ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Wednesday, April 28, 2010

अहंकार सोडा, दयाळू बना

(इमाम फैजल अब्दुल रौफ यांनी, मुस्लिम-अमेरिकन समुदाय व त्यांचे देशबांधव यांच्यात सुसंबंध प्रस्थापित करण्याच्या , आणि हा संदेश जगभरच्या मुस्लिमांपर्यंत पोचवण्याच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. खालील भाषणात ते, कुराण, रुमीच्या कथा, आणि मोहम्मद व येशूच्या उदाहरणांतून दाखवून देतात की, आपल्यातील प्रत्येकाला दयाळू बनण्यापासून रोखणारी एकच गोष्ट आहे - आपण स्वतः)

अहंकार सोडा, दयाळू बना

"मी इस्लामच्या दृष्टीकोनातून अनुकंपेबद्दल बोलतोय, आणि कदाचित माझ्या श्रद्धेमागं खूप गहन विचार नसेलही कारण ती दयेच्या भावनेवरच आधारीत आहे. पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे.

आमच्या कुराण या पवित्र ग्रंथामध्ये ११४ अध्याय आहेत, आणि प्रत्येक अध्यायाचा आरंभ 'बिस्मिल्लाह' नं होतो, त्या परमदयाळू, क्षमाशील ईश्वराच्या नामस्मरणानं, किंवा, सर रिचर्ड बर्टन यांनी म्हटल्याप्रमाणं, (हे रिचर्ड बर्टन म्हणजे एलिझाबेथ टेलरचे पती नव्हेत, तर हे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेले सर रिचर्ड बर्टन, जे जगप्रवासी होते आणि कित्येक साहित्यकृतींचे भाषांतरकार होते, त्यांच्या शब्दांत,) “करुणेनं ओतप्रोत भरलेल्या दयाळू ईश्वराच्या नामस्मरणानं.”

आणि मुस्लिमांसाठी, ईश्वराचं मानवजातीशी संवाद साधण्याचं माध्यम असणार्‍या कुराणातील एका वचनात, ईश्वर बोलतोय आपल्या प्रेषित मोहम्मदाशी, जे अखेरचे प्रेषित मानले जातात, प्रेषितांच्या मालिकेतील, (जी सुरु होते आदम पासून, नोवा, मोझेस, अब्राहम सहित, येशू ख्रिस्तासहित, आणि संपते मोहम्मदापाशी,) तो म्हणतो, “हे मोहम्मदा, आम्ही तुला पाठवलंच नसतं, जर आम्हाला मनुष्यजातीबद्दल रहम नसता, करुणा नसती.”

आणि आपण सर्व मनुष्य प्राण्यांसाठी, आणि आम्हा मुस्लिमांसाठी नक्कीच, प्रेषितानं दाखविलेल्या मार्गावर चालण्यामागं ज्यांचं ध्येय, आणि ज्यांचं उद्दिष्ट स्वतःला त्या प्रेषितासारखं बनविणं हे आहे. आणि त्या प्रेषितानं आपल्या एका वचनात म्हटलं आहे, “स्वतःला दैवी गुणांनी अलंकृत करा.” ईश्वरानं स्वतःच सूचित केलं आहे की करुणा हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. वास्तविक, कुराण असं सांगतं की, “ईश्वरानं स्वतःला दयाळू बनण्याचा आदेश दिला आहे" अथवा, “स्वतःवर करुणेचा अंमल प्रस्थापित केला आहे.” म्हणूनच, आपलं उद्दिष्ट आणि ध्येय असलं पाहिजे, करुणेचे स्रोत बनणं, करुणेचे संप्रेरक होणं, करुणेचे पाईक बनणं, करुणेचे प्रसारक बनणं, आणि करुणेचे कार्यकर्ते बनणं.

हे सर्व ठीक आहे, पण आपलं चुकतं कुठं? आणि या जगात करुणाहीनतेचे स्रोत काय आहेत? याचं उत्तर आपण अध्यात्मिक मार्गानं शोधूयात. प्रत्येक धार्मिक प्रथेमध्ये, एक बाह्य मार्ग असतो आणि एक अंतःमार्ग, किंवा उघड मार्ग आणि गुप्त मार्ग. इस्लामचा गुप्त मार्ग सुफीवाद, किंवा अरेबिक मध्ये तसव्वुफ म्हणून ओळखला जातो. आणि हे पंडीत अथवा गुरु, सुफी परंपरेचे धर्मगुरु, आमच्या प्रेषिताच्या शिकवणीचा आणि उदाहरणांचा दाखला देतात, की आपल्या समस्यांचं मूळ कुठं आहे.

प्रेषितानं पुकारलेल्या एका लढाईत, त्यानं आपल्या अनुयायांना सांगितलं, “आपण छोट्या युद्धाकडून परतत आहोत मोठ्या युद्धाकडं, मोठ्या लढाईकडं.”

आणि ते म्हणाले, “हे देवदूता, आम्ही लढाईला विटलो आहोत. अजून मोठ्या लढाईला आम्ही कसं तोंड देणार?”

तो म्हणाला, “ती स्वतःची लढाई असेल, अहंकाराशी लढाई.” मानवी समस्यांचं मूळ स्वार्थामध्येच असलं पाहिजे, 'मी' मध्ये.

प्रसिद्ध सुफी गुरु रुमी, जे तुमच्यापैकी बर्‍याचजणांना माहिती असतील, त्यांच्या एका गोष्टीत ते एका व्यक्तीबद्दल बोलतात, जी एका मित्राच्या घरी जाते आणि दार ठोठावते, आणि एक आवाज येतो, “कोण आहे?”

“मी आहे,” किंवा व्याकरणदृष्ट्या अचूक सांगायचं तर, “तो मी आहे,” (इंग्रजीमध्ये असंच म्हणतात).

आतून आवाज येतो, “निघून जा.”



कित्येक वर्षांच्या प्रशिक्षण, शिस्त, शोध व धडपडीनंतर, ती व्यक्ती परत येते, आणि अतिशय विनम्रतेनं, ती परत दार ठोठावते.

आतून आवाज येतो, “कोण आहे?”

ती म्हणते, “तूच आहेस, पाषाणहृदयी.”

धाडकन दार उघडतं, आणि आवाज येतो, “आता आत ये, कारण या घरात दोन 'मी'साठी जागा नाही.”

आणि रुमीच्या कथा अध्यात्मिक वाटेवरील रुपकं आहेत. ईश्वराच्या उपस्थितीत, एका अहं पेक्षा जास्त जणांसाठी जागाच नसते, आणि तो एकमेव अहं ईश्वरी असतो. एका शिकवणीमध्ये, जिला आमच्या परंपरेत हदिथ कद्सी म्हणतात, ईश्वर म्हणतो की, “माझा सेवक,” किंवा "माझी निर्मिती, मनुष्य प्राणी, तोपर्यंत माझ्या निकट येत नाहीत, जोपर्यंत ते करत नाहीत, जे मी त्यांना करायला सांगितलं आहे.” आणि तुमच्यातील मालक लोकांना माझं म्हणणं तंतोतंत कळेल. तुमच्या कामगारांनी तुम्ही सांगितलेलं काम करावं अशी तुमची इच्छा असते, आणि ते पूर्ण केल्यावर ते अधिक काम करु शकतात, पण तुम्ही त्यांना जे करायला सांगितलंय त्याकडं दुर्लक्ष न करता.

आणि ईश्वर म्हणतो, “माझा सेवक माझ्या अधिकाधिक निकट येत राहतो, मी त्यांना सांगितलेलं अधिकाधिक करुन,” आपण त्याला जास्तीचं पुण्य म्हणू शकतो, “जोपर्यंत मी त्याच्यावर किंवा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत नाही. आणि जेव्हा मी माझ्या सेवकावर प्रेम करतो,” ईश्वर म्हणतो, मी ते डोळे बनतो ज्यानं तो किंवा ती पाहू शकतात, ते कान ज्यानं तो किंवा ती ऐकू शकतात, तो हात ज्यानं तो वा ती पकडू शकतात, आणि तो पाय ज्यानं तो वा ती चालू शकतात, आणि ते हृदय ज्यानं त्याला वा तिला जाणीव येते.” आपली हीच ईश्वराबरोबरची एकरुपता आहे, जी आपल्या अध्यात्माची आणि सर्व श्रद्धा परंपरांची शिकवण व उद्दीष्ट आहे.

मुस्लिम येशूला सूफी गुरु मानतात, तो महान प्रेषित व दूत, जो अध्यात्मिक मार्गाचं महत्त्व पटवून द्यायला आला. जेव्हा तो म्हणतो, “मीच आत्मा आहे, आणि मीच मार्ग आहे,” जेव्हा प्रेषित मोहम्मद म्हणाले, “माझं दर्शन घेणार्‍याला ईश्वराचंच दर्शन घडतं,” कारण ते ईश्वराचं इतकं एकरुप साधन बनले, की ते ईश्वराचाच अंश बनले, इतकं की ईश्वरेच्छा त्यांच्याच माध्यमातून प्रकट झाली आणि त्यांनी स्वतःचं अस्तित्व आणि अहंकार सोडून दिले. करुणा ही आपल्यामध्ये असतेच. आपल्याला फक्त आपल्या अहंकाराला बाजूला सारायचं आहे, आपला स्वार्थ दूर लोटायचा आहे.

मला खात्री आहे, कदाचित तुमच्यापैकी सर्वांनी, किंवा तुमच्यापैकी बहुतेकांनी, एक अशी अध्यात्मिक स्थिती अनुभवली आहे, तुमच्या आयुष्यातील तो क्षण, काही सेकंद, कदाचित एखादा मिनीट, जेव्हा तुमचा अहंकार गळून पडला. आणि त्या क्षणी, तुम्ही विश्वाशी एकरुपता अनुभवली, त्या पाण्याच्या भांड्याशी एकरुपता, सकल मानव प्राण्यांशी एकरुपता, त्या जगनिर्मात्याशी एकरुपता, आणि सर्वशक्तीनिशी, तो दरारा, गूढतम प्रेम, गूढ करुणेची व दयेची जाणीव, जी तुमच्या आयुष्यामध्ये आजवर अनुभवली नव्हती.

हाच क्षण म्हणजे आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे, अशी भेट की, एका क्षणासाठी, तो पुसून टाकतो ती सीमारेषा, जी आपल्याला भरीस पाडते - मी, मी, मी, माझं, माझं, माझं म्हणायला, आणि त्याऐवजी, रुमीच्या कथेतील व्यक्तीप्रमाणं, आपण म्हणतो, “अरेच्चा, हे तर सर्व तूच आहेस.” हे सर्व तूच आहेस. आणि हेच सर्व आपण आहोत. आणि आम्ही, मी, व आपण सारे तुझाच अंश आहोत. सर्व ईश्वरीय, सर्व उद्दिष्टं, आपला जीवनस्रोत, आणि आपला अंत. तू आमची हृदयं तोडणाराही आहेस. तूच आहेस ज्याच्याकडं आम्ही सर्वांनी बघायचं, ज्याच्या हेतूसाठी आम्ही जगायचं, आणि ज्याच्या हेतूसाठी आम्ही मरायचं, आणि ज्याच्या हेतूसाठी आमचं पुनरुत्थान केलं जाईल ईश्वराला उत्तर देण्यासाठी की आम्ही किती करुणामय जीव आहोत.

आज आमचा संदेश, आणि आमचा उद्देश, आणि तुमच्यापैकी जे आज इथं आहेत, आणि या करुणेच्या सनदेचा उद्देश आहे, आठवण करुन देणं. कारण कुराण नेहमीच आम्हाला लक्षात ठेवायला उद्युक्त करतं, एकमेकांना आठवण करुन देण्यासाठी, की सत्यज्ञान हे प्रत्येक मनुष्यप्राण्यात असतंच.

आपण हे सर्व जाणतो. आपल्यासाठी हे सर्व उपलब्ध आहे. जंगनं त्याला सुप्त मन संबोधलं असेल. आपल्या सुप्त मनातून, तुमच्या स्वप्नांतून, ज्याला कुराणमध्ये म्हटलं आहे, आपली निद्रीतावस्था, दुय्यम मृत्यु, क्षणिक मृत्यु. आपल्या निद्रीतावस्थेत आपल्याला स्वप्नं पडतात, आपल्याला दिव्य दृष्टी मिळते, आपण आपल्या शरीराच्या बाहेरही भ्रमण करतो, आपल्यापैकी बरेचजण. आणि आपल्याला विस्मयकारक गोष्टी दिसतात. आपण आपल्याला ज्ञात अशा अवकाशाच्या मर्यादेबाहेर भ्रमण करतो, आणि आपल्याला ज्ञात असणार्‍या कालमर्यादेबाहेर. पण हे सर्व त्या जगनिर्मात्याचं गुणगान गाण्यासाठी, ज्याचं मूळ नाव आहे - करुणेनं ओतप्रोत भरलेला दयाळू ईश्वर.

ईश्वर, बोख, तुम्हाला जे नाव द्यावं वाटेल ते, अल्लाह, राम, ओम, कुठलंही नाव ज्यायोगे तुम्ही संबोधता अथवा मिळवता दैवी अस्तित्व, तेच निःसंशय अस्तित्वाचं निश्चित स्थान आहे, निःसंशय प्रेम आणि दया आणि करुणा, आणि निःसंशय ज्ञान व विद्वत्ता, ज्याला हिंदू म्हणतात सच्चिदानंद. भाषा वेगळी असेल, पण उद्देश एकच आहे.

रुमीची अजून एक कथा आहे तिघांबद्दल, एक तुर्क, एक अरब, आणि तिसरा एक इंग्रज समजू. एकजण अंगूर मागत असतो, एकजण एनेब मागत असतो, आणि एक जण ग्रेप्स मागत असतो. आणि त्यांच्यात भांडण आणि वादविवाद होतात कारण - मला ग्रेप्स हवेत, मला एनेब हवेत, मला अंगूर हवेत. हे न कळाल्यामुळं, की ते म्हणत असलेले शब्द वेगवेगळ्या भाषांमध्ये एकाच वस्तूबद्दल बोलतात.

निःसंशय वास्तव ही एकच संकल्पना आहे, निःसंशय अस्तित्व ही एकच संकल्पना. कारण निःसंशय म्हणजेच, एकमेव, आणि परिपूर्ण व एकमेवाद्वितीय. हेच परिपूर्ण अस्तित्वाचं केंद्रीकरण, हेच परिपूर्ण शुद्धीचं केंद्रीकरण, जाणीव, करुणा व प्रेमाचं निःसंशय स्थान, हेच ठरवतं देवत्वाचे मुलभूत गुणधर्म.

आणि तेच असले पाहिजेत मानवी अस्तित्वाचे मुलभूत गुणधर्म. कारण मानवजातीची व्याख्या, बहुदा जीवशास्त्रीयदृष्ट्या शरीरविज्ञानशास्त्र म्हणून होते, पण ईश्वर मानवतेची व्याख्या करतो आपल्या परमार्थानुसार, आपल्या स्वभावानुसार.

आणि कुराणात म्हटलंय, तो देवदूतांशी बोलतो व म्हणतो, “जेव्हा मी मातीपासून आदम निर्माण केला, आणि त्यामध्ये माझे प्राण फुंकले, तेव्हा अतिशय थकून गेलो.” देवदूत थकतात, मानवी शरीरासमोर नव्हे, तर मानवी आत्म्यासमोर. का? कारण त्या आत्म्यामध्ये, मानवी आत्म्यामध्ये, दैवी श्वासाचा एक अंश असतो, ईश्वरीय आत्म्याचा एक अंश.

हे बायबलच्या शब्दकोशातही व्यक्त केलं आहे, जेव्हा आपल्याला शिकवलं जातं की ईश्वरीय प्रतिमेतूनच आपली निर्मिती झाली. ईश्वराचं वर्णन कसं कराल? ईश्वराचं वर्णन म्हणजे परिपूर्ण अस्तित्व, परिपूर्ण जाणीव आणि ज्ञान आणि विद्वत्ता आणि परिपूर्ण करुणा व प्रेम.

आणि, म्हणूनच, आपल्याला मनुष्य बनण्यासाठी, मनुष्य बनण्याच्या व्यापक अर्थानं, मानवतेच्या सर्वात सुखी कल्पनेनं, बनावं लागेल योग्य वाहक - आपल्यातील ईश्वरी श्वासाचे; आणि अस्तित्वाच्या परिपूर्णतेचा स्वतःमध्ये शोध घेत, जगण्याचे; अस्तित्वाचे; विद्वत्तेच्या, शुद्धीच्या, जाणीवेच्या गुणधर्माचे; आणि करुणामय व प्रेमळ बनण्याच्या गुणधर्माचे.

माझ्या श्रद्धा परंपरांमधून मला हेच समजतं, आणि इतर श्रद्धा परंपरांच्या माझ्या अभ्यासातूनही मला हेच समजतं. अशा समान व्यासपीठावर आपण एकत्र आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण यासारख्या व्यासपीठावर एकत्र येतो, तेव्हा मला खात्री पटते की आपण एक सुंदर जग निर्माण करु शकतो.

आणि माझा वैयक्तिक विश्वास आहे की, आपण ती मर्यादा गाठली आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांच्या उपस्थितीनं व मदतीनं, आपण ईसाही चं भाकीत सत्यात उतरवू शकतो. कारण त्यानं सांगून ठेवलाय असा काळ, जेव्हा लोक त्यांच्या तलवारींचे नांगर बनवतील आणि अजून परत युद्ध करणार नाहीत.

आपण मानवी इतिहासाच्या त्या स्थितीप्रत आलो आहोत, जिथं आपल्याकडं पर्याय नाही. आपल्याला आपला अहंकार उतरवलाच पाहिजे. अहंकारावर नियंत्रण आणलंच पाहिजे, मग तो वैयक्तिक अहंकार असेल, व्यक्तिगत अहंकार असेल, कौटुंबिक अहंकार, वा राष्ट्रीय अहंकार. आणि सर्वजण मिळून त्या एकमेवाद्वितीय परमेश्वराचं गुणगान गावोत.”

स्रोतः http://www.ted.com/talks/lang/mar/imam_feisal_abdul_rauf.html


Share/Bookmark

Wednesday, April 7, 2010

श्रीमंतांच्या तिजोर्‍या कशा उघडायच्या?

(प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या लेखावरुन)

नुकताच पार पडलेला आयपीएल लिलाव म्हणजे जबरदस्त यशस्वीतेचं उदाहरण मानावं लागेल. यामध्ये १० वर्षांसाठीच्या फ्रांचाईजेसना १,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळाली. शून्यातून सुरुवात करुन, केवळ तीनच वर्षांत भारतातील सर्वांत मोठा शो-बिझ इव्हेंट साकारण्यासाठी तर आयपीएल व्यवस्थापन प्रशंसेस पात्र आहेच. पण त्याबरोबरच त्यांनी आत्ताच्या फ्रांचाईजेस इतक्या जास्त किंमतीला विकल्या आहेत की, त्या खरेदी करणार्‍यांसाठी त्यातून पैसे कमविणं जवळजवळ अशक्यप्राय बनलं आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांनी आयपीएलचे हिशेब मांडले आहेत आणि प्रत्येकाचे अंदाज निरनिराळे येत आहेत. पण ढोबळमानानं पाहता, ताज्या लिलावातील विजेत्याला प्रति मोसम १७० कोटी रुपये नुसती फ्रांचाईज किंमतच मोजावी लागणार आहे. गेल्या हंगामात, खेळाडूंचं मानधन व प्रशासकीय खर्चासाठी साधारण ४५ कोटी रुपये खर्च आला (त्रयस्थ संशोधन केंद्रांच्या अंदाजानुसार). अशाप्रकारे, पैशाचं कालसापेक्ष अवमूल्यन विचारात न घेतादेखील, या फ्रांचाईजेसना नुसता खर्च भरुन काढण्यासाठी प्रति मोसम २१५ कोटी रुपये उत्पन्न मिळवणं भाग आहे. आयपीएलच्या दुसर्‍या मोसमातील कोणताही संघमालक सर्वाधिक ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकला नाही. म्हणजेच नव्या संघमालकांनी त्यांच्या संघांसाठी अवास्तव किंमत मोजली, हे उघड गुपित आहे. इतर उत्पन्नाच्या स्रोतांद्वारे हळूहळू आयपीएलकडं अधिक पैसा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्याबरोबरच अनेक धोकेदेखील संभवतात. नवनवीन संघांच्या समावेशामुळं आयपीएलचं प्रेक्षणमूल्य सौम्य होऊ शकतं. भारताच्या या सर्वांत मोठ्या रिऍलिटी शोची नवलाई उतरणीला लागू शकते. शेवटी, आयपीएल हा शो-बिझनेसचाच एक प्रकार आहे आणि अनिश्चितता हा त्याचा मुलभूत गुणधर्म आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, आयपीएलची प्रेक्षकसंख्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकांच्याही खाली घसरु शकते. (तसाही, या मालिकांचा निर्मितीखर्च आयपीएलपेक्षा कितीतरी पटींनी कमी असतो.) या निष्कर्षाचे परिणाम महत्त्वपूर्ण ठरु शकतात.

असं असलं तरी, मोठमोठ्या उद्योगसमूहांनी या शो-बिझचा भाग होण्यासाठी मजबूत पैसा ओतला आहे. त्यांच्याकडं नक्कीच वित्त अधिकारी व सल्लागार असतील, ज्यांनी ही सर्व गणितं जुळवायचा प्रयत्न केला असेल. गुंतवणुकीवरील परतावा हा संघखरेदीमागील मुख्य उद्देश नसेलही कदाचित. पैशाव्यतिरिक्त अजून काहितरी फायदे त्यामागे असले पाहिजेत. आयपीएल संघाच्या मालकीतून मिळणारी झटपट दृश्य प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा इतर कोणत्याही मार्गानं मिळवणं अवघड आहे. तुमच्या बॅँक-खात्यामध्ये लाखो-करोडो रुपये असतील, पण तुम्हाला स्टेडियममध्ये बॉलीवूडच्या तारकांसोबत बसायची संधी मिळते का? तुमच्या संघाच्या प्रत्येक चौकार-षटकारासाठी ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज तुम्हाला टाळी देतो का? सामन्यानंतरच्या पार्टीमध्ये सर्वांदेखत चिअरलीडर्सच्या ग्लासाला ग्लास भिडवण्याची संधी तुमच्या पैशानं मिळू शकते का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, असं करताना अख्खा देश तुम्हाला पाहत असतो का? नसेल तर मग नुसत्या गगनचुंबी इमारती आणि तेलसाठ्यांचा काय उपयोग? काही भागधारकांना आणि सतावणार्‍या बॅँकर्सना परतावा मिळवून देण्यासाठी? छे छे, तुमच्याकडं पैसा असेल तर, लोकांना तुमची किंमत कळालीच पाहिजे. आणि जर 'पेट्रोकेमिकल्स बनवायचं रटाळ काम करणारा' ही ओळख बदलून, 'कोची कूलनेस संघाचा मालक' अशी तुमची ओळख बनणार असेल तर, वर्षाला १०० कोटी रुपयांच्या नुकसानीचं काही वाटणारही नाही.

खरंच की. एका आयपीएल संघाची मालकीच तुम्हाला झटपट प्रसिद्धी, उत्साह, ग्लॅमर मिळवून देऊ शकते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला अलौकीक झळाळी आणू शकते. तुमच्याकडं विशेष कौशल्य किंवा जन्मजात कलागुण असण्याची काही गरज नाही. फक्त एकच गोष्ट हवी जिची चलती आहे - पैसा.

काहीजणांना हा सर्व प्रकार म्हणजे उथळ व्यावहारिकता वाटेल. मला मात्र यामध्ये, श्रीमंत भारतीयांकडून पैसे कसे उकळायचे याच्या भारी युक्त्या दिसतात. पाश्चिमात्य लक्ष्मीपुत्रांच्या तुलनेत, भारतातील श्रीमंत लोक आपल्या संपत्तीच्या खूपच क्षुल्लक प्रमाणात दानधर्म करतात. हा त्या लोकांचा खाजगी निर्णय असू शकतो, आणि खूपशा सेवाभावी संस्थांना भारतीय उद्योग क्षेत्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागतो. शेवटी, या सेवाभावी चळवळींतून नफा कमविण्याची संधी थोडीच मिळते? पण, आयपीएल लिलावांनी सिद्ध केलं आहे की, नफ्याच्या आशेशिवायही श्रीमंत लोक आपल्या तिजोर्‍या उघडतात आणि प्रचंड पैसा ओततात, फक्त तुम्ही एक गोष्ट सांभाळली पाहिजे - त्यांचा अहंकार. तुम्ही त्यांना जोपर्यंत खूष ठेवाल तोपर्यंत ते पैसा ओतत राहतील.

या श्रीमंत लोकांना आपण कुणीतरी महान व्यक्ती आहोत असं वाटायला लावणार्‍या गोष्टी देऊ करण्यात काहीच गैर नाही. यातून बहुविध संधी निर्माण होतील – उड्डाणपूल, सी लिंक, रस्ते, गल्ल्या, मेट्रो स्टेशन्स, एखाद्या मार्गावरील रेल्वे, यांना अशा श्रीमंत लोकांची नावं देता येतील – जे त्यासाठी बोली लावून अधिकाधिक पैसे मोजतील. एकदा का यासाठी चढाओढ सुरु झाली की, ही साथ वार्‍यासारखी पसरत जाईल आणि उद्याच्या बातम्यांमध्ये झळकण्यासाठी हे लोक एकमेकांच्या वरचढ बोली लावू लागतील. जर यातून चांगल्या कामांसाठी काही हजार कोटी रुपये उभे होणार असतील, तर त्यामध्ये गैर काय?

भरपूर निधी मिळवण्यासाठी, सरकार त्या दानशूर माणसाचं नाव नाणी व नोटांवर छापू शकतं - भले ते मर्यादीत काळासाठी का असेना. सरकारी महाविद्यालयांना श्रीमंत माणसांची नावं देता येतील – यातून फक्त पैसाच उभा राहणार नाही तर, त्यांच्या नावाचा वापर त्यांना संस्थेची गुणवत्ता राखण्यासही उद्युक्त करु शकेल.

नाममात्र अधिकार असणारी काही सरकारी पदं श्रीमंत लोकांना देऊ करता येतील. प्रचंड किंमत मोजून त्यांना एका वर्षासाठी द्वितीय उपाध्यक्ष असं काहितरी बनता येईल, ज्यायोगे त्यांना प्रत्येक परदेशी अधिकारी व पाहुण्यांसोबत फोटोमध्ये झळकायला मिळेल आणि एका साधारण खतनिर्मिती कारखान्याचा मालक यापेक्षा अधिक प्रतिष्ठेनं मिरवता येईल.

यापैकी काही सूचना विचित्रही वाटतील, पण निदान माझ्या बोलण्याचा रोख तरी तुमच्या लक्षात आला असेल. अहंकार हे माणसाच्या अंतरंगात राहणारं, कायम भुकेनं वसवसलेलं जनावर आहे. तो माणूस कितीही यशस्वी वा प्रसिद्ध असला तरी या जनावराला खाऊ घालावंच लागतं. ललित मोदी आणि आयपीएल व्यवस्थापनानं यालाच लक्ष्य करुन, दुप्पट भावानं संघ विकले आणि विशेष म्हणजे विकत घेणारे देखील शेवटी खूषच आहेत. या कामगिरीसाठी ते खरंच कौतुकास पात्र आहेत. निधी उभारणार्‍या संस्थांनी व शासकीय संस्थांनी रोख पैशाच्या मोबदल्यात प्रतिष्ठा व प्रसिद्धी देऊ करण्यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे, खास करुन जेव्हा चांगल्या योजनांसाठी निधी अत्यंत आवश्यक असतो.

तोपर्यंत, तुमच्याकडं १,७०० कोटी रुपये पडून नसतील, तर तुम्ही नशीबवान आहात असं समजा. कधीकधी गरजेपेक्षा जास्त पैसा तुम्हाला असे बावळट प्रकार करायला लावतो. त्यापेक्षा टीव्हीवरच्या चीअरलीडर्स पाहणं कितीतरी चांगलं.


(स्रोतः http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/all-that-matters/How-to-make-the-rich-open-their-wallets/articleshow/5758477.cms)


Share/Bookmark