(इमाम फैजल अब्दुल रौफ यांनी, मुस्लिम-अमेरिकन समुदाय व त्यांचे देशबांधव यांच्यात सुसंबंध प्रस्थापित करण्याच्या , आणि हा संदेश जगभरच्या मुस्लिमांपर्यंत पोचवण्याच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. खालील भाषणात ते, कुराण, रुमीच्या कथा, आणि मोहम्मद व येशूच्या उदाहरणांतून दाखवून देतात की, आपल्यातील प्रत्येकाला दयाळू बनण्यापासून रोखणारी एकच गोष्ट आहे - आपण स्वतः)
अहंकार सोडा, दयाळू बना
"मी इस्लामच्या दृष्टीकोनातून अनुकंपेबद्दल बोलतोय, आणि कदाचित माझ्या श्रद्धेमागं खूप गहन विचार नसेलही कारण ती दयेच्या भावनेवरच आधारीत आहे. पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे.
आमच्या कुराण या पवित्र ग्रंथामध्ये ११४ अध्याय आहेत, आणि प्रत्येक अध्यायाचा आरंभ 'बिस्मिल्लाह' नं होतो, त्या परमदयाळू, क्षमाशील ईश्वराच्या नामस्मरणानं, किंवा, सर रिचर्ड बर्टन यांनी म्हटल्याप्रमाणं, (हे रिचर्ड बर्टन म्हणजे एलिझाबेथ टेलरचे पती नव्हेत, तर हे शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेले सर रिचर्ड बर्टन, जे जगप्रवासी होते आणि कित्येक साहित्यकृतींचे भाषांतरकार होते, त्यांच्या शब्दांत,) “करुणेनं ओतप्रोत भरलेल्या दयाळू ईश्वराच्या नामस्मरणानं.”
आणि मुस्लिमांसाठी, ईश्वराचं मानवजातीशी संवाद साधण्याचं माध्यम असणार्या कुराणातील एका वचनात, ईश्वर बोलतोय आपल्या प्रेषित मोहम्मदाशी, जे अखेरचे प्रेषित मानले जातात, प्रेषितांच्या मालिकेतील, (जी सुरु होते आदम पासून, नोवा, मोझेस, अब्राहम सहित, येशू ख्रिस्तासहित, आणि संपते मोहम्मदापाशी,) तो म्हणतो, “हे मोहम्मदा, आम्ही तुला पाठवलंच नसतं, जर आम्हाला मनुष्यजातीबद्दल रहम नसता, करुणा नसती.”
आणि आपण सर्व मनुष्य प्राण्यांसाठी, आणि आम्हा मुस्लिमांसाठी नक्कीच, प्रेषितानं दाखविलेल्या मार्गावर चालण्यामागं ज्यांचं ध्येय, आणि ज्यांचं उद्दिष्ट स्वतःला त्या प्रेषितासारखं बनविणं हे आहे. आणि त्या प्रेषितानं आपल्या एका वचनात म्हटलं आहे, “स्वतःला दैवी गुणांनी अलंकृत करा.” ईश्वरानं स्वतःच सूचित केलं आहे की करुणा हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. वास्तविक, कुराण असं सांगतं की, “ईश्वरानं स्वतःला दयाळू बनण्याचा आदेश दिला आहे" अथवा, “स्वतःवर करुणेचा अंमल प्रस्थापित केला आहे.” म्हणूनच, आपलं उद्दिष्ट आणि ध्येय असलं पाहिजे, करुणेचे स्रोत बनणं, करुणेचे संप्रेरक होणं, करुणेचे पाईक बनणं, करुणेचे प्रसारक बनणं, आणि करुणेचे कार्यकर्ते बनणं.
हे सर्व ठीक आहे, पण आपलं चुकतं कुठं? आणि या जगात करुणाहीनतेचे स्रोत काय आहेत? याचं उत्तर आपण अध्यात्मिक मार्गानं शोधूयात. प्रत्येक धार्मिक प्रथेमध्ये, एक बाह्य मार्ग असतो आणि एक अंतःमार्ग, किंवा उघड मार्ग आणि गुप्त मार्ग. इस्लामचा गुप्त मार्ग सुफीवाद, किंवा अरेबिक मध्ये तसव्वुफ म्हणून ओळखला जातो. आणि हे पंडीत अथवा गुरु, सुफी परंपरेचे धर्मगुरु, आमच्या प्रेषिताच्या शिकवणीचा आणि उदाहरणांचा दाखला देतात, की आपल्या समस्यांचं मूळ कुठं आहे.
प्रेषितानं पुकारलेल्या एका लढाईत, त्यानं आपल्या अनुयायांना सांगितलं, “आपण छोट्या युद्धाकडून परतत आहोत मोठ्या युद्धाकडं, मोठ्या लढाईकडं.”
आणि ते म्हणाले, “हे देवदूता, आम्ही लढाईला विटलो आहोत. अजून मोठ्या लढाईला आम्ही कसं तोंड देणार?”
तो म्हणाला, “ती स्वतःची लढाई असेल, अहंकाराशी लढाई.” मानवी समस्यांचं मूळ स्वार्थामध्येच असलं पाहिजे, 'मी' मध्ये.
प्रसिद्ध सुफी गुरु रुमी, जे तुमच्यापैकी बर्याचजणांना माहिती असतील, त्यांच्या एका गोष्टीत ते एका व्यक्तीबद्दल बोलतात, जी एका मित्राच्या घरी जाते आणि दार ठोठावते, आणि एक आवाज येतो, “कोण आहे?”
“मी आहे,” किंवा व्याकरणदृष्ट्या अचूक सांगायचं तर, “तो मी आहे,” (इंग्रजीमध्ये असंच म्हणतात).
आतून आवाज येतो, “निघून जा.”
कित्येक वर्षांच्या प्रशिक्षण, शिस्त, शोध व धडपडीनंतर, ती व्यक्ती परत येते, आणि अतिशय विनम्रतेनं, ती परत दार ठोठावते.
आतून आवाज येतो, “कोण आहे?”
ती म्हणते, “तूच आहेस, पाषाणहृदयी.”
धाडकन दार उघडतं, आणि आवाज येतो, “आता आत ये, कारण या घरात दोन 'मी'साठी जागा नाही.”
आणि रुमीच्या कथा अध्यात्मिक वाटेवरील रुपकं आहेत. ईश्वराच्या उपस्थितीत, एका अहं पेक्षा जास्त जणांसाठी जागाच नसते, आणि तो एकमेव अहं ईश्वरी असतो. एका शिकवणीमध्ये, जिला आमच्या परंपरेत हदिथ कद्सी म्हणतात, ईश्वर म्हणतो की, “माझा सेवक,” किंवा "माझी निर्मिती, मनुष्य प्राणी, तोपर्यंत माझ्या निकट येत नाहीत, जोपर्यंत ते करत नाहीत, जे मी त्यांना करायला सांगितलं आहे.” आणि तुमच्यातील मालक लोकांना माझं म्हणणं तंतोतंत कळेल. तुमच्या कामगारांनी तुम्ही सांगितलेलं काम करावं अशी तुमची इच्छा असते, आणि ते पूर्ण केल्यावर ते अधिक काम करु शकतात, पण तुम्ही त्यांना जे करायला सांगितलंय त्याकडं दुर्लक्ष न करता.
आणि ईश्वर म्हणतो, “माझा सेवक माझ्या अधिकाधिक निकट येत राहतो, मी त्यांना सांगितलेलं अधिकाधिक करुन,” आपण त्याला जास्तीचं पुण्य म्हणू शकतो, “जोपर्यंत मी त्याच्यावर किंवा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत नाही. आणि जेव्हा मी माझ्या सेवकावर प्रेम करतो,” ईश्वर म्हणतो, मी ते डोळे बनतो ज्यानं तो किंवा ती पाहू शकतात, ते कान ज्यानं तो किंवा ती ऐकू शकतात, तो हात ज्यानं तो वा ती पकडू शकतात, आणि तो पाय ज्यानं तो वा ती चालू शकतात, आणि ते हृदय ज्यानं त्याला वा तिला जाणीव येते.” आपली हीच ईश्वराबरोबरची एकरुपता आहे, जी आपल्या अध्यात्माची आणि सर्व श्रद्धा परंपरांची शिकवण व उद्दीष्ट आहे.
मुस्लिम येशूला सूफी गुरु मानतात, तो महान प्रेषित व दूत, जो अध्यात्मिक मार्गाचं महत्त्व पटवून द्यायला आला. जेव्हा तो म्हणतो, “मीच आत्मा आहे, आणि मीच मार्ग आहे,” जेव्हा प्रेषित मोहम्मद म्हणाले, “माझं दर्शन घेणार्याला ईश्वराचंच दर्शन घडतं,” कारण ते ईश्वराचं इतकं एकरुप साधन बनले, की ते ईश्वराचाच अंश बनले, इतकं की ईश्वरेच्छा त्यांच्याच माध्यमातून प्रकट झाली आणि त्यांनी स्वतःचं अस्तित्व आणि अहंकार सोडून दिले. करुणा ही आपल्यामध्ये असतेच. आपल्याला फक्त आपल्या अहंकाराला बाजूला सारायचं आहे, आपला स्वार्थ दूर लोटायचा आहे.
मला खात्री आहे, कदाचित तुमच्यापैकी सर्वांनी, किंवा तुमच्यापैकी बहुतेकांनी, एक अशी अध्यात्मिक स्थिती अनुभवली आहे, तुमच्या आयुष्यातील तो क्षण, काही सेकंद, कदाचित एखादा मिनीट, जेव्हा तुमचा अहंकार गळून पडला. आणि त्या क्षणी, तुम्ही विश्वाशी एकरुपता अनुभवली, त्या पाण्याच्या भांड्याशी एकरुपता, सकल मानव प्राण्यांशी एकरुपता, त्या जगनिर्मात्याशी एकरुपता, आणि सर्वशक्तीनिशी, तो दरारा, गूढतम प्रेम, गूढ करुणेची व दयेची जाणीव, जी तुमच्या आयुष्यामध्ये आजवर अनुभवली नव्हती.
हाच क्षण म्हणजे आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे, अशी भेट की, एका क्षणासाठी, तो पुसून टाकतो ती सीमारेषा, जी आपल्याला भरीस पाडते - मी, मी, मी, माझं, माझं, माझं म्हणायला, आणि त्याऐवजी, रुमीच्या कथेतील व्यक्तीप्रमाणं, आपण म्हणतो, “अरेच्चा, हे तर सर्व तूच आहेस.” हे सर्व तूच आहेस. आणि हेच सर्व आपण आहोत. आणि आम्ही, मी, व आपण सारे तुझाच अंश आहोत. सर्व ईश्वरीय, सर्व उद्दिष्टं, आपला जीवनस्रोत, आणि आपला अंत. तू आमची हृदयं तोडणाराही आहेस. तूच आहेस ज्याच्याकडं आम्ही सर्वांनी बघायचं, ज्याच्या हेतूसाठी आम्ही जगायचं, आणि ज्याच्या हेतूसाठी आम्ही मरायचं, आणि ज्याच्या हेतूसाठी आमचं पुनरुत्थान केलं जाईल ईश्वराला उत्तर देण्यासाठी की आम्ही किती करुणामय जीव आहोत.
आज आमचा संदेश, आणि आमचा उद्देश, आणि तुमच्यापैकी जे आज इथं आहेत, आणि या करुणेच्या सनदेचा उद्देश आहे, आठवण करुन देणं. कारण कुराण नेहमीच आम्हाला लक्षात ठेवायला उद्युक्त करतं, एकमेकांना आठवण करुन देण्यासाठी, की सत्यज्ञान हे प्रत्येक मनुष्यप्राण्यात असतंच.
आपण हे सर्व जाणतो. आपल्यासाठी हे सर्व उपलब्ध आहे. जंगनं त्याला सुप्त मन संबोधलं असेल. आपल्या सुप्त मनातून, तुमच्या स्वप्नांतून, ज्याला कुराणमध्ये म्हटलं आहे, आपली निद्रीतावस्था, दुय्यम मृत्यु, क्षणिक मृत्यु. आपल्या निद्रीतावस्थेत आपल्याला स्वप्नं पडतात, आपल्याला दिव्य दृष्टी मिळते, आपण आपल्या शरीराच्या बाहेरही भ्रमण करतो, आपल्यापैकी बरेचजण. आणि आपल्याला विस्मयकारक गोष्टी दिसतात. आपण आपल्याला ज्ञात अशा अवकाशाच्या मर्यादेबाहेर भ्रमण करतो, आणि आपल्याला ज्ञात असणार्या कालमर्यादेबाहेर. पण हे सर्व त्या जगनिर्मात्याचं गुणगान गाण्यासाठी, ज्याचं मूळ नाव आहे - करुणेनं ओतप्रोत भरलेला दयाळू ईश्वर.
ईश्वर, बोख, तुम्हाला जे नाव द्यावं वाटेल ते, अल्लाह, राम, ओम, कुठलंही नाव ज्यायोगे तुम्ही संबोधता अथवा मिळवता दैवी अस्तित्व, तेच निःसंशय अस्तित्वाचं निश्चित स्थान आहे, निःसंशय प्रेम आणि दया आणि करुणा, आणि निःसंशय ज्ञान व विद्वत्ता, ज्याला हिंदू म्हणतात सच्चिदानंद. भाषा वेगळी असेल, पण उद्देश एकच आहे.
रुमीची अजून एक कथा आहे तिघांबद्दल, एक तुर्क, एक अरब, आणि तिसरा एक इंग्रज समजू. एकजण अंगूर मागत असतो, एकजण एनेब मागत असतो, आणि एक जण ग्रेप्स मागत असतो. आणि त्यांच्यात भांडण आणि वादविवाद होतात कारण - मला ग्रेप्स हवेत, मला एनेब हवेत, मला अंगूर हवेत. हे न कळाल्यामुळं, की ते म्हणत असलेले शब्द वेगवेगळ्या भाषांमध्ये एकाच वस्तूबद्दल बोलतात.
निःसंशय वास्तव ही एकच संकल्पना आहे, निःसंशय अस्तित्व ही एकच संकल्पना. कारण निःसंशय म्हणजेच, एकमेव, आणि परिपूर्ण व एकमेवाद्वितीय. हेच परिपूर्ण अस्तित्वाचं केंद्रीकरण, हेच परिपूर्ण शुद्धीचं केंद्रीकरण, जाणीव, करुणा व प्रेमाचं निःसंशय स्थान, हेच ठरवतं देवत्वाचे मुलभूत गुणधर्म.
आणि तेच असले पाहिजेत मानवी अस्तित्वाचे मुलभूत गुणधर्म. कारण मानवजातीची व्याख्या, बहुदा जीवशास्त्रीयदृष्ट्या शरीरविज्ञानशास्त्र म्हणून होते, पण ईश्वर मानवतेची व्याख्या करतो आपल्या परमार्थानुसार, आपल्या स्वभावानुसार.
आणि कुराणात म्हटलंय, तो देवदूतांशी बोलतो व म्हणतो, “जेव्हा मी मातीपासून आदम निर्माण केला, आणि त्यामध्ये माझे प्राण फुंकले, तेव्हा अतिशय थकून गेलो.” देवदूत थकतात, मानवी शरीरासमोर नव्हे, तर मानवी आत्म्यासमोर. का? कारण त्या आत्म्यामध्ये, मानवी आत्म्यामध्ये, दैवी श्वासाचा एक अंश असतो, ईश्वरीय आत्म्याचा एक अंश.
हे बायबलच्या शब्दकोशातही व्यक्त केलं आहे, जेव्हा आपल्याला शिकवलं जातं की ईश्वरीय प्रतिमेतूनच आपली निर्मिती झाली. ईश्वराचं वर्णन कसं कराल? ईश्वराचं वर्णन म्हणजे परिपूर्ण अस्तित्व, परिपूर्ण जाणीव आणि ज्ञान आणि विद्वत्ता आणि परिपूर्ण करुणा व प्रेम.
आणि, म्हणूनच, आपल्याला मनुष्य बनण्यासाठी, मनुष्य बनण्याच्या व्यापक अर्थानं, मानवतेच्या सर्वात सुखी कल्पनेनं, बनावं लागेल योग्य वाहक - आपल्यातील ईश्वरी श्वासाचे; आणि अस्तित्वाच्या परिपूर्णतेचा स्वतःमध्ये शोध घेत, जगण्याचे; अस्तित्वाचे; विद्वत्तेच्या, शुद्धीच्या, जाणीवेच्या गुणधर्माचे; आणि करुणामय व प्रेमळ बनण्याच्या गुणधर्माचे.
माझ्या श्रद्धा परंपरांमधून मला हेच समजतं, आणि इतर श्रद्धा परंपरांच्या माझ्या अभ्यासातूनही मला हेच समजतं. अशा समान व्यासपीठावर आपण एकत्र आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण यासारख्या व्यासपीठावर एकत्र येतो, तेव्हा मला खात्री पटते की आपण एक सुंदर जग निर्माण करु शकतो.
आणि माझा वैयक्तिक विश्वास आहे की, आपण ती मर्यादा गाठली आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांच्या उपस्थितीनं व मदतीनं, आपण ईसाही चं भाकीत सत्यात उतरवू शकतो. कारण त्यानं सांगून ठेवलाय असा काळ, जेव्हा लोक त्यांच्या तलवारींचे नांगर बनवतील आणि अजून परत युद्ध करणार नाहीत.
आपण मानवी इतिहासाच्या त्या स्थितीप्रत आलो आहोत, जिथं आपल्याकडं पर्याय नाही. आपल्याला आपला अहंकार उतरवलाच पाहिजे. अहंकारावर नियंत्रण आणलंच पाहिजे, मग तो वैयक्तिक अहंकार असेल, व्यक्तिगत अहंकार असेल, कौटुंबिक अहंकार, वा राष्ट्रीय अहंकार. आणि सर्वजण मिळून त्या एकमेवाद्वितीय परमेश्वराचं गुणगान गावोत.”
स्रोतः http://www.ted.com/talks/lang/mar/imam_feisal_abdul_rauf.html
ऐसी अक्षरे
Wednesday, April 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment