कीर्तीच्या ताईने आज एक नवीनच गोष्ट सांगितली. "रविवारी काहीतरी वेगळा खेळ खेळायचा आणि सोमवारी वर्गात आल्यावर त्याबद्दल सगळ्यांना सांगायचं!"
"वेगळा खेळ म्हणजे नक्की काय खेळायचं, ताई?" असं कीर्तीने विचारलं, तेव्हा ताई म्हणाली, "नेहमी खेळता त्यापेक्षा वेगळा खेळ."
"पण आम्हाला थोडेच खेळ खेळता येतात, ताई," सिकंदर म्हणाला.
"अरे म्हणूनच तर वेगळा खेळ खेळायला सांगितलाय ना! त्याशिवाय तुम्हाला आणखी खेळ कसे माहित होणार? जरा विचार करा आणि नवीन खेळ शोधून काढा. सोमवारी वर्गात याल तेव्हा तुम्हाला खूप नवीन नवीन खेळांबद्दल ऐकायला मिळणार आहे."
"पण ताई…" कीर्ती काहीतरी विचारणार होती, पण बोलता बोलता मध्येच थांबली.
"काही शंका असेल तर विचारून घ्या," ताई हसत हसत म्हणाली.
"शंका नाही ताई, पण एक रिक्वेस्ट आहे," ज्योती म्हणाली.
"कसली रिक्वेस्ट?" ताईने विचारलं.
"अगदीच नवीन खेळ शोधून काढायचा म्हणजे फारच कडक नियम आहे, ताई. काहीतरी सूट मिळाली तर बरं होईल…" ज्योतीनं असं म्हटल्यावर कीर्तीनं तिच्याकडं कौतुकानं बघितलं. तिलासुद्धा असंच म्हणायचं होतं, पण कसं म्हणायचं असं वाटून ती मध्येच थांबली होती.
ताई म्हणाली, "फार टेन्शन नका घेऊ. थोडा विचार तरी करा... बरं, ठीक आहे. चला, मी एक सूट देते तुम्हाला…"
"हुर्रेऽऽऽ" सगळी मुलं एकदम ओरडली.
"अरे हो हो, मी अट रद्द केलेली नाही, थोडीशी सूट देईन म्हणाले. अगदी नवीन खेळ नाही सुचला तर निदान नवीन सवंगडी तरी शोधावेच लागतील."
"म्हणजे... खेळ जुनाच चालेल पण वेगळ्या दोस्तांसोबत खेळायचा, असंच ना?" सिकंदरने स्पष्टच विचारून टाकलं.
"हो हो, असंच असंच!" ताई हसत म्हणाली आणि तिने आपली बॅग आवरायला घेतली. म्हणजे आता वर्ग संपला असं सगळ्या मुलांना कळालं.
आता नक्की काय खेळायचं आणि कुणासोबत खेळायचं, यावर विचार करत सगळी मुलं आपापल्या घराकडे चालायला लागली.
"आई, मला काहीतरी नवीन खेळ सुचव ना!" घरी आल्या आल्या कीर्ती म्हणाली.
"बापरे! नवीन खेळ? मी तर मागच्या वीस वर्षात कुठलाच खेळ खेळलेले नाहीये." आईने लढाईच्या आधीच राजीनामा देऊन टाकला.
"असं काय गं, आई?" कीर्ती म्हणाली. "आमच्या ताईने सांगितलंय, नवीन खेळ खेळायचा आणि त्याबद्दल सोमवारी सगळ्यांना सांगायचं. आणि हो, अगदी नवीन नसला तरी जुनाच खेळ नवीन दोस्तांसोबत खेळायचा असंपण सांगितलंय."
"मग सोप्पंय की!" आई म्हणाली. "तुझा नेहमीचा गाड्या दुरुस्त करायचा खेळ खेळू शकतेस तू. फक्त यावेळी तुझ्याकडच्या गाड्या न मोडता दुसर्या कुणाच्या तरी मोडायच्या," असं म्हणून आई हसायला लागली.
"मी गाड्या मोडत नाही काही, गाड्या दुरूस्त करते!" कीर्तीला आईच्या बोलण्याचा राग आला होता.
"बरं बरं, मग तुझ्या गाड्या दुरुस्त करायच्या ऐवजी दुसऱ्या कोणाच्या तरी दुरुस्त कर. झालं समाधान?" आईने विचारलं आणि तिच्या उत्तराची वाट न बघता आतल्या खोलीत निघून गेली.
"आईला माझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्टच नसतो," कीर्ती स्वतःशी पुटपुटली.
"असं कसं म्हणू शकतेस तू, कीर्ती? नऊ महिने पोटात असताना तुझं सगळं तीच एकटी ऐकत नव्हती काय?" पाठीमागून आतमध्ये येत पप्पा बोलले.
"पप्पा!" गर्रकन मागे वळून कीर्ती पप्पांच्या कुशीत धावली. तिला उचलून कडेवर घेत पप्पांनी विचारलं, "काय बोलायचं होतं तुझ्याशी? मला सांग."
मग कीर्तीनं पुन्हा सगळी कहाणी सुरुवातीपासून सांगितली.
"अच्छा! एवढंच होय? हे तर खूपच सोप्पं आहे," असं म्हणत पप्पांनी तिला खाली उतरवलं आणि फ्रेश व्हायला आत निघून गेले. कीर्तीला त्यांची ही युक्तीसुद्धा आता माहिती झाली होती. 'सोप्पं आहे' म्हणायचं आणि हळूच पळून जायचं! जाऊ दे, मलाच काहीतरी विचार करायला लागेल, असं म्हणत कीर्ती आतमध्ये निघून गेली.
बराच वेळ खिडकीतून बाहेर बघत असताना आई आणि पप्पांच्या गप्पा तिच्या कानावर येत होत्या. कीर्तीचे पप्पा एका गॅरेजमध्ये काम करायचे. रोज कामावरून आले की आईला कामावरच्या गमतीजमती सांगायचे. आज कुठली नवीन गाडी दुरुस्त केली, कुठल्या कस्टमरची काय गंमत झाली, काम करताना काय चूक झाली, असं खूप काही सांगण्यासारखं असायचं. कीर्तीसुद्धा त्यांच्या गप्पा ऐकत त्यांच्यासोबत बसायची; पण आज तिला त्यापेक्षा काहीतरी महत्त्वाचा विचार करायचा होता. त्यामुळं ती एकटीच दुसरीकडे बसली होती; पण ऐकत मात्र त्यांच्याच गप्पा होती.
विचार करता करता छोट्या कीर्तीचा मोठा मेंदू थकून गेला आणि हळूहळू तिचे डोळे जड झाले. काही वेळानं कसला तरी गडबड गोंधळ ऐकून ती जागी झाली. थोड्या वेळापूर्वी तर आपण खिडकीतून बाहेर बघत होतो आणि आता खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या ग्राउंडवर कसे काय आलो, ते तिला कळलंच नाही. ग्राउंडच्या चारही बाजूंनी खूप सारी गर्दी जमली होती आणि खूप जोरजोरात ओरडण्याचे आवाजसुद्धा येत होते. पण नक्की कोण जमलं होतं आणि कोण ओरडत होतं, हे काही तिला समजत नव्हतं. कारण सगळीकडून ग्राउंडवर खूप मोठा प्रकाश पडत होता.
'बहुतेक लोकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन केले असतील!' मागे एकदा तिने टीव्हीवर एका मॅचच्या वेळेस असं बघितलं होतं. पण हळूहळू तिच्या डोळ्यांना त्या भगभगीत उजेडाची सवय झाली, तसं तिच्या लक्षात आलं की ते मोबाईलचे टॉर्च नव्हते, तर गाड्यांचे हेडलाईट होते. बंद-चालू होणारे, अप्पर-डिप्पर करणारे, पिवळे आणि पांढरे, खूप सारे लाईट होते.
"अरेच्चा! लोक पार्किंगमध्ये गाडी लावायची सोडून आतमध्ये घेऊन आले की काय." तिला खुदकन हसू आलं; पण तेवढ्यात तिच्या कानाजवळच कुणीतरी जोरात शिट्टी फुंकली आणि तिनं दचकून मागे बघितलं.
एक काळी-पिवळी रिक्षा अगदी तिच्या पायाला नाक लावून उभी होती. "मॅच सुरू होणार आहे, पटकन बाजूला हो!" असं ती रिक्षा तिला म्हणाली.
"बाजूला म्हणजे कुठं?" कीर्तीनं गोंधळून विचारलं.
"तुला पाहिजे तिथं!" असं म्हणत रिक्षाने आपली मान उगीचंच डावीकडे-उजवीकडे वळवली. आता कुठं जायचं हे न कळून कीर्ती पटकन त्या रिक्षामध्येच जाऊन बसली. रिक्षा चालवायला तर कुणीच नव्हतं; पण ती बसल्याबरोबर रिक्षा सुरु झाली आणि ग्राउंडच्या एका टोकाला जाऊन थांबली.
"कसली मॅच आहे इथं?" कीर्तीनं विचारलं.
"फुटबॉलची मॅच आहे. तुला माहिती नाही काय?" रिक्षाने जागेवर थरथरत विचारलं.
"नाही, कुठल्या टीमची आहे?" तिनं पुन्हा विचारलं.
"अरेच्चा!" रिक्षा म्हणाली, "कसली मॅच आहे, कुणाची मॅच आहे, हेच माहिती नसेल तर ग्राउंडवर आलीस कशाला?"
ही रिक्षा फारच उद्धटपणे बोलतीय, असं किर्तीला वाटून गेलं. "खरंच नाही माहिती. मी इथं कशी आले, ते पण आठवत नाहीये," कीर्तीनं खरं ते सांगितलं. यावर रिक्षानं काहीच न बोलता फक्त जागेवर एक गिरकी घेतली आणि करकचुन ब्रेक लावून थांबून राहिली.
ग्राऊंडच्या चारही बाजूंनी आवाज वाढत चालले होते. थोड्याच वेळात ग्राउंडवर काही गाड्या हळूहळू येताना तिला दिसल्या. दोनचाकी, चारचाकी, छोट्या-मोठ्या कितीतरी गाड्या येऊन आपापल्या जागी थांबत होत्या. हे काहीतरी विचित्रच घडतंय, असं किर्तीला वाटत होतं; पण पुन्हा काहीतरी प्रश्न विचारून या रिक्षाचं उद्धट उत्तर ऐकायची तिची इच्छा नव्हती, त्यामुळं ती समोर जे काही चाललंय ते गुपचूप बघू लागली.
घरघर घरघर, व्रूम व्रूम, असे आवाज करत गाड्या जागच्या जागी थरथरत होत्या. अचानक ग्राउंडच्या एका बाजूने सुसाट वेगाने एक सायकल आली आणि ग्राऊंडच्या मधोमध येऊन थांबली. मग कीर्तीला शिट्टीचा आवाज आला; पण ती शिट्टी त्या सायकलनं वाजवली की ती बसलेल्या रिक्षानं वाजवली, हे तिला समजलंच नाही. पण फुटबॉलची मॅच मात्र सुरू झाली.
सगळ्या टू-व्हीलर आणि फोर-व्हीलर एकमेकांना न धडकता बॉल पास करत ग्राउंडवर फिरताना दिसत होत्या. कीर्तीला भारीच मजा वाटू लागली. मधूनच धडधड धडधड आवाज करत एक बुलेट गाडी आली आणि तिने फुटबॉलला जोरात किक मारली. फुटबॉल उंच उडाला; पण समोरच्या टीमचा गोलकीपर म्हणून एक मोठ्ठा ट्रक उभा होता, त्या ट्रकच्या कपाळावर आपटून बॉल परत ग्राउंडच्या मध्ये येऊन पडला. ग्राऊंडच्या सभोवती जमलेल्या गर्दीमधून वेगवेगळे हॉर्नचे आवाज ऐकायला येऊ लागले. पी पी पी, भों भों भों, अशा आवाजांनी एकच कल्लोळ झाला.
कीर्ती थांबली होती त्याच बाजूला एक मोठा स्कोअर बोर्ड लावलेला होता आणि त्याच्या शेजारी उभा राहिलेला एक जाडजूड रोडरोलर ग्राउंडवर बारीक लक्ष ठेवून होता. दोन्ही टीमकडून एकसुद्धा गोल न झाल्यानं बिचाऱ्या रोडरोलरला स्कोअर अपडेट करायची संधीच मिळाली नाही. तो जागेवरच गुरगुरत आणि मागेपुढे मागेपुढे करत थांबून राहिला.
तेवढ्यात ग्राउंडवर एका बाजूला खूप गर्दी झाली. एका छोट्याशा कारने फुटबॉल खेळवत खेळवत अगदी गोल पोस्टपर्यंत नेला होता. अगदी शेवटच्या क्षणी त्या कारने बॉल पास करून त्यांच्या टीममधल्या क्रेनकडे ढकलला. क्रेनची सोंड खाली आली आणि फुटबॉल उचलून तिने बरोबर जाळीमध्ये फेकला.
"गोऽल! गोऽऽल!" असा आरडाओरडा झाला. रोडरोलर स्कोअर बोर्ड अपडेट करायला मागे वळला. पण सायकलने शिट्टी वाजवून सगळ्यांना थांबवलं आणि सांगितलं की, "फुटबॉल खेळताना हाताचा वापर करायची परवानगी नाही."
मग क्रेनचा हात कुठला आणि पाय कुठला याच्यावर वादावादी सुरू झाली. स्कोअर बोर्ड अपडेट करायचा चान्स हुकला याचा रोडरोलरला राग आला आणि गडगड गडगड आवाज करत तो थेट मैदानात घुसला. चिडलेल्या रोडरोलरला येताना बघून दोन्ही टीममधल्या छोट्या-मोठ्या गाड्या इकडे-तिकडे पळत सुटल्या. ही सगळी गडबड बघून कीर्तीला हसावं कि घाबरावं तेच कळेना. या गोंधळात रोडरोलर आपल्याला येऊन धडकला तर आपला चेंदामेंदा होईल, हे लक्षात येऊन रिक्षा पळून जायचा प्रयत्न करू लागली; पण काही केल्या रिक्षा स्टार्ट होईना. नुसतीच जागेवर खाँई खाँई आवाज करत थरथरत राहिली. आता मात्र कीर्तीला हसू आवरेना. ग्राउंडवर गोल-गोल फिरणाऱ्या गाड्या आणि त्यांच्या मागे लागलेला रोडरोलर बघून ती जोरजोरात हसायला लागली.
"कीर्ती, ए कीर्ती, काय झालं हसायला? एकटीच काय हसतेस?" आई आणि पप्पा दोघेही तिच्याकडं आश्चर्यानं बघत उभे राहिले होते. कीर्ती एकदा त्या दोघांकडं आणि एकदा खिडकीतून बाहेर दिसणार्या ग्राउंडकडं बघत हसतच होती. आता यांना काय सांगायचं आणि कसं सांगायचं, हे पण तिला कळत नव्हतं; पण सोमवारी वर्गात सांगण्यासारखं आता तिच्याकडं खूप काही होतं, हे नक्की!
[समाप्त]