नातं शब्दांपलीकडचं...
(मंदार शिंदे ९८२२४०१२४६)
साधारण १९९८-९९ च्या दरम्यानची गोष्ट आहे. वाचनाची आवड वाढत चालली होती. पंचतंत्र, अकबर-बिरबल, इसापनीती, रामायण-महाभारत वाचता-वाचता पुस्तकांचा आकार वाढत चालला होता. फास्टर फेणे आणि चंपक-चांदोबा मागं पडू लागले होते. मराठी साहित्याच्या पंगतीमध्ये ‘मृत्यंजय’ आणि ‘स्वामी’सारख्या पुरणपोळ्यांचा आस्वाद घेत होतो. त्याचवेळी वपुंच्या कथा सात्विक पोळीभाजीपासून चखण्यातल्या शेव-चकलीपर्यंतचे अनुभव देत होत्या. पुलंच्या पुस्तकांतून कधी साखर-फुटाणे तर कधी शिरा-भाताची तृप्ती लाभत होती. आणि अगदी त्याच काळात कडक तंदुरी चिकनचा अनुभव देणारं एक पुस्तक हाती लागलं. अर्पण पत्रिकेनंच निम्मा गड सर केला होता...
"त्या सर्व वाचकांना, ज्यांनी 'दुनियादारी' विकत घेतली, वाचनालयातून वाचली, मित्राची ढापली, वाचनालयाची पळवली... पण 'दुनियादारी'वर मनापासून प्रेमच केलं ! त्यांनाही, ज्यांनी 'दुनियादारी'च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला ! आणि... खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम 'कट्टा-गँग्ज'ना, ज्या 'दुनियादारी' जगल्या... जगतात… जगतील !"
येस्स ! ते पुस्तक होतं, सुहास शिरवळकर लिखित 'दुनियादारी'. हे पुस्तक पहिल्यांदाच वाचणाऱ्या सगळ्यांचं होतं, तसंच माझंही झालं. 'दुनियादारी'नं अक्षरशः गारूड केलं. दिग्या, श्रेयस, सुरेखा, शिरीन, श्रोत्री... अख्खी कट्टा गँग ओळखीची झाली. कित्येक प्रसंग अगदी आपल्याच आजूबाजूला घडलेत, घडत आहेत असं वाटू लागलं. मैत्री, प्रेम, धाडस, थ्रिल... यांभोवतीच विचार फिरु लागले. पुढं पुण्याला आल्यावर पहिलं काम काय केलं असेल तर, एस. पी. कॉलेजवर जाऊन 'दुनियादारी'तले प्रसंग री-लिव्ह करणं. दिग्याचा कट्टा, अलका टॉकीज, रीगलपासून ते शिरीनच्या बंगल्यापर्यंत सगळी ठिकाणं पायी फिरुन शोधली होती. शनिवार पेठेतल्या सुशिंच्या घरापर्यंतही पोहोचलो होतो, पण थेट घरात जाऊन त्यांना भेटायचं धाडस तेव्हा झालं नाही. सिनेमात किंवा सर्कशीत सिंहाचे खेळ बघायला आवडतात म्हणून कुणी 'चला, गुहेत जाऊन सिंहाची आयाळ खाजवून येऊ' असं म्हणेल का ? पण आता वाटतं, त्यावेळी धाडस करायला हवं होतं... असो.
तसं अगदीच वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, कारण सुहास शिरवळकरांशी माझी आधीच दोनदा भेट झाली होती. साधारण १९९९ साली काही महिन्यांच्या अंतरानं ते भेटले होते. निमित्त होतं त्यांच्या प्रकट मुलाखतीचं. पहिली भेट झाली सांगलीतल्या वि. स. खांडेकर वाचनालयात. सुशिंचा लेखन प्रवास, त्यांच्या पुस्तकांमागील प्रेरणा, रहस्यकथांपासून सामाजिक कादंबऱ्यांपर्यंत त्यांची अफाट साहित्य निर्मिती, अशा अनेक गोष्टींवर सुशि दिलखुलासपणे व्यक्त झाले. विशेष लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी म्हणजे सुशिंचं प्रवास-प्रेम आणि लेखन-शिस्त.
आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये गावांची, स्थळांची, हॉटेल्स आणि कॉलेजेसची, निसर्गाची एवढी हुबेहूब वर्णनं सुशि कशी करतात, हे मला पडलेलं कोडं होतं. तोपर्यंत कोवळीक, सालम, दास्तान वगैरे काही पुस्तकं वाचून काढली होती. पुणे-मुंबई हाय-वे वरची हॉटेल्स आणि ढाबे, पुण्या-मुंबईतलेच नाही तर राजस्थानातल्या गावांतल्या गल्ली-बोळांची डिटेल वर्णनं त्यांच्या कथांचा अविभाज्य भाग आहेत. सुशिंनी आपल्या लाडक्या 'बॉबी'वरून लांबलांबचा प्रवास कसा केला आणि आपल्या लेखनात त्याचा उपयोग कसा केला, हे त्यांनी मुलाखतीत मोकळेपणानं सांगून टाकलं.
दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, एकावेळी अनेक विषयांवर लेखन करण्याच्या पद्धतीची. तेव्हा आत्तासारखे कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधले स्टोअरेज आणि सॉर्टींगचे पर्याय उपलब्ध नव्हते. आज गुगल ड्राईव्हवर सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स आपण लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप अशा कुठल्याही माध्यमातून ऐक्सेस करू शकतो, कॉपी-पेस्ट, एडीट करू शकतो. पण या गोष्टी अस्तित्वात नसताना सुशिंनी एका शिस्तबद्ध पध्दतीनं अक्षरशः शेकडो पुस्तकं लिहिली. त्यांनी मुलाखतीत सांगितलं की, एका कथेवर काम सुरु असताना अचानक दुसराच प्रसंग किंवा कल्पना सुचली की ते वेगळ्या पानावर लिहून त्यांच्या शेल्फच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेऊन द्यायचे. पुढं त्या थीमवर लिहायला घेतलं की पाच-दहा प्रसंग आधीच लिहून झालेले असायचे. यामुळं कथा लिहून पूर्ण व्हायचा स्पीड वाढायचा आणि अचानक सुचलेली कल्पना हरवायची भीतीही नसायची. वाचकांसाठी आणि खास करून होतकरु लेखकांसाठी सुशिंच्या या टिप्स खूपच मोलाच्या होत्या.
सुशिंच्या मुलाखतीचा एक सेक्शन हमखास 'डेडीकेटेड टू दुनियादारी' असायचा. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं 'दुनियादारी'वर एकही प्रश्न विचारला नसल्यास श्रोत्यांमधून नक्की यावर प्रश्न यायचे. 'दुनियादारी सत्य घटनेवर आधारित आहे काय' अशा निरुपद्रवी चौकशांपासून ते 'दुनियादारीचा शेवट गोड नसता का करता आला' अशा तक्रारींपर्यंत सगळ्या प्रश्नांना सुशि हसतमुखानं सामोरे जायचे, प्रामाणिक आणि पटणारी उत्तरं द्यायचे. कसलाही साहित्यिक अभिनिवेश त्यांच्या बोलण्यात नसायचा. वि. स. खांडेकर वाचनालयातल्या त्या मुलाखतीदरम्यान तर ते 'दुनियादारी'बद्दल जास्तच खूष होऊन बोलले. अर्थात त्याला कारणही तसंच विशेष होतं. त्या मुलाखतीआधी काही दिवस मुंबईची एक तरुण कलाकारांची टीम त्यांना भेटून गेली होती. 'दुनियादारी'वर सिनेमा बनवायचं प्रपोजल घेऊन ते आले होते आणि नुसत्या प्रपोजलमुळं सुशिंना झालेला आनंद त्या मुलाखतीत प्रत्येकाला जाणवत होता.
मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर अनौपचारिक गप्पा झाल्या. सुदैवानं तेव्हा कुणाकडंच मोबाईल फोन नव्हते. त्यामुळं सेल्फीच्या चक्रव्यूहात न अडकता, ऑटोग्राफ करत असताना सुशिंसोबत खूप लोकांना बोलता आलं. मी मला आवडलेली पुस्तकं, प्रसंग, पात्रं याबद्दल थोडंसं बोललो. त्यांनी शांतपणे, लक्षपूर्वक ऐकून घेतलं. एक-दोन किस्से ऐकवले, न छापलेल्या काही 'बिहाईन्ड द सीन्स' गोष्टी सांगितल्या.
त्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा गणेश वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सुशिंच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलाखत नेहमीप्रमाणं झकास झाली. औपचारिक कार्यक्रम संपल्यावर इतर उपस्थितांसोबत मीही त्यांना भेटायला गेलो. मला बघितल्याबरोबर सुशि म्हणाले, "अरे, वि. स. खांडेकरमध्ये आपण भेटलो होतो ना ? सॉरी, मी तुझं नाव विसरलो." नाव विसरायला मी त्यांना माझं नाव सांगितलंच कुठं होतं ? तरी त्यांनी नुसता चेहरा लक्षात ठेऊन आपणहून ओळख दिली होती... अगदी अनपेक्षित ! त्यानंतर काही वर्षांनी सुशि गेल्याची बातमी कळाली तेव्हा थेट काळजात कळ उठली होती, ती मात्र अनपेक्षित नक्कीच नव्हती. छापलेल्या शब्दांच्या पलीकडं जाऊन त्यांनी आपल्या वाचकांशी नातं कसं प्रस्थापित केलं होतं, ते मी प्रत्यक्ष अनुभवू शकलो हे माझं भाग्यच !
No comments:
Post a Comment