ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, January 1, 2020

Dabangg 3 - Bhai Ki Movie... Must Watch!

दबंग ३ - भाई की मूव्ही.. मस्ट वॉच!


सलमान खान ऊर्फ चुलबुल पांडे ऊर्फ रॉबिन हूड पांडे ऊर्फ धाकड पांडे ऊर्फ करु पांडे (म्हणजे काय कुणास ठाऊक?) हा उभ्या-आडव्या भारत देशातल्या सर्वसामान्य आणि बहुसंख्य प्रेक्षकांना अपील होणारा ‘हिरो’ आहे. पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो सिटीपासून शंभरेक किलोमीटर लांब गेलं की ही वस्तुस्थिती जास्त ठळकपणे नजरेत येते. आयुष्मान खुराणा, राजकुमार राव, विकी कौशल, असे नव्या दमाचे ‘ऐक्टर’ इंडस्ट्रीत येत असले तरी, त्यांच्या सिनेमाला सलमान आणि अक्षय कुमारच्या सिनेमासारखी ‘एन्टरटेनमेण्ट व्हॅल्यू’ अजून कमावता आलेली नाही. अजय देवगणचा ‘सिंघम’ आणि रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ बऱ्यापैकी देशभरातल्या प्रेक्षकांना एन्टरटेन करु शकलेत. पण रणबीर कपूरची ऐक्टींग, आयुष्मानच्या सिनेमांची दमदार स्क्रिप्ट, ठराविकच लोकांना आकर्षित करु शकलेत हे सत्य आहे.

सलमानचा सिनेमा मात्र कितीही टिपिकल असला, स्टोरी कितीही प्रेडीक्टेबल असली, स्क्रिप्ट कितीही कमजोर असली, गाणी कितीही नीरस असली, डायलॉग कितीही बालिश असले, फाईट सीन कितीही अविश्वसनीय असले, तरीदेखील फक्त आणि फक्त सलमानच्या नावावर सिनेमा जबरदस्त हिट होतो, पैसे कमावतो, इंडस्ट्रीत खळबळ माजवतो, कित्येक नव्या-जुन्या कलाकारांना काम आणि प्रसिद्धी मिळवून देतो, हे नक्की!

उदाहरणार्थ, ‘दबंग ३’ मधे महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च केलंय. तिच्यात विशेष लक्षात राहण्यासारखं काहीच नसलं तरी, करीयरच्या सुरुवातीला तिच्या नावावर १०० कोटीचा सिनेमा लागला ना डायरेक्ट… याला म्हणायचं सलमानची जादू.

सिनेमाची स्टोरी सलमान खाननं लिहिलेली असल्यावर प्रभुदेवाला डिरेक्शनसाठी किती वाव होता माहिती नाही, पण एका गाण्यातला प्रभुदेवाचा डान्स मात्र फुल्टू पैसा वसूल!

सोहेल खानचा गेस्ट अपिअरन्स अगदीच छोटा, पण त्याची एन्ट्री हमखास टाळ्या मिळवणारी! सलमान, अरबाज, सोहेल, या तिघांना एकत्र स्क्रीनवर बघायला अजून मजा आली असती.

डुप्लिकेट विनोद खन्ना संपूर्ण सिनेमात खटकतो, पण ओरिजिनल डिंपल बरोबर असल्यामुळं काही सीनमधे तोसुद्धा खपून जातो. मागच्या ‘दबंग’चे रेफरन्स ओढून-ताणून जुळवायचा प्रयत्न केलाय, पण ‘सिनेमॅटीक लिबर्टी’च्या नावाखाली फिजिक्सच्या नियमांसारखी स्क्रिप्ट रायटींगच्या नियमांची मोडतोडसुद्धा दुर्लक्षित केलेलीच बरी.

पहिल्या ‘दबंग’मधे सिक्स पॅकवाला सोनू सूद भाव खाऊन गेला होता. तिसऱ्या ‘दबंग’चा व्हीलनसुद्धा स्टायलीश आणि इम्प्रेसिव्ह वाटतो. उगाच बावळट आणि किरकोळ व्हीलन समोर असेल तर चुलबुल पांडेची दबंगगिरी उठून दिसणार कशी? त्यामुळं व्हीलनच्या रोलसाठी यावेळी सुद्धा चांगली चॉईस केलेली दिसली.

साजिद-वाजिदच्या संगीतात लक्षात राहण्यासारखं काहीच नाही. काही गाणी मागच्या ‘दबंग’मधल्या गाण्यांमधेच कडवी वाढवून दिल्यासारखी वाटली. यावेळी मुन्नीच्या ऐवजी मुन्ना बदनाम झालाय आणि झंडू बाम, फेव्हीकॉल या ब्रॅन्डनंतर यावेळी ‘सेट वेट जेल’चा नंबर लागलाय, एवढंच गाणी ऐकून लक्षात येतं.

कदाचित प्रभुदेवा डिरेक्टर असल्यामुळं असेल, पण फाईट सीन थोडे साऊथच्या सिनेमासारखे जास्तीचे रक्तबंबाळ वाटले. पण तरीसुद्धा बटबटीत अंगप्रदर्शन किंवा अंगावर येणारे टॉर्चर सीन कमीच वाटले. सलमानच्या सिनेमाची परंपरा जपत एकही किसिंग सीन दाखवलेला नाही, बेड सीन नाही, पाणचट आणि सूचक जोक असले तरी अश्लील किंवा ओंगळवाणे डायलॉग नाहीत. असे सिनेमे फॅमिलीसोबत बघायला जाण्यात लोकांना फारशी रिस्क वाटत नाही. या बाबतीत अक्षय कुमारचे सो-कॉल्ड कॉमेडी सिनेमे अगदीच टाळण्यासारखे असतात.

एकूण, सलमानचा सिनेमा म्हणजे कम्प्लीट फॅमिली एन्टरटेनमेण्ट. देशातली राजकीय उलथा-पालथ, आर्थिक मंदीचं संकट, बेरोजगारीचा प्रश्न, पर्यावरण बदलाची आव्हानं, अशा सगळ्या गोष्टी विसरायला लावणारा आणि शेवटी वाईटाचा पराभव, चांगल्याचा विजय होतोच अशी आशा पेरून जाणारा सलमानचा ‘दबंग ३’ सगळ्या चुका पोटात घालून एकदा बघण्यासारखा… सलमानच्या फॅन्ससाठी तर एवढं सगळं बोलायची सुद्धा गरज नाही. भाई की मूव्ही है, बस्स… मस्ट वॉच!!

- मंदार शिंदे ९८२२४०१२४६
०१/०१/२०२०


Share/Bookmark

No comments:

Post a Comment