी व्यथा दडली आहे; पण विनोदाच्या चादरीखाली या व्यथा झाकून जातात आणि म्हणूनच त्या सुसह्य वाटू लागतात.

साध्या-साध्या गोष्टींत देखील विनोद शोधण्यासाठी पुलंचीच नजर हवी. "कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे योगी असतात, अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात, पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत." किंवा "तुकारामाचं पूर्ण नांव काय? ह्या प्रश्नाला तुकाराम विष्णुपंत पागनीस हे उत्तर दिल्यामुळं, मंबाजीनं तुकोबाला बदडलं नसेल इतकं आमच्या बाबांनी आम्हांला बदडलं होतं. बाबांच्या शेंडीच्या केसाचा देखील दाह झाला नाही." या ठिकाणी, तुमच्या-आमच्या आसपास घडणार्‍या घटना वेगळ्या पद्धतीनं पाहण्याची नजर पुलंचा विनोदच देतो. स्वतः शिक्षकी पेशात असूनही एके ठिकाणी ते म्हणतात, "प्रोफेसर हा माणूस आणि लिफ्टमन हे हसू शकतात हे मला कधीच पटले नाही."

असे विनोदाचे बादशहा पु.ल. जेव्हा त्यांच्या अनुभवी नजरेसमोरुन सरकणार्‍या काळाचे उलटे फासे पाहतात, तेव्हा मात्र सभोवती, कारुण्याची किनार असणार्‍या कृष्णमेघांची दाटी होऊ लागते - "स्वराज्य आले हत्तीवरुन मिरवीत. अंबारीत राजेंद्रबाबूंच्या हाती कलश होता, समोर घोड्यावर बसून चालले होते जवाहरलाल - फक्त बापू मात्र आमच्याबरोबर पायी चालत होते."

काही ठिकाणी पु.ल. सहजगत्या सत्यपरिस्थिती सांगून जातात, "आम्ही ओझ्याचे बैल हेच खरं! शिंगाला झेंडू बांधा नाहीतर पोत, पाठीवर झूल चढवा किंवा चाबूक उडवा, जोडले एकदा की थांब म्हणेपर्यंत चालले!" तसंच जाताजाता ते नेत्यांच्या आश्वासनांची आणि कार्यपद्धतीची खिल्लीही उडवतात - "शाळांच्या इमारतींची संख्या वाढली म्हणून शिक्षण घेणे आणि देणे याविषयीची आस्था वाढली असे मानावयाचे म्हटले तर, ज्या गावात विपुल देवळे व मशिदी आहेत, तिथली माणसे धर्मावतार आहेत असे मानावे लागेल."

पुलंचं विनोदी वाङ्‍मय विपुल असलं तरी पु.ल. म्हणजे विनोद एवढंच नव्हे. एक अष्टपैलु व्यक्तिमत्व कसं असावं याचा आदर्श नमुना म्हणजे पु.ल.! विनोदी लिखाणाबरोबरच प्रवास वर्णनं, चरीत्रं, भाषांतरं, चित्रपट-कथा लेखन, कविता, गीत-संगीत अशा साहित्याच्या आणि कलेच्या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी मुशाफिरी केली आहे.

जाज्वल्य देशाभिमान हाही पुलंचा एक पैलु आहे. एक आठवण पु.ल. सांगतात - "मिठाच्या सत्याग्रहाचे दिवस होते. लॅमिंग्टन रोडवर पोलिस स्टेशनपाशी सत्याग्रहींचा जथा आला होता. लोक निर्भयपणे पोलिसांच्या गाडीतून घुसून स्वतःला अटक करुन घेत होते. त्या गर्दीत एक तरुण स्त्री होती. तिने आपल्या अंगावरचे दागिने उतरले, शेजारच्या एका माणसाच्या हाती दिले. त्याला आपले नाव सांगितले, पत्ता सांगितला आणि म्हणाली, "माझ्या घरी हे दागिने नेऊन द्या आणि सांगा 'म्हणावे, मी सत्याग्रहात गेले'." तो गृहस्थ म्हणाला, "बाई, तुमची माझी ओळखदेख नाही. तुमचे हे दागिने मी तुमच्या घरी पोहोचवीन असा तुम्हाला विश्वास का वाटतो?" ती म्हणाली, "तुमच्या अंगावर खादी आहे आणि डोक्यावर गांधी टोपी आहे म्हणून.""

खरोखर पुलंबद्दल काय लिहावं आणि किती लिहावं! शेवटी पु.लं.चेच उद्गार -
"घड्याळाचं काय नि माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की फार पुढंही जाण्याची भिती नाही आणि फार मागंही पडण्याची नाही!"

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

Thursday, March 4, 2010

शिकारी की सावज?

(डॉ. वाय. एल. आर. मूर्ती यांच्या संदेशावर आधारीत. डॉ. वाय. एल. आर. मूर्ती, इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगलोर इथं प्राध्यापक आहेत. त्यांनी आय. आय. टी., मद्रास येथून एम. टेक. तसेच आय. आय. एम., बेंगलोर येथून व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.)

शिकारी की सावज?

भारतामध्ये आजमितीला सर्वाधिक कॅमेरा विक्री कोण करतं?
तुम्ही म्हणाल – सोनी, कॅनॉन अथवा निकॉन. अंहं, यापैकी कुणीही नाही. बरोबर उत्तर आहे - नोकीया ! होय, नोकीया, जिचं भारतातील मुख्य उद्योग-क्षेत्र कॅमेरा नसून मोबाईल फोन आहे.
याचं कारण म्हणजे, फक्त कॅमेर्‍याऐवजी कॅमेरा असलेल्या मोबाईल फोन्सची वाढती विक्री होय. मग हे मोबाईल फोन पूर्णपणे कॅमेर्‍याची जागा घेऊ शकतील काय? अर्थातच! सोनी आणि कॅनॉन यांना या गोष्टीची जाणीव असावी, अशी आपण आशा करु.

आता हेच पहा. भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? तुम्हाला काय वाटतं, एचएमव्ही-सारेगामा? चूक. ती कंपनी आहे - एअरटेल! तासन्‌तास चालणारे म्युझिक अल्बम्स विकून म्युझिक कंपन्या जेवढं कमवत असतील त्यापेक्षा कितीतरी जास्त एअरटेल कमवतं, तेही ३० सेकंद वाजणार्‍या कॉलर ट्यून्स विकून.
वास्तविक, एअरटेल काही संगीत उद्योगात नाही. ती भारतातील सर्वाधिक ग्राहकवर्गाला मोबाईल सेवा पुरविणारी कंपनी आहे. अशा प्रकारचा प्रतिस्पर्धी ओळखणं महाकठीण काम आहे, आणि त्याला मागं टाकणं तर त्याहून कठीण (तुम्ही त्याला ओळखेपर्यंत तो तुम्हाला मागं टाकून बराच पुढं गेलेला असतो). पण म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की नोकीया आणि भारती (एअरटेल ची मूळ कंपनी) अगदी निवांत असतील, तर तुमचा अंदाज पुन्हा चुकीचा ठरण्याची शक्यता आहे.
आपण स्मार्टफोनच्या बाबतीत पूर्ण गाफील राहीलो, हे नोकीयानं कबूल केलं आहे. ऍपलचा आयफोन आणि गुगलचे ऍन्ड्रॉईड, नोकीयासाठी भविष्यातील मोठी डोकेदुखी ठरु शकतात, हे त्यांना कळून चुकलं आहे. पण गुगल ही तर मोबाईल कंपनी नाहीच मुळी? याचाच अर्थ, ही उदाहरणं एका अजून मोठ्या कोड्याकडं अंगुलीनिर्देश करत आहेत. हे फक्त मोबाईल, संगीत, कॅमेरा किंवा ईमेल पुरतं मर्यादीत नाही.

"भविष्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिगत डिजिटल उपकरण (पर्सनल डिजिटल डिव्हाईस) कोणतं?" यासाठी हे महाभारत चालू आहे. काय असेल ते - टेलिफोनसहित अधिक वेगवान मोबाईल किंवा पामटॉप? या छोट्या-छोट्या लढाया मिळून एका महायुद्धाकडं संक्रमित होत आहेत. या सर्व लढायांमागं एक यक्षप्रश्न आहे - “कोण आहे माझा प्रतिस्पर्धी?”

माझ्या विद्यार्थ्यांना डिवचण्यासाठी मी अधून-मधून एक प्रश्न विचारत असतो - “ऍपलनी जे सोनीबरोबर केलं, तेच सोनीनं कोडॅकबरोबर केलं, कसं ते स्पष्ट करा?” काही हुशार विद्यार्थी लगेच उत्तर देतात. सोनीनं आपलं कार्यक्षेत्र श्राव्य माध्यमाभोवती (ऑडीयो) आखून घेतलं (वॉकमन मधून संगीत ऐका). ऍपलसारखी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आपल्या कार्यक्षेत्रात शिरकाव करु शकेल, याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. जरा विचार करुन पहा, हे खरंच इतकं अशक्य होतं का? संगणक बनविणार्‍या ऍपलकडं दोन्ही दृक्‌-श्राव्य माध्यमांची क्षमता आहे. मग केवळ श्राव्य माध्यमात ऍपल आपल्याशी स्पर्धा करु शकणार नाही, असं सोनीला का वाटलं? सोप्पं आहे - कोडॅकनं जेव्हा आपलं कार्यक्षेत्र फिल्म कॅमेर्‍यापुरतं मर्यादीत ठेवलं, तेव्हा सोनी 'डिजिटल' म्हणून विस्तारत गेले. डिजिटल कॅमेर्‍याच्या कक्षेत ही दोन्ही क्षेत्रं मिसळून गेली. डिजिटल मध्ये प्रवेश करुन कॅमेरा फिल्मवर गुंतवलेल्या पैशावर पाणी सोडायचं, की फिल्म मध्येच राहून डिजिटल च्या स्पर्धेतून बाहेर पडायचं, या द्विधेत कोडॅक अडकून पडलं. निर्णयाअभावी त्याची दोन्हीकडं पीछेहाट झाली. साहजिकच आहे. "उद्या माझा प्रतिस्पर्धी कोण असणार आहे?” हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारलाच नाही. हीच गत आयबीएम ची झाली, ज्यांनी मेनफ्रेम कॉम्प्युटरच्या उत्पन्नापुढं पीसीच्या (पर्सनल कॉम्प्युटर) उदयाकडं दुर्लक्ष केलं. हीच गत बिल गेट्सची झाली, ज्यांनी आधी इंटरनेट ला एक 'फॅड' ठरवलं, आणि मागाहून नेटस्केपला संपविण्यासाठी विंडोजमध्ये इंटरनेट ब्राउजर गुंडाळून विकलं. आजचा प्रतिस्पर्धी कोण, हा मुद्दाच गौण आहे. आजचा प्रतिस्पर्धी कोण हे उघड आहे, तर उद्याचा कोण हे गुपित!

२००८ मध्ये ब्रिटिश एअरवेजचा भारतातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण होता? सिंगापूर एअरलाईन्स? की इंडीयन एअरलाईन्स? असतीलही, परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर वेगळंच काहीतरी आहे. वर उल्लेख केलेल्या व न केलेल्याही सर्व एअरलाईन्ससाठी धोकादायक प्रतिस्पर्धी आहेत – एचपी आणि सिस्को च्या व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग व टेलिप्रेझेन्स सुविधा! जागतिक मंदीमुळं व्यावसायिक वाहतूक घटली. प्रवास खर्चात कपात करण्यासाठी, भारतातील व बाहेरील वरीष्ठ आयटी अधिकार्‍यांना व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग वापरण्याच्या सूचना त्यांच्या मुख्य कार्यालयांकडून देण्यात आल्या. इतकंच नव्हे तर, अमेरीकन व्हिसासाठी भारतीय तंत्रज्ञांची उडणारी झुंबड २००८ मध्ये बिल्कुल दिसली नाही. (भारतासाठी ६५,००० युएस व्हिसांचा कोटा उपलब्ध आहे. युएसकडूनच उलट विनंत्या येऊ लागल्या, हा मंदीचाच महिमा!) इथंपर्यंत ठीक आहे. पण मंदीनंतर विमान वाहतूक कंपन्या पुन्हा जोरात येतील, यात मला तरी तथ्य वाटत नाही. थोड्या कालावधीसाठी येतीलही; परंतु दीर्घकाळासाठी नक्कीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, भौतिकशास्त्राबाहेर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुठं लागू होत असेल तर तो इलेक्ट्रॉनिक उपकरणांना. १९७७ आणि १९९१ दरम्यान (आता हद्दपार झालेल्या) व्हीसीआर च्या किमती त्याच्या मूळ किमतीच्या एक तृतीयांशपर्यंत घसरल्या होत्या. पीसीच्या किंमती काही लाख रुपयांवरुन काही हजार रुपयांपर्यंत उतरल्या. असाच कल राहिला तर टेलिप्रेझेन्सच्या किंमती देखील कोसळतील. मग उपरोल्लेखित विमान वाहतूक कंपन्यांची काय अवस्था होईल? तसंही त्यांच्यापैकी बहुतेक कंपन्या पिछाडीसच आहेत. असं काही झालं तर त्या भूतकाळात जमा व्हायला वेळ लागणार नाही.

भारतीयांना दोन गोष्टींचं प्रचंड वेड आहे. चित्रपट आणि क्रिकेट. ही दोन्ही पूर्णतः भिन्न क्षेत्रं होती. तशीच त्यातील श्रद्धास्थानंही निराळी होती. सचिन आणि सेहवाग हे क्रिकेटचे देव होते. (आमीर खान, शाह रुख खान आणि त्यांच्या मागोमाग इतर) खान हे चित्रपटांचे नियंते होते. क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेट किंवा फार तर ५० षटकांचे क्रिकेट होते. मग आयपीएल चा उदय झाला आणि ही दोन्ही क्षेत्रं एकजीव झाली. आयपीएलनं क्रिकेटला २० षटकांपर्यंत खाली ओढलं. एकाएकी आयपीएलचा सामना ३ तासांच्या चित्रपटांइतका छोटा वाटू लागला. क्रिकेट चित्रपटाचं प्रतिस्पर्धी बनलं. आयपीएल सामन्यांच्या दिवशी चित्रपटगृहं ओस पडू लागली. आपला प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी मल्टीप्लेक्सच्या मालकांनी चित्रपटगृहांमध्ये आयपीएल सामने प्रदर्शित करण्याचे हक्क मागून घेतले. जर आयपीएल हाच क्रिकेटचा मुख्य प्रवाह बनणार असेल, आणि तशीच शक्यता दिसत आहे, तर चित्रपटांना आयपीएल सामन्यांच्या सोयीनुसार आपल्या प्रदर्शन तारखा जुळवून घ्याव्या लागतील. प्रेक्षकांच्या दृष्टीनं दोन्हीही ३ तासांचे तमाशेच आहेत. क्रिकेटचा हंगाम चित्रपटांना भारतीय बाजारपेठेतून हद्दपारही करु शकेल.

गेल्या २० वर्षांमध्ये भारतातून गायब झालेली उत्पादनं आठवून बघा. तुम्ही शेवटचा कृष्ण-धवल (ब्लॅक-एंड-व्हाईट) चित्रपट केव्हा बघितला होता? तुम्ही शाईचं पेन अखेरचं केव्हा वापरलं होतं? तुम्ही टाईपरायटर वर अखेरचं टायपिंग केव्हा केलं होतं? या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, “आठवत नाही!” थोड्या कालावधीसाठी नेहमीच्या टाईपरायटरला नाममात्र पर्याय म्हणून थोडीफार संग्रहक्षमता (मेमरी) असणारा एक इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर उपलब्ध होता. त्यानंतर आला संगणक, आणि ही सर्व उत्पादनं हद्दपार झाली. आज माझ्यासारखी सराईत तंत्रज्ञ नसणारी माणसं देखील संगणकाचाच सुधारीत टाईपरायटर म्हणून वापर करतात. टाईपरायटर मात्र कुठंच दिसत नाही.

एक शेवटचं उदाहरण. २० वर्षांपूर्वी, सकाळी उठण्यासाठी भारतीय जनता काय वापरत होती? उत्तर आहे, “गजराचं घड्याळ”. हे गजराचं घड्याळ म्हणजे छोट्या छोट्या यांत्रिक अवयवांचा एक अवाढव्य राक्षस होता. चालू राहण्यासाठी त्याला रोज चावी द्यावी लागे. गजर देताना त्याचा एवढा आवाज होई की, तुमच्याबरोबर अख्ख्या कॉलनीची झोपमोड होई. त्यानंतर अजून छोटी आणि सुंदर घड्याळं आली. ही बर्‍यापैकी नाजूक असूनदेखील त्यांना सवयीनं "गजराचं घड्याळ"च म्हटलं जायचं. आज आपण सकाळी उठण्यासाठी काय वापरतो? मोबाईल फोन! या मोबाईल फोनच्या कृपेनं अख्खा घड्याळ उद्योग अवकाळी झोपला. टायटन सारख्या बड्या कंपन्यांनाही याचा फटका बसला. तुमचा प्रतिस्पर्धी कुठल्या कोपर्‍यात दडून बसलाय याची तुम्हाला कल्पनाच नाही!

गंमत म्हणून विचारतो, लेखकांचा प्रतिस्पर्धी कोण असू शकतो? विनोद सांगणारी यंत्रं? (ऍपलचा सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नीक यानं टेलीफोनलाच, पोलीश भाषेत विनोद सांगणारं एक यंत्र जोडून टाकलं.) की त्यांची स्पर्धा गोष्टी सांगणार्‍या यंत्रमानवांशी असेल? भविष्य भयंकर दिसतंय! एका आयटी कंपनीच्या अधिकार्‍यानी या स्पर्धेबद्दल सूचकपणे म्हटलं आहे, “शिकारी बना...नाहीतर...सावज बनाल!” हेच या गोष्टीचं समर्पक तात्पर्य आहे.

भावानुवाद - मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark

Ballpoint Pen Sketches





These sketches are made with regular ballpoint 'pens'.







Share/Bookmark

Wednesday, March 3, 2010

एक महात्मा

एक महात्मा होऊनी गेला, आयुष्य अपुले देऊनी गेला..
स्वतंत्रतेच्या वेशीवरती, बलिदान प्राणाचे देऊनी गेला.
आक्रंदीते ती भारतमाता - सुपुत्र माझा हरवुनी गेला,
आठवा त्याला, जागवा स्मृती - 'कोहिनूर' तो हरपुनी गेला.
रस्ता होता त्याचा दूरचा, आणि अगदी उंचावरचा,
आमच्या मानेवर मात्र पापांचे ओझे...
मान वर करुन पाहूही नाही शकलो, सन्मार्ग तयाचा.
नेणार होता तो स्वर्गाकडे आम्हांला - आपल्याबरोबर घेऊन,
आम्ही मात्र पाताळातच गेलो - मोहाच्या पाशात अडकून.
एक युधिष्ठिर होऊनी गेला - 'कुत्र्या'साठी स्वर्गही नाकारला,
देवांचा राजा रथ घेऊनी उभा - त्यालाही अट्टाहास हा न उमगला !
त्या 'धर्मा'चाच अवतार हा, 'बापू' बनुनी आला पुण्यात्मा..
'गोडसे'च काय - आम्हालाही नाही समजला तो महात्मा, तो पुण्यात्मा !!


Share/Bookmark