आजपासून जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे १८९३ साली सौ. गोदावरीबाई पंडित यांनी लिहिलेल्या "पाकदर्पण" (महाराष्ट्रीय स्वयंपाकशास्त्र) पुस्तकाची प्रस्तावना इथे देत आहे. त्यावेळची भाषा, सामाजिक परिस्थिती, आणि इतर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. या पुस्तकातील पाककृतीदेखील माहितीपूर्ण आणि मजेदार आहेत...
"पाकदर्पण अथवा, महाराष्ट्रीय स्वयंपाकशास्त्र"अनेक शास्त्रीय माहितीवरून व प्रत्यक्ष अनुभवावरुन, सौ. गोदावरीबाई पंडित - नीतिदर्पण, प्रीतीचा मोबदला, रंगवल्लिका, पुराणयुक्ति रत्नमाला, वगैरे पुस्तकांची कर्त्री - यांनी तयार केले, ते पुणे पेठ बुधवार येथे भाऊ गोविंद सापकर यांणी आपले 'ज्ञानचक्षू' छापखान्यात छापून प्रसिद्ध केले.सन १८९३ डिसेंबर.
प्रस्तावना
आपल्या देशांत अलीकडे दिवसेंदिवस प्रजा अशक्त होत चालली, अशी हाकाटी मात्र सर्वत्र समंजस मनुष्यांच्या तोंडून ऐकण्यांत येत आहे, पण त्याच्या परिहारार्थ यत्न मात्र कोणाकडून यथातथ्य होत असल्याचे पाहण्यांत येत नाही!! ही किती सखेदाश्चर्याची गोष्ट आहे? चालू मन्वंतरांत तर असे आहे की, अन्नमय प्राण, आणि प्राणमय पराक्रम आहे! माझी समजूत तर अशी आहे की, प्रजा अशक्त होण्यास आणखी काही कारणे हल्लीच्या काळांत असतील, पण त्यांस खावयास अन्न जे मिळते, ते मिळावे तसे म्हणजे यथा प्रकारयुक्त तयार झालेले मिळत नाही हेंही पण एक कारण प्रधान आहे; याविषयी तिळमात्र शंका नाही.
या माझ्या म्हणण्यास विरुद्ध मतेंही पडण्याचा संभव आहे. तथापि सूक्ष्म विचारी आणि दूरदर्शी लोक ही गोष्ट निर्भ्रांतपणे कबूल करतील, अशी माझी खात्री आहे. शरीरप्रकृतीस आरोग्य असणे, हुशारी असणे, बुद्धि तीव्र राहणे, अंतःकरण आनंदी व स्थीर असणे, ह्या सर्व गोष्टी खरोखर चांगल्या अन्नावर बहुतेक अंशी अवलंबून आहेत; अशी वैद्यशास्त्राची, विद्वान् वैद्यांची आणि शारीरशास्त्रसंपन्न डाक्तरांची मते आहेत; मग माझे ह्मणणें खोटे कसें होईल? सारांश चांगले, यथाप्रकार तयार केलेले, स्वच्छ, आणि ताजे अन्न हें संपूर्ण आरोग्याचे, समाधानाचे व आनंदाचे माहेर घर आहे. म्हणून असे अन्न अलीकडील प्रजेस मिळण्याची समृद्धि झाल्यास मोठा नफा होणार आहे हे वेगळे सांगणे नको.
मग असे अन्न अलीकडील काळांत कोणासही मिळत नाहीं की काय? आणि म्हणून प्रजा अशक्त होत चालली की काय? असे प्रश्न सहजच कोणाच्या मनांत उत्पन्न होणार आहेत. परंतु या प्रश्नांची उत्तरें अशी आहेत की, चांगले अन्न कोणास मिळत नसेल, असे माझे म्हणणे नाहीं; ईश्वरकृपेने तें सर्वांस चांगले आणि विपुल मिळावे, अशीच माझी इच्छा आहे. तथापि तें स्वादिष्ट, रसभरित, आणि क्रियाशुद्ध मिळत गेल्यास उत्तम, असें माझें आग्रहपूर्वक म्हणणे आहे. याविषयी मात्र समंजस लोक विचार करतील अशी माझी आशा आहे. आपल्या लोकांत शंभर घरात पाहिले, तर पांच घरचा स्वयंपाक देखील स्वादिष्ट, यथाशास्त्ररीत्या तयार केलेला, रसभरित आणि खाल्ल्याबरोबर दुखणेकऱ्यासही उत्साह व बल देणारा असा सांपडेल की नाही हा संशयच आहे. उदाहरणार्थ पहा की, ज्या दिवशी प्रसंगवशात आपणास खाणावळीत जाऊन जेवण्याचा प्रसंग येतो, त्या दिवशी आपल्या मानसिक वृत्तीचे धर्म किती आनंदांत, समाधानांत आणि तरतरीतपणांत असतात, आणि ज्या दिवशी आपण आपल्या घरीं, स्वच्छ जागेत, स्वच्छ पात्रांत, आणि आपल्या स्वच्छ व प्रिय मनुष्यांच्या हातचे अन्न भक्षण करितों, त्या दिवशी आपली वृत्ति किती प्रसन्नतेत आणि आनंदोत्सहांत असते!
वर हे जे मी उदाहरण लिहिले आहे, त्याचा अनुभव बहुतेक माझ्या प्रिय देशबांधवांस आणि भगिनींस असेलच. म्हणून माझ्या सांगण्याचा सखोल अर्थ अशांच्या ध्यानात येण्यास उशीर लागणार नाही. परंतु नेहमी जे गलिच्छ खाणावळीतच फुक्का झोडून मिटक्या मारीत बसणारे त्यांना मात्र हे माझे उदाहरण मुळीच लागू पडणार नाही हे उघड आहे. असो. सांगण्यांचे तात्पर्य इतकेंच की, चांगले, स्वादिष्ट, यथाशास्त्र केलेले, आणि ताजे असे अन्न हें बल, बुद्धि, पराक्रम, आनंद यांस देणारे असून मुख्यत्वे सुस्वरूप व सबल अशी प्रजा उत्पन्न करणारें आहे, हे सर्वानी ध्यानांत ठेवून स्वशक्त्यनुसार होईल तितके करून असे अन्न सेवन करण्याची नित्य खबरदारी ठेवावी, म्हणजे स्वताचे शरीरास आरोग्याची आणि सुखाची समृद्धि होऊन आपले आयुष्य, बल, पराक्रम, बुद्धी, विद्या, शौर्य यांची वाढ होईल. आणि प्रजाही सशक्त अशी होईल.
आपल्या देशात चांगल्या अन्नाची ईश्वरकृपेने समृद्धि आहे; पण ते यथाप्रकार तयार करण्याची कला मात्र लोपल्यासारखी झाली आहे, ही दुःखाची गोष्ट होय. सुमारे पांच हजार वर्षांपूर्वी ही कला भरतखंडांत चांगली जागृत होती, अशी माहिती मिळते. त्या अलीकडे उत्तरोत्तर ही कला नीच वर्गात मोडत जाऊन ऱ्हास पावत गेली!! वस्तुतः ही कला नीच नाहीं, सर्व कलेचे आदिपीठ ही कला असून केवळ प्राणदाती अशी आहे. तथापि साडेसातीचा फेरा या कलेस शेवटी येऊन पोचला. आणि ती नीच लोकांच्या हाती जाऊन निंद्य होऊन बसली!!
पूर्वी मोठमोठे विद्वान, पराक्रमी, शूर, श्रीमान अशा लोकांस देखील बहुतेक ही कला अवगत होती. 'पुण्यश्लोक नृपावलीत पहिला' असा जो महा पराक्रमी आणि पुण्यशील राजा 'नल' निषध देशाधिपति तो देखील या पाककलेत अतिशय निपुण होता असे इतिहासावरून समजते. त्याचप्रमाणे इतर राजेही जेव्हां महा अरण्यांतून शिकारीस जात असत, तेव्हां मृगमांसादि अन्न तयार करून किंवा कंदमूलादि अन्न स्वहस्तानेच तयार करून ते खात असत. अशी उदाहरणे शेकडो सांपडतात. पांडवांपैकी मोठा बलवान जो भीम तो तर या कलेत मोठा प्रोफेसर होता. मच्छ देशाधिपति राजा विराट, याच्या घरी पांडव अज्ञातवासात असतां विराट राजाच्या येथील सर्व पाकनिष्पत्ति करण्यावर भीम हा आचार्य म्ह. नायक होता. अर्थात तो पाककलेत मोठा निपुण असावा, हे तर उघडच आहे. फार कशाला अजून देखील आपल्या देशी प्रचारांत म्हण अशी आहे की, स्वयंपाक मोठा सणसणीत म्हणजे तिखटमिठाने व तेलादिकांनी परिपूरित व बराच खमंग असला म्हणजे त्यास 'भीमपाक' असे म्हणण्याचा परिपाठ आहे. आणि स्वयंपाक मधुर, स्वादिष्ट, आणि रसभरीत असला म्हणजे त्यास 'नलपाक' अशी संज्ञा मिळते.
इतक्यावरून सारांश एवढाच घ्यावयाचा की, पूर्वी मोठमोठे थोर पुरुष देखील या कलेत निष्णात असत. आणि आतां पाककला मोठी निंद्य मानली जात आहे, ही किती सखेदाश्चर्याची गोष्ट होय! ज्या लोकांस व्यवहारिक विद्यांपैकी कोणतीच दुसरी श्रेष्ठ विद्या, व कला अवगत नाहीं, ज्यांचे ठिकाणी दुसरें काहीच सद्गुण वसत नाहीत, जे व्यसनी, हलकट, भांग्ये आणि गलिच्छ लोक, अशा लोकांच्या हातांत प्रस्तूत ही कला थोडीबहुत दृष्टीस पडते, परंतु काय उपयोग! अशा लोकांच्या संगतीने उलट या श्रेष्ठ कलेचे महत्व मात्र उतरून जाऊन तिची दैना मात्र अधिकाधिक होत चालली आहे.
अलीकडे हजार पांचशे वर्षापासून याप्रमाणें या कलेचा आमच्या श्रेष्ठ पुरुषवर्गास अतिशय तिटकारा येऊन तिला निंद्य ठरवून, तिला पत्करील तो केवळ हतवीर्य असे आपले मत ठोकून देऊन तिला बिचारीला आम्हा बायकांच्या गळ्यांत केवळ अडकावून दिली आहे! केवळ ती वंशपरंपरा आम्हा बायकांसच अगदी बक्षीसपत्र करून दिली आहे. स्वयंपाक म्हणजे केवळ बायकांचेच कर्तव्य कर्म!! पुरुषांनी, त्यांत श्रेष्ठ पुरुषांनी या कामाला अगदी स्पर्शही करु नये!! असें ठरले. चिंता नाही. तेव्हा आम्ही तिचा स्वीकार आनंदाने केला पाहिजे, हे स्पष्ट ठरले! कारण श्रेष्ठ पुरुष वर्गास इतर दुसरी कामे महत्वाची आणि देशहिताची अशी पराक्रमयुक्त करणे आहेत म्हणून! पण तशींही कांही कामे अलीकडे (सुमारे एक शतकांत) त्यांच्याकडून झाल्याची उदाहरणे अद्याप दिसण्यात आलेली नाहीत. मग अजून पुढे त्यांना कांही पराक्रम करून दाखविणे असेल तर मात्र कोण जाणे!! कसेही असो. पाककला ही आम्हा बायकांची खास झाली, त्यात मात्र काही शंका नाही. कारण आता आम्ही ती श्रेष्ठ पुरुष वर्गास परत घ्या म्हणावयास गेलो, तर आतां ते (पुरुष) हजार पांचशें वर्षांची वहिवाट पुढे आणून तक्रार करण्यास उभे राहतील हे उघडच आहे.
असो. या प्रमाणे ही पाककला बायकांकडे तर आली. परंतु तिची स्थिती असावी तशी अजून काही आली नाही. ती बरीच स्थित्यंतर धावून आली. म्हणून तिला यथाशक्ती सर्वानीं त्यांत विशेषेकरून आम्ही बायकांनी सुधारली पाहिजे हे नि:संशय आहे. तेव्हां आता ही कला सुधारण्यास शास्त्रयुक पुस्तकें पाहिजेत, हे उघड आहे. पण ती असावी तितकी, आणि असावी त्या रीतीची मुळीच उपलब्ध नाहीत. अलीकडे दहापांच वर्षात कोंठे एक दोन सूपशास्त्राची पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत असे ऐकते, पण तीही असावी तशी पद्धतवार, लहान मुलींस शिकण्यास उपयोगी पदार्थांची गुणदोषदर्शक आणि पूर्ण माहितीने भरलेली अशी मुळीच नाहीत हे शोधा अंती समजून आले. तेव्हां ही अडचण दूर होऊन माझ्या प्रिय देशभगिनींस प्रस्तुतचे काळी उपयोगी होईल व प्रसंगवशात् देशबंधूंसही उपयोग करता येईल, असे एखादें सूपशास्त्रावर पुस्तक तयार करावे असा हेतु माझ्या मनांत उद्भवला! पण नुस्ता हेतु उद्भावून काय उपयोग? पुस्तक प्रसिद्ध होण्यास बाकीची साधने कशी मिळतील, ही काळजी पुढे येऊन मूर्तिमंत उभी राहिली, तेव्हां अर्थातच मनांतील हेतु मनांतच ठेवून हातपाय आवरून स्वस्थ बसावे लागले.
इतक्यांत जगदीशकृपेने असा काही योग घडून आला की, त्यामुळे हे पाकदर्पण पुस्तक सहजच लिहून तयार करण्यास अनायासेच मला उत्तेजन मिळाले. श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड यांनां ईशेच्छेनें या जीर्ण झालेल्या पाककलेचा जीर्णोद्धार करावा अशी उत्कटेच्छा प्राप्त होऊन त्यांणी या कामास लागलाच आरंभ करविला. आणि तंजावरप्रांती, मद्रासप्रांती व यवन वगैरे अन्य लोकांत पाकनिष्पत्ति कशी करतात या विषयींची योग्य माहिती मिळवून त्यासंबंधाने दोन तीन भागांची पुस्तके छापून प्रसिद्ध केली.
वास्तविक पाहतां महाराजांचा हा उपकार साऱ्या आमच्या देशावर झाला यांत संशय नाही. या पुस्तकांच्या योगाने महाराजांचा मजवर तर मोठाच अनुग्रह झाला. कारण लागलींच मला- महाराष्ट्रीय लोकांच्या उपयोगी होईल, असे हे पाकदर्पण नामक पुस्तक लिहून ते श्रीमंत सरकार महाराजांस अर्पण करण्याविषयी पूर्ण उत्तेजन आले. आसो. वाचकहो याप्रमाणे या पुस्तकाची मूळपीठिका आहे, ती तुह्मांस सादर केली. आतां माझी स्वतांची थोडी हकीकत येथे देऊन हा बराच लांबलेला प्रस्तावनालेख आटोपून घेते.
'नीतिदर्पण', 'रंगवल्लिका' वगैरे दोन चार पुस्तके मजकडून तयार होऊन प्रसिद्ध झाल्यानंतर कित्येक माझ्या हितचिंतक बांधवांस व भगिनींस अशी जिज्ञासा झाली की, माझी स्वतांची थोडी हकीकत (आत्मचरित्र) मी कोणत्या तरी एखाद्या पुस्तकांत प्रसिद्ध करून सर्वास कळवावी. याचप्रमाणे ज्ञानप्रकाशासारख्या वजनदार पत्रकारांनीही अशाच सूचना केल्या होत्या. या सर्व सूचनांविषयी विचार करण्यास- पाकदर्पण पुस्तकांत ही मला योग्य संधि मिळाली, म्हणून मी ईश्वराचे अत्यंत आभार मानते.
वाचकहो, माझे जन्म पुणेजिल्ह्यांत इंदापूर नांवें जो एक तालुका प्रसिद्ध आहे, तेथें म्हणजे इंदापूर गावात एका कुलीन भिक्षुक घराण्यांत झालें. आई लहानपणीच निवर्तली. लहानपणात शाळेत वगैरे जाऊन शिक्षण मिळवण्याची सोय नव्हती. घरांतील चालीरीती जुन्या वळणाच्या; त्यांतही भिक्षुकीवृत्ति! मग अशा ठिकाणी बायकांस शिक्षणाचे नाव स्वप्नात तरी कशाला येईल! अकरावे वर्षी पुण्यातील एका वीस वर्षांच्या सुशिक्षित वराशी माझे लग्न झाले. पुढे संसार समजू लागल्या पासून विद्वान् व सुशिक्षित प्रियपतीच्या सहवासांत येऊन तेव्हापासून त्यांच्याच सहचर्येमध्यें सुशिक्षण मिळत गेले, आणि अभ्यासाची व योग्यतेची मजल सध्या तुम्ही जाणता आहां येथपर्यंत येऊन पोचली. सारांश विद्वान, सुशील, आणि निर्मळ अंतःकरणाच्या प्रिय पतीच्या सहवासाने स्त्रियांस कोणते सुख प्राप्त होणार नाहीं बरे? सुशिक्षणादि सर्व ऐहिक सुखे प्राप्त होतील यांत काही मोठेंसें आश्चर्य नाहीं; परंतु अशा प्रकारच्या सशास्त्र व सुखरूप संसारिक आचरणापासून जगदीशही प्रसन्न होऊं शकेल यांत संशय नाही. अशा प्रकारच्या भावनेने व निष्ठेने परलोकही माझा सुखाचा होईल अशी मला उमेद आहे.
सुजन बंधूभगिनींनो, प्रस्तुत आमचा संसार मध्यम स्थितीत आहे; पण अत्यंत सुखाचा आहे. मोठ्या श्रीमंत संसाऱ्यास काही तरी तळमळ असेल, पण आम्हास ईशकृपेने पूर्ण समाधान आहे. कारण विद्या, ऐक्य आणि प्रीति ही ज्या दंपत्यात आहेत, ते दंपत्य पूर्ण सुखी अशी माझी समजूत असून तशीच स्थिती आमची आहे ती देहावसानापर्यंत अशीच कायम राहो, हीच प्रार्थना त्या सर्वचालक प्रभुजवळ आहे.
माझ्या उदाहरणावरून इतके घेतां येईल की, स्त्रियांस विद्येचे शिक्षण तर अवश्य पाहिजेच, नको म्हणणार्याची बुद्धि अपाक होय. मात्र हे शिक्षण लहानपणी घरी सुशिक्षित आईबापांकडून अथवा शाळेत; व वयात आल्यावर त्यांच्या प्रियपती कडून मिळण्याची तजवीज असावी. म्हणजे अशा व्यवस्थेने मर्यादेचे व स्वधर्माचे उल्लंघन न होतां पुढे त्यांचा संसार सुखरुप होईल. वयांत आलेल्या मुली आपल्या शिक्षणाच्या निमित्ताने माहेरघर किंवा सासरघर सोडून अन्यस्थळी जाणे रीतीस निंद्य आहे.
असो. मला समजू लागल्यापासून पुढे नऊ दहा वर्षांतच माझी योग्यता विद्वान स्त्रियांत गणण्या सारखी झाली. पण लोकापवादामुळें मी आपले शिक्षण झाकून ठेवण्याचा यत्न करीत असे. स्नान केल्यावर नेमाधर्माची पोथी वाचणे झाल्यासही मी ती चोरून व हळू वाचीत असे. कारण शेजारी पाजारी नावें ठेवतील हे भय! शेवटी ही गोष्ट फार दिवस झाकून न राहतां गांवभर समजली. मग लोकचर्चाही सुरू झाली!! ज्या बायकांस लिहिणे वाचणें येत नव्हते, अशांनी तर माझा मोठा तिरस्कार करावा. कारण त्यांच्या सारखी मी अक्षरशून्य नाहीं म्हणून! कित्येक स्त्रियांस माझा अभ्यास पाहून इर्षाही उत्पन्न होऊन त्या आपल्या घरी आपल्या घरांतील माणसांजवळ दिव्याशी पुटपुट करीत बसू लागल्या. तथापि कांही येईना, म्हणून शेवटी माझी निदाहीं करू लागल्या.
कमधर्मसंयोगें अशा समयास माझे 'रंगवल्लिका' नामक रांगोळीचे पुस्तक छापून बाहेर प्रसिद्ध झाले. तेव्हां तर आमच्या कित्येक इष्टमित्रांस मोठाच आचंबा वाटून ते आंतून आमची निंदा व द्वेष करूं लागले. पुढे मुंबईतील उपयुक्त ग्रंथप्रसारक मंडळीनी मी लिहिलेली कादंबरी 'प्रीतीचा मोबदला' नामक प्रसिद्ध केली! तेव्हां तर मजवर लोकचर्चेच्या पुष्पांजुळींचा अतिशय वर्षाव झाला. तथापि अशा समयीही कित्येक नि:सिम साधुजनांनी व खऱ्या आणि थोर अंतःकरणाच्या बंधूभगिनींनी आणि कित्येक थोर वर्तमानपत्रांच्या लेखकांनी उत्तेजनपर लेख लिहून यथाप्रकारे माझी स्तुति लिहून विरुद्ध पक्षवाल्यांची षोडशोपचारे पादप्रक्षालनपूजा बरीच केली. आणि माझे अंतःकरणांतील हा देशसेवेचा उल्हास कमी होऊ न देतां जास्त वृद्धिंगत केला. कित्येक करुणहृदय प्रिय बंधूंनी तर तशा वेळी मजवर एखाद्या देवीप्रमाणे कविता रचून मला प्रोत्साहन दिले. अशांचे उपकार मजवर फार झाले आहेत, हे निराळे सांगणे नको.
पुढे 'नीतिदर्पण' नांवाचें चवथें पुस्तक लिहून ते श्रीमंत सरकार गायकवाड यांजकडे पहाण्यास पाठविले असता त्यांस ते मनापासून आवडले. आणि त्यांनी पूर्ण साह्य देऊन ते छापून प्रसिद्ध ही करविलें. तात्पर्य, अशा रीतीने मी भीतभीत ग्रंथकर्त्री या नांवाने आतां प्रसिद्ध झाले आहे. हे 'पाकदर्पण' पुस्तक माझी पांचवी हस्तकृति होय. सूज्ञांच्या लक्षांत येईल. मला शिक्षण मिळाले आहे, म्हणून मी कोणत्याही रीतीनें धर्ममर्यादेच्या बाहेर किंवा गृहमर्यादेच्या बाहेर गेले आहे, असे मुळीच नाही. उलट सौख्यरूप संसारात अधिक विश्रांति पावत आहे. इतके सांगून माझा कित्ता इतर माझ्या देशभगिनींस कळविण्यास उपदेश करून हा लेख पूर्ण करिते.
मुक्काम सोलापूर, सदर बाजार,
तारीख १ डिसेंबर सन १८९३ इ.