ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, August 15, 2022

Narcondam: Marathi Play Review

तुमचा 'प्लॅन बी' काय आहे?विकास आणि विनाश. एकाच नाण्याच्या दोन बाजू. कुणाचा तरी विकास म्हणजे कुणाचा तरी विनाश. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. लगेच किंवा कालांतरानं. संपूर्णपणे विनाश टाळून विकास साधणं शक्य आहे का? या प्रश्नापासून सुरु झालेला आणि उत्तराऐवजी पुन्हा त्याच प्रश्नापाशी नेऊन सोडणारा एक 'प्रयोग' म्हणजे - नारकोंडम!

'नारकोंडम' या विचित्र नावावरून या नाटकाच्या / दीर्घांकाच्या विषयाची कल्पना येत नाही, ही नाटक आणि प्रेक्षक या दोघांसाठी जमेची बाजू. नाटक बघायला जाणार असाल तर या नावाबद्दल माहिती 'गुगल' करणं कटाक्षानं टाळा. (आणि नसाल बघायला जाणार, तर द्या सोडून. उगाच काहीतरी शोध लावून सोशल मिडीयावर सस्पेन्स फोडू नका.)

बुद्धीबळाच्या पटावरचे हे काळे आणि हे पांढरे, अशा पात्र परिचयातून नाटकाची सुरुवात होते; पण हळूहळू काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्यातले काळे आपल्याला दिसायला लागतात. शेवटी तर प्रेक्षक म्हणून गेलेल्या आपल्यालाच निर्णायक चाल खेळायचं आव्हान हे नाटक देतं. प्रेक्षकांपासून एका वेगळ्या उंचीवर - स्टेजवर - न घडता हे नाटक प्रेक्षकांच्या आजूबाजूला घडतं. प्रेक्षकांना आपल्यामध्ये सामावून घेतं. त्या-त्या प्रसंगामध्ये आपण स्वतः उपस्थित आहोत, त्या नेपथ्याचाच एक भाग आहोत, असा एक वेगळा अनुभव या दीड तासांमध्ये मिळतो. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, मोकळ्या आकाशाखाली, मग पुढच्याच क्षणी बंद केबिनमध्ये किंवा घराच्या दिवाणखान्यात, अशा वेगवेगळ्या जागांवर आपल्याला प्रत्यक्ष घेऊन जायची किमया या नाटकाचे संवाद आणि ते सादर करणारे कलाकार साधतात. पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार, धूर्त, अनुभवी, आक्रमक, हट्टी, भावनिक, संतुलित, अशा निरनिराळ्या भूमिकांचा आनंद आपल्याला घेता येतो. दीपाली, लक्ष्मी, रणजीत, अवनीश, पराग, हृषीकेश, प्रदीप अशा सगळ्या कलाकारांनी धावफलक हलता ठेवायची जबाबदारी चपखल पार पाडलीय. हा दीर्घांक असला तरी, कथानकाला आणि सादरीकरणाला स्वतःचा एक विलक्षण वेग आहे. खटकेबाज संवाद आणि सर्वच पात्रांची एकमेकांसोबत जुगलबंदी यामुळं, विषय गंभीर असला तरी नाटक बघायला मजा येते. प्रदीप वैद्यांच्या दिग्दर्शनाची कमाल म्हणजे, नाटक पहिल्या पाच-सात मिनिटातच पकड घेतं आणि शांतपणे एक-एक पदर उलगडत फक्त दीड तासात एक मोठा विषय आपल्यापर्यंत पोहोचवतं.

आपल्या आजूबाजूला अनेक छोट्या-मोठ्या घटना घडत असतात. काही घटना घडून गेल्यावर आपल्याला समजतात; काही घडत असताना त्यांचे अपडेट आपल्याला अर्धवट स्वरुपात मिळत असतात. पण जे घडून गेलंय किंवा घडतंय, त्याच्या पलिकडं - पडद्यामागं - काय घडलं असेल, घडत असेल, याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत असतं. मग हाती लागलेल्या मर्यादीत माहितीच्या आधारावर आणि तर्क व कल्पनाशक्तीच्या जोरावर काहीतरी लिहिलं जातं, सादर केलं जातं. असाच एक सशक्त प्रयोग आहे - 'नारकोंडम'! वर उल्लेख केल्यानुसार, विनाश टाळून विकास साधण्याचा काही पर्यायी मार्ग - प्लॅन बी - खरंच असतो का, याबद्दल प्रश्नांची पेरणी करून हे नाटक संपतं, एवढंच कथानकाबद्दल सांगेन. बाकी तुमचा इतर काही महत्त्वाचा 'प्लॅन बी' नसेल, तर नक्की या नाटकाच्या पुढच्या प्रयोगाला जा आणि एका उत्तम सादरीकरणाचा आनंद लुटा!

- मंदार शिंदे 9822401246Share/Bookmark

Sunday, August 14, 2022

Swatantryache Gaane (Freedom Song)


स्वातंत्र्याचे गाऊ गाणे चला उभारू नवी तोरणे
आनंदाचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू

नाही गुलामी आता कुणाची
पहाट झाली मुक्त क्षणांची
भेदभावही मिटून गेला
समानतेचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू
आनंदाचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू...

हटेल गरिबी अन्‌ लाचारी
होईल बरकत धन-धान्याची
रंक न राहील कुणी इथे
श्रीमंतीचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू
आनंदाचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू...

अजस्र यंत्रे कामे करतील
कष्टकऱ्यांचे खिसेही भरतील
काम मिळे अन्‌ दाम मिळे
या प्रगतीचाही करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू
आनंदाचा करू हो उत्सव स्वातंत्र्याचा करू...

- अक्षर्मन (9822401246)


Share/Bookmark

Friday, August 12, 2022

Baasari - Short Story in Marathi

बासरी
******

एके दिवशी एका शहरात आला एक बासरीवाला. रंगीत-रंगीत बासऱ्या त्यानं आणल्या होत्या विकायला. स्वतः वाजवत होता तो बासरी खूप सुंदर. मंत्रमुग्ध होऊन जाई, सूर पडती ज्याच्या कानांवर.

मोठमोठ्यानं ओरडत होता - बासरी घ्या बासरी.. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की. ओरडून झाल्यावर वाजवू लागे बासरी पुन्हा-पुन्हा. आनंदानं ऐकणारे मग डोलवू लागती माना.

लोकांना वाटलं नक्कीच ही बासरी आहे खास. बासरीसोबत खरा आनंद मिळणार अगदी हमखास! बासरीवाला म्हणतच होता - बासरी घ्या बासरी.. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की. 

जिथं-जिथं तो जाईल तिथं लागला जणू मेळा. बासरी विकत घ्यायला एवढे लोक झाले गोळा. दुपारपर्यंत त्याच्या सगळ्या बासऱ्या विकून झाल्या. स्वतःची एकच बासरी उरली हातामध्ये त्याच्या. एकजण म्हणाला त्याला - हीपण बासरी विकून टाक. नकार देऊन बासरीवाला घरी निघाला चूपचाप. 

विकत घेतली ज्यांनी बासरी, बसले सगळे वाजवायला. एकाची पण वाजेना धड, लागले हवा फुंकायला. तुझी वाजते का, त्याची वाजते का, चौकशी झाली सुरु. सूर कुणालाच काढता येईना, नुसता आवाज फुरुफुरु.

लोकांना आता वाटायला लागलं, फसवणूक झाली आपली. एकाची पण वाजेना कशी सुरात नवीन बासरी. बासरीवाल्याची एकच बासरी होती चांगली वाजणारी; बाकीचा माल खराब त्यानं मारला आपल्या माथी. चिडले लोक, बासरीवाल्यानं दिला होता धोका. शिकवू त्याला नक्की धडा, भेटू तर दे पुन्हा.

थोड्या दिवसांनी पुन्हा आला बासरीवाला शहरात. सूर तेच पुन्हा घुमले त्याच गल्ली-बोळात. चला चला, जाब विचारू, घरोघरी गेला निरोप. त्याच्याभोवती गोळा होऊन सगळे करू लागले आरोप.

वादावादी झाली खूप, पण निकाल काही लागेना. न्यायाधीशांकडं घेऊन गेले न्यायनिवाडा करायला. घडलं काय, तक्रार काय, सांगितलं सगळं उलगडून. जज साहेब बुचकळ्यात पडले, असली केस ऐकून.

काहीतरी गडबड आहे नक्की, आली त्यांना शंका. एवढे लोक उगीचच नाही करणार एकत्र दंगा. बासरीवाल्याला म्हणाले -  सांग, काय घडलं होतं? खराब बासरी विकलीस ह्यांना, खरं आहे की खोटं?

खोटं आहे, न्यायाधीश साहेब, तो म्हणाला ठासून. चांगल्याच बासऱ्या दिल्यात मी, एक-एक तपासून. खराब बासरी एकसुद्धा मी सोबत नाही ठेवत. काही म्हणा, खोट्याचा धंदा आपल्याला नाही झेपत.

जज म्हणाले - यांच्या बासऱ्या का नाही वाजत देवा? तुझ्याच बासरीतून सुमधुर संगीत, यांच्यातून नुसती हवा?

तो म्हणाला - म्हणणं माझं नीट ऐकलं नाही ह्यांनी. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की.

म्हणजे काय, नीट सांग, जज साहेब म्हणाले. सत्य मिळेल की आनंद, हे कसे ओळखायचे?

तो म्हणाला - बासरीनं माझ्या नसेल दिला आनंद; पण सत्य सांगितलेलं दिसणार कसं, डोळेच जर ठेवले बंद? बासरी विकत घेतली म्हणून संगीत कसं येईल? वाजवायला येत नसेल तर नुसती हवाच येईल-जाईल.

सगळ्या बासऱ्या घेतल्या परत, हिरव्या, पिवळ्या, रंगीत. एक-एक बासरी वाजवून त्यानं ऐकवलं मधूर संगीत.

मला आनंदी बघून ह्यांना वाटलं, सोप्पं आहे. दहा रुपयात बासरी आणि आनंद, फारच स्वस्त आहे. खरं तर ह्यांना माहीत नाही बासरी कशी वाजवायची. अपेक्षा मात्र सगळ्यांना आहे सुमधूर संगीत ऐकायची. सत्य माझ्या बासरीनं सांगितलं आहे, साहेब. क्षमता आणि अपेक्षांचा बसत नाही इथं मेळ. आरोप ह्यांचा माझ्यावर, फसवणूक मी केली. स्वतःच स्वतःला फसवणाऱ्यांची फिर्याद तुम्ही घेतली.

कष्ट नकोत, शिक्षण नको, मग आनंद कसा मिळेल? पैशानं विकत मिळेल बासरी, संगीत कसं मिळेल? मिळवू शकतात आनंद हे स्वतः बासरी वाजवायला शिकून. तुमचा वेळ वाया घालवला बघा, माझ्यावर आरोप करून.

जज साहेबांनी डोलवली मान, केस झाली सोपी. आरोप करणारे फिर्यादी आता स्वतःच झाले आरोपी. बासरीवाल्याचं केलं कौतुक, केली त्याची सुटका. आनंदाची चाहूल दाखवून लावून गेला चटका… 

मूळ हिंदी कथा - सचिन कुमार जैन
मराठी रूपांतर - मंदार शिंदेShare/Bookmark