ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, September 9, 2015

इंग्रजीचा उदो उदो...

आम्हाला इंग्रजी शिकवणारे सर म्हणायचे, "इंग्रजी बोलता आली नाही तरी चालेल पण इंग्रजी पूर्ण कळाली पाहिजे." त्यांचं म्हणणं असं होतं की, इंग्रजी शिकायला सुरु करतानाच जर इंग्रजी बोलण्यावर, म्हणजे स्पोकन इंग्लिशवर भर दिला तर भाषेच्या नियमांकडं हमखास दुर्लक्ष होतं. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा समोरची व्यक्तीदेखील तुमचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. या प्रक्रियेमधे इंग्रजीचं व्याकरण, शब्दप्रयोग, वगैरे गोष्टींपेक्षा संदर्भासहीत मुद्द्यांकडं जास्त लक्ष दिलं जातं. एकदा का तुम्ही चुकीचे शब्दप्रयोग किंवा चुकीची वाक्यरचना करुनही तुमचं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवू शकलात, की तुम्ही त्याच चुका नेहमी-नेहमी करत राहता. अशा पद्धतीनं एक भाषा म्हणून तुम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकत नाही, फक्त कामचलाऊ इंग्रजी बोलू व समजू शकता, जी आपल्या आजूबाजूला सर्रास आढळून येते.

आमचे सर असंही म्हणायचे, "इंग्रजी बोलण्याची तुम्हाला इतकी गडबड का? आधी ती भाषा नीट शिकून तर घ्या. इंग्रजी बोलता आलं नाही म्हणून तुमचं काम अडेल अशी परिस्थिती आपल्या देशात तरी यायची शक्यता नाही. इथं तुम्ही मातृभाषेत किंवा हिंदीत संवाद साधू शकता. अगदी परदेशातच जायचं असेल तर इंग्रजीशिवाय अडण्याची शक्यता मान्य. पण एका मराठी माणसानं दुसर्‍या मराठी माणसाशी मोडक्या-तोडक्या इंग्रजीत संवाद साधणं, यातून ना संवाद घडतो ना भाषेचं ज्ञान मिळतं."

माझा इंग्रजी शिकण्याला किंवा वापरण्याला अजिबात विरोध नाही. पण इंग्रजी भाषा म्हणून न शिकता तिला थेट मातृभाषा बनवण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या स्वतःचं आणि पुढच्या पिढीचं फार मोठं नुकसान करतोय, असं मला वाटतं. अजूनही आपल्या आजूबाजूला, समाजात वावरताना अथवा कोणत्याही इंडस्ट्रीत काम करताना, इंग्रजीचं महत्त्व 'सादरीकरणाची भाषा' अर्थात 'प्रेझेंटेशन लँग्वेज' म्हणूनच असल्याचं दिसून येतं. या प्रेझेंटेशनसाठी संबंधित विषयाचं ज्ञान, अभ्यास, अनुभव, कल्पनाशक्ती, इत्यादी गोष्टी भाषेपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. मात्र या गोष्टी मांडण्यासाठी जी इंग्रजी भाषा वापरायची, तिच्या दडपणाखाली या मुलभूत गोष्टींकडंच दुर्लक्ष केलं जाताना दिसतं. तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी हा अनुभव घेतला असेल - एखादा तांत्रिक मुद्दा मांडताना किंवा तुमच्या कामाबद्दल चर्चा करताना तुम्ही व्यवस्थित इंग्रजी बोलू शकता. पण हवा-पाण्याच्या गप्पा मारताना मात्र तुम्हाला ना इंग्रजी शब्द आठवतात, ना एक पूर्ण वाक्य इंग्रजीतून बोलता येतं. याच गोष्टीची भीती किंवा लाज वाटून अनेक जण इंग्रजीचं दडपण घेतात. पण असं का होतं, यामागचं कारण शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे?

कोणतीही भाषा शिकण्यातला पहिला टप्पा असतो ऐकण्याचा. लहान मुलांच्या कानावर जी आणि जशी भाषा पडते, तसेच भाषिक संस्कार त्यांच्यावर होतात. तुम्ही 'चांगली' इंग्रजी भाषा ऐकलीच नाहीत, तर तुम्हाला चांगली इंग्रजी बोलता कशी येणार? आपण इंग्रजीच्या नावाखाली जे काही आजूबाजूला ऐकतोय, त्याला भाषा तरी म्हणावं का? हा ऐकण्याचा टप्पा तर आपण सोडूनच देतो आणि मुलांना थेट ए-बी-सी-डी गिरवायला शिकवतो. मुलं या 'ए-बी-सी-डी'चा अर्थ आणि संदर्भ आपापल्या मातृभाषेत शोधण्याचा प्रयत्न करतात, जो त्यांना कधीही सापडत नाही. आणि जी भाषा त्यांना अजून आपली वाटतच नाही, त्या भाषेत त्यांनी बोलावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. इथूनच इंग्रजीचं दडपण यायला सुरुवात होते. मग काही जण चुकीचं इंग्रजी रेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी झाले की आयुष्यभर चुकीचीच भाषा रेटत राहतात. राहिलेले, कायम इंग्रजीची भीती आणि न्यूनगंड मनात घेऊन या भाषेला टाळायचा प्रयत्न करत राहतात. इंग्रजी बोलायची वेळ आली की हे रस्ता बदलून दुसरीकडंच जातात आणि समोर आलेली संधी हकनाक गमावून बसतात.

ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण इंग्रजीकडं वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकली आणि शिकवली गेली पाहिजे. पहिल्या दिवसापासून इंग्रजीतून बोलण्याची गडबड न करता, टप्प्याटप्प्यानं मुळाक्षरं, शब्दार्थ, वाक्यरचना, अलंकार शिकत गेलं पाहिजे. त्याच बरोबरीनं 'चांगली' इंग्रजी कानावर पडण्याची सोयदेखील केली पाहिजे. आणि एकदा या भाषेवर प्रभुत्व आलं की, यू कॅन टॉक इंग्लिश, यू कॅन वॉक इंग्लिश, यू कॅन लाफ इंग्लिश, यू कॅन रन इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज सच अ फन्नी लँग्वेज!


Share/Bookmark

No comments:

Post a Comment