कोरोना घातक आहे, काळजी घेतली पाहिजे, वगैरे ठीक आहे. पण फोन लावला की खोकल्याचा आवाज आणि मिडीयामध्ये सारखे रुग्णांचे आकडे, हे जरा अतीच व्हायला लागलंय, नाही का?
मागे स्वाईन फ्ल्यू आला तेव्हा पेपरमध्ये 'डेली काउंट' प्रसिद्ध केला जायचा.
"रुग्णांची संख्या २५ च्या वर..."
"पुण्यात ३० वा रुग्ण आढळला..."
"राज्यात एकूण रुग्णांची संख्या ५२..." वगैरे वगैरे.
काही वर्षांपूर्वी असेच 'डेली काउंट' शेतकरी आत्महत्त्येचे दिले जायचे. आणि सोशल मिडीया यायच्या आधी एका वर्षी तर 'दहावी परीक्षेतील अपयशाने आत्महत्त्या'देखील ट्रेन्डीन्ग केल्या होत्या पेपरवाल्यांनी...
आज पुण्यात २ आत्महत्त्या, काल नागपुरात ३ आत्महत्त्या, परवा लातुरात ४ आत्महत्त्या, राज्यात एकूण १७ आत्महत्त्या, वगैरे वगैरे.
मग अचानक हा काउंट बंद झाला. म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या थांबल्या का? मिडीयालाच ठाऊक!
दहा-एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीहून पुण्याला बसने प्रवास करत होतो. रात्री साडेअकराला ट्रॅव्हल्सची बस निघाली. स्वाईन फ्ल्यू पासून बचाव कसा करावा, यावर मेसेज फिरत होते त्यावेळी. बसमध्ये सुद्धा चर्चा सुरु होती. 'पुण्यापर्यंत आलाय म्हणे स्वाईन फ्ल्यू...' अशी बातमी होती.
बस सांगलीमधून निघाली आणि थोड्या वेळात दिवे बंद झाले, निजानीज झाली. कात्रज नवीन बोगद्यापर्यंत बस पोहोचली तेव्हा जाग आली. आजूबाजूला बघितलं तर माणसं मास्क लावून बसली होती. होय, तेच पाच-दहा रुपयांना रस्त्याच्या कडेला विकत मिळणारे कापडी हिरवे मास्क! म्हणजे पुण्याची हद्द सुरु झाली की व्हायरसचं इन्फेक्शन सुरु होणार याची केवढी ती खात्री.. आणि जागतिक दर्जाच्या व्हायरसला थोपवण्यासाठी पाच रुपयांच्या मास्कवर किती तो विश्वास...
मिडीयाला चढलेला कोरोना फीवर उतरेपर्यंत व्हॉट्सऐपवरच बोलू आपण. बाकी काही नाही, पण त्या व्हायरसची वाटत नाही एवढी भीती कानात कुणीतरी खोकण्याची वाटते. समजून घ्या...
बाय द वे, ८ः५० च्या शोची तिकीटं काढली असतील तर किती वाजता थिएटरमध्ये पोहोचावं, म्हणजे हॉस्पिटल के बाहर खडे होकर फू फू करनेवाला नंदू आणि फेफडे की बीमारीचा एक्स-रे बघणं टाळता येईल? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावं ही विनंती!
No comments:
Post a Comment