ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, September 29, 2018

प्रेमाचा गुलकंद

प्रेमाचा गुलकंद
- कवी केशवकुमार

-बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी ‘त्या’ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित ‘तिज’ला नियमाने !

कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते ?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते !

गुलाब कसले ? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या !
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या !

प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने !
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे !

कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा !
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा !

या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल !
तोहि कशाला प्रगट करी मग मनातले बोल !

अशा त-हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी याच्या नाजुक रतिबात !

अखेर थकला ! ढळली त्याची प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या !

धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, “देवी !
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)

“बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज !
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्ताचे काज ?

गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले ?”

तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, “आळ वृथा हा की !
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी !”

असे बोलुनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी !

म्हणे, “पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद !

कशास डोळे असे फिरविता का आली भोंड ?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड !”

क्षणैक दिसले तारांगण त्या, -परी शांत झाला !
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला !!

“प्रेमापायी भरला” बोले, “भुर्दंड न थोडा !
प्रेमलाभ नच ! गुलकंद तरी कशास हा दवडा ?”

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
हृदय थांबुनी कधीच नातरि तो असता ‘खपला’ !

तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
‘प्रेमाचा गुलकंद’ तयांनी चाटुनि हा बघणे !


Share/Bookmark

Tuesday, September 25, 2018

त्रास मजला फार झाला... (हजल)

हजल
(मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

त्रास मजला फार झाला, कालच्या ट्रॅफीकचा
हात माझा गियर झाला, पाय झाला ब्रेकचा

भंग करण्या तपश्चर्या, येती न आता अप्सरा
जन्म झाला त्याचसाठी, पादणार्‍या बुलेटचा

पाळुनी वन-वे नि सिग्नल, पोहोचलो दारी तिच्या
पावती फाडूनी तोवर, जिंकला बाहेरचा

ती म्हणाली दे मला, तोहफा तू मोठा कीमती
आणला मी कॅन पंपा-वरुन मग पेट्रोलचा

उत्सवाच्या मांडवांतून, पार्कींगला जागा नसे
म्हणुनी उंदरावरुनी येतो, गणपती तो पेणचा

मुंबईवर प्रेम करतो, तरीही ना सोडी पुणे
ओळखावे त्यास आहे, त्रास लोकल ट्रेनचा

ती म्हणाली, बाळ बिल्डर होणार नक्की आमुचा
नाद आत्ता त्यास खोट्या, डंपर आणि क्रेनचा

त्रास मजला फार झाला, कालच्या ट्रॅफीकचा
हात माझा गियर झाला, पाय झाला ब्रेकचा

- अक्षर्मन




Share/Bookmark

Saturday, September 22, 2018

अमर आणि समर

चला गोष्ट सांगूया...
🙂😌☺😊😀😃😄😁

अमर आणि समर
(लेखकः मंदार शिंदे 9822401246)

एका देशामध्ये दोन राज्यं होती, गुहागर आणि मीठागर त्यांची नावं होती. गुहागरात होत्या मोठ्या-मोठ्या गुहा. आणि मीठागरात होत्या बरण्याच बरण्या. गुहागरचा राजा होता अमर. मीठागरचा राजा होता समर.

पुढची गोष्ट वाचा अमेझॉन किंडलवर -

जेशूची गोष्ट व इतर: Stories in Verse 
(Marathi Edition) by Mandar Shinde



✒✒✒🙏🙏🙏


Share/Bookmark

Thursday, September 20, 2018

गद्य आणि पद्य

गद्य आणि पद्याचा विचार करताना मला पडलेले काही प्रश्नः

प्रिंटींगची सोय निर्माण होण्यापूर्वीचं सर्व साहित्य पद्य स्वरुपातच का आहे? त्यावेळी लोकांनी गद्य साहित्यनिर्मिती केलीच नसेल का?

शेकडो अभंग रचणार्‍या तुकोबांनी आयुष्यात एकही लघुनिबंध किंवा कथा रचली नसेल का?

हजारो ओव्या रचणार्‍या माऊलींना एखादा ललित लेख लिहावासा नसेल का वाटला?

हजारो श्लोक रचणार्‍या समर्थांनी एखादं गद्य 'मॅनेजमेंट मॅन्युअल'/मार्गदर्शक पुस्तिका का नसेल लिहिली?

शेकडो दोहे रचणार्‍या कबीराला एखादं 'सेल्फ-हेल्प बुक' लिहावंसं का नसेल वाटलं?

रामायण, महाभारत, भगवद्‍गीता ही महाकाव्यं का आहेत, महाकादंबर्‍या का नाहीत?

पारंपारिक भजन, कीर्तन, आरत्या, भारुड, ओव्या, हे सगळं पद्य स्वरुपातच का आहे? पारंपारिक गद्याची उदाहरणं कोणती?

मला असं वाटतं की, प्रिंटींगची सोय नसताना मौखिक स्वरुपातच साहित्य साठवणं व हस्तांतरित करणं भाग होतं. लयबद्धता, यमकं, वृत्तबद्धता, गेयता, मोजक्या नि नेमक्या शब्दांचा वापर या गुणधर्मांमुळंच पद्य साहित्य मुखोद्‍गत होऊन टिकून राहिलं असावं. याउलट, गद्य साहित्य मात्र काळाच्या ओघात नाहीसं झालं असावं.

प्रिंटींगची सोय झाल्यानंतर गद्य साहित्य वरचेवर संदर्भासाठी किंवा पुनर्वाचनासाठी उपलब्ध होऊ लागलं, त्यामुळं तिथून पुढं ते टिकून राहिलं असावं.

पण आजही लहान मुलांचं शिक्षण बडबडगीतं, गाणी किंवा पद्यरुप गोष्टींपासून सुरु होतं. मूल स्वतः वाचू व समजू लागलं की गद्य धडे सुरु होतात. यामागंही वरील कारणंच असावीत असं वाटतं.

कथा, कादंबरी, कविता अशा साहित्यप्रकारांची सरसकट तुलना करता येणार नाही, हे मान्यच. तरीही, आकलन, स्मरण, पुनर्निर्माण या मुद्यांवर पद्य नक्कीच गद्यापेक्षा जास्त सोयीस्कर आणि परिणामकारक ठरतं, हे नक्की!

तुम्हाला काय वाटतं?

- मंदार शिंदे 9822401246


Share/Bookmark

Monday, September 10, 2018

रक्षक (रूपककथा)

रक्षक

"या पहिल्या मजल्यावरच्या कुत्र्यांनी जाम वैताग दिलाय," लिफ्टमधून पाचव्या मजल्यावर जाणारी गाय तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या शेळीला म्हणाली.

"खरंय गं, पण बोलणार कोण त्यांच्याविरुद्ध? तुमचा बैल की आमचं बोकड? शिवाय ते दुसर्‍या मजल्यावरचं डुक्करपण आहेच कुत्र्याच्या साथीला..." शेळीनं दुःखद उसासा सोडला.

मग तिसरा मजला आला, शेळी बाहेर पडली. पाचव्या मजल्यावर गाय बाहेर पडली. रोजचीच गोष्ट आज नव्यानं घडली.

दुपारी कुत्र्याची पिल्लं निमंत्रण द्यायला आली. एका पिल्लाच्या हॅप्पी बड्डेचं सेलिब्रेशन होतं म्हणे.

संध्याकाळपासून सोसायटीत धिंगाणा सुरु होता.

"बेकरीवाल्या उधळ कालच्या पावाला... पावाला..."

"हाडं कड क‌ड्‍ कड कड्‍ कड कड्‍ कडाड्‍..."

अशी तुफान प्राणिप्रिय गाणी वाजत होती. शहराच्या कानाकोपर्‍यातून सगळी कुत्री जमली होती. एकत्र आल्यानं त्यांच्या भुंकण्याला कोल्हेकुईचा कॉन्फीडन्स चढला होता. तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या मजल्यावर राहणार्‍यांना तर त्या वाघ-सिंहांच्या डरकाळ्या वाटत होत्या. दारं-खिडक्या घट्ट बंद करुन, टीव्हीचा आवाज वाढवून सगळे घरात बसले होते.

"आज मौऽऽसम बडा कुत्तियाना है... बडा कुत्तियाना है..."

"भुंकी तो नाऽऽना, छेडीतो ताऽऽना, मठ्ठ हे राहीले.. डोलावीत माऽऽना..."

अशी गाणी टीव्हीवर दबक्या आवाजात वाजत होती. पापभिरू मंडळी घरात बसूनच रात्र लवकर संपायची वाट बघत होती.

तो दिवस संपला. पण दुसर्‍या दिवसापासून सोसायटीत कुत्र्यांची वर्दळ वाढली. पार्किंगमध्ये कुत्री, लिफ्टमध्ये कुत्री, जिन्यामध्ये कुत्री. टेरेसवर, ग्राऊंडवर, कुंपणावर, कुत्रीच कुत्री...

बैल, बोकड, माकड, जिराफ, सगळे कुत्र्यांना चुकवत ये-जा करु लागले. घरात आले की दार घट्ट बंद करुन लपू लागले.

पण कुत्र्यांचा उपद्रव खूपच वाढला. शेवटी वैतागून सगळे पहिल्या मजल्यावर गोळा झाले.

"हे सगळं थांबलं पाहिजे... बाहेरचे चले जाव... शांतता वापस लाव..." अशा घोषणा झाल्या.

कुत्र्यानं म्हणणं ऐकून घेतलं. मग स्वतःच घोषणा दिल्या, "बाहेरचे चले जाव... शांतता वापस लाव.."

कुत्र्यालाच मग सुचली युक्ती, वॉचमनची एका केली नियुक्ती. सगळ्यांकडून घेतली वर्गणी, सगळे म्हणाले कुत्राच गुणी!

वॉचमन होता कुत्र्याचाच मित्र. एका महिन्यात पालटलं चित्र.

आता कुत्री रोज येत नाहीत, कधीकधी येतात. ते तरी काय करणार, आपले सणच कित्ती कित्ती असतात. दसर्‍या दिवशी सोनं द्यायला, संक्रांतीला तिळगुळ घ्यायला... वर्गणी मागायला आणि फटाके उडवायला...

पण वॉचमनचा आता चांगलाच दरारा, पूर्वीसारखा नसतो रोजचाच धिंगाणा.

"या पहिल्या मजल्यावरच्या कुत्र्यानंच सोसायटी वाचवली, नाही का? यावेळी चेअरमन तोच होणार..." लिफ्टमधून पाचव्या मजल्यावर जाणारी गाय तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या शेळीला म्हणाली.

"खरंय गं, त्याच्याएवढं खंबीर इथं आहेच तरी कोण? तुमचा बैल की आमचं बोकड?" शेळीनं हसत डोळा मारला.

मग तिसरा मजला आला, शेळी बाहेर पडली. पाचव्या मजल्यावर गाय बाहेर पडली. रोजचीच गोष्ट आज पुन्हा नव्यानं घडली.

दुपारी कुत्र्याची पिल्लं निमंत्रण द्यायला आली. पप्पा चेअरमन झाल्याबद्दल सेलिब्रेशन होतं म्हणे.

संध्याकाळपासून सोसायटीत आनंदोत्सव सुरु झाला. डॉल्बीवर गाणं वाजू लागलं...

"हाडं कड क‌ड्‍ कड कड्‍ कड कड्‍ कडाड्‍... कड क‌ड्‍ कड कड्‍ कड कड्‍ कडाड्‍..."

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६


Share/Bookmark