ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Monday, October 11, 2021

Blogger Naming Pattern

फार पूर्वी, म्हणजे साधारण पंधरा ते वीस वर्षांपूर्वी, शिकलेल्या लोकांमध्ये डायरी लिहिण्याची पद्धत होती. दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना किंवा त्यावर आपली मतं मांडायचं ते एक हक्काचं व्यासपीठ होतं. अर्थात कित्येकांच्या डायऱ्या त्यांच्यानंतर फार तर घरातल्या इतर लोकांनी वाचल्या असतील किंवा न वाचताच रद्दीत किंवा कचऱ्यात टाकून दिल्या असतील. काही मोजक्याच डायऱ्यांना आत्मचरित्र किंवा चरित्रामध्ये रुपांतरित व्हायचं भाग्य लाभलं असेल. पण तो आपल्या चर्चेचा विषय नाही.

मागच्या पंधरा-वीस वर्षांमध्ये डायरीमधल्या नोंदी बंद वहीतून थेट इंटरनेटवर आल्या, ब्लॉगच्या रूपानं. सुरुवातीपासून गुगलची ब्लॉगर किंवा ब्लॉगस्पॉट ही सर्व्हीस वापरायला सोपी आणि लोकप्रिय राहिली आहे. त्या पाठोपाठ वर्डप्रेस आणि मग आता मिडीयमसारख्या अनेक सेवा उपलब्ध झाल्या आहेत. पण अजूनही ब्लॉगरची लोकप्रियता आणि वापर फारसा कमी झाल्यासारखं वाटत नाही. ब्लॉगवर असंख्य प्रकारचं लेखन दररोज प्रसिद्ध केलं जात असतं, तेसुद्धा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये. ब्लॉगवर एखादी पोस्ट प्रसिद्ध (पब्लिश) केल्यावर ती शेअर करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्या पोस्टचा पत्ता किंवा युआरएल.

ब्लॉगरचा स्वतःचा एक युआरएल नेमिंग पॅटर्न असतो. तुमच्या ब्लॉगच्या टायटलमध्ये तुम्ही इंग्रजीत (रोमन लिपीत) शीर्षक टाईप केलं, तर -

ब्लॉगचा पत्ता / वर्ष / महिना / पोस्टचे शीर्षक आणि शेवटी डॉट एचटीएमएल

असं युआरएल तयार होतं.

उदाहरणार्थ, ५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या पोस्टचं शीर्षक 'Friends Forever' असं असेल तर, त्या पोस्टचं युआरएल असेल -

https:// yourblogname.blogspot.com/ 2021/10/ friends-forever.html

पण पोस्टचं टायटल मराठीत (देवनागरी किंवा रोमन व्यतिरिक्त कोणत्याही लिपीत) टाईप केलेलं असेल, तर ब्लॉगरला त्यातून कोणताही शब्द/अक्षर युआरएलमध्ये घेता येत नाही. मग अशा पोस्टसाठी -

ब्लॉगचा पत्ता / वर्ष / महिना / blog-post_तारीख आणि शेवटी डॉट एचटीएमएल

असा पॅटर्न वापरला जातो. यापैकी blog-post च्या पुढं अंडरस्कोअर ( _ ) चिन्हानंतर दोन आकड्यात पोस्ट प्रसिद्ध केल्याची तारीख दिली जाते. म्हणजे, ९ तारखेला blog-post_09 आणि २७ तारखेला blog-post_27.

पण या पॅटर्नमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण होते, जेव्हा -

* एकाच दिवशी एकापेक्षा जास्त पोस्ट प्रसिद्ध केल्या जातात; किंवा
* एखादी पोस्ट प्रसिद्ध (पब्लिश) करून डिलीट केली जाते आणि पुन्हा नव्यानं ड्राफ्ट करून प्रसिद्ध केली जाते.

यापैकी पहिल्या केसमध्ये, blog-spot_2439 किंवा blog-spot_792 असे आकडे दिले जातात. हे आकडे रँडमली टाकले जातात की त्याला पुन्हा वेळ, तास, मिनीट, असा काही संदर्भ असतो, हे नक्की माहिती नाही; त्यामुळं सध्या अशी रँडम उदाहरणं दिली आहेत.

दुसऱ्या केसमध्ये, ८ ऑक्टोबरला पहिल्यांदा प्रसिद्ध केलेल्या पोस्टला समजा blog-post_08 असा युआरएल दिला होता आणि तुम्ही ती पोस्ट डिलीट करून पुन्हा प्रसिद्ध केली, तर blog-post_8 असा युआरएल देऊन तारखेचा संदर्भ टिकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण हीच पोस्ट २९ तारखेला केली असती, तर कदाचित दुसऱ्यांदा प्रसिद्ध केलेल्या पोस्टला रँडम आकडाच द्यावा लागला असता.

यामागचं कारण विचारात घ्यायचं तर, blog-post_08 ही पोस्ट तुम्ही तुमच्याकडून डिलीट केली तरी ब्लॉगरच्या आर्काइव्हमध्ये काही काळ ती पोस्ट साठवून ठेवली जाते. त्यामुळं तिला एकदा मिळालेलं युआरएल लगेच दुसऱ्या पोस्टला देता येत नाही.

रोमन लिपीव्यतिरिक्त इतर लिप्यांमध्ये टायटल टाईप केलं असल्यास वर सांगितलेला पॅटर्न वापरला जातो; पण संबंधित महिन्यातल्या पहिल्या पोस्टसाठी युआरएलमध्ये तारीख टाकली जात नाही. तिथं फक्त /blog-post.html असं युआरएल दिसतं.

लिंक किंवा युआरएल बघून ती कशाबद्दल आहे हे समजण्यासाठी पोस्टचं टायटल रोमन लिपीत टाईप करणं आवश्यक आहे, हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. तसंच, लिंक बघून एखादी पोस्ट शोधायची असल्यास रोमन लिपीतलं टायटलच उपयोगी पडतं, मग पोस्ट कुठल्याही भाषेत/लिपीत का असेना.

- मंदार शिंदे
९८२२४०१२४६



Share/Bookmark

No comments:

Post a Comment