"ह्या जगात येताना जसा गुपचुप आलो, तसा जाताना देखील आपल्या हातून या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे."
हे उद्गार आहेत, आपल्या निखळ विनोदानं अवघ्या महाराष्ट्राला हसवत राहणार्या एका असामान्य 'वल्ली'चे अर्थात् आपल्या सर्वांच्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांचे!
पुलंच्या विनोदाबद्दल किती आणि काय बोलायचं? पुलंचे विनोद, आंब्याच्या डहाळीवर बसून गाणार्या कोकीळेच्या कुहू-कुहू सारखे मधुर आहेत; पिंजर्यातल्या पोपटाच्या पंखांच्या फडफडाटासारखे केविलवाणे नाहीत. पुलंचा विनोद कधीही कोंडल्यासारखा वाटत नाही; उलट कोंदटलेल्या जीवांना मोकळ्या हवेत श्वास घेऊ देणारा तो भासतो. कुणाचंही मन दुखावलं जाईल असा विनोद पुलंनी कधीच केला नाही. कुत्सितपणा टाळून केलेल्या सत्यनिवेदनाला परखडपणाची झालर चढते, फटकळपणाचं ठिगळ नाही. पुलंचा विनोद आरशासारखा स्वच्छ आहे; असा आरसा की ज्यात अक्राळविक्राळ विद्रूप सत्याला, विनोदाचा, सहनशीलतेचा मुलामा चढवून समोर उभं केलं जातं, तेही सुसह्य स्वरुपात! म्हणूनच, भाजीत झुरळ सापडल्याच्या तक्रारीला, स्वतःची मिशी अजिबात न फेंदारता, "बंडोपंत, मंथली ट्वेंटीटू रुपीजमध्ये एलिफंट का यायचा भाजीत?" हे जगप्रसिद्ध उत्तर देणारा खाणावळवाला पुलंच्या विनोदातच दर्शन देतो.
पुलंचा विनोद सहजगत्या घडून येतो, तो मुद्दाम घडवून आणावा लागत नाही. "एक तारखेला दूधवाले, घरवाले, कोळसेवाले, दारेवाले, धोबी, आणि डॉक्टर, हे 'षड्रिपू' थैमान घालतात," यासारख्या विनोदात मध्यमवर्गीयांची फार मोठी व्यथा दडली आहे; पण विनोदाच्या चादरीखाली या व्यथा झाकून जातात आणि म्हणूनच त्या सुसह्य वाटू लागतात.
साध्या-साध्या गोष्टींत देखील विनोद शोधण्यासाठी पुलंचीच नजर हवी. "कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे योगी असतात, अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात, पण चेहर्यावरची घडी मोडू देत नाहीत." किंवा "तुकारामाचं पूर्ण नांव काय? ह्या प्रश्नाला तुकाराम विष्णुपंत पागनीस हे उत्तर दिल्यामुळं, मंबाजीनं तुकोबाला बदडलं नसेल इतकं आमच्या बाबांनी आम्हांला बदडलं होतं. बाबांच्या शेंडीच्या केसाचा देखील दाह झाला नाही." या ठिकाणी, तुमच्या-आमच्या आसपास घडणार्या घटना वेगळ्या पद्धतीनं पाहण्याची नजर पुलंचा विनोदच देतो. स्वतः शिक्षकी पेशात असूनही एके ठिकाणी ते म्हणतात, "प्रोफेसर हा माणूस आणि लिफ्टमन हे हसू शकतात हे मला कधीच पटले नाही."
असे विनोदाचे बादशहा पु.ल. जेव्हा त्यांच्या अनुभवी नजरेसमोरुन सरकणार्या काळाचे उलटे फासे पाहतात, तेव्हा मात्र सभोवती, कारुण्याची किनार असणार्या कृष्णमेघांची दाटी होऊ लागते - "स्वराज्य आले हत्तीवरुन मिरवीत. अंबारीत राजेंद्रबाबूंच्या हाती कलश होता, समोर घोड्यावर बसून चालले होते जवाहरलाल - फक्त बापू मात्र आमच्याबरोबर पायी चालत होते."
काही ठिकाणी पु.ल. सहजगत्या सत्यपरिस्थिती सांगून जातात, "आम्ही ओझ्याचे बैल हेच खरं! शिंगाला झेंडू बांधा नाहीतर पोत, पाठीवर झूल चढवा किंवा चाबूक उडवा, जोडले एकदा की थांब म्हणेपर्यंत चालले!" तसंच जाताजाता ते नेत्यांच्या आश्वासनांची आणि कार्यपद्धतीची खिल्लीही उडवतात - "शाळांच्या इमारतींची संख्या वाढली म्हणून शिक्षण घेणे आणि देणे याविषयीची आस्था वाढली असे मानावयाचे म्हटले तर, ज्या गावात विपुल देवळे व मशिदी आहेत, तिथली माणसे धर्मावतार आहेत असे मानावे लागेल."
पुलंचं विनोदी वाङ्मय विपुल असलं तरी पु.ल. म्हणजे विनोद एवढंच नव्हे. एक अष्टपैलु व्यक्तिमत्व कसं असावं याचा आदर्श नमुना म्हणजे पु.ल.! विनोदी लिखाणाबरोबरच प्रवास वर्णनं, चरीत्रं, भाषांतरं, चित्रपट-कथा लेखन, कविता, गीत-संगीत अशा साहित्याच्या आणि कलेच्या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी मुशाफिरी केली आहे.
जाज्वल्य देशाभिमान हाही पुलंचा एक पैलु आहे. एक आठवण पु.ल. सांगतात - "मिठाच्या सत्याग्रहाचे दिवस होते. लॅमिंग्टन रोडवर पोलिस स्टेशनपाशी सत्याग्रहींचा जथा आला होता. लोक निर्भयपणे पोलिसांच्या गाडीतून घुसून स्वतःला अटक करुन घेत होते. त्या गर्दीत एक तरुण स्त्री होती. तिने आपल्या अंगावरचे दागिने उतरले, शेजारच्या एका माणसाच्या हाती दिले. त्याला आपले नाव सांगितले, पत्ता सांगितला आणि म्हणाली, "माझ्या घरी हे दागिने नेऊन द्या आणि सांगा 'म्हणावे, मी सत्याग्रहात गेले'." तो गृहस्थ म्हणाला, "बाई, तुमची माझी ओळखदेख नाही. तुमचे हे दागिने मी तुमच्या घरी पोहोचवीन असा तुम्हाला विश्वास का वाटतो?" ती म्हणाली, "तुमच्या अंगावर खादी आहे आणि डोक्यावर गांधी टोपी आहे म्हणून.""
खरोखर पुलंबद्दल काय लिहावं आणि किती लिहावं! शेवटी पु.लं.चेच उद्गार -
"घड्याळाचं काय नि माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की फार पुढंही जाण्याची भिती नाही आणि फार मागंही पडण्याची नाही!"
- मंदार शिंदे 9822401246
khup chan lekh ahe...
ReplyDeletePu. La. sarkhe waqti sarkhe sarkhe hone nahi...
Apratim lihala ahes
ReplyDelete