नवीन कथा: "राजा"
👑📱🐶💡🤔💭
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
राजा सकाळी उठला. डोळे चोळत त्यानं इकडं-तिकडं बघितलं. महालात दुसरं कुणीच नव्हतं. मातोश्री आज लवकर मोहिमेवर गेल्या वाटतं! त्यानं विचार केला.
आळोखे-पिळोखे देत राजा उभा राहिला. रोजच्या सवयीनं राजवस्त्राची घडी घालू लागला. वयानुसार वाढत्या उंचीमुळं हे राजवस्त्र अंगावर पांघरायला पुरेनासं झालं होतं. शिवाय नेहमी डोक्याकडं घ्यायची बाजू काल चुकून पायाकडं घेतली होती. तोंडावर पांघरलं की बरोबर डोळ्यांसमोर राजवस्त्राची खिडकी यायची, ज्यातून महालाच्या छतापलिकडचे तारे बघत राजाला छान झोप लागायची. काल उलट-सुलट पांघरल्यामुळं या खिडकीत पाय जाऊन तिचा दरवाजा झाला होता.
आपल्या राजवस्त्राची मातोश्रींच्या राजवस्त्राशी गुपचुप अदलाबदल करायचा विचार राजाच्या मनात चमकून गेला. पण मातोश्री झोपतात त्या कोपऱ्यात नजर टाकली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गेले कित्येक महिने त्या अंगावर पांघरायला घेतच नाहीत. त्यांचं जुनं राजवस्त्र पलिकडच्या बाजूला दोन बांबूंना बांधून झोळी केली होती. बादशाहची झोळी!
राजा त्या झोळीपाशी जाऊन थांबला. रिकाम्या झोळीत बसून झोका घ्यायचा त्याला मोह झाला. पण स्वतःच्या वाढत्या उंचीबरोबर वाढणाऱ्या वजनाची सुद्धा त्याला जाणीव होती. आपण ह्या झोळीत बसलो आणि झोळी फाटली तर? कसं का असेना, अंगावर पांघरायला एक राजवस्त्र आहे, ते बादशाहच्या नवीन झोळीसाठी कुर्बान करायची राजाची तयारी नव्हती.
बादशाहचं नाव कधी ठेवणारेत पण? चहाचं पातेलं चुलीवर ठेवत तो विचार करू लागला. बादशाह काय भारी नाव आहे… राजाचा भाऊ बादशाह! पण बादशाहच ठेवतील का नाव? मातोश्रींना नव्हती आवडली आपली सूचना… काहीतरी देवाबिवाचं नाव ठेवायचं म्हणे. असं देवाचं नाव ठेवलं म्हणून कुणी खरंच देव होतं का? आता माझ्याच नावाचं बघा…
चहा उकळेपर्यंत राजा महालाबाहेर जाऊन चूळ भरून आला. अलीकडंच तो चुलीवरची बरीच कामं करायला शिकला होता. चहा बनवायचा, भात शिजवायचा, रस्सा उकळायचा, पापड भाजायचा… कुणी शिकवलं नव्हतं, पण मातोश्रींना ही सगळी कामं करताना बघितलं होतं त्यानं लहान असल्यापासून.
मातोश्री आता बादशाहला घेऊन जातात कामावर, आधी राजाला घेऊन जायच्या तशा. पण आता राजा मोठा झाला होता ना. त्यामुळं त्याला एकट्याला घरी सोडून जाणं शक्य होतं. पण मातोश्री परत येईपर्यंत पोटातली भूक थोपवणं राजाला शक्य नव्हतं. म्हणून मग घेतली त्यानं स्वतःच चुलीवरची कामं शिकून…
चहात बुडवायला काही मिळतंय का हे शोधताना राजाला अचानक 'तो' दिसला - मोबाईल! मातोश्री मोहिमेवर जाताना विसरून गेल्या की काय? घाईघाईनं त्यानं मोबाईल हातात घेतला आणि चालू करायचा प्रयत्न करू लागला. थोडा वेळ झटापट केल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याचं - म्हणजे मोबाईलचं - चार्जिंग संपलेलं आहे. काल कामावर मोबाईल चार्ज करायचं मातोश्री विसरल्या असणार… म्हणून आमच्यावर ही जबाबदारी सोपवून गेलेल्या दिसतात. चहा पिता-पिता त्यानं विचार केला.
चहाचा ग्लास विसळून झाल्यावर, बंद मोबाईल आणि चार्जर काळजीपूर्वक खिशात कोंबून राजा महालाबाहेर पडला. महालाचा बुलंद दरवाजा ओढून घेत त्यानं लोखंडी कडी अडकवली आणि सराईतपणे कुलुपात किल्ली फिरवली. आपल्या वयाच्या मानानं जरा जास्तच जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन पडल्यात असं त्याला वाटून गेलं. कुलुप नीट लागलं की नाही हे बघायला त्यानं दोन-तीन हिसडे दिले. तिसऱ्या हिसड्याला लोखंडी कडीच बाहेर आल्यासारखी वाटली. पण कुलुप पक्कं बंद झालं होतं. स्वतःवर खूष होत राजा देवळाच्या दिशेनं निघाला.
वस्तीतलं देऊळ म्हणजे त्याच्या दृष्टीनं 'चार्जिंग स्टेशन' होतं. वस्तीतल्या दादा, काका, मामा लोकांना देवळात आपापले मोबाईल चार्जिंगला लावताना त्यानं खूप वेळा बघितलं होतं. आज तो स्वत: तिथं मोबाईल चार्जिंगला लावणार होता. त्याला अजूनच मोठं झाल्यासारखं वाटू लागलं. 'दादा' झाल्यासारखं वाटू लागलं. तसा तो खरोखरचा दादा झाला होताच की - छोट्या बादशाहचा राजादादा!
देवळाच्या पायऱ्यांवर त्याला एक नवीन कुत्रं बसलेलं दिसलं. आपल्या प्रजेची खडान्खडा माहिती राजाला असायची, त्यामुळं 'लोकल' कोण आणि 'फॉरेनर' कोण हे त्याला पटकन लक्षात यायचं.
"हॅल्लो डॉगी! मायसेल्फ जॉर्ज अब्राहम कॅन्डी. लेकीन प्यार से लोग मुझे 'राजा' कहते हैं…"
आपल्या स्वतःच्या आईला ऊर्फ मातोश्रींना 'लोग' म्हणताना त्याला कसंतरीच वाटलं. ती एकटीच बिचारी त्याला प्रेमानं 'राजा' म्हणायची. बाकी सगळ्यांसाठी तो फक्त 'राजू' होता. पण हे सगळं त्या 'फॉरेनर' कुत्र्याला कुठून माहिती असणार? त्याला आपण आपलं नाव जे सांगू तेच तो लक्षात ठेवणार, नाही का? आपली ओळख आपणच बनवायची, हे राजानं लहानपणीच ठरवून टाकलं होतं. लहानपणी म्हणजे फार वर्षांपूर्वी नव्हे, पण दादा व्हायच्या जरा आधी, बादशाहच्या जन्माआधी.
त्या 'फॉरेनर' कुत्र्यानं बसल्या जागेवरच आपले पुढचे पाय अजून पसरवत राजा ऊर्फ जॉर्ज अब्राहम कॅन्डी साहेबांना कोपरापासून नमस्कार केला. स्वत:वरच खूष होत राजानं त्या पायरीपलीकडं उडी मारली आणि देवळाच्या सभामंडपात प्रवेश केला.
त्या लांबलचक हॉलमधले चार्जिंग पॉइंट शोधणं अजिबात अवघड नव्हतं. प्रत्येक बोर्डपाशी भिंतीला टेकून उभी राहिलेली दादा, काका, मामा मंडळी आपापल्या किंवा एकमेकांच्या मोबाईलमधे काहीतरी बघण्यात गुंग होती. दुसऱ्या टोकाला कोपऱ्यात एकच बोर्ड होता जिथं कुणीच उभं किंवा बसलेलं नव्हतं.
झपझप पावलं टाकत राजा त्या बोर्डपाशी गेला. खिशातून बंद मोबाईल आणि चार्जर बाहेर काढून तो रिकामं सॉकेट शोधू लागला. प्रत्येक सॉकेटमधे काही ना काही घुसवलेलं त्याला दिसलं. म्हणूनच इथं कुणी उभं राहिलं नव्हतं तर! राजानं प्रत्येक पिनमागच्या वायरचा डोळ्यांनी माग काढला. सगळ्या वायर बघून झाल्यावर नक्की कुठली पिन काढायची ते त्यानं ठरवलं. ‘ती’ पिन काढून तिथं चार्जर लावणार तेवढ्यात…
"लाईट कुणी बंद केली रे कळसाची?"
बुलेट काकांच्या किंचाळण्यानं राजा दचकला. बुलेट काका देवळाचा सगळा कारभार बघायचे. त्यांचं खरं नाव राजाला माहिती नव्हतं, पण त्यांच्याकडं एक धडाम्-धुडुम् आवाज काढणारी बुलेट गाडी होती, त्यामुळं त्यांना 'बुलेट काका' असंच नाव पडलं होतं.
"बहिरे झाला काय रे सगळे? काय विचारतोय मी? कळसाची लाईट कुणी बंद केली?" बुलेट गाडीपेक्षा मोठ्या आवाजात बुलेट काका किंचाळत होते.
आपला मोबाईल आणि चार्जर घेऊन हळूच बोर्डपासून सटकायचा राजानं प्रयत्न केला.
"तू? मोबाईल लावतोस काय चार्जिंगला?" बुलेट काका अजून फुटतच होते. “कुणाचा मोबाईल आणलास चोरून?"
"चोरुन नाही काका, आईचा आहे. चार्जिंग संपलं होतं म्हणून…"
"म्हणून इथं आलास फुकट चार्जिंग करायला? आणि त्यासाठी कळसाची लाईट बंद केलीस तू?"
"नाही काका… म्हणजे होय. मला वाटलं, आता दिवसा लाईटची गरज नसेल कळसाला…"
"गरज नसेल? अरे देवळाच्या कळसावर पाच लाख रूपये खर्च केलेत मी. किती? पाच लाख! चोवीस तास लाईट चालू ठेवायचे म्हणून सांगून ठेवलंय सगळ्यांना. आता तू गरज ठरवणार होय त्याची? चल निघ इथून…"
पाच लाख म्हणजे पाचावर पाच शून्य की सहा, यावर विचार करत राजा निमूटपणे देवळाबाहेर जायला निघाला. आत येताना भेटलेलं 'फॉरेनर' कुत्रं त्याला दिसलं नाही. बहुतेक बुलेट काकांनी आत येताना त्याच्या पेकाटात लाथ घातली असणार. देवळाच्या पायरीवरसुद्धा त्यांनी काही हजार तरी खर्च केले असतीलच ना? मग त्यावर कुणी परप्रांतीय फुकट येऊन बसलेला त्यांना कसा चालेल?
पण बुलेट काकांकडं एवढे पैसे येतात कुठून? आपल्या मातोश्री दिवसरात्र काम-काम-काम करतात; आपले पिताश्री वेगवेगळ्या राज्यांमधे जाऊन काम शोधत असतात, जिकडं काम मिळेल तिकडंच राहतात. तरी आपल्याकडं एवढे पैसे येत नाहीत. बुलेट काका तर कधी काम करताना दिसत नाहीत. तरी त्यांच्याकडं खर्च करायला केवढे पैसे असतात. बहुतेक 'पैसे खर्च करणं' हेच त्यांचं काम असेल! पण मग हे पैसे ते स्वतःच्या घरावर खर्च करायचे सोडून देवळावर का खर्च करतात? जाऊ दे, आपल्याला तर काहीच कळत नाही. पिताश्री भेटले पुढच्या वेळी की विचारू त्यांनाच…
विचार करता-करता राजा परत घरापाशी येऊन पोहोचला. कुलूप उघडून अंधाऱ्या महालात जायची त्याची इच्छा झाली नाही. आपण अजून थोडे मोठे झालो की एवढी भीती वाटणार नाही अंधाराची, त्यानं स्वतःला समजावलं. तो बाहेरच महालाच्या भिंतीला टेकून बसला.
अजून थोडे मोठे म्हणजे किती मोठे? अठरा वर्षांचा झालास की तू स्वतंत्र मोठा माणूस होशील, असं पिताश्री आणि मातोश्री दोघंपण म्हणायचे. आता खूप वर्षं नव्हती राहिली अठरासाठी. चार-पाच-सहा वर्षांतच येईल अठरावं. पण बादशाहला खूपच वर्षं लागतील अजून, नाही का? केवढुसा आहे तो आत्ता… मातोश्री दमून जातात त्याचं सगळं करता-करता. पण आपण असतो ना मदतीला!
आपण बादशाहएवढे असताना कुठं कोण होतं मातोश्रींच्या मदतीला? एकटीनंच केलं असेल ना आपलं सगळं? अजून किती वर्षं करत राहणार? आपण काहीतरी करायला पाहिजे… काय करूया? आपल्याला कामावरसुध्दा नेत नाहीत. शाळेत जा, भरपूर शीक, मोठा हो, असं म्हणत असतात. बुलेट काका गेले असतील का शाळेत? कुठल्या शाळेत शिकले असतील की एवढे मोठेच झाले? एकदा विचारलं पाहिजे…
विचार करता-करता राजाचा डोळा लागला. चार्जिंग नसलेला मोबाईल हातात घट्ट पकडून, तिथंच महालाच्या भिंतीला टेकून तो झोपून गेला, आता थेट अठरा वर्षांचे झाल्यावरच उठू, असं काहीतरी स्वप्न बघत…
👑📱🐶💡🤔💭
- मंदार शिंदे
9822401246