ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, June 9, 2023

यदा कदाचित रिटर्न्स!

 


जवळपास बावीस वर्षांपूर्वी, म्हणजे १३ डिसेंबर २००१ या दिवशी, पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एक नाटक बघितलं. 'भीमाच्या गदेसारखी मजबूत कॉमेडी' अशी जाहिरात केली जात असलेलं संतोष पवारांचं 'यदा कदाचित'! प्रत्येक वाक्याला हसायला लावणारं आणि त्याच वेळी गंभीर विचार करायला लावणारं नाटक. स्टेजवर संतोष पवार आणि त्यांच्या टीमनं घातलेला धुमाकूळ न विसरता येण्यासारखा.

पुढं या नाटकाची सीडी हाती लागली. यूट्यूब आणि ओटीटीच्या जन्माआधीची गोष्ट. रेकॉर्डरवर ऑडीयो कॅसेटची ए आणि बी साईड आलटून-पालटून ऐकायची सवय होती. अशा वेळी नाटकाची सीडी मिळाल्यावर साहजिकच नाटकाची पारायणं सुरू झाली. त्यात दोन महत्त्वाची नाटकं म्हणजे, 'पती सगळे उचापती' आणि 'यदा कदाचित'. पुन्हा-पुन्हा बघून या नाटकांमधले डायलॉग पाठ झाले होते.

कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कितीही वेळा हे नाटक बघितलं, तरी प्रत्यक्ष स्टेजवरचा धिंगाणा अनुभवणं वेगळीच गोष्ट. सध्याच्या काळातले जिवंत आणि ज्वलंत विषय रडत नाही, तर हसत-खेळत सोप्या पद्धतीनं लोकांसमोर मांडायचे, ही 'यदा कदाचित'ची खासियत. त्यासाठी ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांपासून राजकीय आणि फिल्मी नेत्या- अभिनेत्यांपर्यंत कुणालाही स्टेजवर खेचून आणायला संतोष पवार कचरत नाहीत, घाबरत नाहीत. सोबत लावणी आणि गवळणीपासून बॉलिवूड डान्स आणि शारीरिक कसरतींचा तडका असतोच. म्हणजे एन्टरटेनमेन्टची फुल ग्यारंटी!

त्यामुळं 'यदा कदाचित रिटर्न्स'ची तयारी सुरू झाल्याचं कळाल्यापासून अपार उत्सुकता. मुंबई-ठाण्यापासून सुरुवात करत, शेवटी ८ जून २०२३ या दिवशी पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग ठरल्याचं समजलं आणि बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा 'यदा कदाचित'ची जादू प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय भावना आणि अस्मिता घाऊक प्रमाणात दुखावल्या जाण्याच्या काळात, 'यदा कदाचित रिटर्न्स' क्वचित आडून आणि बहुतेकदा थेट भाष्य करतं. 'राजा नागडा आहे' आणि 'पोपट मेला आहे' हे सांगायला महान कलाकार आणि सेलिब्रिटी घाबरत असतील, तर त्यांनी 'यदा कदाचित रिटर्न्स' नक्की बघावं. त्यातून त्यांना प्रेरणा तरी मिळेल किंवा किमान सत्याची ओळख तरी पटेल.

नवीन संचातले कुठलेच कलाकार नवखे वाटत नाहीत आणि वीस सेकंदांच्या रील्सच्या जमान्यात दोन अंकी (मराठी) नाटकातली एनर्जी एकदाही ड्रॉप होत नाही, याबद्दल सर्व कलाकार आणि विशेषत: दिग्दर्शक कौतुकास पात्र आहेत. पात्रांची निवड आणि स्क्रिप्ट यावर चोख काम झालेलं आहे. कमरेखालचे विनोद करताना चावट आणि अश्लील यामधला बॅलन्स 'बऱ्यापैकी' साधला आहे. गाणी, संगीत, लाईट्स उत्तम आहेत.

'मराठी नाटक' म्हणजे लांबच लांब मोनोलॉग्ज, शब्दबंबाळ संवाद, मेलोड्रॅमाटीक स्क्रिप्ट, आणि 'विनोदी नाटक' म्हणजे अंगविक्षेप आणि चावटपणा, या दोन्ही संकल्पनांना छेद देणारा 'यदा कदाचित' हा एक यशस्वी प्रयोग आहे आणि तो आता 'रिटर्न' आला आहे. ही संधी सोडू नका!

०८/०६/२०२३

मंदार शिंदे (9822401246)



Share/Bookmark