ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Thursday, March 20, 2014

या माजावरती औषध काय?

शिवसेनेच्या प्रसिद्ध ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ पासून मनसेच्या ‘गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा’ पर्यंतचा प्रवास जर तुम्हाला नवनिर्माणाचं आणि सुराज्याचं चिन्ह वाटत असेल तर या ‘माजरोगा’ची लागण तुम्हालाही झाली आहे, हे नक्की. शाळेत प्रतिज्ञा म्हणायची - 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...' आणि प्रत्यक्षात मात्र धर्म, जात, राज्य, शहर, वस्ती, अशा नवनवीन मुद्द्यांवर भेदभाव करायचा. हा ‘आपल्या’तला नाही असं दिसलं की लागले सगळेच चोची मारायला. मग ‘आपल्या’सारखेच शंभर कावळे जमा करायचे आणि सण-समारंभ, जयंत्या-पुण्यतिथ्यांच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शन करत फिरायचं. अशा मिरवणुकांमधल्या स्पीकरचा वाढता आवाज हा मिरवणुकीत सहभागी झालेल्या जनतेच्या ढासळणार्‍या आत्मविश्वासाचं प्रतिक असतं, असं मला नेहमी वाटतं. जेवढा आवाज मोठा, तेवढी माणसं भेदरलेली. आपण कुठल्याही प्रकारे श्रेष्ठ नाही, आपल्यामधे कसलंही विशेष कौशल्य, क‌र्तृत्व नाही, त्यामुळं एकंदरीतच आपला निभाव लागणं कठीण आहे, याची कळत-नकळत जाणीव झालेली माणसं ‘आपल्या’सारख्याच असुरक्षित इतरांचा शोध घेतात आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण...

चार टाळकी एकत्र आली की विधायक कामांऐवजी विध्वंसक कामाचंच प्लॅनिंग सुरु होतं, याचं कारण काय? एक तर 'गर्दीचा आयक्यू हा त्यातील सर्व माणसांच्या आयक्यूचा लसावि असतो', हे वैश्विक सत्य. त्यातून आपल्याकडं (भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, त्याहून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्याहून म्हणजे पुण्यात) भयंकर सुबत्ता आणि स्थैर्य आलेलं आहे. फारसं काम न करता प्रत्येकाला मुबलक (व गरजेपेक्षा जास्त) पैसा मिळतोय. सरकार, प्रशासन, पोलिस वगैरे खूप म्हणजे खूपच सहिष्णुतेनं आणि दयाबुद्धीनं नागरिकांना वागवतायत. (हे वाक्य उपहासानं लिहिलेलं नाही. पुण्याबाहेरील किंवा महाराष्ट्राबाहेरील प्रशासन आणि पोलिसांची भूमिका लक्षात घेतल्यास आपण खूप सुरक्षित आहोत, हे मान्य करावंच लागेल!) आपल्याकडं भूकंप, ज्वालामुखी, महापूर, वगैरे नैसर्गिक आपत्तीदेखील यायची शक्यता दूरदूरपर्यंत नाही. अशा परिस्थितीत, आपण अजिंक्य, अमर, अविनाशी वगैरे झाल्यासारखं जन्तेला वाटण्यात काही आश्चर्य नाही. (इथं ‘जन्ता’ म्हणजे ‘आप’वाले म्हणतात तसे फक्त झोपडपट्टीत राहणारे लोक नव्हे. पैशानं, शिक्षणानं, जातीनं, नोकरीनं, किंवा व्यवसायानं माणसाची लेव्हल ठरवून बरेचजण ‘आम जनते’च्या व्याख्येतून स्वतःची सुटका करुन घेतात. पण ही सगळी आवरणं काढून एकंदरीत माणसांचे स्वभाव, वृत्ती, आणि वर्तणूक यांच्या कसोटीवर ‘जनते’ची व्याख्या केली गेली पाहिजे.) या जन्तेला आपल्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचं आणि सुबत्तेचं श्रेय स्वतःकडंच राखून, उरलेलं अपयश, समस्यांबद्दल मात्र राजकारण, प्रशासन, सरकारला दोष द्यायचा आहे. आणि हा जो धर्माचा, जातीचा, भाषेचा, गावाचा, नावाचा, पैशाचा वगैरे माज आहे ना, त्याची मुळं या स्थैर्य आणि सुबत्तेतच आहेत!

हा आहे आपला आजार. पुण्यात दिवसाढवळ्या बाईकवरुन गोळ्या झाडत दहशतवादी फिरत नाहीत. नदीवरच्या पुलांनीच जोडल्या गेलेल्या पुणे शहराला येता-जाता ‘पूल उडवून देऊ’, अशा धमक्या मिळत नाहीत. पुण्यात (व आजूबाजूच्या मोठ्या परिसरात) कंपन्या बंद पडल्या, नोकर्‍या मिळत नाहीत, वगैरे परिस्थिती सध्याही नाही आणि नजिकच्या भविष्यकाळात येईल असंही दिसत नाही. उलट, नोकरी-धंदा न करता निव्वळ बापजाद्यांच्या जमिनी विकल्या तरी आपल्यासहित पुढच्या काही पिढ्यांची सोय होऊ शकेल, अशी परिस्थिती. प्रत्येक धर्माला, जातीला किमान एक तरी प्रभावशाली नेता मिळालेला आहे, जो त्या-त्या सीझनमधे ‘आपल्या’ जन्तेला चुचकारायचं काम बिनचूक करतोय. इतक्या सुरक्षित आणि कम्फर्टेबल वातावरणात, मुळातच ‘सेन्स’चा अभाव असणार्‍या (खरंतर नॉन्सेन्सच म्हणायचं होतं) जन्तेला माज नाही चढणार तर काय होणार?

आता यावर उपचाराचे दोनच पर्याय -

पहिला, अस्थैर्य निर्माण करणं, जन्तेला पुन्हा दरिद्री बनवणं, बेसिक सर्व्हायवलसाठी स्ट्रगल करायला लावणं.

आणि दुसरा, हे स्थैर्य आणि ही सुबत्ता अशीच टिकवून, त्यांचा विवेकबुद्धीनं अधिक प्रगतीसाठी वापर करणं.

आता आम जनतेच्या व्याख्येत स्वतःलासुद्धा कन्सिडर करुन, यांपैकी कुठला पर्याय सोपा (किंबहुना शक्य) वाटतोय, सांगू शकाल?


Share/Bookmark

No comments:

Post a Comment