चला गोष्ट सांगूया...
😀😀😀😀😀😀
चिंगूस मुंगूसची गोष्ट
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
समुद्राच्या किनारी होतं एक गाव, गावामध्ये रहात होते एक तिकडमराव. तिकडमराव माणूस होता भलताच कंजूस, सगळे त्याला म्हणायचे ‘चिंगूस मुंगूस’. चिंगूस मुंगूसची बायको फारच बिचारी, कंजूषपणाला त्याच्या कंटाळली भारी. विकत आणलं नाही धान्य कणभर जरी, तिकडमराव म्हणायचे आज बनव श्रीखंड-पुरी. बायको म्हणायची, “ऑर्डर देत राहू नका उभे, किचनमध्ये येऊन बघा रिकामे सगळे डबे !” पैसे होतील खर्च जर गेलो दुकानात, तिकडमराव म्हणायचे मग “चालेल डाळभात !”
असे आपले चिंगूस मुंगूस लग्नात एकदा गेले, श्रीखंड-पुरी गुलाबजाम पोट भरून खाल्ले. पण लक्षात राहिली एकच गोष्ट पहिल्यांदाच खाल्ली, गोड-गोड मऊसूत खोबर्याची एक वडी. वडीची ती चव त्यांच्या तोंडामध्येच राहिली, आनंदानं नाचत त्यांनी घरची वाट धरली.
घरामध्ये शिरल्या-शिरल्या ऑर्डर त्यांनी सोडली, “बनवा बघू किलोभर मस्त खोबर्याची वडी.” बायको आली तरातरा किचनमधून चालत, कापडाची पिशवी मोठी हातात होती झुलत. पिशवी फेकून अंगावरती बायको ओरडली, “नारळ नाही घरामध्ये, साखरसुद्धा संपली.” पैसे होतील खर्च जर गेलो बाजारात, पण खोबर्याची वडीसुद्धा बसली होती मनात.
नाराजीनंच तिकडमराव बाजारात गेले, ‘नारळ-नारळ’ पुटपुटत रस्त्याने निघाले. घरापासून जवळच दिसला एक नारळवाला, लांबूनच विचारलं “एक नारळ केवढ्याला ?” नारळवाल्याला ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट, ‘पाच रुपये’ सांगून टाकले डिस्काउंटमध्ये झटपट.
“बापरे ! पाच रुपये ? नारळ एवढा महाग ?” नारळवाल्याने ऐकून लावला डोक्यालाच हात. म्हणाला “तिकडमराव, एक काम करा. इथून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. तिकडं मिळेल तुम्हाला नारळाची मोठ्ठी बाग, तिथले नारळ नक्कीच नाहीत इथल्याएवढे महाग !”
नारळ स्वस्त मिळवण्याची आयडीया त्यांना आवडली, दहा किलोमीटर चालत चालत कंजूष स्वारी निघाली. खूप वेळ चालल्यावर दिसली नारळाची मोठ्ठी बाग, “एक नारळ मिळेल काय ?” बाहेरून त्यांनी दिली हाक. बागेचा मालक चढला झाडावरती झटपट, त्यालासुद्धा ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट. ‘तीन रुपये’ नारळाचे झाडावरूनच सांगितले, याच्यापेक्षा स्वस्त नसते त्यालासुद्धा परवडले.
“बापरे ! तीन रुपये ? नारळ एवढा महाग ?” बागमालकाने ऐकून लावला डोक्यालाच हात. म्हणाला “तिकडमराव, एक काम करा. अजून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. तिकडं मिळेल तुम्हाला याहून मोठ्ठी बाग, तिथले नारळ नक्कीच नाहीत माझ्याएवढे महाग !”
नारळ अजून स्वस्त मिळणार - केवढी भारी गोष्ट, त्यासाठी करु म्हणाले चालायचे थोडे कष्ट. दहा किलोमीटर चालून चालून तिकडमराव थकले, खोबर्याची वडी आठवून पुन्हा पळत सुटले. शेवटी एकदा दिसली त्यांना नारळाची ती मोठ्ठी बाग, “एक नारळ केवढ्याला ?” बाहेरूनच दिली हाक. त्या बागेचा मालक बसला झाडामागं लपून, चिंगूस मुंगूसची कटकट आली माझ्याकडं कुठून ? ‘एक रुपया’ नारळाचा भाव सांगून टाकला, मालक कुठं दिसेना, आवाज फक्त ऐकला.
“बापरे ! एक रुपया ? नारळ एवढा महाग ?” बागेचा मालक खालीच बसला डोक्याला लावून हात. म्हणाला, “तिकडमराव, एक काम करा. अजून दहा किलोमीटर प्रवास तुम्ही करा. इथून दहा किलोमीटरवर भेट होईल समुद्राशी, समुद्राच्या किनारी दिसतील झाडंच झाडं नारळाची. किनार्यावरच्या झाडांचा कुणीच नाही मालक, वाट्टेल तेवढे नारळ तिथं मिळतील तुम्हाला फुकट !”
फुकट ! फुकट !! फुकट !!!
‘फुकट’ हा तर चिंगूस मुंगूसचा शब्द होता आवडता, हजार किलोमीटर चालून जाईल फुक्कट काही मिळवायला. चालून चालून दमले तरी पाय निघाले पुन्हा पुढे, नारळ-नारळ जप करत तिकडमराव समुद्राकडे. दहा किलोमीटर चालून जायला झाली त्यांना संध्याकाळ, पण किनार्यावर दिसली शेवटी नारळाच्या झाडांची माळ. वाकडे तिकडे आडवे सरळ, एका-एका झाडाला शंभर नारळ. या नारळांचा मालक कोण, किती नेले मोजणार कोण !
फुकट नारळ काढण्यासाठी, सरसर झाडावर चढली स्वारी. नारळ शोधून चांगला मोठ्ठा, चिंगूस मुंगूसनं मारला डल्ला. दोन्ही हातांनी नारळ धरून, खेचला सगळी शक्ती लावून.
पण तेवढ्यात काय झालं माहितीय ?
तिकडून आली वार्याची झुळुक, नारळाची झाडं हलली सुळुक-सुळुक. वारा वाहू लागला मग गोल-गोल, तिकडमरावांचा सुटला की तोल. पायांची पकड सुटली रे सुटली, नारळ पकडून स्वारी लटकली. हातांनी ठेवला नारळ धरून, झटकले पाय नि ओरडले खच्चून. “वाचवा ! वाचवा !! मेलो रे मेलो !!! कुठून बुद्धी सुचली अन् झाडावर चढलो !” आरडाओरडा त्यांचा तिथं ऐकणार होतं कोण, समुद्राच्या किनारी राहतंय तरी कोण !
पण काम संपवून तेवढ्यात कुठून तरी, हत्तीवाला माहूत एक चालला होता घरी. किनार्यावरुन आला त्याला आवाज ऐकू, माहूत म्हणाला ‘चला, जवळ जाऊन बघू’. जवळ जाऊन दिसलं त्याला झाड झुलणारं, झाडावर होतं एक माणूस लटकणारं. कोण लटकलंय बघून तो पळत सुटला झटपट, त्यालासुद्धा ठाऊक होती चिंगूस मुंगूसची कटकट.
“माहूत दादा, वाचवा मला, उपकार होतील फार… वाचलो तर मी घरी येऊन तुमचा करील सत्कार !”
माहूत बोलला हत्तीवरुन, “सत्काराचं करू काय ? पाचशे रुपये घेईन मी, सांगा तुम्ही देणार काय ?”
चिंगूस मुंगूस कित्ती कंजूष, पैसे कुठून द्यायला; जीव झाडावर टांगून घेतला पाच रुपये वाचवायला. पण आता काही खरं नाही, त्यांना कळून चुकलं; जिवंत राहण्यासाठी त्यांनी माहुताचं ऐकलं.
माहूत झाला खूष पाचशे रुपयांसाठी, मदतीसाठी झाडाजवळ त्यानं नेला हत्ती. हत्तीच्या पाठीवर राहिला माहूत उभा, म्हणाला “मी पाय धरतो, मग तुम्ही हात सोडा !” तिकडमरावांचे त्यानं घट्ट धरले पाय, हत्तीला कळेना नक्की चाललंय तरी काय ? घाबरून बिचारा सुटला पळत, माहुताला सोडला वरतीच लटकत.
माहुतानं ठेवले त्यांचे पाय घट्ट धरून, घाबराघुबरा होऊन तो ओरडला खच्चून. “वाचवा ! वाचवा !! मेलो रे मेलो !!! कुठून बुद्धी सुचली अन् मदतीला धावलो !” आरडाओरडा त्याचा तिथं ऐकणार होतं कोण, समुद्राच्या किनारी राहतंय तरी कोण !
पण काम संपवून तेवढ्यात कुठून तरी, घोडेस्वार मजेत एक चालला होता घरी. किनार्यावरुन आला त्याला आवाज ऐकू, घोडेस्वार म्हणाला ‘चला, जवळ जाऊन बघू’. जवळ जाऊन दिसलं त्याला झाड झुलणारं, झाडावर होतं डब्बल माणूस लटकणारं. कोण लटकलंय बघून तो पळत सुटला झटपट, नको म्हणाला आपल्यामागं चिंगूस मुंगूसची कटकट.
“घोडेवाले दादा, वाचवा आम्हाला, उपकार होतील फार… वाचलो तर मी घरी येऊन तुमचा करील सत्कार !”
घोडेस्वार बोलला, “मी सत्काराचं करू काय ? हजार रुपये घेईन मी, सांगा तुम्ही देणार काय ?”
चिंगूस मुंगूस कित्ती कंजूष, पैसे कुठून द्यायला; जीव झाडावर टांगून घेतला पाच रुपये वाचवायला. पण आता काही खरं नाही, त्यांना कळून चुकलं; जिवंत राहण्यासाठी त्यांनी घोडेस्वाराचं ऐकलं.
घोडेस्वार झाला खूष हजार रुपयांसाठी, झाडाजवळ घोडा घेऊन गेला मदतीसाठी. घोड्याच्या पाठीवर राहिला घोडेस्वार उभा, म्हणाला “मी पाय धरतो, मग तुम्ही हात सोडा !” लटकणार्या माहुताचे घट्ट धरले पाय, घोड्याला पण कळेना नक्की चाललंय तरी काय ? घाबरून बिचारा सुटला पळत, घोडेस्वाराला सोडला वरतीच लटकत.
कोणालाच कळेना असे कसे झाले, एक नाही दोन नाही लटकले तिघे. नारळाच्या शेंडीला झाला तिघांचा भार, घोडेस्वार आणि माहुतावर पडले तिकडमराव. जमिनीवर पडून त्यांची मोडली हाडं आधी, वरून नारळ पडून फुटली तिघांची पण डोकी.
खोबर्याच्या त्या वडीसाठी रामायण हे घडलं, चिंगूस मुंगूसचं कंजूषपण फारच महागात पडलं. शेवटी एका नारळाचे पाच रुपये वाचले, दवाखान्यात लाखो मात्र खर्च की हो झाले !!
(सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथेवर आधारित…)