रक्षक
"या पहिल्या मजल्यावरच्या कुत्र्यांनी जाम वैताग दिलाय," लिफ्टमधून पाचव्या मजल्यावर जाणारी गाय तिसर्या मजल्यावर राहणार्या शेळीला म्हणाली.
"खरंय गं, पण बोलणार कोण त्यांच्याविरुद्ध? तुमचा बैल की आमचं बोकड? शिवाय ते दुसर्या मजल्यावरचं डुक्करपण आहेच कुत्र्याच्या साथीला..." शेळीनं दुःखद उसासा सोडला.
मग तिसरा मजला आला, शेळी बाहेर पडली. पाचव्या मजल्यावर गाय बाहेर पडली. रोजचीच गोष्ट आज नव्यानं घडली.
दुपारी कुत्र्याची पिल्लं निमंत्रण द्यायला आली. एका पिल्लाच्या हॅप्पी बड्डेचं सेलिब्रेशन होतं म्हणे.
संध्याकाळपासून सोसायटीत धिंगाणा सुरु होता.
"बेकरीवाल्या उधळ कालच्या पावाला... पावाला..."
"हाडं कड कड् कड कड् कड कड् कडाड्..."
अशी तुफान प्राणिप्रिय गाणी वाजत होती. शहराच्या कानाकोपर्यातून सगळी कुत्री जमली होती. एकत्र आल्यानं त्यांच्या भुंकण्याला कोल्हेकुईचा कॉन्फीडन्स चढला होता. तिसर्या, चौथ्या, पाचव्या मजल्यावर राहणार्यांना तर त्या वाघ-सिंहांच्या डरकाळ्या वाटत होत्या. दारं-खिडक्या घट्ट बंद करुन, टीव्हीचा आवाज वाढवून सगळे घरात बसले होते.
"आज मौऽऽसम बडा कुत्तियाना है... बडा कुत्तियाना है..."
"भुंकी तो नाऽऽना, छेडीतो ताऽऽना, मठ्ठ हे राहीले.. डोलावीत माऽऽना..."
अशी गाणी टीव्हीवर दबक्या आवाजात वाजत होती. पापभिरू मंडळी घरात बसूनच रात्र लवकर संपायची वाट बघत होती.
तो दिवस संपला. पण दुसर्या दिवसापासून सोसायटीत कुत्र्यांची वर्दळ वाढली. पार्किंगमध्ये कुत्री, लिफ्टमध्ये कुत्री, जिन्यामध्ये कुत्री. टेरेसवर, ग्राऊंडवर, कुंपणावर, कुत्रीच कुत्री...
बैल, बोकड, माकड, जिराफ, सगळे कुत्र्यांना चुकवत ये-जा करु लागले. घरात आले की दार घट्ट बंद करुन लपू लागले.
पण कुत्र्यांचा उपद्रव खूपच वाढला. शेवटी वैतागून सगळे पहिल्या मजल्यावर गोळा झाले.
"हे सगळं थांबलं पाहिजे... बाहेरचे चले जाव... शांतता वापस लाव..." अशा घोषणा झाल्या.
कुत्र्यानं म्हणणं ऐकून घेतलं. मग स्वतःच घोषणा दिल्या, "बाहेरचे चले जाव... शांतता वापस लाव.."
कुत्र्यालाच मग सुचली युक्ती, वॉचमनची एका केली नियुक्ती. सगळ्यांकडून घेतली वर्गणी, सगळे म्हणाले कुत्राच गुणी!
वॉचमन होता कुत्र्याचाच मित्र. एका महिन्यात पालटलं चित्र.
आता कुत्री रोज येत नाहीत, कधीकधी येतात. ते तरी काय करणार, आपले सणच कित्ती कित्ती असतात. दसर्या दिवशी सोनं द्यायला, संक्रांतीला तिळगुळ घ्यायला... वर्गणी मागायला आणि फटाके उडवायला...
पण वॉचमनचा आता चांगलाच दरारा, पूर्वीसारखा नसतो रोजचाच धिंगाणा.
"या पहिल्या मजल्यावरच्या कुत्र्यानंच सोसायटी वाचवली, नाही का? यावेळी चेअरमन तोच होणार..." लिफ्टमधून पाचव्या मजल्यावर जाणारी गाय तिसर्या मजल्यावर राहणार्या शेळीला म्हणाली.
"खरंय गं, त्याच्याएवढं खंबीर इथं आहेच तरी कोण? तुमचा बैल की आमचं बोकड?" शेळीनं हसत डोळा मारला.
मग तिसरा मजला आला, शेळी बाहेर पडली. पाचव्या मजल्यावर गाय बाहेर पडली. रोजचीच गोष्ट आज पुन्हा नव्यानं घडली.
दुपारी कुत्र्याची पिल्लं निमंत्रण द्यायला आली. पप्पा चेअरमन झाल्याबद्दल सेलिब्रेशन होतं म्हणे.
संध्याकाळपासून सोसायटीत आनंदोत्सव सुरु झाला. डॉल्बीवर गाणं वाजू लागलं...
"हाडं कड कड् कड कड् कड कड् कडाड्... कड कड् कड कड् कड कड् कडाड्..."
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
No comments:
Post a Comment