ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, October 2, 2018

पाणी कसं अस्तं...

पाणी कसं अस्तं
- दिनकर मनवर
(दृश्य नसलेल्या दृश्यात)
पाणी हा शब्द
मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
की चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून

पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ ?

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून ?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं ?
पोह-यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं ?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं ?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीतलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठविले गेले नाहीत काय ?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं ?
नि दंगली घडवतं ते पाणी नस्तं ?

पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारांवर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माणसांची
ते पण पाणी पाणीच अस्तं ?

पाणी स्पृश्य अस्तं की अस्पृश्य ?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म ?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात ?

आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं
की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं ?
पाणी नदीतलं, नाल्यातलं, ओढ्यातलं, विहिरीतलं
पाणी तळ्यातलं, धरणातलं, सरोवरातलं, समुद्रातलं
पाणी ढगातलं, माठातलं, पेल्यातलं, डोळ्यांतलं
हे पाणी कुणाच्या मालकीचं अस्तं ?

पाणी नारळात येतं
छातीच्या बरगड्यात साचतं
फुफ्फुसातून पू होऊन स्रवतं
पोटात पाण्याचा गोळा होऊन राहतं
ईश्वराचा कोणता देवदूत हे पाणी न चुकता सोडत अस्तो ?

पाणी पारा अस्तं की कापूर ?
जे चिमटीत पकडता येत नाही
नि घरंगळून जात राहतं सारखं
किंवा कापरासारखं जळून जातं झर्कऽऽन

पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या
निव्वळ पाण्यासारखाच 


Share/Bookmark

No comments:

Post a Comment