ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Tuesday, October 2, 2018

अंधार...

अंधार...
(लेखकः मंदार शिंदे ९८२२४०१२४६)

====०====
थंड होत चाललेल्या कॉफीच्या कपात
साखरेची तिसरी पुडी फोडून ओतताना
मी पुन्हा हसलो…

तू पुन्हा विचारलंस, ‘का हसलास ?’

कसं सांगू तुला ? आणि काय सांगू ?

एअर कन्डीशन्ड कॉफी शॉपच्या
काचेच्या भिंती आणि दारातून
जाणवत होतं भगभगतं ऊन.

मी क्षणभर पाहिलं बाहेर अन्‌
गपकन्‌ घेतले डोळे मिटून.

तू निघालीस चटकन्‌ उठून
तुझी गर्द निळी-जांभळी ओढणी सांभाळीत.

मी थांबवायच्या आत तू गेली होतीस
उन्हाच्या झळांच्या पायर्‍या करून
भगभगत्या सूर्यप्रकाशाच्या दिशेनं.

डोळ्यांना खुपणारा तो सूर्यप्रकाश सहन करीत
मी बघत राहिलो तुझी लगबग.

वर वर, अगदी ढगात, सूर्याच्या जवळ
तू जात राहिलीस तुझी ठाम पावलं टाकीत.

एकदाच मागं वळून पाहिलंस माझ्याकडं,
एक क्षणभरच थांबलीस, हसलीस…

आणि मग उलगडत गेलीस
तुझी ती गर्द निळी-जांभळी ओढणी,
आणि अंथरलीस त्या भगभगत्या आकाशावर.

तुझ्या केसांमधल्या त्रिकोणी-चौकोनी क्लिप्सनी
डकवून टाकलास तो निळा-जांभळा पडदा.

मी सुखावल्या डोळ्यांनी बघत राहिलो
एका रुक्ष दिवसाची मनोहर रात्र होताना.

परत येण्याआधी तू पुन्हा एकदा
हात फिरवलास त्या पडद्यावर,
आणि मी माझ्या या डोळ्यांनी पाहिली
त्या त्रिकोणी-चौकोनी चांदण्यांची थरथर.

तू येऊन बसलीस समोरच्या खुर्चीत,
जणू काही घडलंच नाही अशा थाटात.

मी मात्र बघत राहिलो आकाशात
लुकलुकणार्‍या तुझ्या टिकलीच्या चंद्राकडे…

पुडीतली साखर कपात ओतताना
मी पुन्हा हसलो…

तू पुन्हा विचारलंस, ‘का हसलास ?’

कसं सांगू तुला ? आणि काय सांगू ?

शेवटी तूच म्हणालीस मोकळ्या केसांतून हात फिरवीत,
‘आज अंधार फार लवकर झाला, नाही का?’

- अक्षर्मन


Share/Bookmark

No comments:

Post a Comment