ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, July 27, 2024

Ek Don Teen Chaar - New Marathi Movie

नवीन मराठी सिनेमाबद्दल 'चार' शब्द...


निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी यांचा 'एक दोन तीन चार' हा मराठी सिनेमा रिलीज झालाय. राम और श्याम, सीता और गीता, चालबाझ, जुडवा, अशा अनेक जुन्या चित्रपटांचा प्रीक्वेल शोभेल असा हा सिनेमा आहे. विषय वेगळा आहे आणि त्यातल्या टेक्निकल गोष्टीसुद्धा सोप्या करून सांगायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. सिनेमाच्या नावावरून आणि ट्रेलरवरून कन्टेन्टचा अंदाज येतोच, पण इथं कुठलाही स्पॉइलर न देता सिनेमाबद्दल लिहीणार आहे.

निपुणचं कॅरेक्टर खूपच क्यूट आणि बिलीव्हेबल आहे. काही प्रसंग बघितल्यावर या रोलसाठी निपुणच का, या प्रश्नाचं उत्तर सहजच मिळतं. विशेषतः वैदेही आणि निपुणचे कित्येक सीन इमोशनल असले तरी 'ओव्हर' झालेले नाहीत. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री छान जुळून आलीय. वैदेहीला या सिनेमामध्ये अभिनयाची मोठी रेन्ज दाखवायची संधी आणि आव्हान दोन्ही मिळालंय आणि तिने या संधीचं सोनं केलंय असं म्हणायला हरकत नाही. सतीश आळेकरांची एनर्जी आणि स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे. हृषीकेश जोशींचा छोटासा रोल भाव खाऊन जाणारा आहे.

या सिनेमाची स्टोरी आणि डायलॉग मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच थोडेसे धक्कादायक वाटू शकतील असे आहेत. विशेषतः काही नैसर्गिक शब्द आणि क्रिया मोठ्या स्क्रीनवर बघायची अजून सवय नसलेल्यांना ते खटकू शकेल. पण दिग्दर्शक वरुण नार्वेकर, लेखक-अभिनेता निपुण धर्माधिकारी, आणि इतर सगळ्याच कलाकारांनी कसलंही अवघडलेपण न ठेवता हा अवघड विषय मांडलेला आहे.

या सिनेमामध्ये कन्टेन्ट भरपूर असला तरी सिनेमा थोडा रेंगाळल्यासारखा वाटतो. तसा 'अमलताश'सुद्धा संथ होता, पण त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि सुंदर फ्रेम्समुळं संथपणा सुसह्यच नाही तर आवश्यक वाटत होता. 'एक दोन तीन चार' मात्र संथच नाही तर काही ठिकाणी तुटकसुद्धा वाटतो...

एक तर सिनेमाची मांडणी सलग नाही - म्हणजे, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अशा सिक्वेन्समध्ये प्रसंग घडत नाहीत. एप्रिलमधला प्रसंग समजेपर्यंत जानेवारीतला प्रसंग येतो आणि तो संपेपर्यंत डिसेंबर आणि मग मार्च, असा थोडासा कॉम्प्लिकेटेड फ्लो आहे. एका पॉइंटला आल्यावर तर असं वाटायला लागतं की, आतापर्यंत दाखवलेला सिनेमा हे एक स्वप्न होतं आणि खरा सिनेमा इथून सुरु होईल की काय. पण थँकफुली तसं काही होत नाही आणि या उलट-सुलट मांडणीची मजा शेवटी-शेवटी जास्त कळत जाते.

सिनेमाची स्टोरीलाईन ट्रेलरमध्ये खूपच जास्त उलगडून सांगितली की काय असं ॲक्च्युअल सिनेमा बघताना वाटून जातं. असं वाटायचं कारण म्हणजे, थिएटरमध्ये शेजारचे काही प्रेक्षक फक्त ट्रेलरमधले डायलॉग्ज कधी येतायत याची वाट बघत होते, त्या विशिष्ट प्रसंगांना दाद देत होते, आणि मग पुन्हा आपापल्या मोबाईलमध्ये (बहुतेक पुढच्या सिनेमाचा ट्रेलर) बघत होते. वीस सेकंदांच्या रील्ससारखा इफेक्ट काही प्रसंगांमध्ये (कदाचित मलाच) जाणवत होता.

स्टोरी, डायलॉग्ज, म्युझिक, गाणी, सिनेमॅटोग्राफी, मस्त जमून आलंय. पुण्यातल्या जागा मोठ्या स्क्रीनवर पुन्हा बघायला मिळाल्या, छान वाटलं.

एखादं शहर तुमच्या सिनेमामधलं कॅरेक्टर होऊ शकतं का? सचिन कुंडलकरच्या सिनेमांमध्ये तर शहर (पुणे, मुंबई, पाँडेचेरी, गोवा, इत्यादी) हेच मुख्य पात्र असतं अनेकदा. अमलताश, गोदावरी, अशा अलीकडच्या काही सिनेमांमध्ये हे पात्र ठळकपणे दिसलंय. आता 'एक दोन तीन चार' या सिनेमात असाच अनुभव घेताना छान वाटतं. पण हा अनुभव मोठ्या स्क्रीनवर सिनेमा बघताना मिळतो तसा मोबाईल आणि लॅपटॉपवर नाही मिळत, हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं.

मराठी सिनेमामध्ये एकदा एखादा ट्रेन्ड आला की अजीर्ण होईपर्यंत तसेच सिनेमे येत राहतात. 'दुनियादारी'नंतर आलेले कॉलेज लाईफवरचे सिनेमे, 'झिम्मा'नंतर आलेले बायकांच्या आयुष्यावरचे सिनेमे, लागोपाठ आलेले काही बायोपिक्स, यामधून बाहेर पडून परेश मोकाशी, नागराज मंजुळे, आशिष बेंडे, वरुण नार्वेकर, निपुण धर्माधिकारी, यांचे सिनेमे बघायला भारी वाटतंय. असंच काम करत राहण्यासाठी अनेक शुभेच्छा!

मंदार शिंदे
२०/०७/२०२४


Share/Bookmark