ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, May 21, 2014

व्हॉट्स ऑन युवर माईन्ड?

फेसबुक वापरायला सुरु केलं तेव्हा फ्रेन्डलिस्टमधे काही जवळच्या मित्र-मैत्रिणींचीच नावं होती. त्याआधी जे काही लिहायचंय ते ब्लॉगवर लिहित होतो. फेसबुकवर लाईक्स आणि कॉमेंट्समुळं लिहिण्याची पोच मिळायला लागली. त्यामानानं ब्लॉगवर कॉमेंट्स येण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. जसजशी फ्रेन्डलिस्ट वाढत गेली तसतशी लाईक्स नि कॉमेंट्सची संख्यादेखील वाढत गेली. मग कुणी-कुणी लाईक केलं, कुणी कॉमेंट केली, हे बघायची उत्सुकता वाढली. एखाद्या स्टेटसला लाईक मिळाले नाहीत, किंवा अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तर काहीतरी चुकल्यासारखं वाटू लागलं. मग तेच स्टेटस थोड्या वेगळ्या शब्दांत मांडलं तर लाईक्स वाढतील का? की एखाद्या ग्रुपमधे पोस्ट केलं तर जास्त लाईक्स मिळतील? की रात्री उशिरा अपडेट केल्यामुळं वाचलंच गेलं नसेल? दिवसाच स्टेटस अपडेट केलेलं चांगलं का? असे अनेक विचार सुरु झाले. मग लाईकींग आणि कॉमेंटींग पॅटर्नचा अभ्यास झाला. ऑफीस टाईममधे लाईक जास्त मिळतात, म्हणजे ऑफीसमधेच लोकांना फेसबुकवर भटकायला जास्त वेळ मिळतो बहुतेक. काही फ्रेन्ड्स विशिष्ट प्रकारच्या स्टेटसलाच लाईक करतात, इतर स्टेटसकडं दुर्लक्ष करतात. काहींना मराठीच स्टेटस आवडतात, तर काहींना इंग्रजीच स्टेटस समजतात. असं करता-करता, मुळात स्टेटस काय टाकायचं यापेक्षा त्यावर प्रतिक्रिया काय येणार, यावर जास्त विचार होऊ लागला. म्हणजे, फेसबुक विचारतं - व्हॉट्स ऑन युवर माईन्ड? आणि आपण आपलं - व्हॉट विल बी ऑन आदर्स माईन्ड्स? - मधे अडकून पडतो. या सगळ्या भानगडीत, मला काय सांगावंसं वाटतंय ते बाजूलाच राहिलं आणि काय सांगितलेलं 'फ्रेन्ड्स'ना आवडेल, यावर विचार शिफ्ट झाले.

मग असं वाटलं की, जे काही आपल्याला म्हणायचंय ते एकदा म्हणून टाकलं की पुन्हा त्याचे लाईक्स नि कॉमेंट्स (आणि ते स्टेटससुद्धा!) स्वतःला दिसलंच नाही तर? म्हणजे प्रायव्हसी सेटींगमधे काहीतरी 'पब्लिक एक्सेप्ट सेल्फ' असा विचित्र पर्याय निवडता आला तर? म्हणजे मग एकदा पहिली गोष्ट सांगून झाली की डायरेक्ट दुसर्‍या गोष्टीवरच विचार सुरु. पुन्हा ते पहिल्या गोष्टीचे लाईक्स नि कॉमेंट्स नि शेअर्स, असल्या भानगडीच नकोत. नाही तरी, ज्याला आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोचवायचीच असेल त्याला किंवा तिला, मेसेज / ई-मेल / पत्र / फोन एवढे पर्याय उपलब्ध आहेतच की. मग ते कॉमेंट-कॉमेंट खेळण्यात कशाला वेळ घालवायचा? मग लाईक्स वाढले म्हणून शेफारूनही जायला नको, की लाईक्स कमी म्हणून नाराजही व्हायला नको. बघूयात का ट्राय करुन?


Share/Bookmark

No comments:

Post a Comment