लग्नाचा सीझन. शहरातली सगळी कार्यालयं माणसांनी भरलेली. रस्त्यांच्या दोन्ही बाजू पार्क केलेल्या गाड्यांनी भरलेल्या. एकामागून एक अशा सलग दोन-दोन तीन-तीन वराती. वरातीत नाचणारे उत्साही स्त्री-पुरुष, मुलं, काही ठिकाणी घोडेही! कामाच्या वेळी ट्रॅफीकमधे अडकल्यामुळं हॉर्न वाजवून वरातीच्या बॅन्डला साथ देणारं 'पब्लिक'. अशाच एका कार्यालयातून बाहेर येणारी एक मोठ्ठी वरात - सगळ्यात पुढं फटाक्यांचा धूर काढणारी तरुणाई, त्यामागं सुप्रसिद्ध 'ब्रास बॅन्ड', बॅन्डच्या तालावर नाचणारे प्रतिष्ठित मध्यमवयीन पुरुष, पुरुषांच्या खांद्याला खांदा आणि कंबरेला कंबर लावून नाचणार्या घरंदाज महिला, त्यामागं (नऊवारी, झब्बा, पगडी, वगैरे) पारंपारीक वेषात चार-पाच घोड्यांवर बसलेली किशोरवयीन मुलं-मुली, इथपर्यंत 'ब्रास बॅन्ड'चा आवाज पोचत नसेल की काय म्हणून डॉल्बीची सरकणारी भिंत, आणि त्यातून निघणार्या किंचाळ्यांच्या तालावर बेफाट थिरकणारी ज्ञानेश्वर-मुक्ताईपासून चांगदेवांपर्यंतच्या वयाची बेभान माणसं... अबबब! केवढा हा डामडौल, केवढी प्रतिष्ठा, केवढा खर्च, केवढा मोठेपणा! सहज म्हणून 'ब्रास बॅन्ड'वर वाजणारं गाणं ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्या बॅन्डवाल्याचं मनापासून कौतुक वाटलं. काय चपखल गाणं निवडलं होतं - "भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दरशन छोटे...!"
ऐसी अक्षरे
Subscribe to:
Posts (Atom)