ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, May 31, 2014

सत्पात्री दान

दुकानात एक वयस्कर बाई आल्या. आमचं हिंदुराष्ट्राला वाहिलेलं एक पाक्षिक की साप्ताहिक काहीतरी आहे म्हणाल्या. तुमच्या दुकानाची त्यात जाहिरात द्या म्हणाल्या. मी विचारलं, तुम्ही काय छापता त्यात? त्या म्हणाल्या, हिंदु संस्कृतीचं रक्षण, हिंदु बांधवांची जागृती, आपल्या धर्माच्या ख-या परंपरांचा प्रसार, इतर धर्मियांची कारस्थानं, वगैरे वगैरे. मी नम्रपणे म्हणालो, सॉरी! मी तुम्हाला जाहिरात देऊ शकत नाही. यावर बाई म्हणाल्या, ठीक आहे. मग देणगी द्या. समर्थ हिंदुराष्ट्रासाठी हे सत्पात्री दान करा. तुम्हाला हजार पटीत फायदा होईल. एक रुपया दिलात तर तुम्हाला हजार मिळतील. मी पुन्हा म्हटलं, सॉरी! ही आमची व्यवसायाची जागा आहे. इथं आम्ही कसलंही दान, देणगी, वर्गणी देत नाही. बाई ऐकेचनात. म्हणाल्या, ठीक आहे. पैसे नका देऊ. आमच्या पन्नास-शंभर लोकांना चहा-नाष्टा स्वरुपात तरी सत्पात्री दान द्या. मी म्हटलं, हे चालेल. पण आम्ही चहा-नाष्टा नाही बनवत. चिकन-मटण बिर्याणी, पापलेट, सुरमई... माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच बाई अशक्य वेगानं पाय-या उतरून चक्क पळून गेल्या!


Share/Bookmark

Friday, May 30, 2014

संवाद

संवाद कसा साधायचा, हा प्रश्न नसतोच मुळी. प्रश्न असतो - संवाद साधावासा वाटतोय की नाही, हा! एकदा संवाद साधायचा ठरवलाच, तर संवादासाठी खूप माध्यमं सापडतील. पण संवाद साधावासाच वाटत नसेल, तर मात्र खिशात मोबाईल, डेस्कवर कॉम्प्युटर, ड्रॉवरमधे फुलस्केप नि लिफाफा, सगळं असून नसल्यासारखंच. म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कितीही पुढं गेली तरी कम्युनिकेशनच्या ऊर्मीला ओव्हरराईड करु शकणारच नाही, बरोबर ना?


Share/Bookmark

Tuesday, May 27, 2014

ताण

"...जास्त कामाचा ताण होत नाही. ताण होतो जबाबदारीचा, वेळेच्या अभावाचा. कामाच्या जागी मदतीच्या अभावाचा... प्रत्यक्ष काम माणसाला घातक नाही; पण कामापासून मिळणा-या फळाची आकांक्षा माणसावर जबाबदारीचं व वेळेचं ओझं निर्माण करते... काम माणसाला मारत नाही. आधुनिक औद्योगिक संस्कृतीत काम ज्या प्रकारचं व ज्या परिस्थितीत करावं लागतं, ती परिस्थिती माणसाला मारते."

- डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग'मधून


Share/Bookmark

Friday, May 23, 2014

वेळ

७६ वर्षांचा माणूस म्हणतोय, अजून खूप काही करायचं बाकी आहे पण वेळ कमी पडतोय. आणि तिशीतला माणूस टाईम 'पास' करण्यासाठी टीव्हीसमोर बसलाय.


Share/Bookmark

Thursday, May 22, 2014

लोकप्रतिनिधी

लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या अपेक्षा, अधिकार, आणि जबाबदार्‍या असतात. यांपैकी लोकप्रतिनिधींचे अधिकार आणि जबाबदार्‍या राज्यघटनेत नमूद केल्यानुसार ठरलेल्या असतात. अपेक्षा मात्र स्थल-काल-व्यक्तिपरत्वे बदलत जातात. स्थानिक प्रश्नांवर काम करुन निवडून येणारे, व्यक्तिगत करिष्म्यावर निवडून येणारे, आणि योग्य 'टायमिंग' साधून निवडून येणारे असे काही प्रकार आपल्याला लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, अशा सर्व स्तरांवर दिसतात. पण यांपैकी किती लोकप्रतिनिधी राज्यघटनेतील अधिकार व जबाबदार्‍यांनुसार काम करत असतील? मुळात हे अधिकार नि जबाबदार्‍या काय आहेत, हे तरी निवडून येणारे आणि निवडून देणारे या दोघांना ठाऊक असतील का? शाळेतलं नागरिकशास्त्र, लोकसभेतील खासदारांची संख्या आणि विधानसभेतील आमदारांची संख्या पाठ करण्यापलिकडं खरंच जातं का? की त्याची आता कुणाला गरजच वाटत नाही?


Share/Bookmark

Wednesday, May 21, 2014

व्हॉट्स ऑन युवर माईन्ड?

फेसबुक वापरायला सुरु केलं तेव्हा फ्रेन्डलिस्टमधे काही जवळच्या मित्र-मैत्रिणींचीच नावं होती. त्याआधी जे काही लिहायचंय ते ब्लॉगवर लिहित होतो. फेसबुकवर लाईक्स आणि कॉमेंट्समुळं लिहिण्याची पोच मिळायला लागली. त्यामानानं ब्लॉगवर कॉमेंट्स येण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. जसजशी फ्रेन्डलिस्ट वाढत गेली तसतशी लाईक्स नि कॉमेंट्सची संख्यादेखील वाढत गेली. मग कुणी-कुणी लाईक केलं, कुणी कॉमेंट केली, हे बघायची उत्सुकता वाढली. एखाद्या स्टेटसला लाईक मिळाले नाहीत, किंवा अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तर काहीतरी चुकल्यासारखं वाटू लागलं. मग तेच स्टेटस थोड्या वेगळ्या शब्दांत मांडलं तर लाईक्स वाढतील का? की एखाद्या ग्रुपमधे पोस्ट केलं तर जास्त लाईक्स मिळतील? की रात्री उशिरा अपडेट केल्यामुळं वाचलंच गेलं नसेल? दिवसाच स्टेटस अपडेट केलेलं चांगलं का? असे अनेक विचार सुरु झाले. मग लाईकींग आणि कॉमेंटींग पॅटर्नचा अभ्यास झाला. ऑफीस टाईममधे लाईक जास्त मिळतात, म्हणजे ऑफीसमधेच लोकांना फेसबुकवर भटकायला जास्त वेळ मिळतो बहुतेक. काही फ्रेन्ड्स विशिष्ट प्रकारच्या स्टेटसलाच लाईक करतात, इतर स्टेटसकडं दुर्लक्ष करतात. काहींना मराठीच स्टेटस आवडतात, तर काहींना इंग्रजीच स्टेटस समजतात. असं करता-करता, मुळात स्टेटस काय टाकायचं यापेक्षा त्यावर प्रतिक्रिया काय येणार, यावर जास्त विचार होऊ लागला. म्हणजे, फेसबुक विचारतं - व्हॉट्स ऑन युवर माईन्ड? आणि आपण आपलं - व्हॉट विल बी ऑन आदर्स माईन्ड्स? - मधे अडकून पडतो. या सगळ्या भानगडीत, मला काय सांगावंसं वाटतंय ते बाजूलाच राहिलं आणि काय सांगितलेलं 'फ्रेन्ड्स'ना आवडेल, यावर विचार शिफ्ट झाले.

मग असं वाटलं की, जे काही आपल्याला म्हणायचंय ते एकदा म्हणून टाकलं की पुन्हा त्याचे लाईक्स नि कॉमेंट्स (आणि ते स्टेटससुद्धा!) स्वतःला दिसलंच नाही तर? म्हणजे प्रायव्हसी सेटींगमधे काहीतरी 'पब्लिक एक्सेप्ट सेल्फ' असा विचित्र पर्याय निवडता आला तर? म्हणजे मग एकदा पहिली गोष्ट सांगून झाली की डायरेक्ट दुसर्‍या गोष्टीवरच विचार सुरु. पुन्हा ते पहिल्या गोष्टीचे लाईक्स नि कॉमेंट्स नि शेअर्स, असल्या भानगडीच नकोत. नाही तरी, ज्याला आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोचवायचीच असेल त्याला किंवा तिला, मेसेज / ई-मेल / पत्र / फोन एवढे पर्याय उपलब्ध आहेतच की. मग ते कॉमेंट-कॉमेंट खेळण्यात कशाला वेळ घालवायचा? मग लाईक्स वाढले म्हणून शेफारूनही जायला नको, की लाईक्स कमी म्हणून नाराजही व्हायला नको. बघूयात का ट्राय करुन?


Share/Bookmark

Tuesday, May 6, 2014

स्पर्धा आणि यश

आचार्य रजनीश एक कथा सांगायचेः कुत्र्यांच्या जगातील एक गणमान्य कुत्रा एकदा दिल्ली पदयात्रेवर निघाला. त्यांच्या शिष्यांनी समारोहपूर्वक कलकत्त्याहून त्यांना निरोप दिला. मजल-दरमजल करत तीन महिन्यांनी महाराज दिल्लीला पोहोचणार, असा कार्यक्रम आखला होता. दिल्लीतील अनुयायांनी जंगी स्वागत करण्यासाठी स्वागत समिती देखील बनवली होती. तीन महिन्यांनी कुत्रा महाराज दिल्लीला पोहोचणार म्हणून वर्गणी गोळा करायला लागले. आणि अचानक दहाव्याच दिवशी महाराज दिल्लीत येऊन थडकले.

"महाराज आपण किती महान! तीन महिन्यांचा प्रवास दहा दिवसांत पूर्ण केला. कुत्ता महाराजकी जय!" अनुयायांनी जयघोष केला.

"महाराज, आपण हा चमत्कार कसा साधला? आणि आपल्या अंगावर एवढ्या जखमा कशा?"

"मी दहा दिवसांत स्वतःच्या मर्जीने नाही रे पोहोचलो! कलकत्त्याहून निघालो. पहिल्या पडावाच्या गावी पोहोचलो. थकलो होतो. आराम करावा, काही खावं म्हणून मोठ्या आशेने गावात शिरलो, तर त्या गावातले कुत्रे भुंकत माझ्या मागे लागले. त्यांच्या भीतीने पळत सुटलो. निदान पुढील गावात तरी विसावा मिळेल म्हणून आशेने पोहोचलो, तर तिथले कुत्रे अजून क्रूर व भयानक निघाले. लचकेच तोडायला अंगावर आले. माझ्या जलद प्रवासाचं हे रहस्य आहे. अरे, कलकत्त्याहून दिल्लीपर्यंत कोठल्याच मुक्कामावर मला उसंत घेऊ दिली नाही हो!" धापा टाकत थकले भागलेले जखमी कुत्रा महाराज रडकुंडीला येत बोलले.

अशा धावण्यालाच आजच्या युगात स्पर्धा, व दिल्लीला पोहोचण्याला यश म्हणतात.

(डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकातून)


Share/Bookmark