चार-पाच महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातल्या एका स्कूल टीचरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, शाळेमधे डान्स करताना…
मग त्यात काय एवढं, असं वाटत असेल तर हे वाक्य पुन्हा वाचा…
चार-पाच महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातल्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, शाळेमधे फिल्मी गाण्यांवर नाचताना…
आता त्रास झाला? शिक्षिका आणि नाच? फिल्मी गाण्यांवर? शाळेमधे? ज्ञानाचं पवित्र मंदिर, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, वगैरे वगैरे… आणि सस्पेन्ड! अर्थात, बातम्यांमधे तरी तसंच सांगितलंय की, संबंधित शिक्षिकेला या कृत्याबद्दल निलंबित करण्यात आलं… असो!
'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' नावाचा एक मराठी सारण भरलेला हिंदी सिनेमा रिलीज झालाय, हे किती लोकांना माहितीय? मिखिल मुसाले आणि परिंदा जोशी (भारी नाव आहे ना!) यांनी लिहिलेली एक सामाजिक सस्पेन्स थ्रिलर फिल्म… बरंचसं शूटींग पुण्यात झालंय, त्यामुळं पुण्यातले कॅफे, रस्ते, गल्ल्या, पाट्या, वगैरे बघायला मिळतात… निमरत कौर, राधिका मदान, सुमित व्यास, यांच्यासोबत आपला चिन्मय मांडलेकर, आपला सुबोध भावे, आपले शशांक शेंडे, आपले किरण करमरकर, आणि ‘आमची’ भाग्यश्री पटवर्धनसुद्धा आहे… स्टोरी, डायलॉग्ज, सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड स्कोअर, हे सगळं मस्त जमून आलंय…. पण अजून एक भारी गोष्ट म्हणजे, या सिनेमात ‘नाटक’सुद्धा आहे… असो!
पिक्चरची स्टोरी इथं सांगण्यात काही पॉइंट नाही… ‘अ’ ने ‘ब’ ला मारलं आणि ‘क’ ने ते शोधून काढलं, असं उलगडून काहीच सांगता येणार नाही… सगळं कॉम्प्लिकेटेड आहे, गुंतागुंतीचं आहे… बरं-वाईट, चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक, कायदेशीर-बेकायदेशीर, या संकल्पनांना आव्हान देणारा, या चौकटी तोडून-मोडून एक नवीनच वर्तुळ बनवणारा अनुभव असं या सिनेमाचं वर्णन करता येईल… सुरुवातीला आपण बाहेरुन यातल्या पात्रांच्या आयुष्यात डोकावायला लागतो, आणि शेवटी आपणच या वर्तुळाचा केंद्रबिंदू बनून परिघावर चालत राहिलेल्या या सगळ्यांकडं बघत राहतो… सगळे चालतायत, पण पोहोचणार कुणीच नाही… आपल्या इच्छा, कृती, आणि त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया, यांचा सतत विचार करत, भूतकाळाकडून चालायला सुरुवात तर केलीय, पण वर्तुळच असल्यानं भविष्याऐवजी पुन्हा भूतकाळाकडंच पावलं सरकत राहतात, असं शेवटी लक्षात येतं…
या सिनेमातला प्रत्येक सीन एक स्वतंत्र अनुभव आहे… आपल्या आत डोकावून बघायची संधी आहे… आपण त्या सिच्युएशनमधे कसे वागलो असतो, याचा विचार केल्यास त्रास आहे… विचार न केल्यास नुसताच पात्रांचा आणि घटनांचा भास आहे…
“स्टेजवरच्या कलाकारासाठी नाटकातला सगळ्यात भयंकर क्षण कुठला असेल, तर आता पडदा पडावा असं वाटत असताना पडदा न पडणं!”
असो! एखाद्या रहस्यकथेचं खरं यश कशात असतं माहितीये? रहस्याचा उलगडा झाला तरी कथा संपली नाही असं वाटण्यात… ‘अँड दे हॅप्पिली लिव्ह्ड एव्हर आफ्टर’ असं इथं वाटत नाही… ‘अँड दे रिमेइन्ड रेस्टलेस एव्हर आफ्टर’ असं म्हणता येईल फार तर…
'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' नक्की बघा… थिएटरला बघायला मिळाला तर तुम्ही नशिबवान; नाही तर ओटीटी, युट्युब, कुठंतरी येईलच, त्यावर डोळे ताणून बघू शकता… इथं लिहिलेल्या गोष्टींचे रेफरन्स सिनेमात मिळतीलच… नाही मिळाले तरी हरकत नाही… कदाचित तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल, सापडेल… डुबकी मारून तर बघा…
जाता जाता, थोडं नॉलेज शेअरिंग करतो… असंच, जनरल नॉलेज… ‘फाइव्ह स्टेजेस ऑफ ग्रीफ’बद्दल ऐकलंय का? एखादी अप्रिय, दुःखद घटना घडली तर त्यानंतर कुठल्या पाच टप्प्यांमधून आपण जातो, याबद्दलचं ‘क्युब्लर-रॉस ग्रीफ सायकल’ माहिती असावं, म्हणून सांगतोय… अर्थात, प्रत्येकजण या पाचही टप्प्यांमधून आणि तेसुद्धा त्याच क्रमानं जात असेलच असं अजिबात नाही… पण सर्वसाधारणपणे, नकार किंवा अस्वीकार (डिनायल), राग (अँगर), बार्गेनिंग (याला मराठीत काय म्हणतात, कुणास ठाऊक), नैराश्य (डिप्रेशन), आणि स्वीकार (ऍक्सेप्टन्स), असे दुःख सहन करायचे पाच टप्पे आहेत… आपण कुठल्या टप्प्यावर आहोत, त्याप्रमाणं आपल्या प्रतिक्रिया आणि कृती घडत असतात… त्या टप्प्यावर, त्या वेळी ती कृती, ती प्रतिक्रिया कदाचित योग्य असेल, समर्थनीय असेल; पण त्यातून बाहेर पडल्यावर आपल्यालाच ती योग्य वाटेल याची खात्री देता येईल का, माहिती नाही… असो!
सिनेमा बघा, गाणी ऐका, डान्स करा… तुम्ही शिक्षक असाल, पोलिस असाल, कलाकार असाल, किंवा आणखी कुणी… पण सगळ्यात आधी, त्या वर्तुळाच्या मध्यभागी एक माणूस आहे… त्याच्याकडं पण लक्ष द्या थोडं, जमलं तर…
मंदार शिंदे
०२/११/२०२३
No comments:
Post a Comment