ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, August 5, 2018

तू जो मिला...

#FriendshipDay Special #ShortStory
ReadingTime: 03:00 Minutes

ब-याचदा आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत नाही, म्हणून आपण निराश होतो. पण ती गोष्ट का मिळाली नाही याचा नीट विचार केला तर असं कळतं की, आपण चुकीच्याच दिशेला शोध घेत होतो. आपल्याला हवी असलेली गोष्ट जवळपासच होती, पण आपण दूर-दूर शोधत राहिलो.

अशीच काहीशी गोष्ट आहे आदित्य आणि निशाची. आदित्य तसा हुशार आणि कष्टाळू मुलगा, पण सतत असमाधानी. आपल्याला हवं ते अजून मिळालंच नाही, काहीतरी राहून गेलंय, असं त्याला नेहमी वाटायचं. कितीही यश मिळालं तरी त्याला ते अपूर्णच वाटायचं.

अशा आदित्यला भेटली निशा, थोडी बालिश, थोडी खोडकर; पण तेवढीच समजूतदार आणि प्रेमळही. कुणा कॉमन फ्रेन्डनं दिलेल्या पार्टीत दोघांची ओळख झाली आणि असमाधानी, अपूर्ण असा आदित्य नकळत निशाच्या मनमोकळ्या हास्याकडं, लाघवी बोलण्याकडं आकर्षित होत गेला.

भेटी-गाठी, गप्पा-गोष्टी सुरु झाल्या आणि आदित्यला आयुष्याचा वेगळाच अर्थ उलगडत गेला. कामाशिवाय पाच मिनिटंही एका ठिकाणी न थांबणारा आदित्य, आता निशाची वाट बघत तासन्‌तास वेळ घालवू लागला. तिच्यासोबत भटकताना त्याच्या लक्षात आलं की आपण जन्मल्यापासून याच शहरात राहिलो, तरी खूप काही बघायचं राहिलंच होतं. विनाकारण इकडून-तिकडं, या रस्त्यावरुन, त्या रस्त्यावरुन फिरताना त्यानं खूप माणसं बघितली, त्यांची वेगवेगळी आयुष्यं बघितली. त्यांच्या अडचणी बघितल्या आणि तरीही त्यांचं आनंदात जगणं बघितलं. मग स्वतःच्या आयुष्याशी त्यांची तुलना करुन बघितली आणि त्याला जाणवलं की, आपल्याला जे हवंहवंसं वाटत होतं, ते कदाचित आपल्याच आजूबाजूला लपलंय.

निशाला भेटण्यापूर्वी आदित्यचं फ्रेन्ड सर्कल खूप लिमिटेड होतं. दुस-या कुणाचं फारसं ऐकून घेणंही त्याला जमत नसे. पण निशाचा एकही शब्द तो खाली पडू देत नव्हता. तिनं सांगितलेलं काम पूर्ण झालंच पाहिजे, यासाठी तो जिवाचा आटापिटा करु लागला. आणि हळूहळू त्याला स्वतःच्याच छुप्या क्षमता लक्षात येऊ लागल्या. पूर्वी कधी प्रयत्नही न केल्यानं त्याला ज्या गोष्टी जमणार नाहीत असं वाटायचं, त्या सगळ्या गोष्टी आता तो मजेत करु लागला. आणि आपल्याला हे जमलं याचं समाधान त्याच्या चेह-यावर झळकू लागलं. त्याच्या कपाळावरच्या आठ्या गायब झाल्या आणि त्याच्या गालावर मात्र वरचेवर खळी दिसू लागली.

निशाला भेटण्यामागं आदित्यचा कसलाही खास उद्देश नव्हता. जे झालं ते सगळं दोघांच्याही नकळत, काहीच न ठरवता. पण निशानं त्याच्या आयुष्यात प्रवेश करताच त्याचं आयुष्य बदलून गेलं. तो हसायला शिकला. समाधानी रहायला शिकला. त्याला आता काहीतरी मिळाल्यासारखं वाटू लागलं. अपूर्णतेची भावना निघून गेली आणि आयुष्य संपूर्ण वाटू लागलं…

आज निशाला भेटायला निघाला तेव्हा त्यानं रेडीओवर हे गाणं ऐकलं. आदित्यला वाटलं, हे गाणं खास त्याच्यासाठीच लावलं होतं जणू! गाणं गुणगुणतच त्यानं फ्लॅटचं मेन डोअर लॉक केलं आणि पाय-या उतरत पार्किंगकडं निघाला…

आशियाना मेरा, साथ तेरे है ना
ढूँढते तेरी गली, मुझको घर मिला..
आ-बो-दाना मेरा, हाथ तेरे है ना
ढूँढते तेरा खुदा, मुझको रब मिला..
तू जो मिला, लो हो गया मैं काबिल
तू जो मिला, तो हो गया सब हासिल
मुश्किल सही, आसाँ हुई मंजिल..
क्यूँकी तू धडकन, मैं दिल…

- मंदार शिंदे
9822401246


Share/Bookmark

No comments:

Post a Comment