ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, November 27, 2022

शब्देविण संवादु...

राजकीय नेता म्हणजे आक्रमकपणे भाषण ठोकणारा वक्ता, हे समीकरण मोडीत काढलं अटल बिहारी वाजपेयी यांनी. तसंच, चांगला नट म्हणजे एका दमात मोठमोठी पल्लेदार वाक्यं डिलीव्हर करू शकणारा कलाकार, या गृहीतकाला छेद दिला विक्रम गोखले यांनी. वाजपेयींची भाषणं ऐकत आणि विक्रम गोखलेंचा अभिनय बघत आम्ही मोठे झालो. बोलल्या गेलेल्या किंवा बोलायच्या प्रत्येक शब्दाचा परिणाम एनहान्स करण्यासाठी शब्दांच्या आणि वाक्यांच्या मधले पॉजेस किती महत्वाचे असतात, ते या दोघांमुळं कळालं. मोठमोठी वाक्यं बोलताना दम लागतो म्हणून थांबणं वेगळं आणि शब्दा-वाक्यांमधल्या नेमक्या जागा ओळखून तिथं नेमके पॉजेस घेणं वेगळं! या दोघांना ते जसं जमलं तसं इतर कुणाला क्वचितच जमलं असेल - राजकारण आणि अभिनय दोन्ही क्षेत्रांत.

सुरुवातीला त्यांच्या गंभीर भूमिकाच बघायला मिळाल्यामुळं असेल, पण 'वजीर'मधल्या विक्रम गोखलेंना 'माझे राणी माझे मोगा' गाण्यात बघताना काहीतरी वेगळंच वाटायचं. पण पुढं 'लपंडाव' बघितला आणि त्यांच्या अभिनयाची रेन्ज लक्षात यायला लागली.

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अशा मराठीतल्या दिग्गज कलाकारांना हिंदी सिनेमात अगदीच किरकोळ कामं करताना बघून वाईट वाटायचं. विक्रम गोखलेंनीसुद्धा हिंदी सिनेमात व्हिलनचे वगैरे रोल केले. पण नंतरच्या काळात 'हम दिल दे चुके सनम' किंवा 'भुलभुलैया' यासारख्या मेनस्ट्रीम मूव्हीजमध्ये त्यांना महत्वाच्या रोलमध्ये बघून भारी वाटलं होतं.

कारगील युद्धाच्या वेळी विक्रम गोखलेंनी दिलीप कुमारला उद्देशून लिहिलेलं पत्र पेपरमध्ये वाचलं होतं. पाकिस्तान सरकारनं दिलीपकुमारला दिलेला 'निशाण-ए-पाकिस्तान' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून दिलीपकुमारनी परत करावा, असं जाहीर आवाहन त्या पत्रात केलं होतं. त्यातली राजकीय भूमिका, देशभक्तीची संकल्पना, वगैरे तेव्हाच्या वयानुसार आणि आकलनानुसार योग्यच वाटलं होतं; पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे, एक कलाकार, एक नट इतकी स्पष्ट भूमिका घेऊ शकतो आणि इतक्या मुद्देसूदपणे जाहीररित्या मांडू शकतो, याबद्दल वाटलेली कौतुकाची भावना जास्त मोठी होती.

विक्रम गोखलेंना टीव्ही आणि सिनेमाच्या स्क्रीनवर खूप बघितलं. नाटकातला त्यांचा स्टेजवरचा अभिनय बघायची संधी मात्र मिळाली नाही. मागच्याच आठवड्यात जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी'मध्ये त्यांना बघून बरं वाटलं. तसं बघितलं तर, संपूर्ण सिनेमात एकच वाक्य त्यांना वेगवेगळ्या प्रसंगात म्हणायचं होतं. पण न बोलता त्यांनी चेहरा आणि विशेषतः डोळ्यांमधून इतर कलाकारांशी आणि प्रेक्षकांशी साधलेला संवाद आणखी कुणाला जमला असता असं वाटत नाही.

काही कलाकारांचे संवाद, त्यांनी बोललेले शब्द, त्यांच्या ॲक्शन्स आपल्याला त्यांची आठवण करून देत राहतात. विक्रम गोखलेंच्या धीरगंभीर आवाजासोबतच त्यांचे प्रेग्नंट पॉजेस आणि त्यांचा शब्देविण संवादु नेहमी आठवत राहील हे नक्की...

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
२७/११/२०२२


Share/Bookmark

Wednesday, October 12, 2022

A Reluctant Love Story (Political Post)


मला पनीर घालून बनवलेली भाजी आवडते; पण पालक आवडत नाही. पालक पनीर काही लोकांची आवडती डिश असू शकेल. पालक पनीर बनवणं ही मार्केटची गरजदेखील असू शकेल. पण याचा अर्थ मी पनीर सोडून पालकाची स्तुती करावी असा होत नाही. पालक न वापरता पनीरची भाजी कुठे मिळते याचा मी शोध घेऊ शकतो किंवा तशी भाजी मिळेपर्यंत वाट बघू शकतो.

पालक तोंडात गेला की कसंतरी वाटत असताना फक्त पालक आणि पनीरची युती झाल्यामुळं पालकाला गोड मानून घ्यावं, असं मला वाटत नाही. शिवसेना (बाळासाहेबांची, धर्मवीरांची, उद्धवची, राजची, अमितची, आदित्यची, किंवा आणखी कुणाची) म्हणजे धार्मिक आणि प्रादेशिक अस्मितेचा फायदा घेऊन राजकारण करणारी टोळी आहे. निवडणूक आयोगानं त्यांना राजकीय पक्षाचा दर्जा दिलेला असला तरी सेनेच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं वागणं एखाद्या टोळीसारखंच राहिलेलं आहे.

२०१९ मध्ये राजकीय अपरिहार्यतेमुळं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन महाविकास आघाडी स्थापन करावी लागली. अचानक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थकांना शिवसेना नावाचा पालक गोड लागायला लागला. अकार्यक्षमतेला संयमी भूमिका म्हटलं जाऊ लागलं. पोकळ घोषणांना दुर्दम्य आशावाद म्हटलं जाऊ लागलं. अव्यावहारिक आवाहनांना कौटुंबिक साद समजलं जाऊ लागलं. भाजपा सोबत गेलेल्या गुन्हेगारांचं शुद्धीकरण होतं, त्याच धर्तीवर काँग्रेससोबत आलेल्या शिवसेनेचं पापक्षालन झाल्यासारखं वाटायला लागलं. कोणताही महत्त्वाचा, लोकोपयोगी निर्णय न घेता, अननुभवी नेतृत्वाला आश्वासक नेतृत्व मानलं जाऊ लागलं.

पदरी पडलं आणि पवित्र झालं, असं समजून (किंवा खरोखर मनापासून ही जोडी स्वीकारून) अपयशांवर पांघरुण घालण्याच्या आणि कोरड्या आडातून पोहरा भरून काढण्याच्या धडपडीत मूळच्या काँग्रेसी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, संतुलित नेत्यांची आणि त्याहून जास्त सामान्य कार्यकर्त्यांची भयानक दमछाक आणि फरफट झालेली मागच्या अडीच वर्षात दिसून आली. ही दमछाक आणि फरफट नुसती विनोदीच नाही, तर केविलवाणी सुद्धा आहे.

काय तो पक्ष, काय ते चिन्ह, काय ते नेते, एकदम बोगस आहे सगळं. तरीसुद्धा आपला वेळ, बुद्धी, ताकद खर्च करून काही माणसं कुठलीतरी बाजू घ्यायचा प्रयत्न करताना दिसताहेत. हरकत नाही, ज्याची त्याची निवड.

पण यामुळं खरे मुद्दे बाजूला पडताहेत. मूळ प्रश्नांवर ना युती सरकार काम करतंय, ना आघाडी सरकार. पण कुठली तरी बाजू घ्यायच्या धडपडीत 'खरं' राजकीय विश्लेषण, परखड मतप्रदर्शन सध्या कुणीच करत नाही, याचं वाईट वाटतंय. खरं बोलल्यामुळं कुणीतरी दुखावलं जाणारच; पण म्हणून गप्पच बसायचं किंवा एक बाजू पकडून खोट्याला खरं म्हणायची धडपड करत रहायचं, हे दोन्ही पर्याय पटत नाहीत.

असो. विषय राजकीय असला तरी चिंतन बौद्धिक आणि व्यक्तिगत आहे, त्यामुळं सूचना आणि प्रतिक्रिया अर्थातच अपेक्षित नाहीत. धन्यवाद !

मंदार शिंदे
१२/१०/२०२२

 


Share/Bookmark

Saturday, September 10, 2022

Awaken the real power within you... Brahmastra!

सिनेमा म्हणजे करमणूक. एन्टरटेनमेन्ट. खऱ्या आयुष्यातल्या समस्या, दुःख, निराशा विसरायला लावणारे तीन तास, खोटी आशा, खोटी नाती, खोटे प्रसंग; पण करमणूक १००% खरी.

अचाट शक्तीचे अफाट प्रयोग, कल्पनेपलीकडची कल्पना, पौराणिक संदर्भांची आजच्या वास्तवाशी बेमालूम जोडणी, प्रेम-बिम, नाच-गाणी, दसरा-दिवाळी, भांडण - लढाई, रहस्य, अस्त्र-शस्त्र… ब्रह्मास्त्र!

आपण कोण आहोत, आपल्यामधे काय शक्ती आहेत, याची कल्पनाच नसलेला रणबीरचा 'शिवा'. कुठलीही विशेष शक्ती नसताना केवळ प्रेमाखातर जीव धोक्यात घालणारी आलियाची 'ईशा'. आपल्याला नेमून दिलेलं काम बजावताना दुसरा कुठलाही विचार न करणारी मौनीची 'जुनून'. आपल्या छोटया-मोठ्या शक्तींचा योग्य वेळी वापर करणारे शिष्य आणि अस्त्र-शस्त्रांचं प्रशिक्षण देण्याऐवजी स्वतःच्या आतमधे असलेली शक्ती जागवायला शिकवणारे अमिताभचे 'गुरुजी'. एवढ्याच पात्रांनी तीन तास आपल्याला खिळवून ठेवणं शक्य असताना, थोड्याच वेळासाठी येऊन आपला पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्स देणारा नागार्जुन. आणि सिनेमा रिलीज होईपर्यंत सस्पेन्स ठेवलेला (पण आता सांगायला हरकत नाही असा) - 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची खरी ताकद - मेन अट्रॅक्शन - शाहरुखचा 'सायंटीस्ट मोहन भार्गव'.

जबरदस्त स्पेशल इफेक्ट्स, जे फक्त आणि फक्त मोठ्या स्क्रीनवरच बघावेत. सुसाट वेगानं धावणारी आणि धक्क्यांमागून धक्के देणारी गोष्ट. एकामागून एक घडत जाणाऱ्या महत्त्वाच्या घटना बघताना मधे-मधे श्वास घ्यायला फुरसत देणारी गाणी. आणि सगळी गोष्ट एकदाच सांगून संपवून टाकण्याऐवजी पहिल्या गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण करून सोडणारा शेवट.

एवढी सगळी कारणं दिली असूनसुद्धा ज्यांना आपली करमणूक करून घ्यायची इच्छा नसेल, त्यांनी अजिबातच 'ब्रह्मास्त्र' बघायला जाऊ नये. हॅरी पॉटर, स्टार वॉर्स आणि हॉलिवूडच्या आणखी कुठल्या-कुठल्या सिनेमांशी तुलना करायची असेल तरी 'ब्रह्मास्त्र' बघायला जाऊ नये. आपल्या पुराणात खरी अस्त्रं कुठली होती आणि कुठलं अस्त्र कधी कुठं कसं वापरायचं याबद्दल आपल्याला उपजत ज्ञान असेल, तर मग 'ब्रह्मास्त्र' बघायचा विचारसुद्धा करू नये.

पण तीन तास 'भारी' वाटून घ्यायचं असेल, फॅन्टसी अनुभवायची असेल, जे प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात घडणार नाही ते स्क्रीनवर बघायची मजा घ्यायची असेल, (आणि तुम्ही रणबिर, आलिया, अमिताभ, नागार्जुन, मौनी यापैकी कुणाचेही किंवा सगळ्यांचे फॅन असाल...) तर नक्की मोठ्या स्क्रीनवर 'ब्रह्मास्त्र' बघाच.

…शाहरुखचे फॅन असाल तर वरून अकरावी ओळ वाचल्यावरच तुम्ही तिकीट बुक करायला गेला असाल, याची खात्री आहे!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
९ सप्टेंबर २०२२Cinema means entertainment. Entertainment entertainment entertainment. Three hours of relief from real life problems, sorrows, and disappointments. Cinema gives false hopes, portrays false relationships, presents false events; but the entertainment is 100% real.

Tremendous powers being exercised, imagination beyond imagination, subtle connection of mythological references with today's reality, love story, dance and songs, Dussehra-Diwali celebrations, battles and wars, mystery, weapons, Astra… Brahmastra!

Ranbir plays 'Shiva' who has no idea who he is, what powers he has. Alia plays 'Isha' who has no special powers, but risks her life only for the sake of love. Mauni plays 'Junoon' who does not think of anything else while doing the work assigned to her. Amitabh plays 'Guruji' who not only teaches students to use their small and big powers at the right time but also encourages them to awaken the power within themselves instead of training them with weapons. While these many characters could have kept us engrossed for three hours, Nagarjuna gives his power-packed performance in just a short time. And kept in suspense until the release of the movie (but it's okay to say now) - the real strength of 'Brahmastra' - the main attraction - Shahrukh playing 'Scientist Mohan Bhargava'.

Amazing special effects, which should only be seen on the big screen. A story that runs at a steady pace and gives one shock after another. Songs that give you time to breathe while catching up with the important events happening one after the other. And instead of just telling the story once and for all, there is an ending that leaves you curious about the next story generated from the first story.

Despite all these reasons, those who do not want to entertain themselves should not go to see 'Brahmastra' at all. Even if you want to compare it with Harry Potter, Star Wars and any other Hollywood movies, you should not go to see 'Brahmastra'. If you have instinctive knowledge about what were the real weapons in our Puranas and how to use which weapon when and where, then you should not even think of watching 'Brahmastra'.

But if you want to feel great for three hours, if you want to experience the fantasy, if you want to enjoy watching on screen what will never happen in your real life, (and if you are a fan of any or all of Ranbir, Alia, Amitabh, Nagarjuna, Mouni...) then definitely watch 'Brahmastra' on the big screen.

…If you are a fan of Shah Rukh, you must have gone to book the ticket only after reading the eleventh line from above!

- Mandar Shinde 9822401246
9th September 2022Share/Bookmark

Thursday, September 1, 2022

Why this veil?

दोस्ती का पर्दा है बेगानगी
मुँह छुपाना हम से छोड़ा चाहिए

- मिर्ज़ा ग़ालिबकशास लपविशी तोंड, संशय लोक, घेती पुन्हा-पुन्हा
अशीच येऊन भेट, जशी तू थेट, भेटीशी इतरेजना

- अक्षर्मन


 Share/Bookmark

Monday, August 15, 2022

Narcondam: Marathi Play Review

तुमचा 'प्लॅन बी' काय आहे?विकास आणि विनाश. एकाच नाण्याच्या दोन बाजू. कुणाचा तरी विकास म्हणजे कुणाचा तरी विनाश. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. लगेच किंवा कालांतरानं. संपूर्णपणे विनाश टाळून विकास साधणं शक्य आहे का? या प्रश्नापासून सुरु झालेला आणि उत्तराऐवजी पुन्हा त्याच प्रश्नापाशी नेऊन सोडणारा एक 'प्रयोग' म्हणजे - नारकोंडम!

'नारकोंडम' या विचित्र नावावरून या नाटकाच्या / दीर्घांकाच्या विषयाची कल्पना येत नाही, ही नाटक आणि प्रेक्षक या दोघांसाठी जमेची बाजू. नाटक बघायला जाणार असाल तर या नावाबद्दल माहिती 'गुगल' करणं कटाक्षानं टाळा. (आणि नसाल बघायला जाणार, तर द्या सोडून. उगाच काहीतरी शोध लावून सोशल मिडीयावर सस्पेन्स फोडू नका.)

बुद्धीबळाच्या पटावरचे हे काळे आणि हे पांढरे, अशा पात्र परिचयातून नाटकाची सुरुवात होते; पण हळूहळू काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्यातले काळे आपल्याला दिसायला लागतात. शेवटी तर प्रेक्षक म्हणून गेलेल्या आपल्यालाच निर्णायक चाल खेळायचं आव्हान हे नाटक देतं. प्रेक्षकांपासून एका वेगळ्या उंचीवर - स्टेजवर - न घडता हे नाटक प्रेक्षकांच्या आजूबाजूला घडतं. प्रेक्षकांना आपल्यामध्ये सामावून घेतं. त्या-त्या प्रसंगामध्ये आपण स्वतः उपस्थित आहोत, त्या नेपथ्याचाच एक भाग आहोत, असा एक वेगळा अनुभव या दीड तासांमध्ये मिळतो. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, मोकळ्या आकाशाखाली, मग पुढच्याच क्षणी बंद केबिनमध्ये किंवा घराच्या दिवाणखान्यात, अशा वेगवेगळ्या जागांवर आपल्याला प्रत्यक्ष घेऊन जायची किमया या नाटकाचे संवाद आणि ते सादर करणारे कलाकार साधतात. पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार, धूर्त, अनुभवी, आक्रमक, हट्टी, भावनिक, संतुलित, अशा निरनिराळ्या भूमिकांचा आनंद आपल्याला घेता येतो. दीपाली, लक्ष्मी, रणजीत, अवनीश, पराग, हृषीकेश, प्रदीप अशा सगळ्या कलाकारांनी धावफलक हलता ठेवायची जबाबदारी चपखल पार पाडलीय. हा दीर्घांक असला तरी, कथानकाला आणि सादरीकरणाला स्वतःचा एक विलक्षण वेग आहे. खटकेबाज संवाद आणि सर्वच पात्रांची एकमेकांसोबत जुगलबंदी यामुळं, विषय गंभीर असला तरी नाटक बघायला मजा येते. प्रदीप वैद्यांच्या दिग्दर्शनाची कमाल म्हणजे, नाटक पहिल्या पाच-सात मिनिटातच पकड घेतं आणि शांतपणे एक-एक पदर उलगडत फक्त दीड तासात एक मोठा विषय आपल्यापर्यंत पोहोचवतं.

आपल्या आजूबाजूला अनेक छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. काही घटना घडून गेल्यावर आपल्याला समजतात; काही घडत असताना त्यांचे अपडेट आपल्याला अर्धवट स्वरुपात मिळत असतात. पण जे घडून गेलंय किंवा घडतंय, त्याच्या पलिकडं - पडद्यामागं - काय घडलं असेल, घडत असेल, याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत असतं. मग हाती लागलेल्या मर्यादीत माहितीच्या आधारावर आणि तर्क व कल्पनाशक्तीच्या जोरावर काहीतरी लिहिलं जातं, सादर केलं जातं. असाच एक सशक्त प्रयोग आहे - 'नारकोंडम'! वर उल्लेख केल्यानुसार, विनाश टाळून विकास साधण्याचा काही पर्यायी मार्ग - प्लॅन बी - खरंच असतो का, याबद्दल प्रश्नांची पेरणी करून हे नाटक संपतं, एवढंच कथानकाबद्दल सांगेन. बाकी तुमचा इतर काही महत्त्वाचा 'प्लॅन बी' नसेल, तर नक्की या नाटकाच्या पुढच्या प्रयोगाला जा आणि एका उत्तम सादरीकरणाचा आनंद लुटा!

- मंदार शिंदे 9822401246Share/Bookmark

Sunday, August 14, 2022

Swatantryache Gaane (Freedom Song)


स्वातंत्र्याचे गाऊ गाणे चला उभारू नवी तोरणे
आनंदाचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू

नाही गुलामी आता कुणाची
पहाट झाली मुक्त क्षणांची
भेदभावही मिटून गेला
समानतेचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू
आनंदाचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू...

हटेल गरिबी अन्‌ लाचारी
होईल बरकत धन-धान्याची
रंक न राहील कुणी इथे
श्रीमंतीचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू
आनंदाचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू...

अजस्र यंत्रे कामे करतील
कष्टकऱ्यांचे खिसेही भरतील
काम मिळे अन्‌ दाम मिळे
या प्रगतीचाही करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू
आनंदाचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू...

- अक्षर्मन (9822401246)


Share/Bookmark

Friday, August 12, 2022

Baasari - Short Story in Marathi

बासरी
******

एके दिवशी एका शहरात आला एक बासरीवाला. रंगीत-रंगीत बासऱ्या त्यानं आणल्या होत्या विकायला. स्वतः वाजवत होता तो बासरी खूप सुंदर. मंत्रमुग्ध होऊन जाई, सूर पडती ज्याच्या कानांवर.

मोठमोठ्यानं ओरडत होता - बासरी घ्या बासरी.. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की. ओरडून झाल्यावर वाजवू लागे बासरी पुन्हा-पुन्हा. आनंदानं ऐकणारे मग डोलवू लागती माना.

लोकांना वाटलं नक्कीच ही बासरी आहे खास. बासरीसोबत खरा आनंद मिळणार अगदी हमखास! बासरीवाला म्हणतच होता - बासरी घ्या बासरी.. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की. 

जिथं-जिथं तो जाईल तिथं लागला जणू मेळा. बासरी विकत घ्यायला एवढे लोक झाले गोळा. दुपारपर्यंत त्याच्या सगळ्या बासऱ्या विकून झाल्या. स्वतःची एकच बासरी उरली हातामध्ये त्याच्या. एकजण म्हणाला त्याला - हीपण बासरी विकून टाक. नकार देऊन बासरीवाला घरी निघाला चूपचाप. 

विकत घेतली ज्यांनी बासरी, बसले सगळे वाजवायला. एकाची पण वाजेना धड, लागले हवा फुंकायला. तुझी वाजते का, त्याची वाजते का, चौकशी झाली सुरु. सूर कुणालाच काढता येईना, नुसता आवाज फुरुफुरु.

लोकांना आता वाटायला लागलं, फसवणूक झाली आपली. एकाची पण वाजेना कशी सुरात नवीन बासरी. बासरीवाल्याची एकच बासरी होती चांगली वाजणारी; बाकीचा माल खराब त्यानं मारला आपल्या माथी. चिडले लोक, बासरीवाल्यानं दिला होता धोका. शिकवू त्याला नक्की धडा, भेटू तर दे पुन्हा.

थोड्या दिवसांनी पुन्हा आला बासरीवाला शहरात. सूर तेच पुन्हा घुमले त्याच गल्ली-बोळात. चला चला, जाब विचारू, घरोघरी गेला निरोप. त्याच्याभोवती गोळा होऊन सगळे करू लागले आरोप.

वादावादी झाली खूप, पण निकाल काही लागेना. न्यायाधीशांकडं घेऊन गेले न्यायनिवाडा करायला. घडलं काय, तक्रार काय, सांगितलं सगळं उलगडून. जज साहेब बुचकळ्यात पडले, असली केस ऐकून.

काहीतरी गडबड आहे नक्की, आली त्यांना शंका. एवढे लोक उगीचच नाही करणार एकत्र दंगा. बासरीवाल्याला म्हणाले -  सांग, काय घडलं होतं? खराब बासरी विकलीस ह्यांना, खरं आहे की खोटं?

खोटं आहे, न्यायाधीश साहेब, तो म्हणाला ठासून. चांगल्याच बासऱ्या दिल्यात मी, एक-एक तपासून. खराब बासरी एकसुद्धा मी सोबत नाही ठेवत. काही म्हणा, खोट्याचा धंदा आपल्याला नाही झेपत.

जज म्हणाले - यांच्या बासऱ्या का नाही वाजत देवा? तुझ्याच बासरीतून सुमधुर संगीत, यांच्यातून नुसती हवा?

तो म्हणाला - म्हणणं माझं नीट ऐकलं नाही ह्यांनी. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की.

म्हणजे काय, नीट सांग, जज साहेब म्हणाले. सत्य मिळेल की आनंद, हे कसे ओळखायचे?

तो म्हणाला - बासरीनं माझ्या नसेल दिला आनंद; पण सत्य सांगितलेलं दिसणार कसं, डोळेच जर ठेवले बंद? बासरी विकत घेतली म्हणून संगीत कसं येईल? वाजवायला येत नसेल तर नुसती हवाच येईल-जाईल.

सगळ्या बासऱ्या घेतल्या परत, हिरव्या, पिवळ्या, रंगीत. एक-एक बासरी वाजवून त्यानं ऐकवलं मधूर संगीत.

मला आनंदी बघून ह्यांना वाटलं, सोप्पं आहे. दहा रुपयात बासरी आणि आनंद, फारच स्वस्त आहे. खरं तर ह्यांना माहीत नाही बासरी कशी वाजवायची. अपेक्षा मात्र सगळ्यांना आहे सुमधूर संगीत ऐकायची. सत्य माझ्या बासरीनं सांगितलं आहे, साहेब. क्षमता आणि अपेक्षांचा बसत नाही इथं मेळ. आरोप ह्यांचा माझ्यावर, फसवणूक मी केली. स्वतःच स्वतःला फसवणाऱ्यांची फिर्याद तुम्ही घेतली.

कष्ट नकोत, शिक्षण नको, मग आनंद कसा मिळेल? पैशानं विकत मिळेल बासरी, संगीत कसं मिळेल? मिळवू शकतात आनंद हे स्वतः बासरी वाजवायला शिकून. तुमचा वेळ वाया घालवला बघा, माझ्यावर आरोप करून.

जज साहेबांनी डोलवली मान, केस झाली सोपी. आरोप करणारे फिर्यादी आता स्वतःच झाले आरोपी. बासरीवाल्याचं केलं कौतुक, केली त्याची सुटका. आनंदाची चाहूल दाखवून लावून गेला चटका… 

मूळ हिंदी कथा - सचिन कुमार जैन
मराठी रूपांतर - मंदार शिंदेShare/Bookmark