गुजरातमध्ये एक मोठ्ठं जंगल आहे - डांगचं जंगल. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं-झुडपं आणि प्राणी इथं दिसतात. शेकडो वर्षांपासून काही आदिवासी जमाती तिथं राहतात. त्यापैकी एक आहे - मालधारी जमात, 'सासन गीर' जंगलात राहणारी. या जमातीतले लोक गाई-म्हशी पाळून त्यांचं दूध विकतात. जनावरांना चारा, चुलीसाठी लाकडं, आणि इतर गोष्टी त्यांना जंगलातून मिळतात. पण त्याबरोबरच त्यांचा सामना होतो एका बलवान रहिवाशाशी...
आशियाई सिंह!

आफ्रिकन सिंह मोकळ्या पठारांवर राहतात. त्यामुळं ते चपळ आणि कुशल शिकारी बनतात. आशियाई सिंहाला मात्र दाट जंगलात रहायला आवडतं. सिंह कळपात राहणारा प्राणी आहे. त्याच्या सोनेरी केसांमुळं पिवळ्या पडलेल्या झाडा-झुडपांतून तो दिसून येत नाही. त्यामुळं त्याचं सावज बेसावध राहतं. मानेवरच्या भरगच्च आयाळीमुळं त्याचे शत्रू मानेचा लचका तोडू शकत नाहीत.
सिंह हा मांसाहारी गटातला मांजर-वर्गीय प्राणी आहे. त्यामुळं त्याच्याकडं तीक्ष्ण दात आणि धारदार नख्या असतात. लपतछपत, हलक्या पावलांनी पाठलाग करून, जवळ आल्यावर झडप घालून तो शिकार करतो. सिंहाची नजर, कान, आणि नाक तीक्ष्ण असतात. तो वास घेत-घेत शिकार शोधतो. त्याच्या डोळ्यांवर ऊन किंवा प्रखर प्रकाश पडला की, डोळ्यांची बाहुली लहान होते. उलट अंधारात बाहुली मोठी होऊन जास्तीत जास्त प्रकाश डोळ्यात जातो. त्यामुळं रात्री अंधारातसुद्धा सिंहाला व्यवस्थित दिसतं - मांजरासारखंच!
शिकारीचं काम सिंहिणींचा कळप करतो. सावजाच्या चारही बाजूंनी सिंहिणी हळूहळू पुढे सरकतात. एका सिंहिणीनं झडप घातली की, सावज उधळतं. पण सगळीकडून वेढलं गेल्यामुळं लवकरच ताब्यात येतं. सिंहिणींनी त्याला ठार मारलं की मग सिंहराज येतात, आणि शिकारीतला मोठा वाटा स्वतःसाठी घेतात.
सिंहांच्या कळपात एक अनुभवी नेता नर असतो. शिवाय पाच-सहा सिंहिणी आणि दोन-तीन लहान सिंह असतात. भरपूर खाद्य मिळणार्या जंगलात ते राहतात. मांजर गटातल्या इतर प्राण्यांपेक्षा सिंहांचं स्वरयंत्र जास्त कार्यक्षम असतं. त्यामुळं ते मोठमोठ्यानं आवाज काढून गोंगाट करत फिरतात.
गीरच्या जंगलात खूप हरिण आणि चितळ आहेत. पण सिंह पूर्वीसारखी त्यांची शिकारच करत नाहीत. उलट, भूक लागली की मालधारी लोकांच्या गुरांची शिकार करतात. यासाठी त्यांना फार कष्ट पडत नाहीत. दिवसभर सावलीत आराम करायचा, आणि रात्री गाई-म्हशींचा फडशा पाडायचा. एक म्हैस सिंहांच्या पूर्ण कळपाला पुरते. शिवाय नंतरचे सहा दिवस शिकार करावी लागत नाही. अंगात शिकारीचं कसब असूनसुद्धा आशियाई सिंह गुराढोरांची सोपी शिकार करू लागलेत. म्हणून गीरचे वन अधिकारी आणि सरकारनं मालधारींना जंगलापासून थोडं दूर हलवलं आहे. शिवाय इथल्या काही सिंहांना दुसर्या अभयारण्यात हलवण्याचा प्रयत्नही केला आहे.
सिंहांसाठी योग्य हवामान आणि जागा शोधणं, हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. यात खूप अडचणीदेखील आहेत. म्हणून सरकारबरोबरच संस्था आणि नागरिकांनी या कामात स्वतः रस घेतला पाहिजे. सरकारनं गीर जंगलाचं अभयारण्य केलं आहे. त्यामुळं तीनशेहून अधिक सिंह तिथं मुक्तपणे राहतायत. असं होत राहिलं तर, हा जंगलाचा राजा पुन्हा एकदा भारताच्या मातीत स्थिरावेल, आणि पूर्वीसारखंच आपलं शिकारीचं कौशल्यसुद्धा दाखवू लागेल.
No comments:
Post a Comment