ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, April 13, 2014

एका इंटरव्ह्यूची गोष्ट


"सत्य कल्पनेहून रंजक असते"
(या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक असून प्रत्यक्ष जीवनातील व्यक्ती वा प्रसंगांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

"हॅलो, रजत शर्मा जी?"
"बोला, पंतप्रधान नरेन्द्रभाई..."
"अरे, अजून इलेक्शन व्हायच्या आहेत. भावी पंतप्रधान म्हणा..."
"इलेक्शन काय, होत राहतील हो. पण तुम्हीच आमचे पंतप्रधान! मोदी मोदी मोदी..."
"बास बास बास! गेले पाच-सहा महिने तेच ऐकतोय सारखं. तुम्ही अजून टेन्शन देऊ नका."
"तुम्हाला कसलं आलंय टेन्शन, नरेन्द्रभाई? तुम्ही तर स्वतःच देशातल्या सगळ्या प्रश्नांवर रामबाण उपाय आहात. जय श्रीराम."
"जय श्रीराम. जय श्रीराम."
"बरं, फोन कशासाठी केला होतात? काही विशेष काम माझ्याकडं?"
"हो तर. जरा विशेषच काम आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर कुठलातरी मुलाखतीचा कार्यक्रम चालवता ना?"
"हो हो, 'आप की अदालत'. त्यासाठीच तर एवढा फेमस आहे ना मी."
"काय म्हणालात? 'आप' की अदालत? बाप रे, तुम्हीपण 'आप'चा झाडू घेतला का काय हातात?"
"अहो नाही नाही नरेन्द्रभाई, ते केजरीवालचं 'आप' म्हणजे 'आम आदमी'चं. हे 'आप' म्हणजे आपल्या-आपल्यातलं. हॅ हॅ हॅ."
"हॅ हॅ हॅ, पण म्हणजे ते पत्रकार लोक घेतात तसलीच मुलाखत ना?"
"हो तसलीच, फक्त सेट असतो कोर्टाचा. आणि ज्याची मुलाखत घ्यायचीय त्याला आम्ही उभं करतो आरोपीच्या पिंजर्‍यात."
"अरे बापरे! कोर्ट? आरोपीचा पिंजरा?"
"पण तुम्ही कशाला घाबरताय नरेन्द्रभाई? तुम्हाला तर सुप्रिम कोर्टानं क्लीन चिट दिलीय ना?"
"अहो क्लीन चिट नाही ती शर्मा जी. 'सबळ पुराव्यांअभावी आरोप सिद्ध होत नाहीत', असं म्हटलंय. त्यामुळं अजूनही पुरावे बाहेर येऊ नयेत म्हणून खूप सावध रहावं लागतं हो."
"बरं बरं, ते मुलाखतीचं काय म्हणत होता तुम्ही?"
"हां, ते काँग्रेसवाले आणि 'आप'वाले सगळीकडं सांगत फिरतायत की, मोदी मुलाखतीला घाबरतो, मोदी पत्रकारांना घाबरतो."
"हॅ, एवढंच ना? मग घ्यायची एखादी जंगी पत्रकार परीषद. नाहीतर असं करा ना, तुम्हाला मुलाखत द्यायचीच आहे असं जाहीर करुन टाका एकदा. मग बघा तो करणसुद्धा तुमच्या मागं-मागं फिरेल मुलाखत घ्यायला..."
"......"
"हॅलो, हॅलो नरेन्द्रभाई! हॅलो..."
"हां हॅलो."
"ओह्‌, मला वाटलं फोन कट झाला की काय?"
"नाही, मी लाईनवरच आहे. जरा पाणी पिऊन घेतलं. ते करण थापरचं काय म्हणत होता तुम्ही?"
"कोण? मी? हां हां, ते करण थापर नाही करण जोहरचं म्हणत होतो मी. म्हटलं करण जोहरपण मागं-मागं फिरेल तुमची मुलाखत घ्यायला..."
"अच्छा अच्छा, करण जोहर काय? मला वाटलं पुन्हा करण थापर... बरं ते जाऊ दे, तुमच्या त्या आपल्या-आपल्या अदालतमधे का नाही बोलवत तुम्ही मला?"
"खरंच आयडीया चांगली आहे. नाही तरी तुम्हाला खूप चांगला टीआरपी मिळतोय सध्या. आमच्या चॅनेलचं तर नशीब उघडलं म्हणायचं. बोला, कधी ठेवायचा इंटरव्ह्यू?"
"ते ठरवू नंतर. आधी माझ्या काही अटी आहेत इंटरव्ह्यूसाठी, त्यावर बोलूयात का?"
"हो हो, नक्कीच! मला मान्य आहेत तुमच्या सर्व अटी..."
"अहो आधी काय अटी आहेत त्या ऐकून तरी घ्या!"
"बरं, बोला काय अटी आहेत तुमच्या?"
"त्या अरविंद केजरीवालनं सभा आणि पत्रकार परीषदा घेऊन खूप प्रश्न विचारुन ठेवलेत आधीच. त्यातला एकपण प्रश्न तुमच्या लिस्टमधे नसला पाहिजे."
"हो हो, मंजूर. सारखे-सारखे तेच-तेच प्रश्न विचारत असतो तो. मी जरा वेगळे प्रश्न विचारेन."
"छान. मी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवतोय लोकसभेची. एकाच मतदारसंघातून का नाही लढवत, असं विचारायचं नाही."
"मंजूर, तुम्ही दोनच काय ५४३ मतदारसंघांतून उभे राहिलात तरी नाही विचारणार."
"माझं लग्न, माझी बायको, मी आधीच्या निवडणुकांच्या वेळी ही माहिती का लपवली, यातलं काहीही विचारायचं नाही."
"कबूल, तुमचं लग्न ही तुमची खाजगी बाब आहे. त्यावर मी कशाला प्रश्न विचारेन. हां, पण गांधी फॅमिलीत कोण कुणाचा मुलगा, कोण कुणाची सून, यावर बोललं तर चालेल ना?"
"चालेल चालेल. पुढं ऐका. एका बाईवर पाळत ठेवायला सांगितली होती मी, खाजगी कारणातून. त्यावर अजिबात प्रश्न विचारायचा नाही."
"कारण खाजगी होतं ना, मग नाही विचारणार."
"अमित शाहबद्दल प्रश्न विचारायचा नाही."
"तोबा तोबा! अमित शाह, माया कोडनानीबद्दल बिल्कुल काही विचारणार नाही."
"छान! गॅसच्या किंमतीबद्दल मला विचारायचं नाही. अंबानीच्या रिलायन्सबद्दल पण विचारायचं नाही..."
"काळजीच करु नका. सांगितलं ना, केजरीवालनं विचारलेला एकपण प्रश्न रिपीट होणार नाही याची काळजी घेईन मी."
"येडीयुरप्पा, श्रीरामलू, पासवान यांच्याबद्दल चर्चा करायची नाही."
"नाही करणार. पण काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार, आदर्श घोटाळा, वगैरे?"
"हां त्यावर बोला सारखं-सारखं. झालंच तर मुलायमसिंगच्या गुंड मंत्र्यांबद्दल पण विचारा. फक्त अमित शाह, येडीयुराप्पा..."
"नाही नाही, त्यांची नावं नाही घेणार. एक काम करा नरेन्द्रभाई, तुम्हीच सांगा मी कुठले प्रश्न विचारु..."
"हां हे ठीकाय. असं विचारा की, राहुल गांधी हे म्हणाला त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? किंवा सोनिया गांधी तुम्हाला काहीतरी म्हणाल्या, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? किंवा मुलायम असं म्हणाला ते बरोबर आहे का? किंवा मोबाईलवर, फेसबुकवर 'अबकीबारमोदीसरकार' कसं गाजतंय, त्यावर चर्चा करा. अगदी खाजगीच प्रश्न विचारायचा असेल तर, माझे कपडे, ड्रेसिंग सेन्स, फॅशन डिझायनर, याबद्दल विचारा."
"ब्रिलियण्ट नरेन्द्रभाई! हा अगदी आगळावेगळा एपिसोड होणार आहे 'आप की अदालत'चा. पण मी काय म्हणतो, थोडेसे तरी विरोधी प्रश्न विचारावे लागतीलच मला. नाहीतर लोकांना शंका येईल, हा इंटरव्ह्यू आहे की तुमची सभा?"
"हं, बरोबर आहे तुमचं म्हणणं. असं करा, मला विरोध करणार्‍या अडवाणी, जसवंतसिंग, मुरली मनोहर जोशी, यांच्याबद्दल विचारा अवघड प्रश्न."
"हे चालेल. ठीकाय तर मग, मी तयार आहे. बोला कधी घ्यायचा इंटरव्ह्यू?"
"ते सांगतो मी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा."
"अजून काही राहिलं का नरेन्द्रभाई?"
"इंटरव्ह्यू सुरु झाल्यापासून संपेपर्यंत सारखा 'मोदी मोदी' असा घोष होत राहिला पाहिजे."
"एवढंच ना? तो तर मी आत्तापासूनच सुरु करतोय... मोदी मोदी मोदी..."
"धन्यवाद. भेटू या मग 'आप की अदालत'मधे!"


Share/Bookmark

No comments:

Post a Comment