ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, February 11, 2012

दादा कोंडकेंची कविता...

दादा कोंडकेंचं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य हिट चालू होतं. करंट टॉपिकवर दादा खुमासदार टिप्पणी करून हशा घेत. बतावणीमध्ये एक मयताचा सीन होता. दादा त्या सीनच्या वेळी वसंत सबनिसांना विचारत, 'मयतीला कुणाकुणाला बोलवायचं?' वसंतराव प्रेक्षागारात उपस्थित असलेल्या नामवंताचं नाव घेत. त्यावर दादा फर्मास कॉमेंट करत. एका प्रयोगाला पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात प्रख्यात नाटककार, कवी, 'वाहतो ही दुर्वांची जुडी' नाटकाचे लेखक बाळ कोल्हटकर हजर होते. सीन सुरू झाला.

दादाः मयतीला कुणाला बोलवायचं?
सबनीसः बाळ कोल्हटकरांना बोलवूया.
दादाः नको, नको, मुडदा राहिला बाजूला आणि उगाच 'डी' वर 'डी' च्या फुटकळ कवितेच्या उड्या पडतील मयतावर. नको.

यावर सबनीस रागावले. त्यांना 'दुर्वांची जुडी' नाटक खूप आवडायचं. बाळ कोल्हटकरांबद्दल खूप आदर होता. ते दादांना म्हणाले, कोल्हटकरांच्या 'जुडी'ची टिंगल करताय. एक तरी 'डी' वर 'डी' ची फुटकळ का होईना कविता तुम्हाला आत्ता म्हणता येईल का?

सगळ्यांना वाटलं की दादांची बोलती बंद होणार, पण कसचं काय? त्यांनी प्रेक्षकांत बसलेल्या बाळ कोल्हटकरांकडे बघत 'ऑन द स्पॉट' कविता सुरू केली -

सुंदर पोहे पातळ पातळ
खमंग तुकडे खोबरे पुष्कळ
शेंग, चुरमुरे अन्‌ डाळ
या सर्वांनी, विविध चवींनी
असा बनविला चविष्ट चिवडा
पडते त्यावर 'उडी'
बांधतो ही चिवड्याची 'पुडी'

यावर प्रचंड हशा उसळला...
बाळ कोल्हटकरांनी प्रेक्षागारातून दादांना वंदन करुन, त्यांच्या उत्स्फूर्ततेला दाद दिली.

- सुधीर गाडगीळ
'आठवणी लेखणी अन्‌ वाणीच्या' (ग्राहकहित दिवाळी २०११)

Share/Bookmark

No comments:

Post a Comment