ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, July 3, 2023

एक 'भारी' अनुभव!नुकताच केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' येऊन गेला. लगेच 'बाईपण भारी देवा' सिनेमाचा ट्रेलर बघायला मिळाला. बहुतेक हा सिनेमा आधी बनवून तयार असावा. नावावरून आधी वाटलं, बाई'पण' भारी असते असं काहीतरी म्हणायचंय की काय! पण ट्रेलर बघितल्यावर कळालं, 'बाईपण' भारी असतं असं म्हणायचंय. विषय थोडा 'क्लिशे' वाटला खरा; पण केदार शिंदे ‘क्लिशे’ विषय घेऊन ‘विषय खोल’ सिनेमा बनवू शकतो, हे माहिती असल्यानं सिनेमा बघणार हे ठरलंच होतं.

स्क्रिप्टवर मजबूत पकड, शार्प डायलॉग्ज, सुंदर फ्रेम्स, कलाकारांच्या ‘बाई’गर्दीत सुद्धा प्रत्येक पात्राला न्याय देणारं फूटेज, आणि पारंपारिक-आधुनिक संगीताचं बेमालूम मिश्रण, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एक ‘भारी’ मराठी सिनेमा! रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, अशा दिग्गज आणि अनुभवी कलाकारांपासून, सुकन्या, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब, अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या 'डॉन' बायकांना एकत्र आणायचं काम कौतुकास्पद आहेच; पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यापैकी कुठल्याही कलाकाराला भाव खायची संधी न देता, 'बाईपण भारी देवा' हा शेवटपर्यंत 'दिग्दर्शकाचा सिनेमा' राहतो आणि आपल्याला नेमकं कुणाचं काम आवडलं किंवा कुठला भाग आवडला, हे अजिबात ठरवताच येऊ नये, याची व्यवस्था केदारनं केलेली दिसते.

सिनेमाची स्टोरी किंवा खरंतर वेगवेगळ्या पात्रांच्या समांतर चालणाऱ्या स्टोऱ्यांचं कोलाज, या दृष्टीकोनातून विचार करण्याऐवजी, हा म्युझिकल प्रवास अनुभवणं मी कधीही प्रेफर करेन. परंपरा विरुद्ध मॉडर्न लाईफस्टाईल, एकत्र कुटुंब विरुद्ध विभक्त कुटुंब, करियर की घर, दुष्ट की सज्जन, चांगले की वाईट, असा कुठलाच सामना किंवा जय-पराजय या सिनेमामध्ये बघायला मिळणार नाही. बघणाऱ्यानं आपल्या आयुष्यातल्या पात्रांशी आणि प्रसंगांशी आणि परिस्थितीशी संबंध जोडायचा प्रयत्न केला तरी यातून कसलाही बोध, निर्णय, आदर्श मिळवता येणार नाही. जे घडतंय त्याची मजा घ्यायची, जे पटतंय ते बरोबर न्यायचं, पटत नसेल ते सोडून द्यायचं, असा हलका-फुलका सिनेमा आहे 'बाईपण भारी देवा!’ पु. ल. देशपांडेंच्या 'वाऱ्यावरची वरात'मध्ये सुरुवातीला सूत्रधार (म्हणजे खुद्द पु. ल.) म्हणे - "आजचा आमचा हा कार्यक्रम असाच आपला मजेचा आहे, हसून सोडून द्यायचा आहे. त्याच्यात उगीचच साहित्यिक मूल्य वगैरे पहायचं नाही हं! म्हणजे ते सापडणार नाहीच..." या ‘डिस्क्लेमर’नंतर 'वाऱ्यावरची वरात' बघितली, की त्यातल्या साहित्यिक मूल्यानं आणि जीवन दर्शनानं प्रेक्षकांचे डोळे दिपून जातात, पण ते त्यांच्या लक्षातसुद्धा येत नाही. केदार शिंदेचा हा सिनेमा असाच काहीसा अनुभव देतो, असं मला माझ्या अनुभवावरून नमूद करावंसं वाटतं.

सिनेमातल्या तांत्रिक गोष्टींवर इथं चर्चा करणार नाही, पण दोन प्रसंगांचा उल्लेख करायचा मोह टाळता येत नाहीये. झोया अख्तरच्या 'गली बॉय'मध्ये एका प्रसंगात रणवीर कारमध्ये बसलेला असतो आणि सभोवतालच्या रोषणाईचं प्रतिबिंब त्याच्या गाडीवर (त्याच्यावर नाही, त्याच्या गाडीवर) पडलेलं दिसतं. या सुंदर फ्रेमची आठवण करून देणारा एक उत्कृष्ट प्रसंग 'बाईपण भारी देवा' मध्ये बघायला मिळतो. कुठला ते प्रत्यक्ष स्क्रीनवर बघायला जावंच लागेल. दुसरा एक प्रसंग म्हणजे, 'टाईम मशीन’चं तंत्र वापरून भूतकाळ आणि वर्तमानकाळाची गुंफण करणारी एक सुरेख फ्रेम सिनेमाच्या शेवटच्या टप्पात बघायला मिळते. कथा, संवाद, संगीत, दृश्य प्रतिमा, रंगसंगती, या सगळ्या गोष्टींवर दिग्दर्शकाची हुकूमत एकाच वेळी दाखवणारे हे काही प्रसंग आहेत.

'बाईपण भारी देवा' या सिनेमाची स्टोरी म्हणजे एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. इथं फक्त सिनेमा बघून आलेला फील शेअर केला आहे. मोठ्या स्क्रीनवर हा फील घ्यायलाच लागतोय गड्यांनो... जा आणि भारी वाटून घ्या!

- मंदार शिंदे
०२/०७/२०२३
shindemandar@yahoo.comShare/Bookmark