प्रतिक्रिया :
“आपण आपल्या सीमा शिथील केल्या आणि अपेक्षांचा विस्तार वाढवला. त्यावेळी आपला आवाका आपण जाणून घेतलाच नाही. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता, आवड, बळ वेगवेगळेच असणार. आणि हे लक्षात न घेता मी मला आनंदी करणाऱ्या गोष्टी बाजूला सारून दुसऱ्याला आनंद वाटणाऱ्या गोष्टीत रस दाखवायला लागले तर मी आणि आम्ही आनंदी होणार कधी आणि कसे ? याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ फार वेगळा आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आधी दुसऱ्यासाठी आनंद निर्माण करतांना स्वतःला त्रासदायक तर वाटत नाही ना हे ओळखता यायला हवं. त्यानंतर दुसराही त्या आनंदात सहभागी होऊ इच्छितोय ना हा विचार व्हायला हवा. आणि त्यासाठी मन निर्मळ हवं. निरागस मन दुसऱ्यांनाही आनंदित करू शकतं.”
- गीतांजली राव, निवृत्त शिक्षिका, पुणे
“प्रत्येक जण काल्पनिक जगात जगत आहे, प्रत्येकाला शॉर्टकट हवा आहे आणि या सर्वामधे स्व-पण हरवत चालले आहे, त्यामुळे आनंद नाहीच, तात्पुरते हसणे आणि पुन्हा गंभीर बनणे यामुळे हे सगळे भयानक आहे.”
- अनिल चाचर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, ता. पुरंदर, जि. पुणे
“माझ्या मते ज्या निकषांद्वारे हे मानांकन ठरवले आहे, त्यांची चिकीत्सा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे देशाची भौगोलिक स्थिती, परंपरा आणि आध्यात्मिक रीतीरिवाज यांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. भारतीय लोक कोणत्या गोष्टीत आपला आनंद शोधतात आणि कोणत्या गोष्टीत नाही याचाही विचार होणे गरजेचे आहे. विकसनशील देशात स्थित्यंतरे आणि बदल अधिक गतीने होत असतात आणि मोठ्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम होत असतो. मग त्यात द्विधा मनस्थितीत असणारे बहुसंख्य असतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. अजून बऱ्याच बाबी आहेत ज्यांना समजून घेऊन मानांकन ठरवणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ्य, साक्षरता, बाहेर जाणे, पर्यटन, कु्टुंब पध्दती, संशोधन, कलासक्त समाज, माध्यमांचा प्रभाव, प्रतिक्रियावादी समाज, सामाजिक सलोखा, व्यसनी लोकसंख्या, वगैरे.”
- विशाल अडसूळ, अभिनेता, कलाकार, पुणे
“नक्कीच हल्ली आनंद हरवत चाललाय. आभासी जगात न वावरता वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेऊ शकतो. पण तो आनंद शोधणे आपल्याला जमले पाहिजे.”
- रसिका, सामाजिक कार्यकर्त्या, पुणे
“आनंद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ घेतला आहे. बालकवींची कविता आठवा... त्यांनी आनंदाला मोद असा शब्द वापरून तो दिशांत फिरून नभात भरुन चोहीकडे ओसंडून वाहात आहे. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात. त्यांना मोद कसा मिळतो. याचं उत्तरही त्यांनीच दिलं आहे. सोडुनि स्वार्था जो जातो... स्वार्थातून आनंद मिळत नसतो. जसे, ‘सुखार्थिनां कुतो विद्या आणि विद्यर्थिनां कुतो सुखम्’ हे सुभाषित सांगते तसेच स्वार्थ्याला आनंद मिळणारच नाही. कारण स्वार्थ्याला एक मिळालं म्हणजे दुसऱ्याचा ध्यास लागतो. स्वार्थाने भरलेला समाज खऱ्या आनंदाला-मोदाला मुकतो आहे हेच खरे.”
- विद्या प्रभुदेसाई, प्राध्यापिका, लेखिका, गोवा
“सर्वेक्षण कसं केलंय हे बघायला पाहिजे. मी तर एका ठिकाणी असं वाचलं की पाकिस्तानही आपल्यापेक्षा आनंदी आहे.”
- संभाजी पाटील, शिक्षक, चाळीसगांव
“आनंद हरवलाय हे बरोबरच आहे. इथं सुरक्षितताच नाही तर आनंद कुठून? याचं उत्तर संस्कृती, भेद, परंपरामधे आणि भांडवलवादी लोकशाहीतही शोधावं लागेल.”
- संतोष शेंडकर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पुणे
“मोबाईलच्या वापरावर बंधन आणि कोणताही छंद जोपासला तर नक्कीच फरक पडेल.”
- महेंद्र धावडे, सामाजिक कार्यकर्ते, पुणे
“आनंद हरवत चाललाय हे खरंय. पण प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. आपल्याला दुसऱ्याचा आनंद सहन होत नाही हेही एक कारण भारतीयांचा आनंद हरवल्याचं आहे.”
- अनिल दिक्षित, कवी, पुणे
“आनंद कशात मोजायचा? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आनंद ही भावनाच मूळातच व्यक्तीपरत्वे बदलत असते. तेव्हा ती मोजता येत नाही. एकाच गोष्टीत प्रत्येक व्यक्ती वेगळा आनंद शोधत असते. प्रश्नावली हे अत्यंत कृत्रिम साधन आहे असं मला व्यक्तिश: वाटतं.”
- फारुक काझी, शिक्षक, बालसाहित्यिक, सांगोला, सोलापूर
“आनंद मिळवण्याचा विचार इथे मटेरियलिस्टिक जगण्याच्या पाश्चात्य पद्धतीतून तयार केलेला दिसतो. आपल्याकडे अत्यंत गरिबीत जगणारा माणूस देखील आनंदी असू शकतो, त्याच्या चेहऱ्यावर हास्य हमखास दिसते. अगदी हमालदेखील एकमेकांत हास्य-विनोद करताना दिसतात. आपल्या आनंद मिळवण्याच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. आकडेवारीत आपला नंबर १३३ दाखवलाय, पण पैसे नसताना अजूनही आपले लोक आनंदी समाधानी राहू शकतात.”
- श्रीकांत कुलकर्णी, लेखक, पुणे
“माझ्या मते काही अंशी आनंद हरवलाय/त्याची व्याख्या बदललीये असं म्हणू शकता.. मटेरीअलीस्टीक गोष्टींचं महत्त्व आणि त्यामुळे मिळणारं समाधान याचं प्रमाण वाढलंय. पण हल्ली हे तितकंच महत्त्वाचंही आहे. पूर्वी पेक्षा ट्रॅव्हलींग, एन्टरटेनमेन्ट, शॉपींग हे नित्याचं झालंय, त्यामुळे तुम्हाला रोजच आनंदाचे स्रोत खुले होताहेत, आपण एक्स्प्रेसिव्ह झालोय, परिस्थितीचा ऐक्सेप्टन्स वाढलाय. त्यामुळे हातावर हात धरून बसणं आणि रडत बसणंही क्वचितच दिसतं, लेट इट गो (भाड में जा / तू नहीं और सही..) अशी वृत्ती वाढतीये… आजकालचं युथ खूप घाईत आहे, हावरट आहे.. निवांत लाईफस्टाईल, शांतपणा.. एक ठेहराव नाहीये त्यांच्याकडे.. सतत बेटरमेन्टकडे धावत असतात, त्यामानानं आपली पिढी मला जास्त संतुलित वाटते. टेक्नोसॅव्ही व्हायच्या आधीचा आनंदही लुटलाय…”
- जयश्री खराडे, कलाकार, लंडन
“प्रत्येकाने मी आणि माझे यातून बाहेर निघायला पाहिजे.”
- माया चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या, पुणे
“आनंद हरवलाय तर मुळीच नाही... आपण आनंद कशात मानतो त्यावर बरंच अवलंबून आहे. मानवाची जसजशी सुखाची व्याप्ती वाढली तसतसे आनंद हरवला नाही तर माणसापासून हिरावला. आपण ठरविले तर प्रत्येक गोष्टीत आनंद मानू शकतो.”
- राहुल गरड, पत्रकार, पुणे
“प्रत्येकाचे आनंदाचे निकष वेगवेगळे असू शकतात पण काही निकष कॉमन असू शकतात. सगळ्याचा पाया बदलत्या परिस्थितीनुसार मानसिकतेत होणारे बदल, हा असावा, असं मला वाटतंय.”
- गौरी कुलकर्णी, गायिका, पुणे