कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या आणि तिथंच राहणाऱ्या एका कामगाराचा सहा-सात वर्षांचा मुलगा - जगदीश. मुलगा हुशार आणि चुणचुणीत आहे. या वर्षी जवळच्या मनपा शाळेत त्याचं नाव घातलंय. परवा आम्ही साईटवर गप्पा मारत उभे होतो, तेव्हा तिथंच राहणारा एक तेरा-चौदा वर्षांचा मुलगा जवळून जात होता. त्याच्याकडं बघून छोटा जगदीश मोठ्यानं हसायला लागला. मी कारण विचारल्यावर म्हणाला, "त्यो बगा त्यो... बायावानी झाडू मारतोय."
मीः म्हणजे काय रे?
तोः म्हंजि त्यो हापिसात जातुय बायावानी झाडू माराया. आनि फरशी बी पुसतुय बायावानी...
मीः मग? त्यात काय झालं? तू नाही करत घरी ही कामं?
तोः छ्या! म्या न्हाई बायांची कामं करत!
कुठुन येतो एवढ्याशा मुलांमधे हा अॅटीट्यूड? घरातल्या, समाजातल्या मोठ्या माणसांना कळतंय का हे? आपल्या वागण्या-बोलण्यातून 'नकळत' काय बिंबवतोय आपण मुलांच्या मनावर? हे 'नकळत' होणारे कु-संस्कार थांबवले नाहीत तर 'जाणूनबुजून' संस्कार करायचे सगळे प्रयत्न वायाच जातील, नाही का?
ऐसी अक्षरे
Wednesday, June 20, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment