ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, October 24, 2012

मुलांच्या हक्काची 'सावली'


नितेश बनसोडे हा तरुण अहमदनगरमध्ये अनाथ, निराधार मुलांसाठी 'सावली बालसदन' चालवतो. 'बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे,' हे त्याचं ब्रीद आहे. मी जर बदल करू शकलो तरच सर्वजण बदल करायला तयार होतील, असं तो मानतो. लहानपणापासून नितेश फक्‍त विचार करायचा - समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे, समाज बदलला पाहिजे, गुंडगिरी संपली पाहिजे, वगैरे वगैरे. पण हे कसं होणार, कोण करणार ते कळत नव्हतं. आपण काय करू शकतो, हेही कळायचं नाही तेव्हा. फक्‍त काहीतरी केलं पाहिजे एवढंच कळायचं.

लहानपणीच आई हे जग सोडून गेली. अनाथपणाच्या वेदना स्वतः सोसत मोठा झाला. 'मी बदल करायला हवा' या भावनेतून, २००१ साली कॉलेजमध्ये शिकताना विचार केला - अनाथ मुलांची स्वप्‍नं पूर्ण करण्यासाठी काम करायचं! नुसत्या चर्चा करून काहीही बदलणार नाही, हे जसं लक्षात आलं, तसं स्वतःहून कामाला लागला. महाराष्ट्राच्या अहमदनगर शहरात जेव्हा काम सुरु केलं तेव्हा सोबत काहीही नव्हतं - ना मित्र, ना संस्था, ना टीम, ना इन्फ्रास्ट्रक्चर. फायदा मिळवून देणारी जात नव्हती, प्रसिद्धीचं वलय नव्हतं, राजकीय संबंध नव्हते, सेवादल-आरएसएस सारख्या संघटनांशीही संबंधित नव्हता - एकटा होता. घरातून मिळालेल्या तुटपुंज्या रकमेतून एवढं मोठं स्वप्‍न कसं पूर्ण करायचं, हा प्रश्न त्यावेळी पडला. पण आपली भारतीय संस्कृती म्हणते ना - 'आपल्या घासातला घास दुसर्‍याला भरवायचा.' २००१ मध्ये अहमदनगरला महिना सव्वादोनशे रुपये भाडं देऊन एक खोली घेतली आणि तीन अनाथ मुलांना घेऊन कामाची सुरुवात केली. पुढचा प्रवास अतिशय अडचणींचा आणि खडतर आहे, याची जाणीव होतीच.

आसपासच्या भागातील काही प्रस्थापित संस्थांशी संपर्क साधला, मदत आणि मार्गदर्शनाच्या अपेक्षेतून. परंतु वलयांकीत संस्थांकडून मदत सोडाच, माहितीही मिळू शकली नाही. शहरातील धनवान लोकांना भेटून या कार्याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं, 'आधी तू स्वतः खूप पैसे कमवून श्रीमंत हो आणि मग अनाथ मुलांना सांभाळ.' अशा अनुभवांनी मन खच्ची व्हायचं. पण आतला आवाज पुन्हा पुन्हा ऐकू यायचा - 'मला हे सगळं करायचंय आणि मीच हे करणार आहे!' मग मनात विचार आला, जर या क्षणी माझा मृत्यू झाला तर काय होईल? मग कुठला पैसा, कुठली श्रीमंती, कुठली स्वप्‍नं, आणि कुठल्या समस्या? आणि मग कळून चुकलं की, आयुष्यातली सर्वात मोठी समस्या 'मृत्यू' हीच आहे. त्याच्याआधी येणार्‍या समस्या खूपच छोट्या आहेत. या विचारानं मनाला पुन्हा उभारी आली आणि त्या तीन अनाथ, निराधार मुलांसाठी काम चालू ठेवलं. स्वतः जेवण बनवायचं, मुलांना खाऊ घालायचं, आणि दुपारी कॉलेजला जायचं, संध्याकाळी परत येऊन संस्कार वर्ग चालवायचे, असं काम चालू राहिलं. २००३ पर्यंत अशाच पद्धतीनं रोजच्या भाकरीचा प्रश्न सोडवत काम चालू ठेवलं.

२००४ साली एक अनपेक्षित वळण मिळालं. काही स्‍नेह्यांच्या मदतीनं वीस मुलांना रायगड-दर्शनाला नेलं होतं. खिशात फक्‍त वीस रुपये होते, ज्यातून सगळ्या मुलांसाठी पाणीसुद्धा विकत नसतं मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत या अनाथ मुलांना घेऊन प्रवेश केला. ज्या राजानं साडेतीनशे वर्षांपूर्वी 'आपल्या' माणसांसाठी स्वराज्य उभं केलं, त्या राजाच्या राजधानीत या निष्पाप मुलांना प्यायला पाणीसुद्धा मिळणं किती अवघड आहे, याची जाणीव होऊन मन विषण्ण झालं. आजूबाजूला सधन पर्यटकही होते आणि ही निर्धन मुलंही होती. समाजातील विषमतेचं मूर्तिमंत दर्शन होऊन नितेश निराश झाला. पण हीच आपली परीक्षेची वेळ आहे, आता खचून चालणार नाही, असाही विचार आला. सोबत असलेली ही वीस मुलं अनाथ आहेत आणि एवढ्या तरुण वयात हा या निराधार मुलांचा सांभाळ करतोय, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. कुणाला सांगून हा विश्वास मिळवण्यापेक्षा, लोक जेव्हा स्वतः बघतील तेव्हाच विश्वास ठेवतील, हेही पटलं.

आणि खरोखर तो काम करत गेला, लोकांचा विश्वास बसत गेला. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली. तीन मुलांपासून सुरु केलेलं काम आधी वीस आणि आता पन्नास मुला-मुलींपर्यंत वाढलं. ज्यांना आई-वडील नाहीत किंवा एकटी निराधार आई सांभाळ करु शकत नाही, अशा पंचवीस मुली 'सावली'मध्ये दहा वर्षांपासून अगदी आनंदानं राहतायत. त्यापैकी काही बारावी झाल्या, काही दहावीला आहेत. काही मुलं 'आयटीआय'ला शिकतात. या सगळ्या मुला-मुलींना एक घरासारखं वातावरण दिलंय. हेच स्वप्‍न घेऊन कामाला सुरुवात केली होती - अनाथ मुलांना हक्काचं घर द्यायचं. 'सावली' हे या मुलांचं स्वतःचं घर आहे. या घरात त्यांना कसलीही आडकाठी नाही. संस्थेचं, अनाथाश्रमाचं स्वरुप न देता, स्वतःच्या घराचं वातावरण बनवण्यात यश आलं, जिथं मुलं अगदी आनंदानं बागडतात. या घराला भेट देणार्‍यांना देखील हे वातावरण खूप भावलं. इथं येणारे पाहुणे स्वतः गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातले होते. पण ही घासातला घास देणारी माणसं होती. आणि ह्याच भावनेतून गेली दहा वर्षं 'सावली'च्या स्‍नेह्यांनी इथल्या मुलांची पोटं भरली.

असं असलं तरी रोजचा भाकरीचा प्रश्न सुटला असं म्हणता येणार नाही. रोज सकाळी उठलं की पहिला विचार हाच असतो - आज मुलांच्या जेवणाची सोय कशी करायची? हे घर कसं चालवायचं? लाईटची, फोनची बिलं कुठून भरायची? आपण आपल्या स्वप्‍नासाठी काम करतोय, पण इतर लोक जे इथं काम करतात त्यांच्याही गरजा असतात. त्यांना कामाचा मोबदला, मानधन कुठून द्यायचं? या सगळ्या गोष्टींच्या विचारांमध्ये खूप वेळ जातो आणि लवकर शीण येतो. आणि मग आपल्या मुलांशी बोलायलासुद्धा वेळ मिळत नाही. आठवड्यातून थोडाफार वेळ ठरवून मुलांशी गप्पा मारतो. त्या गप्पांमधून, संवादातून मुलं उमलतात. हा संवादच मुलांचं 'सावली'शी नातं टिकवून ठेवतो. अभिमानाची गोष्ट आहे की, आजतागायत या घरातून एकही मूल पळून गेलेलं नाही. एकाही मुलाला किंवा मुलीला इथं परकं, निराधार वाटलेलं नाही. 'सावली'च्या ऑफीसलाही कुलुप नाही आणि स्वयंपाकघरातही प्रवेश-बंदी नाही. मुलं हवं तेव्हा स्वयंपाकघरात जातात, हवं ते हातानं घेऊन खातात. इतकंच नाही तर स्वतः स्वयंपाकात मदत करून एकमेकांना जेवायलाही वाढतात.

एक गोष्ट मुलांना आवर्जून शिकवली - कधीही लाचार व्हायचं नाही. स्वाभिमानानं जगायचं. आपल्याला आई-वडील नाहीत, हा भूतकाळ झाला. आज आपण सशक्‍त आहोत. केवळ आई-वडील नाहीत ही गोष्ट सोडली तर आपण कुठल्याही अर्थानं आज अनाथ राहिलेलो नाही. समाजानं अनाथपणाचा शिक्का मारल्यानं अशा मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. अनाथाश्रमांमध्ये त्यांना आश्रितासारखं, उपर्‍यासारखं वाटतं. त्यामुळं 'सावली'मध्ये स्वतःच्या घरासारखंच वातावरण ठेवण्याची धडपड केली जाते.

आज आजूबाजूला नजर टाकली तर अशा अनेक संस्था कार्यरत दिसतील. आपापल्या परीने प्रत्येकजण प्रयत्‍न करतोय बदल घडवण्याचा, काहीतरी करण्याचा. परंतु प्रत्येकाला आवश्यक तेवढी मदत किंवा पाठबळ मिळेलच असं नाही. जगण्याच्या लढाईत या मुलांना जिंकून द्यायचा प्रयत्‍न नितेश करतोच आहे, पण आता पुढची स्वप्‍नं आणखी मोठी आहेत. या मुलांपैकी काहींना कलेक्टर व्हायचंय, कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर, तर कुणाला पोलिस... या सगळ्या मुलांची स्वप्‍नं पूर्ण करायची आहेत आणि आदर्श भारताचे आदर्श नागरिक या मुलांमधून घडवायचे आहेत. एक आदर्श सावली उभी करायची आहे - जसं एखादा माणूस कितीही अस्वस्थ, त्रासलेला असला तरी एखाद्या झाडाच्या सावलीत गेल्यावर शांत आणि प्रसन्न होतो, तसंच ह्या 'सावली'त येणार्‍या प्रत्येकाला शांत आणि प्रसन्न वाटावं, अशी प्रार्थना तो  मनापासून करतो.

नितेशला आधी असं वाटायचं की, आपण 'सावली'तल्या मुलांसाठीच काम करतोय. पण हळूहळू लक्षात आलं की, हे काम त्याहून मोठं आहे. ही अनाथ, निराधार मुलं किती सहज वाईट मार्गाला लागू शकली असती. व्यसनाधिनता आणि गुंडगिरीमुळं किती सहज समाजाला त्रासदायक आणि नकोशी ठरली असती. या मुलांना वाईट मार्गावर जाण्यापासून रोखण्याचं काम 'सावली'नं केलंय. काही संभाव्य गुन्हेगार व समाजकंटकांपासून समाजाला वाचवलंय, असंही म्हणायला हरकत नाही. या कामाचा खरा फायदा संपूर्ण समाजाला होतोय. समाजातील लोकांनी प्रेरणा घ्यावी असंच या मुला-मुलींचं यशस्वी जीवन आहे. समाजातील सुखवस्तू कुटुंबातून मुलं इथं येतात आणि बघतात, कशी ही पन्नास मुलं छान, गुण्यागोविंदानं राहतात. हीच मुलं शिव्या देऊन बोलायची, हीच मुलं चोर्‍या करायची, हीच मुलं मारामारी करायची, हीच मुलं म्हणायची की, आम्ही खून करू... 'सावली'त येऊन या सवयी, ही हिंसकता हळूहळू कमी झाली. एकदाही छडी न उगारता, मार न देता या मुलांमध्ये परिवर्तन घडून आलं.

सुरुवातीला दहा बाय दहा च्या जागेतही सारे आनंदानं रहायचे. पण मुलांच्या गरजा ओळखून नितेशनं मदतीचं आवाहन केलं. एका पुरस्काराच्या रकमेतून 'सावली'साठी जागा विकत घेतली. काही सुहृदांनी मदत केली. एक-एक वीट गोळा करत मुलांसाठी मोठं घर बांधलं. मुलांना बागडायला जेवढी प्रशस्त जागा मिळेल, तेवढीच त्यांची मनंही विशाल होतील, या भावनेतून शंभर स्क्वेअर फुटापासून दोन हजार स्क्वेअर फुटांपर्यंत विस्तार केला. आता अजून मोठं स्वप्‍न बघितलंय - पाच एकर जागेचं. इतकी जागा की जिथं मुलांची स्वप्‍नं पूर्ण करणारी सगळी साधनं असतील, शाळा असेल, मैदान असेल, वाचनालय असेल, प्रयोगशाळा असेल, आणखी बरंच काही असेल... पण अजून तरी हे स्वप्‍न स्वप्‍नच आहे. ते सत्यात उतरवण्यासाठी समाजाकडून मदत मिळणं आवश्यक आहे. आणि ती मिळेल यावर विश्वासही आहे!

संपर्कः नितेश बनसोडे, 'सावली बालसदन', अहमदनगर. फोनः ९८९०९६९३१५Share/Bookmark

Thursday, October 11, 2012

मृत्युपत्र - काळाची गरज


('रोटरी क्लब ऑफ पुणे धायरी'तर्फे दि.६ ऑक्टोबर २०१२ रोजी 'मृत्युपत्र' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या अ‍ॅड. डॉ. सुनिल गोखले यांच्या व्याख्यानाचा सारांश)

'मृत्युपत्र' या शब्दाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात एक प्रकारची भीती तयार झालेली आहे. मृत्युपत्र बनवायचं म्हणजे मृत्यु जवळ आला, असंच समीकरण जणू लोकांच्या मनात तयार झालेलं दिसतं. मृत्युपत्राला इंग्रजीतील 'विल' या शब्दानुसार 'इच्छापत्र' असंही म्हणतात.

आपण आयुष्यभर कष्ट करून पै-पै जोडत असतो. मिळालेल्या पैशातून आपण काही वस्तू खरेदी करत असतो. स्थावर म्हणजे जमिन-जुमला, घर, आणि जंगम म्हणजे सोनं-नाणं, बँकेतल्या ठेवी, वगैरे विविध प्रकारची संपत्ती आपण कमवलेली असते. आपण कमवलेला पैसा किंवा पैशांचं वस्तूंमध्ये केलेलं रुपांतर, ही सगळी आपली स्वतःची संपत्ती असते. आपल्या मृत्युपश्‍चात, आपली ही संपत्ती योग्य व लायक वारसास मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण हयात असतानाच आपल्या संपत्तीच्या हस्तांतरणाचं योग्य नियोजन करून ठेवल्यास, पुढच्या पिढीसमोरील अनावश्यक गोंधळ आणि आपल्या संपत्तीची संभाव्य वाताहात टाळता येते. म्हणूनच, योग्य पद्धतीनं मृत्युपत्र करून ठेवणं ही एक अत्यावश्यक बाब बनली आहे.

मृत्युपत्र कसं लिहायचं?

(१) आपल्या मृत्युपश्‍चात आपली संपत्ती कोणाला द्यायची हा निर्णय घेण्यापूर्वी, आपली नेमकी किती आणि काय संपत्ती आहे, हे ठरवावं लागेल. त्यासाठी, आपल्या एकूण संपत्तीची सर्वप्रथम यादी तयार केली पाहिजे. आपल्याला आठवणार्‍या सर्व स्थावर, जंगम, बौद्धिक संपत्तीचा तपशील लिहून काढणं ही इच्छापत्र बनवण्याची पहिली पायरी म्हणता येईल.
(२) एकदा सर्व प्रकारच्या संपत्तीची यादी तयार झाली की, त्यातल्या प्रत्येक वस्तूचा "मी कायदेशीर किंवा अधिकृत मालक आहे का?" हे स्वतःला विचारलं पाहिजे. यादीमध्ये कुठल्याही प्रकारची संपत्ती असली तरी, कागदोपत्री तिची मालकी कोणाकडं आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण, जी गोष्ट आपल्या स्वतःच्या मालकीची आहे, तीच पुढच्या पिढीकडं हस्तांतरीत करण्याचा आपल्याला अधिकार असतो.
(३) आता आपल्या संपत्तीची एकत्रित यादी तयार झाली की सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तिचं योग्य वाटप. हा मृत्युपत्र बनवण्यातला सर्वात अवघड भाग समजला जातो, कारण इथं आपल्या भावना पूर्णपणे बाजूला ठेवून, अतिशय प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागतात. आपल्या नातेसंबंधांमधले हेवेदावे, भांडणं, प्रासंगिक मानापमान, अशा गोष्टींच्या प्रभावात न अडकता, आपली संपत्ती योग्य रीतीनं सांभाळू शकेल आणि तिचा सदुपयोग करू शकेल, असा वारसदार निवडता आला पाहिजे.

आपलं मृत्युपत्र किंवा इच्छापत्र ही पूर्णपणे व्यक्तिगत, खाजगी बाब आहे. आपण मृत्युपत्र बनवणार आहोत, बनवलं आहे, कुणाच्या नावे बनवलं आहे, कुणाला काय दिलं आहे आणि कुणाला काय दिलं नाही, याबद्दल कुणाशीही चर्चा करू नये. एकदा मृत्युपत्र तयार झालं की, ते सुरक्षित जागी ठेवायचं, आणि पुन्हा त्यावर कुणाशीही कसलीही चर्चा करायची नाही.

मृत्युपत्राच्या संदर्भात वरचेवर विचारला जाणारा प्रश्न म्हणजे - 'वडिलोपार्जित संपत्तीचं हस्तांतरण कसं करायचं?' त्यासाठी आधी संपूर्ण कुटुंबानं एकत्र येऊन वडिलोपार्जित संपत्तीचं रीतसर वाटपपत्र बनवलं पाहिजे. योग्य वाटप झालं असल्यास, आपल्या वाट्याचं हस्तांतरण आपल्या मृत्युपत्रामधून करता येतं. मात्र ज्या वडिलोपार्जित संपत्तीचं वाटप झालेलं नाही, तिचं हस्तांतरण करण्याचा अधिकार आपल्याला नसतो.

मृत्युपत्राबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी -

(१) मृत्युपत्र साध्या कागदावर, स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टाईप करून बनवता येतं. ते रजिस्टर/ नोटराईज/ स्टॅंप पेपरवर करणं कायद्यानं बंधनकारक नाही. असं असलं तरी, मृत्युपत्राच्या संदर्भात आजवर उद्भवलेले विवाद आणि खटले पाहता, ते रजिस्टर करून घेणं उपयुक्‍त ठरतं.
(२) मृत्युपत्र बनवण्यासाठी वकीलांची गरज नाही. परंतु, भविष्यातील संभाव्य अडचणी व कायदेशीर त्रुटी टाळण्यासाठी अनुभवी वकीलांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
(३) मृत्युपत्रासाठी दोन साक्षीदार लागतात. हे फक्त आपल्या सहीचे साक्षीदार असतात, त्यांनी इच्छापत्र वाचायची गरज नसते. तसंच, सदर मृत्युपत्रातून त्यांना कोणताही लाभ झाला पाहिजे असं नाही. मृत्युपत्राची वैधता वाढवण्यासाठी, अलिकडच्या काळात व्हीडीओ शूटींगचा पर्यायही वापरला जातो.
(४) इंडीयन सक्सेशन अॅक्टनुसार, मृत्युपत्रासाठी मेडीकल सर्टीफिकेट आवश्यक नाही; परंतु कोणतेही संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी, मृत्युपत्र बनवण्याच्या दिवशीचं मेडीकल सर्टीफिकेट जरुरी ठरवण्यात आलं आहे.
(५) मृत्युपत्र तयार झालं की त्याची एकच प्रत शिल्लक ठेवावी. कच्चे ड्राफ्ट, झेरॉक्स, इ. फाडून किंवा जाळून नष्ट केले पाहिजेत.
(६) आपल्या मृत्युपश्‍चात आपल्या इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी, एक एक्झिक्युटर नेमणं आवश्यक आहे. हा एक्झिक्युटर वारसदार असणं गरजेचं नाही. प्रत्यक्ष हस्तांतरणाची जबाबदारी एक्झिक्युटरची असल्यामुळं, त्याला मृत्युपत्र बनवलं आहे याची कल्पना दिली गेली पाहिजे. त्यामुळं, शक्यतो एक्झिक्युटर हा एखादा तिर्‍हाईतच असलेला बरा.
(७) मृत्युपत्रात शक्य तितक्या विस्तारानं कौटुंबिक पार्श्वभूमी नमूद करणं चांगलं. त्यामुळं, हस्तांतरणाच्या वेळी संदिग्धता राहत नाही. विशेषतः, संपत्तीतला वाटा बायको किंवा मुलांना द्यायचा नसेल तर, त्याची विशिष्ट कारणं नोंदवणं चागलं.
(८) कोर्टाकडून 'विल' चालवण्यासाठी प्रोबेट (आदेश) घ्यावं लागतं; पण कायद्यानुसार ते सक्तीचं नाही. प्रत्यक्ष हस्तांतरणाच्या वेळी, निरनिराळ्या सरकारी किंवा खाजगी कार्यालयांतून अधिकार्‍यांकडून 'प्रोबेट'ची विचारणा केली जाते, त्यामुळं आता त्याची आवश्यकता भासू लागली आहे.
(९) मृत्युपत्राच्या अंमलबजावणीच्या वेळी एक्झिक्युटर हयात नसल्यास कोर्टाकडून अ‍ॅडमिनिस्टर नेमून घेता येतो.

कित्येकदा अपुर्‍या माहितीमुळं किंवा गैरसमजुतीतून मृत्युपत्रात त्रुटी राहून जातात, किंवा मृत्युपत्र बनवलंच जात नाही. याचा त्रास पुढच्या पिढीला तर होतोच, शिवाय आपण कष्टानं कमवलेल्या संपत्तीची आपल्या पश्‍चात लवकरच वाताहात होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून, आपण हयात व सक्षम असतानाच आपलं इच्छापत्र तयार करून ठेवणं ही काळाची गरज बनली आहे.


Share/Bookmark

Sunday, October 7, 2012

फिर ले आया दिल मजबूर, क्या कीजे

फिर ले आया दिल मजबूर, क्या कीजे
रास न आया, रहना दूर, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मकम्मल, कर भी आओ
वो जो अधूरी सी, बात बाकी है
वो जो अधूरी सी, याद बाकी है

करते हैं हम, आज कबूल, क्या कीजे
हो गयी थी, हमसे जो भूल, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मयस्सर, कर भी आओ
वो जो दबी सी, आस बाकी है
वो जो दबी सी, आंच बाकी है

किस्मत को है, यह मंजूर, क्या कीजे
मिलते रहें हम, बादस्तूर, क्या कीजे
दिल कह रहा, उसे मुसलसल, कर भी आओ
वो जो रुकी सी, राह बाकी है
वो जो रुकी सी, चाह बाकी है

(मकम्मल= पूर्ण; मयस्सर= उपलब्ध; बादस्तूर= बेकायदा; मुसलसल= अविरत/अखंड चालू)

स्वानंद किरकिरे/ सईद कादरी/ नीलेश मिश्रा
बर्फी (२०१२)

Share/Bookmark