ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Friday, August 12, 2022

Baasari - Short Story in Marathi

बासरी
******

एके दिवशी एका शहरात आला एक बासरीवाला. रंगीत-रंगीत बासऱ्या त्यानं आणल्या होत्या विकायला. स्वतः वाजवत होता तो बासरी खूप सुंदर. मंत्रमुग्ध होऊन जाई, सूर पडती ज्याच्या कानांवर.

मोठमोठ्यानं ओरडत होता - बासरी घ्या बासरी.. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की. ओरडून झाल्यावर वाजवू लागे बासरी पुन्हा-पुन्हा. आनंदानं ऐकणारे मग डोलवू लागती माना.

लोकांना वाटलं नक्कीच ही बासरी आहे खास. बासरीसोबत खरा आनंद मिळणार अगदी हमखास! बासरीवाला म्हणतच होता - बासरी घ्या बासरी.. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की. 

जिथं-जिथं तो जाईल तिथं लागला जणू मेळा. बासरी विकत घ्यायला एवढे लोक झाले गोळा. दुपारपर्यंत त्याच्या सगळ्या बासऱ्या विकून झाल्या. स्वतःची एकच बासरी उरली हातामध्ये त्याच्या. एकजण म्हणाला त्याला - हीपण बासरी विकून टाक. नकार देऊन बासरीवाला घरी निघाला चूपचाप. 

विकत घेतली ज्यांनी बासरी, बसले सगळे वाजवायला. एकाची पण वाजेना धड, लागले हवा फुंकायला. तुझी वाजते का, त्याची वाजते का, चौकशी झाली सुरु. सूर कुणालाच काढता येईना, नुसता आवाज फुरुफुरु.

लोकांना आता वाटायला लागलं, फसवणूक झाली आपली. एकाची पण वाजेना कशी सुरात नवीन बासरी. बासरीवाल्याची एकच बासरी होती चांगली वाजणारी; बाकीचा माल खराब त्यानं मारला आपल्या माथी. चिडले लोक, बासरीवाल्यानं दिला होता धोका. शिकवू त्याला नक्की धडा, भेटू तर दे पुन्हा.

थोड्या दिवसांनी पुन्हा आला बासरीवाला शहरात. सूर तेच पुन्हा घुमले त्याच गल्ली-बोळात. चला चला, जाब विचारू, घरोघरी गेला निरोप. त्याच्याभोवती गोळा होऊन सगळे करू लागले आरोप.

वादावादी झाली खूप, पण निकाल काही लागेना. न्यायाधीशांकडं घेऊन गेले न्यायनिवाडा करायला. घडलं काय, तक्रार काय, सांगितलं सगळं उलगडून. जज साहेब बुचकळ्यात पडले, असली केस ऐकून.

काहीतरी गडबड आहे नक्की, आली त्यांना शंका. एवढे लोक उगीचच नाही करणार एकत्र दंगा. बासरीवाल्याला म्हणाले -  सांग, काय घडलं होतं? खराब बासरी विकलीस ह्यांना, खरं आहे की खोटं?

खोटं आहे, न्यायाधीश साहेब, तो म्हणाला ठासून. चांगल्याच बासऱ्या दिल्यात मी, एक-एक तपासून. खराब बासरी एकसुद्धा मी सोबत नाही ठेवत. काही म्हणा, खोट्याचा धंदा आपल्याला नाही झेपत.

जज म्हणाले - यांच्या बासऱ्या का नाही वाजत देवा? तुझ्याच बासरीतून सुमधुर संगीत, यांच्यातून नुसती हवा?

तो म्हणाला - म्हणणं माझं नीट ऐकलं नाही ह्यांनी. बासरी सांगेल एक सत्य किंवा देईल आनंद नक्की.

म्हणजे काय, नीट सांग, जज साहेब म्हणाले. सत्य मिळेल की आनंद, हे कसे ओळखायचे?

तो म्हणाला - बासरीनं माझ्या नसेल दिला आनंद; पण सत्य सांगितलेलं दिसणार कसं, डोळेच जर ठेवले बंद? बासरी विकत घेतली म्हणून संगीत कसं येईल? वाजवायला येत नसेल तर नुसती हवाच येईल-जाईल.

सगळ्या बासऱ्या घेतल्या परत, हिरव्या, पिवळ्या, रंगीत. एक-एक बासरी वाजवून त्यानं ऐकवलं मधूर संगीत.

मला आनंदी बघून ह्यांना वाटलं, सोप्पं आहे. दहा रुपयात बासरी आणि आनंद, फारच स्वस्त आहे. खरं तर ह्यांना माहीत नाही बासरी कशी वाजवायची. अपेक्षा मात्र सगळ्यांना आहे सुमधूर संगीत ऐकायची. सत्य माझ्या बासरीनं सांगितलं आहे, साहेब. क्षमता आणि अपेक्षांचा बसत नाही इथं मेळ. आरोप ह्यांचा माझ्यावर, फसवणूक मी केली. स्वतःच स्वतःला फसवणाऱ्यांची फिर्याद तुम्ही घेतली.

कष्ट नकोत, शिक्षण नको, मग आनंद कसा मिळेल? पैशानं विकत मिळेल बासरी, संगीत कसं मिळेल? मिळवू शकतात आनंद हे स्वतः बासरी वाजवायला शिकून. तुमचा वेळ वाया घालवला बघा, माझ्यावर आरोप करून.

जज साहेबांनी डोलवली मान, केस झाली सोपी. आरोप करणारे फिर्यादी आता स्वतःच झाले आरोपी. बासरीवाल्याचं केलं कौतुक, केली त्याची सुटका. आनंदाची चाहूल दाखवून लावून गेला चटका… 

मूळ हिंदी कथा - सचिन कुमार जैन
मराठी रूपांतर - मंदार शिंदेShare/Bookmark

No comments:

Post a Comment