ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, October 18, 2018

जिमला जाणारी स्त्री...

…लग्नाआधी, लग्न झाल्यावर काही काळ स्त्री स्वतःकडं दुर्लक्षच करते. तिचं मन तिच्या पुरुषावर या काळात सर्वस्वी केंद्रित झालेलं असतं. तिचं वेगळं अस्तित्व ती विसरलेलीच असते. आपण दिसतो कशा, बारीक होत आहोत की जाड होत आहोत, आपल्याला पाहून लोक काय म्हणतात याकडे तिचं लक्ष या काळात असत नाही. तिला स्वतःला ती जगातील सर्वांत सुंदर आणि भाग्यवान स्त्री वाटत असते, मग लोक काही म्हणोत. तिच्या दृष्टीनं तिच्या पुरुषाला ती आवडली की तिला पुरे असतं आणि कोणीही शहाणा पुरुष या काळात आपल्या स्त्रीविषयी तिच्याकडं खरं बोलत नसतो. ती जगातील सुंदर स्त्री असल्याचंच तो तिला अगदी शपथपूर्वक आणि प्रतिज्ञापूर्वक सांगतो आणि स्त्री हे खरं मानीत असते.

एकदा हा पहिला भर ओसरला की आधी पुरुषाला आणि मग स्त्रीला जाग येते. एक दिवशी जरा लक्षपूर्वक ती स्वतःकडं आरशात बघते आणि दचकते.

म्हणते, शीः, आपण अगदीच बऱ्या दिसत नाही. कशा आपल्या पुरुषाला आपण इतक्या आवडतो ? त्या अर्थी आंधळाच असला पाहिजे असं मनाशी गंमतीनं म्हणून ती बरं दिसण्याचा निश्चय करते. यासाठी स्त्रियांना सुचणारा पहिला उपाय : ब्युटी पार्लर. दुसरा : डाएटिंग आणि तिसरा : जिम जॉइन करणं.

जिममध्ये येणाऱ्या याहून वेगळ्या स्त्रिया, प्रसूत होऊन स्थूल झालेल्या. वजन तसं फार वाढलेलं नसलं तरी अशा स्त्रीला ते वाढलेलं दिसतं. पूर्वीच्या काळात अशी स्त्री अंगानं भरल्यानं अधिक आकर्षक मानली जात असे आणि कवी तिच्या उठून दिसणाऱ्या अवयवांवर उपमा अलंकारांची बरसात करीत. तिच्यावर शृंगारिक कविता रचीत. विशेषतः संस्कृत कवी. तो काळ फार जुना झाला. आता खुद्द स्त्रीलाच तिचं हे भरलेलं रूप कसं तरीच वाटतं. ते परत सडसडीत करण्याच्या निर्धारानं ती जिममध्ये पोचते.

काही स्त्रिया मूळच्याच वाढत्या अंगाच्या असतात. त्यांनी स्वतःच्या लठ्ठपणावर कितीही विनोद केले तरी त्यांचं लठ्ठ असणं त्यांना एकटेपणी त्रास देतं. आपण अशा का घडलो असं एकीकडं नशिबाला पुसत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यात स्वतःला लपवण्याच्या खटपटीत असतात. हे जमत नाही, वयाबरोबर आणि एखाद्या बाळंतपणानंतर अंग आणखीच सुटतं आणि डेस्परेट होऊन त्या जिमकडं धाव घेतात. एक खरं की, जिममध्ये येणारी स्त्री घाटदार होण्याच्या घाईत असते. तिला वाट पहाण्याला वेळ नसतो आणि झटपट रिझल्ट मिळावेत अशी तिची अपेक्षा असते. यासाठी वेगवेगळ्या अन्नाचा आणि सवयींचा त्याग करण्याला आणि जास्त फीदेखील देण्याला तिची ना नसते.

प्रश्न असा आहे की, असं झटपट घाटदार होता येतं का ? समजा, आलं. तरी तसं रहाता येतं का ?

नाही. तुमच्या दैनंदिन जगण्याचा आणि काळज्या चिंतांचा भाग यात तितकाच महत्त्वाचा असतो. त्या कमी होत नाहीत तोवर तुमचं वजनही फारसं कमी होणार नाही आणि हे या भगिनींना कळत नाही. त्यांना वाटतं, जिमचा सुपरव्हायजर आपल्याकडं द्यावं तसं लक्ष देत नाही म्हणून असं होतं.- ‘मसाज’ (लेखकः विजय तेंडुलकर)


Share/Bookmark

No comments:

Post a Comment