राजकारण...
(मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
निवडणुका जाहीर झाल्या. भाऊसाहेबांच्या ऑफीसमध्ये गर्दी वाढली. चाळीस वर्षं पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला नेता. नगरसेवक ते महापौर असा स्थानिक राजकारणाचा अनुभव. यंदा डायरेक्ट लोकसभेच्या तिकीटाची आशा. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…
मागच्या दोन टर्म खासदार राहिलेले रावसाहेब भाऊंच्याच पक्षाचे. तेसुद्धा चाळीस वर्षांपासून एकनिष्ठ होते… पण कालपर्यंतच ! कालच त्यांनी विरुद्ध पक्षात जाहीर प्रवेश केला. गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मंत्री महोदयांनी तिथंच जाहीर केलं - रावसाहेब आपल्या पक्षाचे खासदारकीचे उमेदवार…
दुसऱ्या दिवशी मुंबईला दोन्ही पक्षांचे बडे नेते भेटले. यंदा स्वतंत्र लढणं मुश्कील आहे, युती करु म्हणाले. संध्याकाळपर्यंत मतदारसंघ वाटून घेतले. पत्रकार परिषद घेतली. दोन दिवसांत उमेदवार जाहीर करू म्हणाले.
जागावाटप करताना सीट भाऊसाहेबांच्या पक्षाकडं आली.
रावसाहेबांनी भाऊसाहेबांना फोन लावला. तुमची स्थानिक राजकारणात गरज आहे म्हणाले. मला लोकसभेचा अनुभव आहे म्हणाले. मी तिसऱ्यांदा खासदार होतो, मग तुम्हाला आमदार करतो असं म्हणाले. जुन्या आठवणी, आंदोलनं आणि मोर्चांची साक्ष काढली. आपण जुने आणि चांगले सहकारी आहोत म्हणाले. विरुद्ध पक्षात जाणं माझी चूक होती म्हणाले. अजूनसुद्धा मनानं मी जुन्याच पक्षाशी एकनिष्ठ आहे असं म्हणाले. लवकरच पुन्हा मूळच्या पक्षात प्रवेश करणार म्हणाले.
भाऊसाहेब फक्त ‘बरं’ म्हणाले.
दोन दिवसांनी मुंबईला मोठा मेळावा झाला, भाऊंच्या पक्षाचा. रावसाहेबांनी पक्षात पुनर्प्रवेश केला. भाऊसाहेब मेळाव्याला गेलेच नाहीत.
रावसाहेबांना जुन्या पक्षाकडून तिकीट मिळालं. विरुद्ध पक्षात त्यांना घेऊन येणारे गृहमंत्री चिडले. युती असूनसुद्धा त्यांनी बंडखोर उमेदवार जाहीर केला. रावसाहेबांना पाडायचं असा मंत्री महोदयांनी निश्चय केला.
रावसाहेबांनी कंबर कसून प्रचार केला. मतदारसंघ पिंजून काढला. चाळीस वर्षं राजकारणाचा आणि दहा वर्षं खासदारकीचा अनुभव पणाला लावला. पण मतदार राजाची पसंती फिरली. विरुद्ध पक्षाचा बंडखोर उमेदवार निवडून आला.
गुलाल उधळला, फटाके वाजले, होर्डींग लागले. तरुण तडफदार खासदार दादासाहेब मिरवणूक संपवून घरी आले. दिवाणखान्यात सोफ्यावर भाऊसाहेब बसले होते. दादासाहेबांनी वाकून नमस्कार केला. तुमचं राजकारण आज कळालं म्हणाले. दहा वर्षांपूर्वी मला 'विनाकारण' विरुद्ध पक्षात पाठवलं, त्याचं फळ आज मिळालं. दहा वर्षं मी तुमच्यावर राग धरला, पण आज तुम्हाला मानलं बाबा ! तुमचा नातू आता वीस वर्षांचा झाला, त्याला कुठल्या पक्षात ‘पेरायचा’ ते आता तुम्हीच ठरवा.
भाऊसाहेब मिशीतल्या मिशीत हसले. मुलाला उठवून शेजारी बसवत बोलले. दादासाहेब, तुम्ही सध्या एकनिष्ठ रहा. दोन-चार टर्ममध्ये तुम्हालाच कळंल, पेरायचं कुठं आणि खुडायचं कुठं… जिथं काहीच नसतं विनाकारण, त्यालाच म्हणतात राजकारण !!
२२/०३/२०१९