पुण्यातल्या नांदेड सिटीच्या 'प्रक्रिया वाचन कट्ट्या'ला आज आले होते गोगलगाय, ससोबा, उंट, रंगीबेरंगी किडा आणि हिप्पोपोटॅमस असे वेगवेगळ्या आकाराचे प्राणी. मुलांनी यातल्या काही प्राण्यांना प्रत्यक्ष बघितलं होतं, तर काहींना फक्त चित्रात किंवा टीव्हीवर. पण एक मुलगा म्हणाला की त्याच्या घरीच ससा आहे, तोपण पेरु खाणारा. मग दुसरा मुलगा म्हणाला की त्याच्याकडे चक्क उंट आहे, जो खातो केळी. हा त्याला केळावरचं 'कव्हर' काढून मगच केळं खायला देतो, असंही सांगितलं. तिसऱ्या मुलानं तर सांगितलं की त्याच्याकडं उंट आणि ससा नाहीये, पण हिप्पोपोटॅमस आहे, ऑरेन्ज आणि मॅन्गो खाणारा...
आईचा राग आला म्हणून घर सोडून निघालेल्या ससोबाची गोष्ट ऐकताना एका मुलाला त्याच्या आईची आठवण आली आणि तो मधेच रडू लागला. मग त्याच्याच वयाच्या दुसऱ्या मुलानं याची समजूत काढली की, गोष्ट संपल्यावर आई न्यायला येणार आहे, त्यात काय रडायचं, माझीपण आई इथं नाहीये, मी बघ रडतोय का!
मागच्या वेळी धनकवडीतल्या कट्ट्याला मुलांशी झाडांबद्दल गप्पा मारल्या. कुणी चिक्कुच्या झाडावर चढलेलं होतं, तर कुणी आंब्याच्या. कुणी झाडावरुन फळं काढून खाल्ली होती, तर कुणी फांदीवरुन उड्या मारलेल्या होत्या. कुठल्या-कुठल्या झाडावर चढलो होतो हे सांगण्याच्या स्पर्धेत काही मुलांनी नारळाच्या झाडावर चढल्याचा दावासुद्धा केला.
माशाच्या आकाराच्या ढगाची गोष्ट सांगताना मुलांना त्यांनी बघितलेले ढगांचे आकार आठवत होते. कुणाला ढगात हत्ती दिसला होता, तर कुणाला कारचा आकार दिसला होता. डोंगर चढून गेल्यावर ढग खाली उतरल्यासारखे दिसतात, हा अनुभवसुद्धा एका मुलीनं सांगितला.
पेपर टाकणाऱ्या मुलाची गोष्ट ऐकताना मुलं विचारात पडली होती की, सगळे पेपर टाकणारे काका आणि दादा सकाळीच पेपर का टाकतात, दुपारी किंवा संध्याकाळी का नाही टाकत? पेपर 'टाकण्याची' त्यांची पद्धतसुद्धा मुलांना गमतीची वाटत होती. असाच सुरळी करुन टाकलेला पेपर थेट आपल्या डोक्यावर येऊन आपटल्याची गंमत एका मुलीनं सांगितली.
मुलांना गोष्टी सांगता-सांगता त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा येते. तुम्हाला आवडतात का अशा गप्पा-गोष्टी?
- मंदार शिंदे ९८२२४०१२४६