ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Saturday, January 16, 2010

घोरणे

आजा घोरतसे, तसाच मुलगा, ती सूनही घोरते,
नातू आणि तशीच नात शयनी घुर्घूर घुंकारिते.
झोपेचे मम जाहले खवटसे त्या रात्रिला खोबरे,
आले मात्र हसू, मला गवसले, घोरी घराणे खरे !
- कवी सोपानदेव चौधरी


Share/Bookmark

जीवन

"आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचं हे विराट कमलपुष्प उमललं आहे;
आणि तो भ्रमरचंद्र आपले रुपेरी पंख पालवून त्या कमलाभोवती अखंड गुंजारव करीत आहे.
त्या कमलाच्या पाकळीवर एक सुंदर दवबिंदू पडला आहे.
त्याचं नाव 'जीवन' !"
-कुसुमाग्रज


Share/Bookmark

मामा

'मामा' या शब्दाची मोठी गंमत आहे. त्याला 'शकुनी' म्हणावं तरी पंचाईत, अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत !
- पु. ल. देशपांडे


Share/Bookmark

विज्ञान आणि तंत्रज्ञान


विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मी वाचलेली सर्वात सोपी व्याख्या :

"परिवर्तन किंवा बदल हा अगोदरची स्थिती आणि नंतरची स्थिती यातला फरक असतो. एखादी गरम वस्तू थंड झाली, तर तिच्या स्थितीत परिवर्तन झाले, असे आपण म्हणतो. थंड वस्तू पुन्हा गरम झाली तरी तो, परिवर्तनाचाच प्रकार. असे बदल विश्वात ज्या नियमांनुसार घडतात, त्यांना आपण विश्वव्यवस्थेचे नियम म्हणतो आणि हे नियम आपल्याला ज्यामुळे समजतात, त्याला आपण विज्ञान म्हणतो. नियम कळून त्यानुसार आपण गरम वस्तूला थंड किंवा थंड वस्तूला गरम करुन पुन्हा-पुन्हा आपल्याला हवा तसा बदल घडवू शकलो, तर त्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो."
- दिलीप पु. चित्रे


Share/Bookmark

Tuesday, December 29, 2009

आठवण

तुझी आठवण आली की,
मन माझं फुलपाखरु होतं.
भूतकाळाच्या बगीच्यामध्ये
तुझ्या सावलीमागे भिरभिरतं.

तुझाच चेहरा समजून ते
सुंदर फुलांवर स्थिरावतं;
तू नाहीस हे उमगल्यावर
तेही बिचारं हिरमुसतं.

पकडायला जातो तेव्हा
चिमटीतून हळूच निसटतं;
पण जाता जाता बोटांवर
तुझीच आठवण सोडून जातं...

- मंदार


Share/Bookmark

Saturday, December 26, 2009

तू

आपल्याच नादात चालणारा मी
अन्‌ तशीच तूही
स्वतःच्याच विश्वात रमणारा मी
अन्‌ तशीच तूही.

कधी आपले रस्ते जुळले
दोघांनाही नाही कळले;
स्वतःपुरते विसरुन गेलो
दोघांचे सुंदर विश्व बनले.

त्या मंतरलेल्या क्षणांच्या आठवणी
पुनःपुन्हा जागवून जगणारा मी
अन्‌ तशीच तूही !

- मंदार


Share/Bookmark

Wednesday, December 9, 2009

शोध


स्वतःच्याच शोधात मी
परत परत हरवतो आहे,
नाही उमगत माझे मलाच
कोणत्या वाटेवर मी चालतो आहे.

रेशीमबंधांच्या बेड्या जिथे
मंतरलेले हे चक्रव्यूह आहे,
दाखवित रस्ता माझा मलाच
रहस्य मीच उकलत आहे.

सोबत कुणीच येणार नाही
माझे मला हे माहीत आहे,
तरीही वेड्या आशेपायी
शोध माझा चालूच आहे...

- मंदार


Share/Bookmark