दारूची दुकाने बंद करा; जेणेकरून मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळेल
लोकमत न्यूज नेटवर्क | May 31, 2021
दारूची
दुकाने बंद करावीत, जेणेकरून मुलांना घरी सुरक्षित वातावरण मिळू शकेल आणि
कुटुंबासाठी पैसे कमावण्याची गरज पडणार नाही. बालमजुरीची व्याख्या तसेच
धोकादायक आणि अ-धोकादायक व्यवसायांबद्दल अधिक स्पष्टता आणावी. या
संकल्पनांमधील अस्पष्टतेमुळे मुलांच्या शोषणास वाव मिळतो. शिक्षणाच्या
महत्त्वाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी; विशेषत: पालकांना शिक्षणाचे
महत्त्व पटवून द्यावे, अशा विविध मागण्या शेती, वीटभट्टी, भाजीविक्री,
घरकाम, तसेच कचरावेचक अशा कामांमध्ये गुंतलेल्या मुलांनी मांडल्या.
जागतिक
बालमजुरी विरोधी दिनाच्या निमित्ताने बालमजुरीविरोधी अभियानाच्या
महाराष्ट्र शाखेतर्फे शुक्रवारी (दि. २८) राज्यस्तरीय आॅनलाईन परिसंवाद
झाला. गाव/वस्ती आणि शाळा पातळीवरील बालपंचायत इत्यादी कार्यान्वित
कराव्यात. आई-वडील कामासाठी घरापासून दूर असताना मुलांना सुरक्षित वातावरण
देणाऱ्या वस्तीपातळीवरील सेंटर्स आणि पाळणाघरांची व्यवस्था करावी. अशी
सेंटर्स मुलांना आॅनलाइन शिक्षणासाठी देखील उपयोगी पडू शकतील. कुटुंबातील
प्रौढ व्यक्तींना आर्थिक साहाय्य आणि उपजीविकेच्या जास्त संधी उपलब्ध करून
द्याव्यात, ज्यामुळे मुलांना काम करण्याऐवजी आपले शिक्षण सुरू ठेवता येईल,
अशा मागण्यांमधून बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून
मुलांनी अपेक्षा व्यक्त केल्या.
बालमजुरी विरोधी अभियानाच्या राज्य
संयोजक एलिशिया तौरो यांनी अशा परिसंवादाच्या माध्यमातून मुलांना आपली मते
आणि मागण्या मांडण्याची संधी देण्याची गरज व्यक्त केली. मंदार शिंदे यांनी
सहभागी मुलांच्या सत्राचे सूत्रसंचालन केले, तर आरोकिया मेरी यांनी
मुलांच्या तसेच बालमजुरी विरोधी अभियानाच्या मागण्यांची यादी सादर केली.
पूर्व राज्य संयोजक मनीष श्रॉफ यांनी आभार मानले. या राज्यस्तरीय
परिसंवादांमध्ये सादर करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने १० जून रोजी
एका राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन बालमजुरी विरोधी अभियानातर्फे करण्यात
येणार आहे.
https://www.lokmat.com/pune/close-liquor-stores-so-children-have-safe-environment-home-a684