इतर अनेक प्रस्थापित व नवनवीन उपचार पद्धतींबरोबरच, आजही बर्याच ठिकाणी भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथीचा वापर केला जातो. याचं कारण म्हणजे, या पद्धतीच्या उपचारांची आणि औषधांची सर्वत्र उपलब्धता. तसंच, सर्वसामान्यांना शारीरिक व आर्थिकदृष्ट्या परवडणार्या उपचार पद्धती म्हणूनही यांच्याकडं पाहिलं जातं.
पूरक आणि पर्यायी औषधं, तसंच पारंपारिक चिकित्सा पद्धती यांचं महत्त्व एकंदर जगभरात वाढू लागलंय. त्यामुळं, भारतीय चिकित्सा पद्धतींकडं देखील लोकांचा ओढा वाढतोय. रासायनिक औषधांचे विपरीत परिणाम आणि प्रस्थापित आरोग्य सेवांचे वाढते दरही याला कारणीभूत आहेत. दीर्घायुष्याची कामना आणि बदलत्या जीवनशैलीनं निर्माण केलेल्या शारीरिक/मानसिक समस्या, या दोन्हींसाठी नवनवीन उपचार व तंत्रज्ञान विकसित होत असलं तरी, लोकांना साध्या-सोप्या उपचार पद्धतींमध्ये जास्त रस आहे. अशा पद्धती, ज्यानं आरोग्यविषयक समस्यांचं निराकरण तर होईलच पण त्याचबरोबर जीवनमानाचा दर्जाही उंचावेल.
सुदैवानं, भारताच्या प्राचीन चिकित्सा पद्धतींमध्ये रोगप्रतिबंधक (प्रिव्हेन्टीव्ह) आणि रोगनिवारक (क्युरेटीव्ह) उपचार पद्धतींचा अनमोल खजिना उपलब्ध आहे. भारतीय चिकित्सा पद्धतींमध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, सिद्ध, युनानी, तसंच होमिओपॅथी आदींचा समावेश होतो. यांची काही खास वैशिष्ट्यं आहेत. उदाहरणार्थ, या पद्धतींमधील उपचारांची विविधता व लवचिकता, जी एकाच रोगावर वेगवेगळ्या रुग्णांच्या वैद्यकीय स्थितींनुसार निरनिराळ्या पद्धतीचे उपचार सुचवते. यामुळं व्यक्तिगत उपचारांतून दीर्घकाळ टिकणारे उपाय योजणं शक्य होतं. या पद्धतीच्या औषधींची व अन्य सामग्रीची उपलब्धता हेही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. आपल्या आजूबाजूला आढळणार्या वनस्पती व पदार्थांमधून ही औषधं बनवली जातात. रसायनांचा वापर नसल्यानं यांच्यापासून साईड-इफेक्टचा धोका नाही. तसंच, औषध निर्मितीसाठी सर्वसाधारण तंत्रज्ञान व त्यामुळं तुलनेनं कमी खर्चात उपचार शक्य होतात. या पद्धती परंपरेशी व संस्कृतीशी निगडीत असल्यानं त्यांना वर्षानुवर्षं समाजमान्यता मिळत आलेली आहे. या बाबींचा विचार केल्यास असं लक्षात येईल की, भारतासारख्या देशात व्यापक प्रमाणावर प्रभावी आरोग्य सेवा पुरवण्याची क्षमता या चिकित्सा पद्धतींमध्ये आहे.
आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी, योग व निसर्गोपचार, यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा रोगप्रतिबंधक आणि रोगनिवारक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, ज्या इतर पद्धतींच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि गुणकारक ठरल्या आहेत. या उपचार पद्धतींकडं शासकीय पातळीवरुन दीर्घकाळ दुर्लक्ष झालं असलं तरी, १९८३च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये, संबंधित चिकित्सा पद्धतींचा पुरेपूर वापर होण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं. १९९५ मध्ये भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथी (ISM&H) विभागाची स्थापना करण्यात आली.
आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या केंद्रीय समितीनं १९९९ मध्ये सादर केलेल्या शिफारशींपैकी काही मुद्दे या क्षेत्रात भरपूर नव्या संधी निर्माण करणारे होते. जसे की -
- प्रत्येक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रावर किमान एक, भारतीय चिकित्सा पद्धतीचा (ISM&H) डॉक्टर असावा.
- अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या अनुपलब्धतेमुळं रिकाम्या राहिलेल्या जागा, भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी भरुन काढाव्यात.
- ग्रामीण रुग्णालयांमध्ये भारतीय चिकित्सा पद्धतींची उपचार केंद्रं सुरु करावीत. तसंच, या उपचार पद्धतींचा जनतेला फायदा मिळवून देण्यासाठी, राज्य व जिल्हा पातळीवरील सरकारी इस्पितळांत स्वतंत्र विभाग उघडावेत.
भारतीय चिकित्सा पद्धती व होमिओपॅथी (ISM&H) या विभागाचं नोव्हेंबर २००३ मध्ये, 'आयुष' (AYUSH म्हणजे आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, आणि होमिओपॅथी) असं नामकरण करण्यात आलं. देशातील, वरील भारतीय चिकित्सा पद्धतींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणं, हे या विभागाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाशी संलग्न असणार्या 'आयुष' विभागाकडून मान्यता प्राप्त केलेल्या आयुर्वेदीक मेडीकल कॉलेजांमध्ये देशपातळीवर पुढील अभ्यासक्रम चालवले जातात -
१. पदवी अभ्यासक्रम - साडेपाच वर्षांचा 'आयुर्वेदाचार्य' (म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदीक मेडिसीन अॅण्ड सर्जरी - BAMS) हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. साडेचार वर्षं मुख्य अभ्यासक्रम आणि एक वर्ष इंटर्नशिप असं याचं स्वरुप आहे.
२. पदव्युत्तर अभ्यासक्रम - आयुर्वेद वाचस्पती (MD) किंवा आयुर्वेद धन्वंतरी (MS) असा तीन वर्षांचा विशिष्ट विषयांचा पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रम आहे. सर्वसाधारणपणे २२ विषयांमध्ये एम.डी. किंवा एम.एस. करता येतं.
३. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम - सर्वसाधारणपणे १६ विषयांमध्ये पदव्युत्तर पदविका (PG Diploma) अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याचा कालावधी आहे दोन वर्षं.
आयएमसीसी अॅक्ट १९७० नुसार, भारतातील आयुर्वेद, युनानी इ. चिकित्सा पद्धतींचं पदवी व पदव्युत्तर शिक्षण, तसंच आयुर्वेदीक उपचार पद्धतीचा वापर (प्रॅक्टीस) यांचं नियंत्रण, भारतीय चिकित्सा केन्द्रीय परिषद (सीसीआयएम) या नियामक मंडळाकडं आहे. भारतीय चिकित्सा पद्धतींचे अभ्यासक्रम व महाविद्यालयांची सर्व माहिती परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे - www.ccimindia.org.